Categories
चळवळ व्यक्तिविशेष

एन. डी. सर: डाव्या चळवळींचे ऊर्जास्रोत

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

एन.डी. : माणसांतला माणूस रावसाहेब कसबे

1957 साल, मी सहावी-सातवीत असेन. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात होती. आम्ही चळवळीतील नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी जात असू. शेतकरी कामगार पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत इतर डाव्या पक्षाबरोबर आघाडीवर होता आणि त्यावेळेस शेकापचे एन.डी. पाटील या तरुण नेत्याचे भाषण आमच्या दृष्टीने आकर्षणाचे असायचे कारण ते ज्या प्रकारची मांडणी करायचे, इतिहास सांगायचे ते आमच्या दृष्टीने एकदम नवीन असायचे. ही आमची एन.डीं.ची पहिली ओळख; पण ही एकतर्फी होती. त्यांची आणि माझी परस्परांची खरी ओळख झाली ती ते शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना! त्यानंतर अनेक परिसंवादात आम्ही एकत्र सहभागी असायचो. त्यांच्याबरोबर सहभागी होताना मी नेहमी व्यवस्थित तयारी करूनच जायचो. कारण वाटायचे चुकीचे काही बोललो तर एन.डी. चिडतील; पण पुढे पुढे जसा परिचय वाढत गेला तशी भीड चेपत गेली. आमच्या परिचयाचे रूपांतर त्यांच्या बरोबरच्या मैत्रीतच झाले.

एन.डी. शेतकरी-कामगार पक्षाचे नेते आहेत, ते कट्टर मार्क्सवादी, तरी त्यांच्याकडे एक व्यापक दृष्टिकोन आहे. त्यांनी महात्मा फुल्यांना आपल्या गुरूस्थानी मानले. एखाद्या मार्क्सवाद्याने महात्मा फुल्यांना आपले गुरू मानणे ही गोष्ट जगातल्या समाजवादी चळवळीत अतिशय वेगळ्या प्रकारची आहे; पण एन. डीं.च्या बाबतीत ती घडली. मार्क्स-एंगल्सने लिहिलेला कम्युनिस्ट जाहीरनामा वाचल्यावर तुम्हाला जग समजते, भांडवलशाही समजते, त्यातील अंतर्विरोध समजतात, मनुष्य जात समजते; परंतु भारतातातील परिस्थिती वेगळी होती, ती वेगळी केली आहे जातीव्यवस्थेने, जिला येथील धर्मव्यवस्थेने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे जगात क्रांती करायची असेल, तर कम्युनिस्ट जाहीरनामा ठीक आहे; पण भारतात क्रांती करायची तर बाबासाहेब आंबेडकरांचे ‘अनहीलेशन ऑफ कास्ट’ हा ग्रंथ अभ्यासलाच पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण लिखाण अभ्यासले पाहिजे, हे एन. डीं.च्या लक्षात आले आणि त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांनी भारतीय राजकारणाला जी दिशा दिली होती, त्या दिशेने आपला पक्ष नेण्याचे काम केले. त्यासाठी जातीसंस्थेची, वर्गसंस्थेची चिकित्सा करत जात आणि वर्ग यामधील अंतर्विरोध कसे मिटवायचे याच्यासंबंधी एन. डीं.नी केलेले चिंतन महत्त्वाचे आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन हे या देशात किती आवश्यक आहे याची कल्पना जी काही फारच थोड्या राजकीय नेत्यांना होती त्यामध्ये एन. डी. होते. डाव्या चळवळीतील जे ब्राह्मणेतर नेते होते त्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाची निकड चांगलीच भासत होती. त्यामुळे एन. डी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी स्थापनेपासून असणे साहजिकच होते. एन. डी. तळागाळातून, बहुजन समाजातून आलेले असल्याने अंधश्रद्धेचे आव्हान किती मोठे आहे, याची कल्पना त्यांना आहे. अंधश्रद्धेविरोधात बोलणे म्हणजे आपली मते घालवणे, याची त्यांना जाणीव होती; पण आपल्या विचारात आणि सार्वजनिक, वैयक्तिक आचारात सुसंगती राखत त्यांनी हे आव्हान आजतागायत पेलले आहे.

एन. डीं.चा विचार करता एक गोष्ट आपल्याला नक्की जाणवते, ती म्हणजे ते सतत लढत राहिले आहेत. पूर्वी आम्ही एन. डीं.चा पत्ता सांगायचो, ‘मु.पो. एस.टी.’ सतत भ्रमंती, तीसुद्धा एस.टी. ने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला त्यांनी. मला वाटते एन. डीं.ना गाडी दिली ती रयत शिक्षण संस्थेने. एन. डीं.नी अनेक लढे लढविले; पण त्यांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा लढा जो ते अजूनही लढत आहेत, तो आहे सीमावादाचा. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला; पण निपाणी, बेळगाव, कारवार हा मराठी भाषिक परिसर मात्र कर्नाटकाशी जोडला गेला. तो पुन्हा महाराष्ट्रात यावा यासाठी एन. डी. रस्त्यावर, न्यायालयात सतत लढत आहेत, त्यांच्याबरोबरच्या प्रत्येक भेटीत या विषयावर चर्चा होतच राहते.

कर्मवीर भाऊराव पाटलानी सुरू केलेल्या ‘रयत शिक्षण संस्थे’मुळे महाराष्ट्रातील केवळ साक्षरताच वाढली असे नव्हे, तर त्या संस्थेने बहुजन समाजात महाराष्ट्रातील एक सुशिक्षितांचा वर्ग निर्माण केला. अशा या ‘रयत’मध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचा वारसा एन. डीं.नी समर्थपणे चालवला. ‘रयत’मधील एन. डीं.च्या अफाट कामाची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे.

एन. डी. हे ‘माणसातला माणूस’ आहेत. सतत त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा, जनतेचा गराडा; पण त्या लोकानुनयासाठी त्यांनी विचार आणि आचार यात कधीच फारकत केली नाही किंवा जवळचे नातेवाईक सत्तेच्या मोठमोठ्या पदांवर असूनही कधी त्याचा फायदा त्यांनी आपल्या संसारासाठी, पक्षासाठी घेतला नाही. कोणतीही भीडमुर्वत न ठेवता आपली मते मांडायची हे त्यांचे वैशिष्ट्य. अनेक राजकीय नेत्यांना आपल्याभोवती खुशमस्करे लागतात; पण एन. डी. त्यापासून खूप दूर राहिले. स्तुती आणि टीकेला त्यांनी फारसे महत्त्व दिले नाही. सतत आत्मपरीक्षण करीत राहिले. सभोवतीच्या माणसातील गुणवत्ता शोधत राहिले आणि त्या गुणांचा चळवळीसाठी उपयोग करून घेत राहिले. जो नेता सतत आत्मपरीक्षण करीत आपल्या युगाचे प्रश्न समजावून घेतो व त्याप्रमाणे आपल्यात बदल करून घेतो, तो नेता खरा ‘द्रष्टा’ नेता आणि एन. डी. असे ‘द्रष्टे नेते’ आहेत. असे नेते आता दुर्मिळ झाले आहेत.

एन. डीं.चे हसणे अतिशय निरागस असे आहे; पण असेही वाटते ते एकदा चिडले की, अजिबात माफ करणार नाहीत; पण एखाद्यावर प्रेम करतील, तर अगदी भरभरून प्रेम करतील. मी त्याचा अनुभव अनेकवेळा घेतलेला आहे. एन. डीं.ना काही वर्षांपूर्वी जेव्हा राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांना पुरस्कार स्वीकारण्यासंदर्भात अगोदर विचारले गेले, तेव्हा त्यांनी संयोजकांना अट घातली, ‘मी पुरस्कार स्वीकारेन पण तो रावसाहेब कसबे यांच्याच हस्ते.’ मला संयोजकांचा फोन आला, ‘एन. डीं.ना शाहू पुरस्कार मिळाला आहे आणि त्यांनी तो पुरस्कार तुमच्याच हस्ते स्वीकारण्याची अट घातली आहे.’ एन.डी. माझे वरिष्ठ, 17-18 वर्षांनी मोठे, गुरूच माझे ते. मी एकदम अवघडून गेलो; पण एन. डी. ऐकेनात. एन. डीं.नी तो पुरस्कार स्वीकारावा, अशी माझी नितांत इच्छा असल्याने मी होकार दिला. त्याच समारंभात एन. डीं.नी जाहीर केले ‘आता यापुढे मी कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही. हा माझा शेवटचा पुरस्कार.’ आज एन. डी. नव्वदीत प्रवेश करीत आहेत. त्यांना प्रदीर्घ असे आयुष्य लाभले आहे. महाराष्ट्रात ज्या काही प्रागतिक, पुरोगामी, डाव्या संस्था, चळवळी आहेत त्यांचा आधारवड एन. डी. पाटील आहेत. त्यामुळे या सर्व चळवळींना, संस्थांना जर कोणाचा वारसा जपायचा असेल, तर तो एन. डीं.चाच वारसा जपायला हवा, तरच आपण आपल्या विचारांशी कधी प्रतारणा करणार नाही, सतत संघर्षशील राहू, असे मला वाटते. अशा या आधुनिक महाराष्ट्राच्या जडण-घडणीत मोठे योगदान असलेल्या महान व्यक्तिमत्त्वाला यापुढील आयुष्यही सुखी व आरोग्यसंपन्न जावो, अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो.