Categories
अभिवादन

शाहू महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन

जून - २०१८

26 जून शाहू जयंतीनिमित्त विशेष लेख!

महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. शाहू महाराज हे एक संस्थानिक होते. 2 एप्रिल 1894 रोजी महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली आणि 28 वर्षे त्यांनी राज्यकारभार केला. या 28 वर्षांत त्यांनी सर्व क्षेत्रांत प्रचंड काम केले. कोल्हापूर संस्थानचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. शाहू महाराज गादीवर आले, त्यावेळी बहुसंख्य कष्टकरी जनता विद्येला वंचित होती. अज्ञान, अंधश्रद्धा, वेडगळ समजुती आणि दारिद्य्र यामुळे सर्व प्रगती खोळंबून गेली होती. गादी मुखत्यारपत्र हाती येताच शाहू महाराजांनी आपल्या प्रजेची स्थिती डोळ्यांनी पाहण्याच्या उद्देशाने सबंध संस्थानचा दौरा आखला. शेतकरी, शेतमजूर आणि बारा बलुतेदार यांच्या मुला-बाळांसाठी शाळा नाहीत. अस्पृश्यांना पशूपेक्षाही निकृष्ट पद्धतीची वागणूक दिली जाते, हे त्यांच्या ध्यानात आले. अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता या तीन व्याधी निपटून काढल्याशिवाय आपल्या प्रजेचा विकास होऊ शकणार नाही, ही खूणगाठ बांधून शाहू महाराजांनी आपल्या कार्याला सुरुवात केली.

शाहू महाराजांची भाषणे

शाहू महाराजांनी ठिकठिकाणी केलेली भाषणे, त्यांनी संमत केलेले पुरोगामी कायदे, प्रसारित केलेली आज्ञापत्रे या सर्वांमधून त्यांचे क्रांतिकारक विचार प्रगट झाले आहेत.

खामगाव येथील मराठा शिक्षण परिषदेत केलेल्या भाषणात शाहू महाराजांनी शिक्षण घेतल्याशिवाय आपला समाज शहाणा होणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

शाहू महाराज बहुजन समाजाचे पुढारी होते. जातिसंस्था मोडल्याशिवाय आपला समाज सुधारणार नाही, असे शाहू महाराजांचे मत होते. अस्पृश्यता पाळणे, हे माणुसकीला सोडून आहे, असे त्यांना वाटे. 1920 साली नाशिक येथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेत भाषण करताना महाराजांनी हे मत ठासून मांडले आहे.

स्वदेशाभिमान म्हणजे परकियांचा द्वेष करणे नव्हे, तर स्वकियांबद्दल प्रेम वाटून त्यांना समतेने वागविणे होय. हा शाहू महाराजांचा विचार आजही महत्त्वाचा आहे. हिंदुस्थानातील कुर्मी क्षत्रियांच्या तेराव्या परिषदेपुढे ते म्हणाले, “नुसत्या जन्माने क्षत्रिय अगर ब्राह्मण झालेल्या लोकांचा आता कोणी आदर करणार नाही. आपण गुणकर्माने क्षत्रिय व्हा. नावाच्या क्षत्रियांच्या यादीत तुमच्या नावाची भर घालू नका. तसेच आम्ही पूर्वी क्षत्रिय होतो; अमूक वंशात आम्ही जन्मलो वगैरे वितंडवादात पडू नका.” (शाहू महाराजांची भाषणे पृ. 48) शाहू महाराजांनी जातिपरिषदेमुळे जातिभेद तीव्र होऊ नयेत, असा विचार मांडला आहे. ते म्हणतात – “सर्व जातीच्या पुढार्‍यांना माझे सांगणे आहे की, आपली दृष्टी दूरवर ठेवा. पायापुरते पाहू नका. जातिभेद मोडणे इष्ट आहे, जरूर आहे. जातिभेद पाळणे, हे पाप आहे. देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे. हा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहिजेत, ही जाणीव पक्की ध्यानात ठेवा.” (राजर्षी श्री शाहू महाराजांची भाषणे पृ. 65)

1920 मध्ये नाशिक येथे श्री उदाजीराव मराठा वसतिगृहाच्या इमारतीच्या पायाभरणीप्रसंगी पाहुणे म्हणून भाषण करताना – “जातिभेद मोडून आपण सर्व एक होऊया!” असे आवाहन शाहू महाराजांनी केले आहे.

आर्य धर्म परिषदेच्या 11 व्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानावरून छत्रपती शाहू महाराजांनी केलेले भाषण अखिल भारतात गाजले. खर्‍या वैदिक मानवतावादी धर्माच्या स्वरुपावर भिक्षुकशाहीने अनेक कर्मकांडे आणि जातीयवाद निर्माण करून हिंदू समाजास अज्ञानात ठेवले, असे सांगताना महाराज म्हणतात, “वेद प्रतिपादित खर्‍या आर्य धर्मावर अनेक पुटे चढल्याकारणाने त्याचे शुद्ध स्वरूप दिसेनासे झाले. धर्मग्रंथांचा अभ्यास लबाड-बनावटी भटजींच्या टीका, भाष्ये वगैरेंच्या आधाराने होऊ लागल्याने प्राचीन सिद्धांत बरोबर समजेनात. मनुष्याचे बुद्धीस नीचपापाप्रत नेणारी हलक्या प्रकारची मूर्तिपूजा फार वाढली. त्या मूर्तीचे पूजक आपणास पवित्र म्हणवून घेऊ लागले. ब्राह्मणत्व वास्तविक पाहता गुणकर्मावर अवलंबून असावयाचे, ते जातीवर येऊन बसले. तीर्थांचे काल्पनिक महात्म्य वाढविण्यात आले. त्यामुळे तेथील नामधारी ब्राह्मणास विपुल मिष्टान्न मिळू लागून द्रव्यप्राप्तीही फार होऊ लगाली. त्यांच्यात आळस व दुर्व्यसने वाढून त्यांना विद्या शिकण्याचे अगत्य वाटेनासे झाले. मनुष्य जन्मल्यापासून तो मरेपर्यंत त्यांचेकडून निरनिराळे रुपाने पैसे मिळविण्याकरिता व्रते, दाने वगैरे विषयींचे ग्रंथ तयार केले गेले. इतकेच नव्हे, तर मेल्यावरही मृतास पोचविण्याकरिता म्हणून श्राद्ध, म्हाळ, दान वगैरे मिळावे, याकरिता गरुड पुराणासारखे गारुडी ग्रंथ तयार झाले. याप्रमाणे अज्ञान्यांच्या पैशावर ब्राह्मण म्हणविणार्‍यांची चंगळ उडाल्याने ब्राह्मणातील विद्या नष्ट होत चालली. आपले व आपल्या संततीचे व्यवस्थित चालले पाहिजे, या बुद्धीने ब्राह्मणेतरांची ही विद्या त्यांचेकडून बंद करण्यात आली. पुढे फलज्योतिषशास्त्र वाढवून निरनिराळ्या ग्रहांची भीती घालून पैसे उपटण्याच्या युक्त्या निघाल्या. अमूक दिवस चांगला व अमूक दिवस वाईट, अमक्या दिवशी प्रवास करावा, लग्न, उपनयन वगैरे अमूक मुहुर्तावर व्हावे, अशी थोतांडे काढून अनेक वेडगळ धर्मसमजुतींचा पगडा जनसमाजावर बसविला गेला. “उपाध्याय सांगेल ती पूर्वदिशा व भट सांगेल ती अमावस्या” असे झाल्याने भट सांगेल तसे निमूटपणे वागणे हा आपला धर्म आहे व यानेच ईश्वर प्रसन्न होतो व आपले कल्याण होते, अशी ब्राह्मणेतरांची समजूत झाली व निव्वळ नंदीबैलाचे स्थितीस ते आले.” (राजर्षी श्री शाहू महाराजांची भाषणे पृ. 29-30)

वेळोवेळी विविध सामाजिक संघटनांच्या विचारपीठावरून शाहू महाराजांनी अनेक सामाजिक विषय व समस्या यांचा ऊहापोह करून आपले पुरोगामी विचार मांडले आहेत. यामध्ये जातिभेद, अस्पृश्यता निर्मूलन, वर्णव्यवस्था, बौद्धिक स्वातंत्र्य, विद्येचा महिमा, पडदा पद्धत, विधवा विवाह, सामाजिक नीतिमत्ता, शेती व शेतकरी, कारखानदारी, सहकार, मजूर, मजूर संघ इत्यादी अनेक धार्मिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक विषयांचा समावेश आहे.

पुरोगामी कायदे

शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात केलेले कायदे त्यांच्या पुरोगामी राज्यकारभाराचे निदर्शक आहेत.

1) सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा

2) आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास व नोंदणी पद्धतीस मान्यता देणारा कायदा

3) स्त्रियांच्या छळवणुकीस प्रतिबंध करणारा कायदा

4) विविध जातीधर्मियांसाठी कोल्हापूरचा काडीमोड कायदा

5) अनौरस संतती व जोगतिणीविषयी कायदा

बहुजन समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रथम त्यांच्या मनातील अज्ञान दूर करणे महाराजांना आवश्यक वाटत होते; पण ‘शिक्षण घेणे हे आपल्यासाठी नाहीच,’ अशी बहुजन समाजामध्ये अंधश्रद्धा होती. त्यासाठी महाराजांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.

आंतरजातीय विवाहाचा कायदा करून महाराज थांबले नाहीत, तर त्यांनी इंदूरच्या धनगर समाजातील राजघराण्याशी आपल्या घाटगे घराण्याचे सोयरसंबंध जुळवून आणले. मराठा-धनगर अशी शंभर लग्ने घडवून आणावयाची, त्यांना जमीनजुमलाही द्यावयाचा, अशी महाराजांची योजना होती. शाहू महाराज व तुकोजीराव होळकर यांच्यामध्ये तसा पत्रव्यवहारही चालू होता. सुरुवातीस 25 विवाह महाराजांनी जमवले होते. पुढे घडून आलेल्या घाटगे-होळकर विवाहाची पार्श्वभूमी महाराजांनी अशी तयार करून ठेवली होती.

स्वातंत्र्योतर काळात भारतामध्ये राष्ट्रहिताच्या म्हणून ज्या-ज्या गोष्टी अग्रक्रमाने केल्या जात आहेत, त्या या राजाने विसाव्या शतकाच्या प्रारंभी देश परतंत्र असतानाही आपल्या छोट्याशा संस्थानात निग्रहाने केल्या होत्या.

शाहू महाराजांच्या कार्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन

आपल्या कारकिर्दीत शाहू महाराजांनी प्रचंड कार्य केले. त्यामधील काही ठळक घटनांमागील वैज्ञानिक द़ृष्टकोन विचारात घेता येईल.

प्रधानावर राज्यकारभार सोपवून राजाने ख्यालीखुशालीत राहण्याचा प्रघात त्या काळी होता. तो शाहू महाराजांनी मोडला. राज्यावर येण्यापूर्वी त्यांनी संस्थानात, देशात आणि नंतर परदेशात सतत अभ्यासदौरे काढून वस्तुस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले.

राज्यात दुष्काळ आणि प्लेग ही दोन संकटे आली, त्यावेळी या संकटांचा मुकाबला करताना शाहू महराजांनी जे अपारंपरिक आणि अभिनव निर्णय घेतले, ते त्यांची विज्ञाननिष्ठा सिद्ध करतात. दुष्काळात रयत, अपंग, वृद्ध, बालके; इतकेच नव्हे, तर गुरा-ढोरांचेही प्राण त्यांनी वाचविले. एकही भूकबळी पडू दिला नाही. प्लेगबळींची संख्याही नगण्य होती. प्लेग निवारणार्थ शाहू महाराजांनी ज्या उपाययोजना केल्या, त्या वैद्यकशास्त्राने सुचविलेल्या होत्या.

पन्हाळा पेट्यात चहा/कॉफीची लागवड करण्याचा प्रयोगही शाहू महाराजांनी केला होता; पण तो तितका यशस्वी झाला नाही.

सोनतळी कॅम्पवर शाहू महाराजांनी जनावरांच्या पैदाशीसाठी एक ‘पॅडॉक’ वसविलेली होती. जनावरांच्या काही उत्तम जाती त्यांनी या प्रयोगातून तयार केल्या. घोडा आणि गाढव यांच्या संकरातून खेचराच्या काही जाती त्यांनी तयार केल्या होत्या. घोडे आणि कुत्री यांच्या अनेक संकरजाती त्यांनी निर्माण केल्या. पक्षीसंकराचेही प्रयोग त्यांनी केले होते. ‘पावलोव’ नावाचा रशियन प्राणिशास्त्रज्ञ याच काळात कुत्र्यांवर प्रयोग करीत होता. पावलोवला पुढे नोबेल पारितोषिक मिळाले. शाहू महाराजांनी हेच प्रतिक्षेप नियंत्रणाचे प्रयोग घोड्यावर केले. ते यशस्वी झाले. हा पॅडॉक म्हणजे ‘जीव अभियांत्रिकीची प्रयोगशाळा’ होती. (शाहू महाराज आणि वैज्ञानिक द़ृष्टिकोन – प्रा. कमलाकर दीक्षित रा. शा. स्मारक ग्रंथ पृ. 415)

शाहू महाराजांनी मानवावरही प्रयोग केले. त्यांचे हे प्रयोग ‘सामाजिक अभियांत्रिकी’तील होते. फासेपारधी ही गुन्हेगार जमात भटकी आणि भांडखोर म्हणून गणली जात होती. शाहू महाराजांनी काही फासेपारधी कुटुंबांना सोनतळीवर आणून स्थिर केले. त्यांना स्थिर जीवन जगता येईल, अशा सुविधा निर्माण करून दिल्या. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली. डोंबारी व माकडवाले या भटक्या जमातीतील काही कुटुंबे आणून त्यांना शहरात जागा आणि उद्योग देऊन स्थिर केले. माणसाच्या अंगी काही गुणधर्म अनुवंशिक असतात, काही गुणधर्म मात्र परिस्थितीनेच निर्माण होतात आणि परिस्थिती बदलली, तर ते गुणधर्म बदलू शकतात, याच विचारातून शाहू महाराजांनी हा प्रयोग केला. भटक्या जमातीतील माणसांना आपल्या जवळ ठेवून घेतले.

इंदूमती राणीसाहेबांच्यावर वैधव्याचा आघात झाला. त्यावेळी त्यांचे वय साडेअकरा वर्षांचे होते. शाहू महाराजांनी सुनेला शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला, तो अमलातही आणला.

शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधण्याचा संकल्प केला. खजिन्यातील लक्षावधी रुपये त्यावर खर्च केले. या धरणामुळे महाराष्ट्रातील हरितक्रांतीचा पाया शाहू महाराजांनी घातला. शिक्षण व शेती या दोन्ही क्षेत्रातील महाराजांचे कार्य आधुनिक युगाशी सुसंगत असेच होते.

ब्राह्मणेतर समाजात शिक्षणाचा अभाव होता. प्रारंभी महाराजांनी सर्वांसाठी एक वसतिगृह सुरू केले. काही काळानंतर त्यांनी चौकशी केली असता या वसतिगृहात केवळ ब्राह्मण विद्यार्थीच होते, असे दिसून आले. हा एकत्रित शिक्षणाचा प्रयोग फसला. महाराजांनी हे वसतिगृह बंद केले. असाच दुसरा प्रयोग महाराजांनी केला. काही विद्यार्थ्यांना राजवाड्यावर राहण्यासाठी ठेवून घेतले. खाण्या-पिण्याची उत्तम सोय केली. मुलांनी सुविधांचा लाभ घेतला; पण अभ्यास केला नाही. हाही प्रयोग फसल्यानंतर महाराजांनी विविध जातींसाठी अशी एकूण 23 वसतिगृहे सुरू केली. या वसतिगृहांत राहण्या-जेवण्याची सोय मोफत होती. हा प्रयोग भारतात एकमेव असा होता. या वसतिगृहांतून शिकून बाहेर पडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात विविध क्षेत्रात नेतृत्व केले.

शाहू महाराजांनी वतनी शिक्षकांचा एक अभिनव प्रयोग करून पाहिला; पण तो फसला म्हणून तीन वर्षांनी सोडून देण्यात आला. गावकामगार पाटलांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘पाटील शाळा’ आणि पुरोहितांना शिक्षण देण्यासाठी ‘पुरोहित शाळा’ महाराजांनी सुरू केल्या. शिक्षणक्षेत्रात महाराजांनी केलेले हे प्रयोग त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील विज्ञाननिष्ठेची साक्ष देतात.

‘वेदोक्त प्रकरण’ हे महाराष्ट्राच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचे प्रकरण होते. सन 1899 साली सुरू झालेले हे प्रकरण 1920 साली क्षात्र जगद्गुरूच्या प्रतिष्ठापनेने संपले. महाराष्ट्राचे धार्मिक व सामाजिक जीवन यामुळे ढवळून निघाले. महाराजांचे ‘वेदोक्त प्रकरणा’संदर्भातील कार्य मार्टिन ल्यूथरसारखेच होते. त्यांनी धर्माचे मूळ स्वरूप विसरून समाजावर अन्याय करणार्‍या सनातन प्रवृत्तीविरुद्ध लढा दिला. मार्टिन ल्यूथरप्रमाणेच क्षात्रजगद्गुरूंचे वेगळे पीठ स्थापन केले. शाहू महाराज हे समाजसुधारक होते; तसेच ते धर्मसुधारकही होते, ही त्यांच्या चरित्रातील महत्त्वाची बाब होय. शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या कृती या वैज्ञानिक दृष्टिकोनांच्या आधारे केल्या होत्या. असा दुसरा संस्थानिक भारतात झाला नाही.

अंधश्रद्धा निर्मूलनास स्वत:पासून सुरुवात

शाहू महाराजांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींकडून त्यांच्या आठवणी गोळा करून भाई माधवराव बागल यांनी ‘शाहू महाराजांच्या आठवणी’ हे पुस्तक लिहिले आहे. या आठवणींमधून शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे दर्शन घडते. समाजामध्ये नवीन विचार मांडत असताना शाहू महाराजांनी मुक्ती-प्रमुक्तीने, अज्ञानी समजाच्या मानसिकतेला अनुसरून कसा प्रयत्न केला. अंधश्रद्धा निर्मूलनाची सुरुवात शाहू महाराजांनी स्वत:च्या कुटुंबीयापासून कशी केली होती, याचा प्रत्यय येतो.

तुमचा आशीर्वाद न घेताच जातो”

1902 सालची गोष्ट. वेदोक्त संघर्ष चालू होता. छत्रपतींच्यावर टीकेचे काहूर उसळले होते. इंग्लंडला जाण्यासाठी शाहू महाराज मुंबईहून आगबोटीने निघणार होते. कोल्हापुरात परत येण्यास सुमारे तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. महाराज दौर्‍यावर निघण्यापूर्वी दोन दिवस आधी एक बडा ब्राह्मण अधिकारी त्यांना भेटावयास आला. महाराजांनी त्यांना विचारले, ‘का आलात? काय काम काढलंत?’

“आबासाहेब आणि आपले आजोबा राजाराम महाराज विलायतेत प्रवास करीत असताना त्यांच्यावर अनेक संकटे आली. राजाराम महाराजांचा तर तिकडेच मृत्यू झाला. महाराज, आपण विलायत दौर्‍यावर निघाला आहात, तेव्हा तशी काही अशुभ घटना घडू नये, असे मला वाटते.”

“बरं मग, प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी काय करावे?”

त्यावर तो अधिकारी उत्साहाने म्हणाला, “विलायतेस जाताना आपण डोक्यावर ब्राह्मणांचे शाप घेऊन जाऊ नये.”

चाणाक्ष छत्रपतींनी हे शब्द ऐकताच शांतपणाने त्या ब्राह्मण अधिकार्‍यावर नजर रोखीत उत्तर दिले –

“आमचे आजोबा ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन विलायतेला गेले असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू तिकडे झाला. म्हणून मी आता ब्राह्मणांचे आशीर्वाद न घेता त्यांचे शाप डोक्यावर घेऊन काय चांगले घडते, हे पाहावयाचे ठरविले आहे.”

शाहू छत्रपतींनी विलायतेस जाताना ब्राह्मणांचे शाप आणि शिव्या घेऊन प्रस्थान केले होते, तरी देखील त्यांचा प्रवास अत्यंत सुखासमाधानात झाला. त्यामुळे त्यांचा शकून-अपशकून आणि शाप-आशीर्वाद इत्यादी कल्पनांवरील विश्वास पूर्ण उडाला होता. (शाहू महाराजांच्या आठवणी पृ. 109)

परदेशी जाऊन आल्यानंतर भलेभले पुढारी प्रायश्चित घेत असत. अशा काळात शाहू महाराजांनी प्रायश्चित घेण्यास स्पष्ट नकार दिला. महाराजांचा हा निर्णय त्या काळात खूपच क्रांतिकारक होता. (राजर्षी शाहू छत्रपती – धनंजय कीर पृ.138)

‘जा; हा फसवण्याचा धंदा बंद करा.”

जुन्या राजवाड्यातील ‘रेकॉर्डला आग लागली. ती विझवण्याच्या कामाला सर्व नोकर व अंमलदार लागले होते. कोल्हापूरचे एजंटही हजर होते. महाराज स्वत: पुढे होऊन आग विझवण्यात सहभागी झाले होते.

कोणत्याही संकटामागे काहीतरी ईश्वरी कोप आहे, त्या संकटातून मुक्त होण्याकरिता देव प्रसन्न करून घ्यायला पाहिजे. त्याचं शांतवन करायला पाहिजे, या समजुती म्हणजे भटांचे उत्पन्न.

आग विझवून गेल्यानंतर सकाळी वाड्याच्या भिंतीवर व आसपासच्या घरांवर रक्ताची बोटे उठलेली दिसू लागली. ही बातमी महाराजांच्या कानावर गेली. विशेष म्हणजे ही बातमी लगबगीने महाराजांच्या कानावर घालणारे ब्राह्मणच होते. ते म्हणाले, ‘महाराज, हे फार दुश्चिन्ह आहे. पुढे काहीतरी मोठी आपत्ती येण्याची सूचना आहे. तरी महाराजांनी योग्य वेळीच खबरदारी घेऊन देवाचे शांतवन केले पाहिजे.’

‘खरंच? मग हे शांतवन कोण करणार?’

“महाराज, आम्ही ते करण्याकरिताच आलो आहोत. आपली परवानगी झाली की, आम्ही त्या कार्यास लागतो.”

महाराजांना परवानगीचा अर्थ काय तो समजण्यास वेळ लागला नाही. परवानगी म्हणजे धर्मविधीस लागणार्‍या खर्चाचे सँक्शन!

महाराजांनी विचारले, ‘संकटे येऊ नयेत म्हणून तुम्ही देवाला प्रसन्न करणार?”

“होय महाराज.”

“जर देवाचं शांतवन केल्यानंतर संकट आलं, तर मी तुम्हाला सर्वांना जबाबदार धरून तुमच्या पायात बेड्या ठोकीन. आहात कबूल?”

सर्व भटजी हॅ हॅ करून दात काढू लागले.

महाराज म्हणाले, “जा, हा फसवण्याचा धंदा बंद करा.”

वरील हकीकत गंगाराम कांबळे यांनी सांगितली. (शाहू महाराजांच्या आठवणी भाई माधवराव बागल पृ. 92-93)

वाड्यातून ब्राह्मण पुरोहिताचे उच्चाटन”

ब्राह्मण पुरोहितांची मक्तेदारी काढून टाकून तेथे मराठा पुरोहितांना बसवणे हे काम शाहू महाराजांनीच केले. आपल्या राजवाड्यातील खाजगी देवालयातील ब्राह्मण पुजारी महाराजांनी काढून टाकला. पूजा-अर्चा, धार्मिक विधी मराठा पुरोहितांकडून चालू केले. (शाहू महाराजांच्या आठवणी पृ. 95)

ज्योतिषाची परीक्षा

(बी. आय. पोवार/शांताराम सरनाईक)

बर्‍याच दूरवरून एक ज्योतिषी आशेने महाराजांच्या भेटीसाठी आला होता. कोल्हापुरातील काही बड्या ऑफिसरांची व त्याची ओळखही होती. तो प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी त्याची माहिती महाराजांच्या कानापर्यंत जाऊन पोचली होती.

ज्योतिषी येताच महाराजांनी त्याला दुसर्‍या दिवशी निवांत भेट घेण्यास सांगितले. तो गेल्याबरोबर म्हैसकर फौजदारास बोलावून सांगितले की, “तो ज्योतिषी माझी गाठ घ्यायला येऊ लागला की, त्याला परस्परच अटक कर आणि पोलीस स्टेशनवर नेऊन ठेव.” महाराजांच्या आज्ञेप्रमाणे म्हैसकर फौजदारांनी त्याला अटकेत ठेवले. दुसरे दिवशी पुन्हा त्याला सोनतळीस आणायचा हुकूम दिला. महाराजांचे दर्शन घडताच तो ‘काही गुन्हा केला नसताना मला निष्कारण अटक केली आहे,’ म्हणून रडू लागला.

त्यावर महाराज म्हणाले, “तुम्ही तर दुसरे दिवशी येणार म्हणत होता. तुम्हाला हे अटकेचं माहीत असतं तर तुम्ही तशी कबुली कशाला दिली असती? तुम्हाला हे भविष्य समजायला पाहिजे होतं.”

महाराजांनीच हा सर्व प्रकार केल्याचे पाहून तो हिरमुसल्यासारखा झाला. आपल्या गावी जातो म्हणून त्याने नमस्कार केला. महाराजांनी आपल्यामुळे ज्योतिषाला त्रास झाला म्हणून त्याला शंभर रुपये द्यायला सांगितले. (शाहू महाराजांच्या आठवणी पृ. 159)

गंगाराम कांबळ्यांची नुकसान भरपाई

गंगाराम कांबळे बावडा बंगल्याला घोडेवाला या नात्याने महाराजांच्या नोकरीत होता. जेवणानंतर तो तेथील हौदावर पाणी प्यायला गेला. हौद मराठ्यांचा होता; पण शाहू महाराजांचे एकंदर धोरण पुरोगामी असल्यामुळे त्या हौदाला शिवण्याचे धाडस गंगारामने केले.

त्यावेळी मराठ्यांच्यात अद्याप जागृती झाली नव्हती. धर्माची आणि रुढीची पकड ढिली झाली नव्हती. मराठ्यांच्या हौदावर गंगारामने पाणी भरलेले वाड्यावरील काही लोकांना खपले नाही. त्यांनी गंगारामला भरपूर मार दिला.

दुसर्‍या नोकराने केलेल्या चोरीचा आळ गंगारामवर घातला व त्याला सर्वांनी झोडपण्यास सुरुवात केली. हे सर्व प्रकरण चालू असताना शाहू महाराज कोल्हापुरात नव्हते. ते दिल्लीस व्हाईसरॉयच्या भेटीस गेले होते.

महाराज आल्यावर गंगाराम व त्याचे आप्तेष्ट यांनी महाराजांची भेट घेतली. गंगारामने आपले कुडते काढून चिंबलेली व रक्तबंबाळ झालेली पाठ महाराजांच्यासमोर उघडी केली व हौदाच्या प्रकरणामुळे आपल्याला कसा त्रास दिला, ते सविस्तर सांगितले.

ज्यांनी गंगारामला मारले त्या सर्वांना महाराजांनी बोलावून घेतले. हातात घोड्याची कमची घेतली व त्या सर्वांची पाठ फोडून काढली. हा मराठा, हा आपल्या रक्तसंबंधाचा, असा भेद केला नाही.

नंतर गंगारामला जवळ घेतले आणि आणि म्हणाले, ‘जा, तुला नोकरी माफ केली आहे. तू कोणताही स्वतंत्र धंदा कर. लागेल ती मदत माझ्याकडे माग.’

गंगारामने स्वतंत्र धंदा काढला. शहराच्या मध्यवस्तीत चहाचे दुकान काढले. जे येतील त्यांना तो चहा देई. दुकानाची व्यवस्था चांगली होती. पुढेपुढे गंगाराम या महाराचे हे हॉटेल म्हणून लोकांना समजले. गावातलेच नव्हे, तर वाड्यावरचेही लोक चिडले. यानं बाटवायचं चालवलंय म्हणून ओरड झाली.

महाराज स्वत: हा काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी आले. रथ थांबवून त्यांनी गंगारामला बोलावले आणि विचारले, “काय रे, तू हॉटेल काढलंयस म्हणं? खरं काय?”

“होय महाराज, आपणच सांगितलं, काही स्वतंत्र धंदा काढ म्हणून, तेव्हा हा धंदा काढलाय!”

“मग पाटी का लावली नाहीस, महाराचं हॉटेल म्हणून?”

“काय म्हणून पाटी लावायची महाराज? सगळ्या हॉटेलवर काय जातीच्या पाट्या लावल्यात? मग महाराज मीच तेवढी पाटी का लावू?”

“असं व्हय? खरं हाय तुझं म्हणणं, आतापर्यंत किती लोक चहा प्यायले तुझ्या दुकानात?”

“कैक प्यायले महाराज. मी काही आकडा नाही ठेवला.”

“मग सार्‍या गावालाच बाटवलंस की रे तू. बरं तर, चांगला चहा करून ठेव, जाताना येतो मी.”

महाराजांनी आपण चहा प्यायला येणार हे गाडीत बसून मोठ्याने सांगितले. ही बातमी सर्वत्र पसरली. महाराज येण्यापूर्वीच अनेक लोक दुकानासमोर उभे होते. महाराजांनी त्यांच्या समक्षच हॉटेलातला चहा बाहेर आणवून घेतला आणि महाराज सर्वांसमक्ष चहा प्यायले आणि आपल्या गाडीतील सर्व मंडळींनाही चहा पाजला आणि म्हणाले,

“तू सोडा वॉटरचं बी यंत्र ठेव, मी देतो तुला.” (शाहू महाराजांच्या आठवणी पृ. 26-27)

महाराजांनी अशा युक्तीने अस्पृश्यता निर्मूलनाचे काम केले. महाराज स्वत: चहा पितात हे पाहिल्यावर गाडीतील इतर मंडळींनाही चहा प्यावा लागे. मणभर उपदेशापेक्षा कणभर कृती अधिक महत्त्वाची ठरते. 100 वर्षांपूर्वीची परिस्थिती ध्यानात घेता शाहू महाराजांचे हे कार्य क्रांतिकारकच होते. समाजपरिवर्तन शेकडो ग्रंथांनी, रुपयांच्या चलतींनी वा प्रवचनांनी कधीच होत नसते. त्यासाठी मनपरिवर्तन हा एकच रामबाण उपाय आहे. शाहू महाराजांनी एका महार आसामीला हॉटेल काढण्याची प्रेरणा दिली आणि ‘लई नामी चहा करतोस म्हणे’ असे म्हणत, प्रशंसा करत स्वत: चहा पिऊ लागले. शाहू महाराजांचे डोळस प्रयत्न यामागे आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे समाजक्रांतिकारक राजे होते. शंभर वर्षांपूर्वी सर्व जनता अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातिभेद, विषमता या विचारात गुंतून पडलेली होती. अशा समाजाला महाराजांना जागे करावयाचे होते. आपल्या समाजाच्या जागृतीसाठी महाराजांनी सर्व प्रकारचे उपाय योजलेले दिसतात. सर्वांत प्रथम महाराजांनी समाजामध्ये जाऊन, निरीक्षण करून वास्तव समजावून घेतले. समाजाच्या अंधश्रद्धेच्या मुळाशी ‘अज्ञान’ हेच प्रमुख कारण आहे, हे ध्यानात घेऊन त्यांनी या समाजाला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पुरोगामी कायदे केले. ठिकठिकाणी सभा-परिषदांना हजर राहून आपले विचार मांडले. ‘शिक्षण घ्या’, ‘अंधश्रद्धांतून बाहेर पडा’, ‘जातिभेद, अस्पृश्यता मानू नका’, ‘सर्व माणसे समान आहेत’, असे विचार सतत मांडले. अज्ञानी समाजाची फसवणूक करणार्‍या पुरोहित वर्गाचे, बनावट धर्मग्रंथांचे कपट उघड करून दाखविले. स्वत: प्रत्येकवेळी विचारपूर्वक, वैज्ञानिक दृष्टीला स्मरून निर्णय घेतले. योजना राबविल्या. केवळ भाषणबाजी न करता अंधश्रद्धा निर्मूलनाची सुरुवात स्वत:पासून केली. जनतेसमोर आपले आचरण उदाहरण म्हणून ठेवले. अशा प्रकारे सतत आयुष्यभर शाहू महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य जागरुकतेने केले. “अंधश्रद्धा आणि तिला जन्म देणार्‍या रुढी आणि परंपरेला विरोध केला. जातिभेद, वर्णवर्चस्व, कर्मकांडावर आंधळी श्रद्धा व त्यातून निर्माण झालेली अनैतिकता यावर प्रहार केला.” (डॉ. नरेंद्र दाभोलकर- तिमिरातुनी तेजाकडे, पृ. 422) आणि हे सर्व केव्हा केले? देश पारतंत्र्यात असताना. शंभर वर्षांपूर्वी राजर्षी छत्रपतींनी केलेले हे कार्य खरोखरच समाजक्रांतिकारक होते. स्वत:च्या जगण्या-वागण्या-बोलण्यातून महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची कितीतरी उदाहरणे जनतेसमोर ठेवली आहेत. ती ध्यानात घेऊनच राजर्षी शाहू महाराजांच्या अनुयायांनी आजही वाटचाल करणे गरजेचे आहे. अशा या थोर समाजक्रांतिकारक राजाला माझे क्रांतिकारी अभिवादन!