Categories
उपक्रम

ग्रंथदिंडीचे वारकरी : पेंडसे काका

एप्रिल - २०१८

पिंपरी चिंचवड मधलं पेंडसेकाकांचं घर! आम्ही अंनिस संबंधातल्या गप्पा मारत होतो. काका चहा आणायला आत गेले, आणि टेबलावरचा फोन वाजला. फोन उचलला. “आमच्या घरी सहस्त्र चंद्रदर्शन कार्यक्रम आहे, आपण येऊ शकाल काय?” ओळख न विचारता कॅसेट सुरू झाली, तेव्हा मी म्हटलं, “थांबा हं, काका कामात आहेत, पाच मिनिटांनी फोन करा.”

तेवढ्यात चहा आला. मी म्हटलं, “काय काका? इकडे अंधश्रद्धा निर्मूलन, आणि तिकडे भटजीगिरी करताय की काय? सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यासाठी ते तुमची मदत मागताहेत.”

सामंत म्हणाले, “अरे, तेवढंच काम आहे काय? मांडववाले, जेवण पुरवणारे, फुलवाले, वाजंत्री, कितीतरी कामे असतात. काकांचा असा काही उद्योग असेल?” चहा पिता-पिता चर्चा रंगली; पण मेंदूला ताण देऊनही काकांना बोलवण्याचा उद्देश काही आम्हाला शोधता आला नाही. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला! आता फोन काकांनी घेतला. यावेळी काकाच बोलताहेत, याची खात्री झाल्यावर पलिकडच्या व्यक्तीने विनंती केली, “आमच्या समारंभात तुमचा ग्रंथदिंडीचा स्टॉल लावाल काय?”

कार्यक्रमात स्टॉल

पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती कार्यक्रमात-धार्मिक कार्यक्रमातही आपल्या मंडपात अंधश्रद्धा निर्मूलनच्या पुस्तकांचा स्टॉल लावणे, हे प्रतिष्ठेचे बनले आहे. आणि त्याचे पूर्ण क्रेडिट आहे पेंडसेकाका ऊर्फ विश्वास पेंडसे यांना.

सहस्त्रचंद्रदर्शन, साठीशांती, वाढदिवस, सेवानिवृत्ती कार्यक्रम, संस्थेचा शतकमहोत्सव, बँकेची जनरल बॉडी, तरुण मंडळाचा बक्षीस वितरण समारंभ, कंपनीतल्या कामगारांचा सत्कार, खंडेनवमी, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, अशा अनेक प्रसंगी अंनिसची ग्रंथदिंडी आपल्या दारी यावी म्हणून प्रयत्न करणारे प्रतिष्ठित पिंपरी चिंचवडमध्ये भेटतात, ते काकांच्या अथक प्रयत्नांनी.

सुरुवात

सात-आठ वर्षांपूर्वी काका सांगली बँकेतून सेवानिवृत्त झाले आणि अंनिसच्या कामात ओढले गेले. मिलिंद देशमुखांच्या बरोबर भ्रमंती सुरू झाली. सोबत त्यांच्यासारखेच दोन-चार निवृत्त सहकारी असायचे. कार्यक्रमापूर्वी मिलिंदच्या विश्वविक्रमाची माहिती सांगणे, प्रास्ताविक करणे, पुस्तिका विकणे, ‘अंनिवा’चे वर्गणीदार करून घेणे, अशी कामे असत; पण अशा लष्कराच्या भाकरी भाजताना गाडीचा पेट्रोलचा खर्च कायमपणे करत राहणे हिशोबी मनाला रुचेना. मग त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी चर्चा केली. पेट्रोलचा खर्च निघायचा, तर अंनिसच्या पुस्तिकांच्या बरोबर समविचारी पुस्तकेही विक्रीला ठेवावीत, हा विचार डॉक्टरांनी उचलून धरला आणि साधना मीडिया सेंटर, मनोविकास, राजहंस प्रकाशन इत्यादी प्रकाशकांशी संपर्क जोडून दिला. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टॉल सुरू झाला. सुरुवातीला 20-25 पुस्तके असत. वाढत-वाढत त्यांची संख्या आता शंभरच्यावर गेली आहे.

व्यवहाराला भावना नसतात

शाळा-कॉलेजमध्ये डॉक्टर किंवा मिलिंदचे लेक्चर सुरू झाले की, काका ग्रंथपालाला गाठत. त्यांना खरेदीची गळ घालत. या कमिशनमधून अंनिसला मदत केली जाते, याची जाणीव करून देत.

ग्रंथपालाला कितीही पटले, तरी तो नियमांशी बांधील असतो. संस्थाप्रमुख, मुख्याध्यापक, प्राचार्य यांनाही ऑडिटरला तोंड द्यायचे असते. ठराविक कमिशनशिवाय पुस्तके घेतली, तर उत्तर द्यावे लागते, तिथे भावनांचा काही उपयोग होत नाही.

या अनुभवातूनही काका निराश झाले नाहीत, त्यांनी चांगले कमिशन देणार्‍या प्रकाशकांचा शोध घेतला; मग त्यांना शाळा-संस्थांना कमिशन देणे परवडू लागले. कधीकधी शाळांतून एकही पुस्तक घेतले जात नसे. घरी गप्पा मारताना मिसेस म्हणत- “आता वेळ कुणाला आहे? पुस्तकं वाचायला. धावपळ एवढी आणि उरलेला वेळ टी.व्ही. आहेच.” पण त्या वेताळच्या कथेतील विक्रमादित्याप्रमाणे काकांचे प्रयत्न सुरूच. ‘विकत नको घेऊ देत, नुसते चाळू देत तरी,’ अशा अपेक्षेने ते स्टॉल लावतच राहिलेत.

अनुभव हाच गुरू

समोरच्या वाचकाला कोणत्या विषयांवरील पुस्तके आवडतात, याचा अंदाज आता काकांना बरोबर येतोय. ज्येष्ठ नागरिक असतील, तर नातवंडांच्यासाठी विज्ञानावरील मनोरंजक पुस्तके सुचवायची, वयस्क किंवा गरोदर महिला असतील, तर त्यांच्या समोर आरोग्य किंवा बालसंगोपनाची पुस्तके ठेवायची. अशा क्लृप्त्यांमुळे आता विक्री वाढते आहे.

बायकोसमोर पचका

एकदा एका शैक्षणिक संकुलामध्ये पालक मेळावा होता. स्टाफ ओळखीचा होता. काकांनी त्यांच्या मदतीने स्टॉल लावला. मदतीला कोणी कार्यकर्ता नसेल, तर मिसेस सरोज पेंडसे सहाय्याला धावत. त्या दिवशी नेमकी त्यांच्यावर पाळी आली. दोघांनी मिळून पुस्तकांची मनासारखी रचना केली आणि ग्राहकांची वाट पाहू लागले. पाच मिनिटे झाली असतील-नसतील, संस्था चालकांचा फोन आला, “तुम्हाला काय वाटते? संस्थेचे आवार म्हणजे काय आप्पा बळवंत चौक आहे? ताबडतोब स्टॉल गुंडाळा!” महापालिकेची अतिक्रमणे काढणारी गाडी आली की, फेरीवाल्यांची कशी तारांबळ उडते, त्याचा अनुभव काकांना आला. त्यात सोबत पत्नी! “असले उपद्व्याप करण्यापेक्षा घरी शांतपणे विश्रांती घ्यावी,” असे विचार काही क्षण मनात येऊन गेले; पण तात्पुरतेच!

असाच अनुभव विज्ञान भवनमध्येही आला. गुरुवार आणि रविवार असे आठवड्यातून दोन वेळा इथे स्टॉल लावत असत. महिनाभर व्यवस्थित चालले. अचानक त्यांनी परवानगी नाकारली. त्यांना वाटले असावे हे जास्त पाय पसरतील की काय?

गोड अनुभव

पण चांगल्या अनुभवांचे गाठोडे मोठे आहे. रस्त्याच्या कडेला स्टॉल लावताना, बाजूचे वडापाववाले अगत्याने चौकशी करत, काहीजण आपुलकीने सल्ले देत. त्यांना वाटे ‘हा पोटाचा व्यवसाय आहे,’ त्यांची दु:खे आणि अडचणीही समजत. चहावाला आग्रहाने चहा देई.

लांबच्या ठिकाणी व्याख्यात्यांबरोबर स्टॉल लावण्यामध्ये जमेपेक्षा खर्च जादा आणि अचानक नादुरुस्त होणारी गाडी अशा अडचणी येऊ लागल्या. तेव्हा पाच किलोमीटरचा परिसर एवढीच मर्यादा स्टॉलला घातली.

एकदा एका बंगल्याशेजारी स्टॉल लावला होता. बंगल्याचा मालक स्कूटरवरून येताना दिसला. आता हा आपल्याला हुसकणार असे वाटत होते; पण जवळ आल्यावर त्यांनी म्हटले, “वॉश घेऊन येतो, तोपर्यंत आहात ना?” नंतर त्यांनी बाहेर येऊन डॉक्टरांची 3000 रुपयांची पुस्तके खरेदी केली. त्यापुढे ते नियमित देणगीदार बनले. त्यांचे जय ट्रेडर्स नावाचे दुकान आहे.

एका मान्यवर नाट्यगृहात डॉक्टरांचा सत्कार होता. छान विक्री होईल, या आशेने काकांनी स्टॉल लावला, तर व्यवस्थापक डाफरू लागले, “आधी स्टॉलचे चार्जेस भरा.” “हा व्यवसाय नाही, अंनिसला मदत आहे,” हे त्यांना पटवून द्यावे लागले; पण कार्यक्रम संपला तरी एकही पुस्तक विकले गेले नाही. काकांनी आवराआवर केली. श्रोते निघून गेले होते आणि एवढ्यात एक महिला आली, “मला डॉक्टरांची पुस्तके पाहायची आहेत.”

बांधाबांध केलेली पुस्तके परत काढणे जीवावर आले होते, अनिच्छेनेच काकांनी पुस्तके बाहेर काढली. “ही बाई एखादे तरी पुस्तक घेईल काय?” असे वाटत असताना साड्या खरेदी कराव्यात, तशी पटापट पुस्तके तिने निवडली आणि त्या दिवशीची अपेक्षित विक्री अशी अनपेक्षितपणे पूर्ण झाली.

अडचणीमुळे विकास

एकदा विद्यापीठात प्रदर्शन होते. मोठी टेबल्स कामात अडकली होती. खूप प्रयत्नांनी काकांना दोन छोटी बाकडी मिळाली. यावर दहा तरी पुस्तके ठेवता येतील काय? मग शोधाशोध सुरू झाली. भिंतीच्या कडेला दोन मोठे पत्रे उभे होते, तेच घेतले. बाकड्यावर ठेवल्यावर चांगला वीस फुटाचा टेबल तयार झाला.

पण अशा अनुभवातून स्वत:चे टेबल असले पाहिजे हे लक्षात आले. कारच्या टपावर ठेवून नेता येईल, असे फोल्डिंगचे टेबल तयार करून घेतले. त्यावर नटांच्या सहाय्याने ट्रे फिक्स करता येतो. टेबलाचा पृष्ठभाग वाढतो. इतर वेळी ट्रेचा वापर वाहतूक करताना होतो. आता टेबलची शोधाशोध करावी लागत नाही.

टेबलाबरोबर फोल्डिंगची खुर्चीही घेतली होती; पण ती चोरीला गेली. पुन्हा खुर्ची घेतली नाही. लँप मात्र घेतलेत. आता म्युनिसीपालीटीच्या उजेडाची गरज पडत नाही.

शॉप लायसन्स

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व काम कायद्याचा आदर राखून केले जाते. कायदा मोडला जात नाही किंवा पळवाटा शोधल्या जात नाहीत, शॉर्टकट वापरले जात नाहीत. या विवेकी वर्तनाला स्मरून काकांनी रस्त्यावर स्टॉल लावण्यासाठी रीतसर परवानगी घेतली आहे. एका वेळी तीन वर्षांसाठी शॉप लायसन्स मिळते.

शॉप लायसन्स काढले असल्यास शॉप चालवायला परवानगी मिळते, त्याचबरोबर हिशोब ठेवण्याचे बंधनही येते. कधीही तपासणी झाली तरी, काकांचे हिशोब तयारच असतात. हिशोब ठेवल्याने नेमकी अवस्था समजते, कार्यपद्धतीत बदल करता येतात, हे फायदे त्यामुळे झाले.

सहकारी

स्टॉल लावण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते नेहमी मदत करतात. पूर्वी घनवट मॅडम, वाघमारे आजी, सुधीर मुरुडकर इत्यादी कार्यकर्ते सोबत येत. गेली दोन-तीन वर्षे पूर्णानंद सामंत नियमित येतात. सामंत महसूल विभागातून तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहेत आणि एखाद्या दिवशी कोणीच सहकारी मिळाले नाहीत, तर घरचे आहेतच. पत्नी सरोज आणि आई सुमती पेंडसे मदत करायला तत्पर असतात.

फायदे

अंनिस ग्रंथदिंडीचा फायदा काय? नफा किती होतो? या प्रश्नाचे उत्तर रुपये आणि पै मध्ये फारसे नाही. दरवर्षी सुमारे दोन लाखांची पुस्तके खपतात. दरमहा पेट्रोल दोन हजारांचे लागते. दोन लाखांमधून खरेदीदारांना डिस्काऊंट दिला जातो. उरलेल्या नफ्यातून शाळांना डॉक्टरांच्या प्रतिमा भेट दिल्या जातात. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राला सुमारे सहा हजारांची देणगी दिली जाते. त्यामुळे पोट भरण्यासाठी या उद्योगाचा उपयोग होत नाही, केला जात नाही. पण नफा केवळ पैशात मोजला जातो, तो उद्योगधंद्यात. सामाजिक क्षेत्रात नफा मोजण्याची एकके वेगळी आहेत.

माणसे जोडली

ग्रंथदिंडीमुळे परिसरातील अनेक विचारी मंडळी जोडली गेली. पूर्वी विद्यार्थी मोबाईल नंबर देत असत; पण त्यांचा सुरुवातीचा उत्साह पुढे टिकत नाही. अभ्यास किंवा नवे आकर्षण अशा कारणांनी संपर्क सुटतो. अंनिसपर्यंत त्यांना आणता येत नाही.

पण आता मात्र ‘ग्रंथदिंडी व्हॉटस् अ‍ॅप गु्रप’ तयार झाला आहे. त्यामध्ये सव्वाशेच्या वर सदस्य असून बहुतेक सर्वजण जागृत आहेत. या ग्रुपमध्ये डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, मुख्याध्यापक, रिटायर्ड जज्ज, साहित्यिक, संस्थाचालक, विद्यार्थी, पोलीस अधिकारी इत्यादींचा समावेश आहे.

ग्रुपवर उलटसुलट चर्चा सुरू असते. “वादे वादे जायते तत्त्व बोध:” याचा प्रत्यय नेहमीच येतो. या ग्रुपला नुकतेच सेवानिवृत्त प्राचार्य जॉईन झाले. 21 साहित्यिक संस्थांमध्ये पदाधिकारी असलेले झुंजार सावंतही ग्रुपला जॉईन झालेत. परिसरात शिक्षण संस्था स्थापन करणारे मनोहर जांभेकर ग्रंथदिंडीला जोडले गेले आणि अंनिसच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष बनले आहेत.

प्रचार

ग्रंथदिंडी नियमित स्टॉल लावत असल्याने हे प्रचाराचे साधन बनले आहे. विविध कार्यक्रमांत जमलेल्या जनसमूहाला अंनिस नावाची संघटना आहे, हे पुन:पुन्हा कळते.

एकदा एका ट्रक ड्रायव्हरने ट्रक स्टॉलच्या पुढे नेला, उभा केला आणि उतरून येऊन म्हणाला, “मी फोटो पाहून थांबलो आहे, मला अंनिसचे काम करायचे आहे.” हे ट्रक ड्रायव्हर औरंगाबादचे निघाले. त्यांना शहाजी भोसलेंचा फोन नंबर दिला. आता ते त्या शाखेत कार्यरत आहेत.

या अर्थाने ही एक ‘ब्रँच ऑन व्हील” आहे.

समारंभात सहभाग

ग्रंथदिंडीचा सहभाग विविध उपक्रमात असतो. डेक इंडिया कंपनीचे मालक साळुंखे, कंपनीच्या खंडेनवमीच्या वार्षिक कार्यक्रमात आदर्श कामगारांचा सत्कार करतात आणि त्याचवेळी ग्रंथदिंडीचा वर्धापनदिन साजरा करतात.

यावर्षीच्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ग्रंथदिंडी हितचिंतक मेळावा संपन्न झाला. व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपने हे संयोजन केले; पण इतरांचाही सहभाग मोठा होता. यावेळी ‘ग्रंथतुला’ करणार्‍या शाहू आपटे यांचा सत्कार करण्यात आला.

ग्रंथदिंडीच्या संपर्कात आले, त्यांनी स्वत:ची ग्रंथतुला करून सुमारे चाळीस हजार रुपये किमतीची पुस्तके शाळांना भेट दिली. त्यामध्ये अंनिसची पुस्तके दोन तृतीयांशापेक्षा जास्त होती.

सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे घरगुती आणि धार्मिक कार्यक्रमातही अंनिस ग्रंथदिंडीचा स्टॉल लावणे प्रतिष्ठेचे बनले आहे.

देवळाबाहेरही असा स्टॉल लावला जातो. अर्थात, तिथे विक्री फारशी होत नाही; पण प्रचारासाठी हे आवश्यक आहे. काही तरुण मंडळे, रामकृष्ण मोरे कॉलेज, लोहार समाज मंडळ, तेलंग महाविद्यालय, पिंपरी चिंचवड कॉलेज इत्यादी संस्था त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात, वाचकदिनी, महत्त्वाच्या समारंभात, अगत्याने निमंत्रण देतात.

नगरसेवक

पिंपरी चिंचवडमध्ये विविध नगरसेवक व्याख्यानमाला आयोजित करतात. या नगरसेवकांचे झेंडे अलग आहेत, पक्ष वेगवेगळे आहेत. ते ग्रंथदिंडीला मात्र आमंत्रण देतात, स्टॉलसाठी खास जागा देतात.

वृद्धांची तरुण कॉलनी

पुण्यात वृद्धांना सोयीचे व्हावे म्हणून एक कॉलनी उभी करण्यात आली आहे. तिथे वृद्धांच्या साठी सेपरेट बंगले आहेत. देखभाल करण्यासाठी डॉक्टर, नर्स तत्पर आहेत. इथे नेहमी स्टॉल लावतात. इथल्या एका 90 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा वाढदिवस झाला. त्यांनी भेटवस्तू किंवा बुके नाकारले आणि अंनिसला मदत करण्याची विनंती केली. देणगीरुपाने साठ हजार रुपयांचे चेक जमा झाले.

लोकभावना

ग्रंथदिंडी स्टॉलबद्दल लोकांच्या भावना चांगल्या आहेत. भेटी देणारे ‘तुमचे काम चांगले आहे’, असे आवर्जून सांगतात. त्यातील अनेकजण “आम्हाला डिस्काऊंट नको” असेही म्हणतात.

चहाच्या स्टॉलवाल्यापासून बंगल्याच्या मालकापर्यंत अनेकजण ‘आमच्याकडे चहा घ्या’ असा आग्रह करतात. “यांना सहकार्य करा,” अशी सूचना रक्षकांना करतात. अचानक आलेल्या पावसात, ताडपत्री लावण्याचे काम शेजारी फेरीवाले आणि वाचकच करतात.

अर्थात, स्टॉलवरून एखादे पुस्तक चोरीलाही जाते; पण त्याचे प्रमाण नगण्य आहे.

असेही आभार

खूपदा वाचक ‘तुम्हीच चांगले पुस्तक सुचवा’ म्हणतात. डॉक्टरांनी औषध लिहून द्यावे, तसे पुस्तक द्यावे लागते. “आम्ही आपली पुस्तके वाचली आणि बुवापासून वाचलो,” असे सांगणारेही अधून-मधून भेटतात.

एकदा एका बाईंनी येऊन खास आभार मानले. त्या म्हणाल्या- “तुम्ही गेल्यावेळी दिलेले ‘झटकून टाक जीवा…’ हे पुस्तक मी मुलाला वाचायला दिले. त्याचे नैराश्य निघून गेले, आभारी आहे.”

पेंडसेकाकांची माहिती वाचून वाचकांनीही नैराश्य झटकून अशा एखाद्या उपक्रमात सहभागी व्हावे; अंनिसच्या शहर आणि तालुक्याच्या शाखांनी ‘ग्रंथदिंडी स्टॉल’ सुरू करावेत आणि त्यांचे फोन नंबर व पत्ते वार्तापत्राने छापावेत, अशी अपेक्षा आहे. पेंडसे काकांच्या भाषेत सांगायचे, तर “साथी हाथ बढाना ऽऽ साथी रे ऽऽऽ” हीच अपेक्षा!

विश्वास पेंडसे संपर्क : मोबा. 9420428775