कर्मकांडे नाकारणारे जैनधर्मीय अलिकडे कर्मकांडे करू लागले. महावीरांनी उपदेशलेल्या कर्मानेच मनुष्य उच्च-नीच होऊ शकतो, या विचाराविरुद्धच हे लोक कर्मकांडे करीत आहेत. वैदिक व्यवस्थेच्या प्रभावातून जैन धर्माने ही व्यवस्था स्वीकारली आहे. मग तो यज्ञ असो अगर अभिषेक; पार्श्वनाथांनी ब्राह्मण कर्मठांचा यज्ञ बंद पाडला, विधिपूजा बंद पाडली. हा इतिहास काय सांगतो व आपण काय करतो, हेच यांना कळत नाही.
इतिहासाच्या खोलात जाण्यापूर्वी फक्त ‘पाद्यपूजा’ होती, असे निदर्शनास येते. त्याही पूर्वी टोळी अवस्थेतील रानटी मनुष्य जगण्यास हितकारी पाणी, वायू, सूर्य, जमीन इत्यादींचा पूजक होता. मूर्तिपूजा सहाव्या शतकामध्ये उदयास पावली, असे इतिहासकार म्हणतात.
धर्मातील कर्मकांडांचे समर्थन असे आहे. अभिषेकामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये धर्मप्रभावना होते व पुण्यकर्माचा बंध लागतो. काही लोकच ज्ञानी असतात; मग सामान्यांचे काय? म्हणून पूजाविधी, भक्ती, आरती या प्रथा पाडून त्यांना शुभभावनांमध्ये ठेवण्यास मदत होते, असा धार्मिक लोकांचा दावा आहे. यातून त्यांचे आत्मकल्याण होते, असाही दावा आहे. त्यामुळे एका झेंड्याखाली लोक एकत्र येऊन संघटित होण्यास मदत होते, हा पण एक दावा आहे आणि असे सर्वच धर्मांमध्ये होत असेल, तर आम्ही का अपवाद व्हावा? आम्ही धर्म संघटन करणे जरूर आहे, असा हा युक्तिवाद आहे. आता हे धर्मकांडवादी एका विशिष्ट पातळीवर खरे पण आहेत. जशा विज्ञानाला दोन बाजू असतात, तशा धर्मालापण दोन बाजू असतातच. मानवांचे आचरण चांगले व्हावे, नीतिमान व्हावे, हे सर्वांना वाटते. ‘तीर्थंकरवाणी’ तर सर्व जीवांचे कल्याण व मंगलम् व्हावे अशीच आहे. मग आम्ही परंपरा का पाळू नये?
परंतु विचारी व ज्ञानी माणसास या सर्वच गोष्टी पटणार नाहीत. कालसापेक्ष यात योग्य ते बदल धर्मानेपण स्वीकारले आहेत. ‘तीर्थंकरवाणी’मध्ये ‘अनेकांत’ सिद्धांत हाच उपदेश सांगतो; पण धर्म या क्रांतिकारक तत्त्वाकडे न पाहता परंपरांत अडकून पडला व तो दांभिक झाला. तो प्रवाही ‘अनेकांत वाद’ तत्त्वास अनुसरून वागला नाही. त्याला कारणंही तशीच आहेत. समाजाचे अज्ञान हे त्याला कारणीभूत आहे. पूर्वी कधी काळी पूजा करणे हे श्रावकांच्या हाती होते. आ. समंतभद्रांच्या ‘श्रावकाचार’मध्ये नित्य षट्कर्मामध्ये पूजा- विधी स्वत: करणेचा आहे; परंतु अज्ञानवश लोक हे करेनात; परिणामी ‘पंडित’ व्यवस्थेचा उगम झाला व हेच पुरोहित वैदिकांप्रमाणे अज्ञानी समाजास लुबाडू लागले. त्यातूनच अशा अनेक कर्मकांडांचा उदय झाला आणि या कर्मकांडांचा भावनिक पातळीवर विकास होऊन सर्वसामान्यांच्या माथी मारण्यात आला. आज २१ व्या विज्ञानयुगात लोक सुशिक्षित झाले; पण असल्या कर्मकांडाचा खोलवर विचार करतात काय?
अशा अभिषेकांचा फायद्या/तोट्याचा तपशील मांडणार काय? त्यांचा समाजास कितपत उपयोग होणार, समाजाचा खरोखर किती विकास होणार व समाजाची खरी पुण्याई किती बांधून घेणार, याचा विचार व्हावा. फक्त लोकांच्या धर्मभावना जागृत करून त्यांना पुण्य लाभणार, हे विचार आता बदलले पाहिजेत. या अभिषेकांचे बजेट रुपये २५० कोटी समाजातील गोरगरिबांच्या हितासाठी कसे खर्च करता येतील, याचा विचार ट्रस्टी, ज्ञानी, मुनी या सर्व संबंधितांनी केला पाहिजे. असे जर झाले तर खरेच तुम्ही गरीब समाजाची पुण्याई बांधून घ्याल. त्यांचा दुवा तुम्हाला नक्की लागेल व खऱ्या ‘तीर्थंकरवाणी’चा सदुपयोग होईल.
आता या परंपरा उद्याच्या उद्या मोडणार नाहीत, याची कल्पना पुरोगामी लोकांना जरूर आहे; परंतु हळूहळू बदल स्वीकारणे जरूर आहे. पुरोगामींनी ‘नाही’ सुचवला तर काळाच्या ओघात काही बदल स्वीकारावे लागणार आहेत; पण ते ‘वेळ खाऊ’ असते म्हणून ज्ञानधुरीण लोकांनी तो बदल जाणीवपूर्वक; प्रसंगी द्वेष पत्करून सुधारण्या केल्या पाहिजेत. आपापसातील कलह मिटवला पाहिजे. बरे, असे लिहून काय सुधारणा घडणार? त्यावरील उपायही सुचले पाहिजेत म्हणून माझ्या मते, माझ्या अल्पज्ञानानुसार आता दूध, केशर, दही, तूप इत्यादींचा अभिषेक टाळून फक्त पाण्यामध्ये एकच लिटर दूध घालावे, तूप, केशर इत्यादी थोडेथोडे घालून प्रतीकात्मक अभिषेक करावा व हा खर्च वाचवावा. इतर कोणत्या बाबींबाबत खर्च वाचवता येईल, तो वाचवावा व एक नवीन सुधारणावाद स्वीकारावा, तोच खरा पुण्याईचा मार्ग आहे. त्या सुधारणा अनेकांत सिद्धांतातच येतात. हे तीर्थंकरांनी सांगून ठेवले आहे.
आता मला तू या पंथाचा आहेस, त्या पंथाचा आहेस असे कृपया म्हणू नका. मला तुम्ही १३-२० पंथांमध्ये वाटू नका, तर मी एक माणूस आहे या नात्याने स्वीकार व विचार करावा. असे बदल करून सर्वच धर्म विज्ञानवादी बनावेत, ही सदिच्छा!
लेखक संपर्क : मो.९९२१४५०५२८
Categories