व्यक्तिविकासाला अडसर ठरणार्या विविध प्रकारच्या बंधनातून मुक्त होण्याची धडपड मानवी समाजात अविरतपणे चालू आहे. ऐतिहासिक अशा या संघर्षात पुरुषप्रधानतेमुळे पुरुष जाती बंधमुक्त होणे सुलभ झालं; पण समाजाचा अर्धा घटक म्हणजे स्त्रीवर्ग तसा बंधनातच राहिला होता. भारतात उच्च वर्गातील स्त्रियांनी स्त्रीमुक्तीसाठी लढे दिले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णासाहेब कर्वेआदी समाजसुधारकांनी स्त्रीसुधारणेच्या चळवळी उभारल्या. पण या चळवळी सामान्यपणे उच्च आणि मध्यमवर्गीय स्त्रियांपुरत्याच मर्यादित होत्या. दलित, वंचित, भटके आणि इतर मागासवर्गीय स्त्रीसमाज हा अन्यायकारक रुढींमध्ये पिचत पडलेला होता. भारतातील मुस्लिम स्त्रियांची स्थिती याहून वेगळी नव्हती. भारतीय न्यायव्यवस्थेने अशा वंचित स्त्रियांना न्याय देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले, यासाठी आपल्या न्यायव्यवस्थेला सलाम करायला हवा. सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायदा आणि तोंडी तलाक घटनाबाह्य ठरवून भारतीय न्यायव्यवस्थेने जुलमी समाजव्यवस्थेला सणसणीत चपराक देऊन न्यायाला पारखे झालेल्या स्त्रीवर्गाला दिलासा दिला आहे.
वैदू, नंदीवाले, कैकाडी, डोंबारी अशा भटक्या समाजाच्या विविध जातपंचायती म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेला डावलून चालू असणार्या समांतर न्यायव्यवस्था होत्या. न्यायव्यवस्था कसल्या; यांना अन्यायव्यवस्था म्हणणेच संयुक्तिक होईल. महाराष्ट्र अंनिसचे धडाडीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, रंजना गवांदे, मुक्ता दाभोलकर आणि अन्य सहकार्यांनी जातपंचांनी आपापल्या जातीअंतर्गत स्त्री-पुरुषांवर केलेल्या अन्यायाच्या अंगावर शहारे आणणार्या घटना अधोरेखित केल्या आहेत. या घटनांमध्ये; विशेषत: भटक्या स्त्रीसमाजावर अन्याय, अत्याचाराची परमावधी झालेली दिसून येते. कौमार्य परीक्षा, तसेच लैंगिक पवित्रता आणि आंतरजातीय विवाहाचा गुन्हा अशा सबबीखाली उकळत्या तेलातील नाणे उचलणे, हातावर तप्त वस्तू घेऊन चालणे, पाच-पाच लाखांपर्यंत दंडाची शिक्षा ठोठावणे अशा अमानुष शिक्षा या स्त्रियांना दिल्या गेल्यात. यात भटके पुरुषही भरडले गेले, तरी विशेषकरून बहुतेक प्रकरणात स्त्रियांचाच बळी गेलेला दिसतो. या स्त्रियांना अन्यायमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू केला. त्याला यश येऊन जातपंचायत प्रतिबंधक कायदा महाराष्ट्र शासनाने मंजूर केला. याबद्दल शासन अभिनंदनास पात्र आहे. समाजातील शेवटच्या घटकातील स्त्रियांच्या जीवनात आता नवी पहाट उगवण्यास सुरुवात होईल, ही आपणा सर्वांना आनंद देणारी बाब ठरावी.
स्त्रीवर्गातील अन्यायग्रस्त दुसरा घटक म्हणजे मुस्लिम भगिनी. तोंडी तलाकच्या नियमामुळे मुस्लिम महिलांचे परावलंबित्व मोठे अन्यायकारक झाले होते. तीन वेळा तलाक शब्द म्हणून किंवा फोनवरून किंवा ई-मेलद्वारा तलाक मिळून मुस्लिम स्त्रिया आपल्या मुलाला, घरादाराला आणि संपत्तीला मुकत होत्या.