Categories
प्रतिसाद

प्रतिसाद

मे - २०१७

वार्तापत्र चिकाटीने चालवत आहात

डॉ. दाभोलकर गेल्यानंतर आपण अंनिस वार्तापत्र अत्यंत चिकाटीने-जोमाने चालविले आहे. आपले-आपल्या सहकार्‍यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आपणास धन्यवाद. नोकरीच्या काळात याच विषयावर मी मुंबई विद्यापीठ बहि:शास्त्र विभागात अनेक वर्षे ‘अंधश्रद्धा आणि नवी दृष्टी’ यावर 25 वर्षे वक्ता या नात्याने बोलत होतो. 1982 ते 2008 या काळात हे काम मी केले. त्यावर थोडेफर लेखन केले. मी आणि प्रा. मच्छिंद्रनाथ मुंढे सर काही वेळा एकत्र होतो. डॉक्टर गेले तेव्हा खूप यातना झाल्या.

-प्रा. मधू श्री. जाधव, सोलापूर

——————————-

होमिओपॅथीवरील लेख आवडला

अंनिस वार्तापत्राचा एप्रिल 2017 चा अंक मिळाला. अंकातील कव्हर स्टोरी ‘पुरोगामी पुरुषी महाराष्ट्र’ हा गिरिश लाड – सॉफ्टवेअर तज्ज्ञ यांचा लेख आवडला. प्रा. आर्डे सरांनी ‘औषध नसलेले औषध : होमिओपॅथी’ या निरुपयोगी पॅथीच्या औषधांची केलेली रासायनिक चिकित्सा वाचून या पॅथीवरील उपचारासाठी औषध घेणार्‍यांचे डोळे उघडतील, असे वाटते. दोन्हीही लेख महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांद्वारे प्रकाशित करावे, ही विनंती. अंनिस वार्तापत्राचा वाचक मर्यादित आहे म्हणून लेखांना व्यापक प्रसिद्धी हवी. अंनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची ‘फिरा’च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन! अंकातील भाषा मुद्रण उत्कृष्ट आहे. – रमेश थेटे, चिंचवड स्टेशन, पुणे.

——————————-

भारतीय गोपालक हे करू शकणार नाही का?

अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात एक गोशाळा आहे. त्या गोशाळेमध्ये ऐंशी हजार म्हातारी जनावरे (भाकड जनावरे) आणि अपंग/अधू गायी आहेत. यांच्यापासून दररोज 800 टन शेण आणि तेवढेच गोमूत्र मिळते. या शेणापासून व गोमुत्रापासून तयार झालेली वीज वीस हजार कुटुंबे वापरतात. त्या शेणापासून रोज 180 टन राखही तयार होते. तीही (उर्वरक) जमीन सुपीक करण्यासाठी उपयोगात आणली जाते. एकंदरीत सर्व हिशोब पाहिला, तर असे लक्षात येते की, गोशाळेला चालविण्यासाठी (निर्मितीसाठी) होणार्‍या सर्वांच्या खर्चाच्या डॉलरमागे गोशाळेला पाच डॉलर उत्पन्न मिळते.

भाकड जनावरांना सांभाळल्याने पाच पट फायदा होतो, तर भारतीय गोपालकांनी भाकड जनावरे कसायांना का विकावीत? या व्यतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल बचत होते, ती वेगळीच.

–विलास शिवलाल शहा (प्राणिमित्र), सोलापूर

——————————-

सुवर्णप्राशन डोस! एक भोंदूगिरी

गोव्यामध्ये आयुर्वेद कॉलेज आणि काही आयुर्वेदाचे शिक्षण घेऊन ‘डॉक्टर’ झालेल्या व्यक्ती ‘सुवर्णप्राशन संस्कार’ या नावाचा डोस देऊन भरपूर पैसे कमावतात. हाडोस म्हणजे शंखपुष्पी आणि शतावरी या वनस्पतीचे चूर्ण पाण्यात मिसळलेले असते. या द्रावणात (ही डॉक्टरमंडळी दावा करतात त्यानुसार) सोने या धातूची पावडर करून ती पावडर या द्रावणात मिसळतात आणि या एकूण मिश्रणाचे दोन-तीन थेंब (प्रत्येकी) पेशंटला देतात. याचा गुण म्हणजे आरोग्य उत्तम राहणे आणि शक्ती (ताकद) वाढणे, असा डॉक्टरांचा दावा असतो.

सोने हा धातू असून तो पाण्यात मिसळत नाही, असे रसायनशास्त्र सांगते. या पार्श्वभूमीवर सुवर्णप्राशनचे आरोग्यवर्धक द्रावण म्हणजे चक्क थोतांड ठरते. हे थोतांड उघड करणे गरजेचे आहे.

– यज्ञेश्वर निगळे, गोवा