Categories
चळवळ

‘फिरा’च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अविनाश पाटील, सचिवपदी प्रा. सुदेश घोडेराव यांची निवड

एप्रिल – २०१७

FIRA’ ची 10 वी राष्ट्रीय परिषद त्रिवेंद्रम येथे संपन्न

‘फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन’ची 10 वी राष्ट्रीय परिषद त्रिवेंद्रम येथे दि.25, 26 फेबु्रवारी 2017 दरम्यान पेरियार रॅशनॅलिस्ट फोरम, त्रिवेंद्रम यांचे सहकार्याने बी.टी.आर. मेमोरियल हॉल येथे संपन्न झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राष्ट्रीय समन्वय विभागाचे सहकार्यवाह प्रा.डॉ. सुदेश घोडेराव उपस्थित होते. देशातील विविध राज्यांतील 50 विविध संस्था, संघटना, चळवळींचे प्रतिनिधी मिळून दोनशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी परिषदेत सहभाग घेतला.

परिषदेच्या उद्घाटन सत्राची सुरुवात मानव विकास वेदिका, तेलंगणाच्या सांस्कृतिक गटाने गीत गायन व नृत्याने झाली. सत्राचे अध्यक्ष कलानाथन यांनी अध्यक्षीय भाषण केले. यात त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदा होण्याची गरज व्यक्त केली. त्या अनुषंगाने होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मअंनिसचे प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी पुढील मुद्दे उद्घाटन सत्रात ठळकपणे मांडले.

1) डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे व प्रा. कलबुर्गी यांच्या खुनाचा, एकत्रितपणे व परस्परपूरक तपास करण्यात यावा.

2) डॉ. दाभोलकर हत्येमागील संशयित आरोपींचा तपास जलदगतीने होऊन अटक करण्यात यावी.

3) फरारी म्हणून घोषित असलेल्या सनातनचे साधक रूद्र पाटील, सारंग अकोलकर, विजय पवार यांची माहिती देणार्‍यास तपास यंत्रणेने 25 लाखांचे बक्षीस जाहीर करावे. त्यांचे फोटो जाहीरपणे प्रदर्शित करण्यात यावेत.

4) सनातन संस्था व हिंदू जनजागरण समितीविषयी राज्य सरकारने भूमिका जाहीर करावी. उद्घाटन सत्रासाठी नॉर्वेजियन हुमॅनिस्ट असोसिएशनचे रॉबर्ट रुस्ताद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘फिरा’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र नायक यांनी देखील मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, देशात धार्मिक तेढ मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. केंद्रातील सरकार धार्मिक बाबींना उघडपणे प्रोत्साहन देत आहे. धर्मनिरपेक्षता जपण्याचे तत्त्व बाजूला ठेवले जात आहे. छद्मविज्ञानाला प्रोत्साहन; तसेच वैदिक काळातील तथाकथित अवैज्ञानिक गोष्टींना राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस अधिवेशनात खरे विज्ञान म्हणून मांडले जात आहे. याच्या विरुद्ध आवाज उठविणार्‍यांना ‘राष्ट्रद्रोही’ म्हटले आहे. ‘फिरा’चे राष्ट्रीय सचिव बलविंदर बर्नाला यांनी ‘फिरा’च्या विविध उपक्रमांचा अहवाल सादर केला.

उद्घाटनानंतरच्या प्रथम सत्रात South Asian Humanist Association (SAHA) च्या बाबू योगिनेनी यांनी ‘आधुनिक युगात होत असलेला धर्मांचा लोप’ या बद्दल मार्गदर्शन केले. बांगलादेशात 7 ब्लॉगर्सची हत्या झाली आहे. पाकिस्तानात 11 धर्मनिरपेक्षवादी लेखकांना अटक झालेली आहे. इतरही देशांत विवेकवादी, विज्ञानवादी विचारांना रोखण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे एकंदरीतच अशा लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. एखाद्या देशातील चळवळींच्या लोकांनी मदत करावी, या उद्देशाने; तसेच जगाचे लक्ष अशा घटनांकडे वेधण्यासाठी SAHA या संस्थेची स्थापना केली असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद पसरविणार्‍या संघटना जागतिक झालेल्या आहेत; परंतु मानवतावादी व्यक्ती/संघटना अजूनपर्यंत जागतिक झालेल्या नाहीत. त्या होण्याची गरज आहे. त्यासाठी विशेष यंत्रणा उभारून विवेकवादी लोकांचे संरक्षण करता येऊ शकेल. जागतिक पातळीवर दबावगट तयार करता येईल. 26 मार्च 2017 रोजी देशातील सर्व चळवळींनी कार्यक्रम घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी ‘SAHA’ तर्फे केले.

दुसर्‍या सत्रात ‘Atheist Centre’ (नास्तिक केंद्र) विजयवाडाचे डॉ. जी. विजयम् यांच्या ‘विकासासाठी धर्मनिरपेक्ष भारत’ या विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण प्रा. डॉ. नरेंद्र नायक यांनी केले. धर्म आणि राजकारण यांची होत असलेली युती मानवी विकासास बाधक आहे, असे त्यांनी सांगितले. धर्म जितका जुना, मानवी विकासास बाधक आहे, तेवढाच विवेकवाद जुना आहे. कारण प्रत्येक धर्मग्रंथात, धर्माचे आचरण, पालन न करणार्‍या व्यक्तीस काय शिक्षा करावयाची यांचा उल्लेख धर्मग्रथांत आहे.

तिसर्‍या सत्रात नॉर्वेनियन ह्युमॅनिस्ट असोसिएशनचे रॉबर्ट रूस्ताद यांनी विचार मांडले. धर्मासंबंधी संशोधन करणार्‍या अमेरिकेतील झएथ या संस्थेने केलेल्या संशोधनाबद्दल त्यांनी माहिती दिली. सन 2050 मध्ये जगात साधारणपणे 292 कोटी ख्रिश्चन, जवळपास तेवढ्याच संख्येने मुस्लिम आणि 136 कोटी हिंदू लोकसंख्या असेल. नास्तिक आणि आस्तिक लोकांच्या आनंदी वास्तवासाठी झेकोस्लोव्हाकिया, स्वीडन, डेन्मार्क, ऑस्ट्रीया, फ्रान्स, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, जपान हे आठ देश योग्य राहतील, अशी माहिती त्यांनी दिली.

संध्याकाळी 4 वाजता त्रिवेंद्रमच्या मुख्य रस्त्यावरून, विधानसभा भवनावरून रॅली काढण्यात आली. ‘विवेकवाद झिंदाबाद’, ‘डॉ. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी अमर रहे’ या सारख्या घोषणा रॅली दरम्यान देण्यात आल्या. दुसर्‍या दिवशीच्या प्रथम व द्वितीय सत्रात, देशभरातील ‘फिरा’शी संलग्न असलेल्या विविध संघटनांचे अहवाल सादर करण्यात आले. यात प्रामुख्याने ओडिशा रॅशनॅलिस्ट फोरम, तर्कशील सोसायटी, पंजाब, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तर्कशील सोसायटी, हरियाना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अथेयिस्ट सेंटर, ह्युमॅनिस्ट अ‍ॅण्ड रॅशनॅलिस्ट ऑर्गनायझेशन ओरिसा, मानवविकास वेदिका तेलंगणा, रॅशनॅलिस्ट फोरम तामिळनाडू, रॅशनॅलिस्ट फोरम आंध्र प्रदेश, जनविज्ञान वेदिका तेलंगणा, कर्नाटका स्टेट रॅशनॅलिस्ट असोसिएशन, युनिव्हर्स फाऊंडेशन आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश ह्युमॅनिस्ट ऑर्गनायझेशन इत्यादी संघटनांच्या प्रतिनिधींनी अहवाल सादर केले. परिषदेच्या समारोपप्रसंगी केरळ राज्याचे सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री सुरेंद्रम प्रमुख पाहुणे होते.

परिषदेचे यशस्वी आयोजन ‘पेरियार फोरम त्रिवेंद्रम’चे लाल सलाम, व साजित यांनी यशस्वी आयोजन केले.

FIRA राष्ट्रीय कार्यकारिणी निवड (2017-18)

परिषदेच्या शेवटी सर्वसाधारण सभा झाली. FIRA च्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड प्रक्रिया यु. कलानाथन, अजय दाते, FIRA यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. मअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची FIRA च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली; तसेच मअंनिसचे राष्ट्रीय समन्वय विभागाचे सहसचिव प्रा. डॉ. सुदेश घोडराव यांची FIRA च्या सचिवपदी निवड झाली. नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-

  • राष्ट्रीय अध्यक्ष – प्रा. डॉ. नरेंद्र नायक (मेंगलोर, कर्नाटका)
  • सचिव – प्रा. बलविंदर बर्नाला (पंजाब- तर्कशील सोसायटी)
  • खजिनदार – हरचंद भिंदर (पंजाब – तर्कशील सोसायटी)
  • राष्ट्रीय उपाध्यक्ष – अविनाश पाटील (मअंनिस), ई. टी. राव (ब्रह्मापूर, ओडिसा), लाल सलाम (त्रिवेंद्रम)
  • सचिव – 1) प्रा. डॉ. सुदेश घोडेराव (म.अंनिस) 2) डॉ. धनेश्वर साहू (ओडिसा), 3) डॉ. अमरजीत कौर (पतियाला, पंजाब), 4) राजा सुरेश (ओरिसा)

प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, नाशिक