Categories
परिवर्तन

आसाराम भक्त ते अंनिस कार्यकर्ती : एक अनोखा प्रवास

जानेवारी २०१७

धार्मिक ते विवेकवादी’ असा प्रवास झालेल्या काही अंनिस कार्यकर्त्यांचा जीवनप्रवास अं. नि. वार्तापत्रातून ‘आम्ही ‘बि’घडलो’ या सदरातून दरमहा प्रसिद्ध करणार आहोत. कार्यकर्त्यांचा विवेकी जीवनप्रवास वाचून वाचकांना यातून प्रेरणा मिळेल.

माझा जन्म सांगली जिल्ह्यातील एका खेडेगावात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. खेडेगाव असल्यामुळे पावलोपावली अंधश्रद्धा होत्या. मांजर आडवे गेले तर पुढच्या कामाला जायचे नाही, पाल अंगावर पडली तर अंगावर पाणी शिंपडायचे इत्यादी असंख्य अंधश्रद्धा माझ्या मनामध्ये होत्या.

माझे वडील शंकराचे भक्त व आई माळकरी, त्यामुळे घरात श्रद्धेचे-भक्तीचे वातावरण होते. माझे वडील सोमवारी उपवास करायचे व दरवर्षी सोमवती अमावस्येला सौराष्ट्रात वारीला जायचे. मीही त्यांच्या सोबत दोन वेळा सोमनाथाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दरवर्षी आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा, तसेच सोमवारचे उद्यापन असे. त्यामध्ये सत्यनारायणाची पोथी, सोमनाथाची पोथी वाचली जाई. माझ्या सर्व आरत्या तोंडपाठ होत्या.

माझ्या आईची माळ असल्यामुळे पंढरपूरच्या कित्येक वार्‍या आईबरोबर मी केल्या आहेत. दर पंधरा दिवसांच्या एकादशीला आमचं महिला भजनी मंडळ कुणाच्या तरी एकाच्या घरी पूर्ण रात्रभर जागरण करून भजनं-गवळणी म्हणायचे. अशाप्रकारे माझं लहानपण पूजा-पाठ, व्रत-वैकल्ये यामध्ये गेलं.

पुढे लग्नानंतर सासरी मुंबई येथेही पूजा-पाठ, उपवास, गौरी-गणपती बसविणे चालू झाले. गणपतीच्या सर्व आरत्या, गौरीची गाणी तोंडपाठ झाली. तसेच मी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास व लक्ष्मीव्रत करायचे, तेही उपाशी राहून! हे व्रत मी 22 वर्षे केले. त्याचबरोबर मी पांडुरंगशास्त्री आठवल्यांच्या स्वाध्याय परिवारातही गीतापठणासाठी जात असे.

त्यानंतर आम्ही मुंबई सोडून रायगड जिल्ह्यातील पेण येथे राहावयास आलो. बाजारपेठेत शहा काकांचे दुकान होते. आसारामबापूंच्या आश्रमातील सर्व पूजेचे सामान तेथे मिळत होते. शहा काकांच्या सांगण्यावरून मी मुंबईला आसारामबापूकडेही गेले. तेव्हापासून मी आसारामची भक्त झाले. दररोज दोन तास माळा जपणे, पूजा-पाठ करणे, उपाशीपोटी गोमूत्र पिणे, कपाळाला विभूती लावणे इत्यादी सुरू केले. मटण-अंडी-मच्छी सर्व सोडून पूर्ण शाकाहारी झाले. दररोज पूजा-पाठ-जप नाही केला, तर आपल्याला पाप लागेल, मोक्ष मिळणार नाही, अशी भीती सतत मनात वाटत असे. अशा प्रकारे आठ वर्षे भक्ती केली.

एके दिवशी माझ्या पतींनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे ‘विचार तर कराल?’ हे पुस्तक आणले. त्यांनी हे पुस्तक पूर्ण वाचले. त्यांना त्यातील विचार पटले. मला त्यातील काही-काही विचार पटले, परंतु तेव्हापासून मी विचार करू लागले.

हे सर्व चालू असताना आमच्या घरी चोरी झाली. चार तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. ज्या व्यक्तीबद्दल संशय होता तिच्याविरुद्ध आम्ही कोर्टात केस केली. यल्लमाला नारळ फोडून, तिला प्रसाद दिला. तीन वर्षे कोर्टात केस चालू होती परंतु प्रत्यक्ष पुरावा नसल्यामुळे निकाल आमच्याविरुद्ध लागला. या घटनेमुळे खूप मन:स्ताप व दु:ख झाले. मी देवाला नवस बोलले होते, साकडे घातले होते त्यामुळे मला खात्री होती की, दागिने परत मिळतील. परंतु एवढी भक्ती करून पूजा-पाठ करून काय उपयोग! देव जर असता, तर आपले दागिने परत मिळाले असते, असे वाटले. खरंच देव आहे का? असा प्रश्न पडला व देवावरील विश्वास कमी झाला. एक एक रुपयाची बचत करून पैसे साठवून बनवलेल्या दागिन्यांचा विसर लवकर पडत नव्हता.

यानंतर थोड्या दिवसांनी माझ्या पतींच्या मांडीमध्ये चमक भरली व चालताना त्रास होऊ लागला. बरेच दिवस औषधे खाऊनसुद्धा त्रास कमी होईना, म्हणून आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने एक्स-रे, एम.आर.आय. स्कॅनिंग अशा सर्व वैद्यकीय तपासण्या करून बघितले. रिपोर्टवरून डॉक्टरांनी सांगितले की, हिपजॉईंट खराब झाला आहे. तेथे रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया करून कृत्रिम पार्ट टाकावा लागेल. हे ऐकून आम्ही खूप घाबरलो. शस्त्रक्रिया टाळण्यासाठी आम्ही मुंबई-पुणे येथे जाऊन मोठ्या नावाजलेल्या डॉक्टरांचे सल्ले घेतले. डॉक्टरांनी सल्ला दिला की, औषधे-गोळ्या घेऊन नैसर्गिकरित्या रक्तपुरवठा होतो का ते पाहू, एक-दीड वर्ष वाट बघू.

आम्ही उपचार चालू केले. मनातून खचून गेलेली मी दररोज देवाचा धावा करत होते. प्रार्थना करत होते की, माझ्या पतींची शस्त्रक्रिया टळू दे. आसारामच्या माध्यमातून कृष्णाला मनातल्या मनात सांगत होते की, तू जर खरा असशील, तर माझी इच्छा पूर्ण करशील.

एक-दीड वर्षे उलटून गेले. पतींच्या मांडीचे दुखणे, चमकणे चालूच होते. डॉक्टरांनी सांगितले शस्त्रक्रिया करावी लागेल. हे ऐकल्यानंतर खूप वाईट वाटले, मन खचून गेले. देवाचा, गुरूचा खूप राग आला. एवढी प्रार्थना करून, एवढी वर्षे पूजापाठ करून काहीच फळ मिळाले नाही. भक्तांच्या मदतीला धावून येत नाही, तो देव, गुरू कसला? त्या दिवसापासून आसारामची, कृष्णाची भक्ती करायची नाही, असे ठरवले.

एका महिन्याने पुण्याला हिपजॉईंट रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेचा त्रास एक-दीड वर्षेहोत होता. या सर्व घटनेचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. या सर्व कारणांनी देवावरची श्रद्धा कमी झाली. दोन तासांची पूजा पाच मिनिटांवर आली. 90 टक्के पूजा-पाठ कमी झाले. त्यानंतर योगासन शिकण्याच्या निमित्ताने अंबिका योगकुटीरमध्ये बोर्‍हाडे सर व मॅडम यांची ओळख झाली व एके दिवशी अंनिसची मीटिंग आहे व आम्ही तेथे काम करतो, असे मॅडमनी सांगितले.

अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काय? तिथे काय काम चालतं, हे जाणून घेण्यासाठी मी मीटिंगला जाऊ लागले. हळूहळू विचार ऐकून, पुस्तके, वार्तापत्र वाचून माझे विचार बदलायला लागले.

अशाप्रकारे मी नियमित अंनिसच्या मीटींगला जाऊ लागले. पतींना आग्रह करून, मागे लागून मीटिंगसाठी घेऊन जाऊ लागले. पूजा-पाठ कमी झाले; पण मनात भीती होती की, आपलं वाईट झालं तर…? त्यामुळे दोन तासांची पूजा पाच मिनिटांवर आणली. त्यानंतर डॉ. नितीन शिंदेंच्या ‘सफर विश्वाची’ या पुस्तकाची ओळ-नि-ओळ मी वाचली. मला विश्वाची निर्मिती कशी झाली, हे समजले. जे काही घडतंय त्यामागे विज्ञान आहे, निसर्ग आहे, देव इथे काही करत नाही, मुळात देव नाहीच ही खात्री पटली. तेव्हापासून पाच मिनिटांची पूजाही बंद झाली. गौरीपूजन, गणपतीपूजन, संक्रांतीपूजन, हळद-कुंकू सर्व काही बंद झाले. आसारामचा फोटो काढून टाकला, देवांचा देव्हारा व फोटो काढून टाकले.

आता माझ्या मनात देवांची-भुतांची कसलीही भीती नाही. माझा आत्मविश्वास वाढला आहे. मी, माझे पती, मुलगी व मुलगा पूर्ण कुटुंब विवेकवादी झालो आहोत. पूर्ण परिवर्तन झाले आहे. माझ्या मुलीचे लग्नही आम्ही खूप कमी खर्चात, साध्या पद्धतीने रायगड जिल्ह्यातील एका खेडेगावातील आगरी समाजातील एका सुशिक्षित कुटुंबातील इंजिनिअर मुलाशी लावून दिले. मुलीच्या आंतरजातीय विवाहाची प्रेरणा अंनिसमुळे आम्हाला मिळाली. आमची मुलगी खूप सुखी आहे.

गेल्या सहा वर्षांपासून आम्ही अंनिसमध्ये काम करत आहोत. मी व माझे पती पेण शाखेचे सक्रिय कार्यकर्ते आहोत. यापुढील जीवनात शेवटपर्यंत अंनिसमध्येच काम करण्याची आम्हा दोघांची इच्छा आहे. तसेच देहदानाची सुद्धा खूप इच्छा आहे.

बोर्‍हाडे सर, मॅडम यांच्यामुळे आम्ही अंनिस मध्ये आलो व डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. नितीन शिंदे यांच्या पुस्तकांमुळे आमचे पूर्ण परिवर्तन झाले. त्यामुळे हे सर्वजण आमच्या प्रेरणास्थानी आहेत. त्यांना आमचा सलाम!

मीना सनय मोरे, पेण जि. रायगड

मो. 8855083580