तुम्ही याला ‘शतकांची लढाई’ संबोधले होते ना डॉक्टर. काही शतके काम केल्यावर आपल्या हाती काही लागेल, असेच तुम्हाला म्हणायचे होते ना! मग ही एक मोठी जबाबदारी आहे. काही शतकांची वाटचाल करणारे दमदार संघटन असेच वृद्धिंगत आणि अभेद्य ठेवण्याचे आम्ही तुमच्या मुशीत घडलेले सर्व कार्यकर्ते ही जबाबदारी नेटानं पार पाडू, अशी ग्वाही देतो.

प्रिय डॉक्टर,
पुन्हा एकदा तुमच्याशी पत्रसंवाद. आज तुमच्या जाण्याला 6 वर्षे पूर्ण झालीत. अर्धं तप झालं. प्रबोधन आणि संघर्षाची पावले मात्र अजूनही चालत आहेत; न थकता, न निराश होता, अनेक संकटांवर मात करीत. त्रिदशकपूर्ती वर्ष आहे डॉक्टर, तुम्ही लावलेलं रोपटं आता 30 वर्षांचं झालंय. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यापर्यंत त्याच्या मुळा पोचल्यात. हे झाड आता खूप बहारदारपणे विस्तारलंय. ही वाढ आता परराज्य आणि परदेशापर्यंत जाणार; किंबहुना परराज्यात तर आपण पोचलो आहोतच. आज हे सर्व बोलणार आहे मी तुमच्याशी. आपण केलेल्या कामाबद्दल, मिळवलेल्या यशाबद्दल आणि काही ताणांबद्दलही मी बोलणार आहे डॉक्टर.
आता तुमच्याशी बोलताना अनेक भावभावनांचं मोहोळ डोक्यात उठलंय. आनंद आणि अभिमान वाटावा, असंही खूप घडलंय. आव्हाने वाटावीत अशी संधीही खूप निर्माण झालीय आणि ताण वाटावा असेही काही घडले आहे. हे सर्व बोलायचंय तुमच्याशी; पण त्याआधी एक सांगावं वाटतं मला डॉक्टर, आजही आपण संघटना म्हणून ठामपणे उभे आहोत, अखंडितपणे, याचे एक मनस्वी समाधान आहे.
डॉक्टर, आधी बाहेरच्या देशातल्या बातम्या सांगू का? या वर्षात आपल्याला दोन मोठे पुरस्कार मिळालेत. आपलं काम तर आधीपासूनच खूप होतं डॉक्टर; पण परदेशात त्याची फार माहिती नव्हती; पण तुमच्या त्या भयानक पद्धतीने जाण्यानं तुमच्यासह संघटना जगभर पोचली. जगभरातून टी.व्ही., वृत्तपत्रांतून आपलं काम जगासमोर आलं, आजही येत आहे. खूप संपर्क करण्यात आले आपल्याशी, खूप निमंत्रणे पण आलीत आपल्याला आणि काही महत्त्वाचे पुरस्कारही आपल्याला मिळाले.
‘फ्रीडम फ्रॉम रिलिजन’ या अमेरिकन संस्थेतर्फे ‘अविजित रॉय करेज अॅवॉर्ड 2019’ साठी आपली निवड झाली. (खकएण) म्हणजे खपींशीपरींळेपरश्र र्कीारपळीीं उरीव एींहळलरश्र णपळेप णज्ञ तर्फे झेीींर्र्हीोीी उरीव आपल्याला मिळाला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दलचा हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. तसेच युक्तिवादी केंद्रम, कोची (केरळ) यांच्यातर्फे राष्ट्रीय स्तरावरील ‘फ्री थॉट अॅवॉर्ड-2019’ आपल्याला मिळाला आणि डॉक्टर, आपल्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना कितीतरी पुरस्कार मिळाले. आपल्या कामाची मान्यता वाढतेय डॉक्टर, याचा आनंद वाटतो.
आणखी एक महत्त्वाची माहिती देतो तुम्हाला. जादूटोणाविरोधी कायद्याची आपण ज्या पद्धतीने प्रचार-प्रसार मोहीम राबवली, त्याचा परिणाम म्हणजे कायद्यांतर्गत साडेपाचशेपेक्षा अधिक गुन्हे महाराष्ट्रभर दाखल झाले आहेत आणि तीच स्थिती सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याची आहे. त्याअंतर्गत देखील चाळीसपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यातील कित्येक दाखल गुन्ह्यांत आपला थेट सहभाग आहे डॉक्टर आणि एखादा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदविण्यासाठी कार्यकर्त्यांना किती आटापिटा करावा लागतो, पूर्ण दिवस खर्च करावा लागतो. हे सर्व आपले कार्यकर्ते अत्यंत चिकाटीने करीत असतात. कोणत्याही लाभाशिवाय असं काम करणारे कार्यकर्ते हीच तर आपली संपत्ती आहे ना डॉक्टर. अशा कितीतरी कार्यकर्त्यांना तुम्ही प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी पत्रं लिहीत असत, “आनंद आणि अभिमान वाटावा, असे तुम्ही कार्यकर्ते आहात”, अशी त्यात वाक्यं असायची. कार्यकर्ता त्या वाक्याच्या उर्जेनेच पुढे वर्षभर जोशात काम करायचा. आज ते तुमच्या स्मृतींच्या मशाली घेऊन अंध:काराशी लढत आहेत, त्याच जोमाने.
डॉक्टर, कायद्याबद्दल अजून एक बातमी सांगू तुम्हाला? महाराष्ट्रातील गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने ‘जादूटोणाविरोधी कायद्या’चा अभ्यासक्रमात समावेश केलाय. या विद्यापीठाच्या बी. ए. तीनच्या अंतिमच्या समाजशास्त्र विषयात या कायद्याची माहिती देण्यात आलीय. बघा ना डॉक्टर, ज्या कायद्यासाठी आपण सनदशीर आंदोलनाचे सर्वच प्रकार सतत 18 वर्षे केले. त्याला किती विरोध झाला. शेवटी तो तुमच्या बलिदानाच्या दबावातून अस्तित्वात आला आणि आज मात्र तो एका विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत झालाय. तुम्ही म्हणायचा ना डॉक्टर, शेवटी विजय आपलाच आहे. याचं सातत्याने प्रत्यंतर येत राहतं.
डॉक्टर, तुम्ही सातत्याने लिहित राहिलात. विपुल लेखन केलंत तुम्ही. ते लेखन आता इंग्रजी आणि हिंदीतून उपलब्ध झालंय. याची गरजही होती आणि मागणीही. ‘अॅमेझॉन’ने प्रकाशित केलेलं ‘ढहश उरीश ेष ठशरीेप’ हे ‘बेस्ट सेलर’ ठरलंय. प्रवास करताना अचानकपणे ते रेल्वे स्टेशनवरील पुस्तकांच्या सुंदर मांडणीत ठेवलेलं मला दिसलं. खूप छान वाटलं. इंग्रजी वाचक वर्ग मोठा आणि वेगळा आहे. त्यांच्यापर्यंत विचार पोचणं खूप आवश्यक आहे म्हणजे चळवळ पोचवणं सोपं जाईल. हिंदीतलं साहित्य देखील एका दिवशी ‘बेस्ट सेलर’ होणारच; पण हे हिंदी आणि इंग्रजीतील पुस्तक आपल्या कार्यकर्त्यांनी वाचणं आवश्यक आहे. कारण असा पुढच्या पिढीशी संवाद हिंदी, इंग्रजीतून करावा लागेल.
बाकी संघटनांतर्गत उपक्रम, मोहिमा, परिषदा सातत्याने सुरू आहेत! ‘जोडीदाराची विवेक निवड’ हे महाराष्ट्रव्यापी अभियान खूप यशस्वीपणे आपण राबवलं. यात 26 जिल्ह्यांतून 34 दिवसांत 55 युवा संकल्प परिषदा आपल्या तरुण कार्यकर्त्यांनी घेतल्या. अर्थात, यात ज्येष्ठांचाही सहभाग आहेच डॉक्टर. 5000 पेक्षा अधिक युवांपर्यंत हा महत्त्वाचा विषय पोचवण्यात आपण यशस्वी झालोत. तसंच जटा निर्मूलनाचं कामही त्याच वेगानं आणि उर्जेनं सुरू आहे. नंदिनी जाधव यांनी आजपर्यंत 119 महिलांना या जटेतून मुक्त केलंय. डॉक्टर, ती महिला केवळ जटेतूनच मुक्त होत नाही, तर अनेक प्रकारचे भ्रम, गुलामी, आजारपण, अंधश्रद्धा आणि वेदनांतून ती मुक्त होत असते, असा अनुभव आहे. अनेक करुण आणि वेदनादायी कहाण्या त्या जटेमागे लपलेल्या आहेत. हे दोन्ही विषय लवकर पुस्तक रुपाने येणार आहेत डॉक्टर.
डॉक्टर, एक सक्षम, स्वतंत्र प्रकाशन संस्था विकसित करण्याचंही आपण स्वप्न पाहिलंय. महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांत 20 हजार कार्यकर्त्यांमध्ये विस्तारलेल्या संघटनेला नीट नियोजन केल्यास एक उत्तम प्रकाशन संस्था नक्की उभी करता येईल. त्यासाठी आपण स्वतंत्र विवेक जागर संस्थेची नोंदणी केली आहे. खूप मेहनत करू डॉक्टर; पण महाराष्ट्रातील एक अग्रगण्य प्रकाशन संस्था म्हणून आपण उभे राहू नक्कीच!
तुम्हालाही खूप आवडला असता, असा एक दिमाखदार सोहळा डॉक्टर आपण घडवून आणला. आपले स्थापने पासूनचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील सरांचा आपण कोल्हापुरात नागरी सत्कार घडवून आणला. एन. डी. सरांचा तुम्हालाही खूप आधार वाटायचा ना डॉक्टर. खरंच, आम्हीही अनुभवतोय. या वयातही आणि आजारपणातही ते ठामपणे आपल्या सोबत आहेत आणि महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. खूप मोलाची. आज सरांचं सोबत असणं किती आधार देणारं आहे. म्हणून आम्ही त्यांना ‘आधारवड’ म्हणणे किती नेमकं विशेषण आहे ना हे सरांसाठी. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी साजेसं.
खुनाच्या तपासाबद्दलही बोलायला हवं ना तुमच्याशी. हे बोलणं खूप जड जातंय डॉक्टर. जखमांवरच्या खपल्या निघताहेत ताडताड असं वाटतं; पण तरी सांगतो. तपासाबद्दल आम्ही समाधानी नाही. हा तपास सीबीआयने केला. आपण तपास यंत्रणांवर देखरेखीची मागणी करीत न्यायालयात गेलो. जे काही होतंय ते न्यायालयाच्या दबावाने होतंय, असं आता वाटतं. गोळ्या झाडणारे हात पकडले डॉक्टर. खरे आव्हान ते हात तयार करणारी यंत्रणा आणि त्या यंत्रणेच्या म्होरक्यांपर्यंत पोचण्याचे आहे. ती विकृत, दहशतवादी मानसिकता तयार करणारी यंत्रणा कायद्याच्या आधारे मोडीत काढण्याची खरी गरज आहे. डॉक्टर, खुनाचा तपास हा विषय आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे पडू देणार नाही. ‘जबाब दो’ आंदोलन सुरूच राहील.
आता थोडं संघटनात्मक ताणाबद्दल सांगतो डॉक्टर. दृष्टिकोन, कार्यपद्धती, कामाच्या अपेक्षा, संघटनेच्या वाढ विस्ताराच्या गरजा, अशा मुद्द्यांवरून काही मतभेद निर्माण झालेत. डॉक्टर, तुम्ही असतानाही आपण यावर रात्र-रात्रभर बोलल्याचं मला स्पष्टपणे आठवतंय. यावर आम्ही अनेकदा विविध पातळीवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एका मित्राने याला संघटनेच्या वाढविस्ताराच्या या वेदना आहेत, असे संबोधले. मग प्रश्न असा आहे, याचं शेवटी काय झालं? तर डॉक्टर, काही प्रश्नांची तात्कालीक उत्तरं आम्ही शोधली आणि काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत; पण भविष्यात म्हणजे आपल्या त्रिदशकपूर्तीनंतर आपण पुन्हा बसून संवाद करून ती सोडवू, असं ठरवलंय. जिथे माणसं आलीत आणि खूप विचार करणारी माणसं आलीत की, मतभेद होणारच, हे आम्ही मान्य केलंय. सगळ्यांना ऐकून घेत अधिकाधिक लोकांचं समाधान करणारा मार्ग आम्हाला शोधायचाय डॉक्टर आणि तो आम्ही नक्की शोधू. हे एका बैठकीत होणारं काम नाही ना डॉक्टर. यासाठी सकारात्मक भावनेने, परस्परांवर विश्वास दाखवत सतत बसावं लागेल, बोलावं लागेल, मतभेद स्वीकारावे लागतील, एकमेकांच्या भूमिका शांतपणे ऐकून घ्याव्या लागतील आणि यातूनच हे कष्टानं उभं केलेलं, तुमच्या बलिदानाने अधिक उजळून निघालेलं हे संघटन अभेद्य राहील, अखंडित राहील. आम्ही निराश नाहीत डॉक्टर, सकारात्मक आणि आशावादी असायला हवं ना डॉक्टर यासाठी?
संघटनेला 30 वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने आपण मुंबईत एक आंतरराष्ट्रीय परिषद घेत आहोत. ‘मानवतेसाठी विवेकवाद’ हा त्याचा विषय आहे. काही परदेशी मान्यवर वक्ते त्यासाठी येत आहेत आणि पुढील दोन दिवस 10 व 11 ऑगस्ट रोजी आपले राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. त्याची सर्व तयारी आता झालीय. आपले सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत आणि हा सोहळा यशस्वी करणार आहोत.
डॉक्टर, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती प्रतिकूल वाटावी, अशी आहे; पण आपण निराश न होता सतत कृतिशील आहोत, संवादी आहोत. पुरोगामी म्हटल्या जाणार्या महाराष्ट्रात आजही आपण त्याच प्रभावाने संघटितपणे उभे आहोत. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. याची दखल आज सर्वच माध्यमे सातत्याने घेत आहेत. तुम्ही याला ‘शतकांची लढाई’ संबोधले होते ना डॉक्टर. काही शतके काम केल्यावर आपल्या हाती काही लागेल, असेच तुम्हाला म्हणायचे होते ना! मग ही एक मोठी जबाबदारी आहे. काही शतकांची वाटचाल करणारे दमदार संघटन असेच वृद्धिंगत आणि अभेद्य ठेवण्याचे आम्ही तुमच्या मुशीत घडलेले सर्व कार्यकर्ते ही जबाबदारी नेटानं पार पाडू, अशी ग्वाही देतो. तुमची स्मृती यासाठी आम्हास सतत प्रेरित करीत राहील.
तुमचा विनायक