प्रिय युवा मानसमित्र आणि मैत्रिणींनो,
परीक्षांचा मोसम जवळ येऊ लागला आहे. त्यामुळे यावेळी परीक्षा आणि टेन्शन याविषयी जरा संवाद करूया. परीक्षा आणि टेंशन याविषयी मी जेव्हा विचार करायला लागतो, तेव्हा मला माझ्या स्वत:च्या मनोविकारतज्ज्ञ होण्यासाठी दिलेल्या पदव्युत्तर परीक्षेच्या निकालाचा दिवस आठवतो, ज्या परीक्षेमध्ये मी थेट नापासच झालो. अशी माझ्या आयुष्यातील ही पहिलीच परीक्षा होती. स्वाभाविकच आहे की, त्यामुळे मी खूप नाराज झालो होतो. प्रसिद्ध अभिनेते आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे माझे शिक्षक होते. अगदी तोंड पाडून मी त्यांना भेटायला गेलो. आगाशे सरांनी मोठ्याने त्यांच्या ऑफिसमधील शिपायाला ऑर्डर सोडली, ‘’अहो, जरा पेढे आणा! आपले डॉक्टर नापास झालेत!” आणि मग माझ्याकडे वळून म्हणाले, ‘’आज तुझं शिक्षण खर्या अर्थाने पूर्ण झाले. इतकी वर्षे चांगले मार्क पाडण्याचा अनुभव घेतलास, एकदा तरी नापास होण्याचा अनुभव पाहिजेच होता की!” केवळ माझ्याच नाही तर सध्याच्या सगळ्या विद्यार्थी आणि पालकांच्या दुखण्यावर माझ्या सरांनी हसत-हसत अगदी नेमके बोट ठेवले होते. मी जेव्हा-जेव्हा, परीक्षेच्या ताणाने विद्यार्थ्याची आत्महत्या किंवा अगदी परवा दहावीतील मुलाला हृदयविकाराचा झटका येण्याची घटना; अशा घटनांचा विचार करतो, तेव्हा मला पहिल्यांदा आगाशे सरांचा सल्ला आठवतो आणि एक अगदी मूलभूत प्रश्न पडतो तो असा की, ‘आपण परीक्षेतील यशाला आपल्या आयुष्यात सर्वव्यापी महत्त्व का बरे दिले आहे?’
परीक्षेत यशस्वी होण्यासाठीची टोकाची धडपड आणि ते जमेल का नाही, या चिंतेने अस्वस्थ होणे हा जणू एक संसर्गजन्य आजार झाल्यासारखी सध्याची परिस्थिती आहे. ज्या कालखंडात व्यवसायाच्या मर्यादित संधी उपलब्ध होत्या, त्या कालखंडात लोकांनी असे अस्वस्थ होणे आपण समजून घेऊ शकतो; पण गेल्या दशकात अनेक नव्या करियरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे महत्त्व कधी नव्हे इतके कमी झाले आहे. डॉक्टर आणि इंजिनिअर या पलिकडे पत्रकारिता, माध्यमे, कॉमर्स, पर्यटन, हॉस्पिटॅलिटी सारख्या अनेक क्षेत्रांच्यामध्ये संधी उपलब्ध झाल्या आहेत. तरीदेखील ही अस्वस्थता कशामधून निर्माण होते आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.
समाजात निर्माण झालेली टोकाची ‘स्पर्धात्मकता’ हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. स्पर्धा करणे हा माणसाचा जैविक गुणधर्म आहे. प्रगतीसाठी एका मर्यादेपर्यंत स्पर्धा आवश्यक देखील आहे; पण दुसर्याशी स्पर्धा करणे हेच जर आपल्या आयुष्याचे इतिकर्तव्य झाले तर मात्र त्यामधून अडचणीचे प्रश्न निर्माण होतात. आपल्या स्वत:च्या म्हणून खास अशा क्षमता कोणत्या आहेत आणि त्या क्षमतांचा अधिक चांगला विकास कसा करता येईल, या उद्दिष्टाच्या ऐवजी शेजारच्याच्या तुलनेत आपल्याला कमी तर मिळणार नाही ना किंवा अधिक कसे, हा विचार एका बाजूला, आपण करीत असलेल्या अभ्यासाच्या मधील आनंद संपवून टाकतो. त्या जागी पूर्णपणे अनावश्यक ताणतणाव निर्माण करतो आणि अंतिमत: आपला परफॉर्मन्स देखील रसातळाला नेतो.
दुसरा मुद्दा आहे, ‘संधी’ विषयक आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या गैरसमजाचा. ‘Opportunity knocks your door only once’ हा तो गैरसमज. प्रत्यक्षात आयुष्य प्रत्येक माणसाला परत-परत संधी देत असते. आयुष्यात एक संधी चुकली, तर दुसरी मिळत असते. आपला बघण्याचा दृष्टिकोन आपण त्यासाठी सकारात्मक ठेवला पाहिजे. आपली एक संधी गेली म्हणजे पूर्ण आयुष्यच वाया गेले, असा गैरसमज आपण करून घेतो आणि अनावश्यक ओझे डोक्यावर वागवू लागतो.
पालकांच्या ‘अपेक्षांचे ओझे’ ही पण एक परीक्षेचा ताण वाढवणारी बाब. अनेक पालक स्वत:ची अपूर्ण स्वप्ने ही मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. खरे तर आपल्या मुलाचा नैसर्गिक कल काय आहे, याचा अंदाज घेऊन, मुलाला त्याचे स्वप्न शोधायला पाठबळ देणे ही पालकांची भूमिका असायला पाहिजे. पालकांचा जीवनातील अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्या जीवनातील स्पर्धात्मकता, अपूर्ण स्वप्ने यांचा मुलांच्या मनावर व्यक्त-अव्यक्त पातळीवर मोठा प्रभाव पडत असतो. याविषयी पालक म्हणून आपण जागरूक नसलो, तर त्याचा मुलाच्या मानसिक स्वास्थ्यावर नक्कीच परिणाम होतो आणि याचा परिणाम परीक्षेच्या वेळी ताण वाढण्यात होतो.
या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन देखील काही वेळा परीक्षेचे टेन्शन येऊ शकते. प्रत्येक वेळी बाह्य परिस्थितीच टेन्शनला कारणीभूत असते असे नाही, तर काही मुलांचा मूळ स्वभाव देखील पटकन ताण घेण्याकडे कल असलेला असू शकतो.
अशा वेळी आपल्याला ताण आला आहे, हे स्वत:ला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला ओळखता येणे आवश्यक असते. खरे तर टेन्शन आलेले ओळखणे अजिबातच अवघड नाही. झोप कमी होणे, भूक कमी होणे, थोड्या अभ्यासानंतर थकल्यासारखे वाटणे, एकाग्रता कमी होणे, कारण नसताना चिडचिड होणे, छातीत धडधड होणे, सारखा घाम येणे किंवा शरीराला हलकासा कंप सुटणे अशी अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणे वाढल्याने टेन्शन येऊ शकते.
कोणताही सामान्य माणूस ही लक्षणे सहज ओळखू शकतो. जर अशी लक्षणे जाणवत असतील, तर त्याविषयी मोकळेपणाने बोलायला आपण आपल्या मुलांना शिकवले पाहिजे. ही लक्षणे म्हणजे त्यांच्यामध्ये काही कमी आहे, अशा नजरेने त्याकडे न पाहता त्यांना मदतीची गरज आहे, या नजरेने आपण त्याकडे पाहू शकतो. वेळीच योग्य मदत घेतली तर ही सगळी लक्षणे कमी होऊन आपला परफॉर्मन्स वाढू शकतो.
बहुतांश वेळा घरातील जवळच्या व्यक्तीने थोडे समंजसपणे त्या मुलाचे म्हणणे ऐकून घेतले, थोडा आधार दिला आणि अपेक्षेचे ओझे कमी केले, तर ही लक्षणे कमी होऊ शकतात. जर त्याने लक्षणे कमी होऊ शकली नाहीत, तर मात्र समुपदेशक अथवा मनोविकारतज्ज्ञाची मदत घ्यायला हवी.
शालेय आणि महाविद्यालयीन मुला-मुलींच्या मधील ताणतणावांचे वाढते प्रमाण पाहता, जसे शाळेत शारीरिक प्रशिक्षणाचे शिक्षक असतात, तसे मानसिक आरोग्य चांगले ठेवायला मदत करणारे कोच किंवा समुपदेशक असणे, हे अनिवार्य करण्याची वेळ आलेली आहे. ‘मअंनिस’सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षित झालेल्या मानसमित्रांची किंवा त्यासारख्या स्वयंसेवकांची देखील आपण मदत घेऊ शकतो. सगळ्यात शेवटी या सगळ्याच्या बरोबरीने माझे मोठे काका आणि मागच्या पिढीतील शिक्षणतज्ज्ञ देवदत्त दाभोलकर यांनी भाषांतरित केलेली एक कविता या कामी आपण सर्वांनी ध्यानात ठेवावी अशी आहे. तिच्या ओळी खालील प्रमाणे-
“मागेल चित्रगुप्त जेव्हा हिशोब सारा।
सांगेल तो मुळीही मजला नको पसारा॥
याचे महत्व नाही हरलास–जिंकलास।
केव्हा कधी कशाने तू सांग खेळलास॥”
आयुष्यात हार-जीत ही होत असते. आपण निर्धाराने प्रयत्न करत राहायला हवे. एवढे साधे-सोपे तत्त्व आपण मनाशी खूणगाठ म्हणून बांधले, तर हा परीक्षेचा कालवधी हा टेन्शनऐवजी सर्जनाचा होऊ शकेल, अशी अपेक्षा वाटते.