Categories
अभिवादन

सर्वस्व झोकून धाडसाने कार्य करणार्‍या कार्यकर्त्या – अलका चाफेकर

वार्षिकांक - २०१९

स्त्रिया हा अंधश्रद्धेने बाधित असा समाजातील एक मोठा घटक आहे. त्याच वेळी हा घटक मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचा वाहकही आहे, हे वापरूनवापरून गुळगुळीत झालेले विधान तेवढेच सत्यही आहे. परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाच्याच काय, पण एकूण समाजबदलाच्या कार्यात झोकून देऊन काम करणार्‍या स्त्रियाही खूप आहेत, याचा नेहमी उल्लेख होतोच, असे नाही. अलका चाफेकर अशा एक कार्यकर्त्या होत्या. ‘होत्या’ असे लिहायला लेखणी धजावत नाही. कारण कालपरवापर्यंत त्या आमच्या गोरेगाव शाखेत कार्यरत होत्या. त्यांच्या कार्याचा गौरव करणारा लेख ‘आदरांजली’ म्हणून इतक्यात लिहावा लागेल, असे वाटले नव्हते.

अलकाताई आधीपासूनच पुरोगामी, विवेकवादी विचारांच्या होत्या. त्यात त्यांना आबांच्या रूपाने जीवनसाथीही तसाच मिळाला. त्या काळात नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा आग्रह त्यांचा होता. बोरीवलीहून आपल्या गोरेगावच्या हौसिंग बोर्डच्या नव्या वास्तूमध्ये ते राहायला आले, तेव्हाची गोष्ट त्या नेहमी सांगत. घरं कधी तयार होतात आणि आपण त्यात कधी राहायला जातो, याची सर्वांनाच प्रतीक्षा असते. परंतु घर तयार होऊन ताबा देण्याची वेळ आली, तो पितृपंधरवडा येऊन ठेपला. सुमुहूर्त बघून नवीन घरात गृहप्रवेश करू इच्छिणारे कोणी पितृपक्षात गृहप्रवेश करण्यास धजावले नाहीत. परंतु कुठलाही किंतु न बाळगता चाफेकर कुटुंब नवीन घरात पितृपक्षात राहावयास आले.

आयुष्यात आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. शिक्षक, आई-वडील व समाजधुरिण वावरत असतात आणि या सर्वांतून आपल्या मनाची चांगली जडणघडण होऊ शकते. परंतु हे घडण्यासाठी आपल्याजवळ संवेदनाशील आणि संस्कारक्षम मन असावे लागते. असे मन अलकाताईंजवळ होते आणि त्यांच्या वावरक्षेत्रात अशी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे पण होती. गोरेगावमध्ये त्या ‘स्वाधार’ या केशव गोरे ट्रस्टमधून कार्यरत असलेल्या स्त्री संस्थेच्या सभासद होत्या. तेथे समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांचे काम त्यांना अगदी जवळून पाहता आले. लग्नाच्या वेळी त्या पोस्टात नोकरीला होत्या. पण आपल्या दोन मुलांची चांगली देखभाल व्हावी, या हेतूने त्यांनी बाहेरून बी. टी. पदवी प्राप्त करून नंदादीप माध्यमिक शाळेत नोकरी घेतली. मराठी आणि हिंदी हे त्यांचे विषय होते. विद्यार्थ्यांसमोर कवितेचे उत्तम रसग्रहण करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यासाठी त्यांना निवृत्तीनंतरही शाळा आमंत्रित करीत असे. अगदी गेल्या वर्षीपर्यंत त्या 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला शाळेतील कार्यक्रमास हजर असत. शिक्षण क्षेत्रात नावाजलेले, ध्येयवादी अरविंद वैद्य हे त्यांचे मुख्याध्यापक होते. ते शिक्षकांकडून सामाजिक बांधिलकीची अपेक्षा करीत, असे अलकाताई सांगत. त्यामुळे निवृत्त झाल्यावर त्या अर्जुन जगधने सरांबरोबर केशव गोरे ट्रस्टमध्ये भरणार्‍या ‘अंनिस’च्या बैठकीला हजर राहू लागल्या. एकेकाळी गोरेगाव ‘अंनिस’ शाखा मुख्यत्वेकरून ‘नंदादीप’मधील शंकर बळी, मनोहर वाकोडे, मच्छिंद्र बोराडे, जयसिंग राजगे अशा पाच-सहा शिक्षकांची मिळून होती. पाटकर कॉलेजचे प्रा. रवी देवगडकरही असत. ‘मध्यवर्ती’कडून राजू देशपांडे शाखा गठित करण्यासाठी येत असत. त्याच वेळी आपला ‘स्वयंअध्ययन‘ प्रकल्प या शाखेतूनच प्रथम राबविला गेला. सातार्‍याजवळील पाटण येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीत जेव्हा त्यासंबंधी अहवाल वाचण्यात आला, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढे हा एक अत्यंत यशस्वी उपक्रम म्हणून सर्व शाखांतून राबविला गेला. या संदर्भातील एक गोष्ट त्या उत्साहाने सांगत आणि विचारकृती पत्रिकेतही त्यांनी ती दिली होती. जुलै 2005 मधे मुंबईत अतिवृष्टीमुळे पूर आला होता. वस्तीत राहणार्‍या मुलांच्या वह्या-पुस्तकांना जलसमाधी मिळाली होती. आम्ही ज्या शाळांतून स्वयंअध्ययन प्रकल्प राबवित होतो, त्या शाळांतून आम्ही वह्या वाटल्या. अलकाताईंना एका शाळेतून मुख्याध्यापिका बाईंचा फोन आला. अलकाताईंनी तत्परतेने विचारले, ‘मॅडम, आणखी किती वह्या हव्या आहेत आपल्याला?’ पलीकडून मुख्याध्यापिका म्हणाल्या, ‘छे, छे! आमच्या शाळेला आणखी शंभर स्वयंअध्ययन प्रश्नपत्रिका हव्या आहेत, हे सांगायला फोन केला.’ विविध उपक्रमांतून आम्ही शाळांशी असे जिव्हाळ्याचे संबंध जोडले होते. रात्रशाळेचे सर गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी जेव्हा-जेव्हा येत, तेव्हा अलकाताईंनी त्यांना कधीच विन्मुख धाडले नाही. परवाच्या शोकसभेत ते सर भरभरून बोलले.

मुळातच पुरोगामी विचार असलेल्या अलकाताईंना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीची ही वाट अवघड वाटली नाही आणि त्या समर्पित भावनेने गेली वीस वर्षे गोरेगाव शाखेत काम करीत होत्या. अरविंद वैद्य यांच्या हाताखाली काम करून आणि मृणालताई गोरे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक चळवळीत भाग घेऊन अलकाताईंनी सामाजिक न्यायाची एक अनोखी तीव्र जाणीव आत्मसात केली होती. डॉ. दाभोलकरांच्या सहवासात आल्यावर त्यांच्या कामाला आणखीच झळाळी प्राप्त झाली. गृहप्रपंचाबरोबरच त्यांचा वर्तमानपत्रातून जोरदार पत्रप्रपंचही चालत असे. त्यांच्या निर्भीड पत्रलेखनाचा हा एक नमुना : पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला ज्यांचा विषयाशी सुतराम संबंध नसलेल्या होकस पोकस स्वामींना उद्घाटक म्हणून बोलाविले गेले, तेव्हा ताईंनी आपल्या पत्रलेखनातून विद्यापीठाला खडसावले. त्या लिहितात, “स्वामींच्या इच्छेखातर मुहूर्त पाहणे, ठराविक रंगाच्याच निमंत्रण पत्रिका काढणे, मुहूर्त न पाहणे हा गुन्हा मानणे, कोणत्या रंगाच्या शाईनेच सह्या करायच्या, याचे बंधन असणे, प्रबंध सादर करायलाही मुहूर्त पाहणे, या व अशा काही चीड आणणार्‍या अवैज्ञानिक गोष्टी स्वामींच्या आज्ञेवरून जेथे चालतात, ते हे विद्यापीठ आहे की धर्मपीठ? आपण 21 व्या शतकात आहोत की वेदकाळात? ‘लोकसत्ते’तील ही बातमी वाचून भयंकर संताप येतो… वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्राधान्य देणारी आमची घटना आहे आणि जगातील एक मोठी लोकशाही. याच लोकशाहीच्या या घटनेला शह देण्याचे काम बुवा- बापूंच्या माध्यमातून निष्क्रिय बनलेल्या समाजाकडून होत आहे. एकटी अंधश्रद्धा निर्मूलन संघटना त्यास किती पुरी पडणार?”

अलकाताईंनी बरीच वर्षे गोरेगाव शाखेच्या कार्याध्यक्ष म्हणून काम सांभाळले. वार्तापत्राचे वर्गणीदार मिळविणे, त्याबाबतच्या अद्ययावत नोंदी ठेविणे आणि त्याचा पाठपुरावा करणे हे काम त्या न कंटाळता करत. बर्‍याचदा वर्गणीची मुदत संपत आली की, त्यांचा फोन जात असे. ‘तुमची वर्गणी अमुक-अमुक तारखेला संपत आहे मी तुमच्या सभासदत्वाचे नूतनीकरण करीत आहे. भेटू तेव्हा वर्गणी द्या.’ त्यातील एकही खाते कधी बुडीत गेल्याचे ऐकले नाही.वाढते वय आणि त्यामागून येणार्‍या शारीरिक तक्रारी यांना न जुमानता त्या याच चिकाटीने वार्षिक अंकासाठी जाहिराती गोळा करीत असत.सांगलीहून येणारी वार्षिक अंकांची गाडी मुंबईत शिरली की, पहिला मुक्काम गोरेगावला अलकाताईंच्या घरी ठरलेला. खाण्या-पिण्याची तयारी ठेवून अलकाताई वाट पाहत असत. मुंबईचे सगळे अंक आणि पावत्या त्यांच्याकडेच उतरविल्या जात आणि तेथूनच मग सर्व वाटप होत असे. याशिवाय शाळा, महिला मंडळ येथील व जाहीर कार्यक्रमातून त्या काळ, वेळ, अंतर वा मुंबईच्या गाड्यांतील जीवघेणी गर्दी यांची तमा न बाळगता अंधश्रद्धा निर्मूलनाचे विषय चमत्कार सादरीकरणासह सहजपणे मांडीत असत; अगदी जळता कापूर खाण्यासकट.

मी आणि अलकाताई तशा समवयस्क आणि आमची ‘अंनिस’मधील ‘इनिंग’ पण एकत्र आणि समकालीन. त्यामुळे सांगण्यासारखे किस्से पण खूप आहेत. एकदा कांदिवलीला बंद्रे सरांच्या ‘बालकविहार’मध्ये ‘अंनिस’चे जाहीर शिबीर होते. आम्हाला आदल्या दिवशी पोलीस अधिकार्‍यांचे फोन येऊ लागले – ‘शिबीर घेण्यापूर्वी येऊन भेटा.’ सकाळी मी व अलका पोलीस स्टेशनवर गेलो. सनातन संस्थेची लेखी तक्रार आम्हाला दाखविण्यात आली. ‘हे अंधश्रद्धावाले हिंदू धर्माविरोधात बोलतात. बायकांना मंगळसूत्र घालू नका, कुंकू लावू नका, असे शिकवतात,’ अशी तक्रार होती. अलकाने आपले मंगळसूत्र दाखविले व म्हटले, ‘माझ्या गळ्यात हे असताना कुठल्या तोंडाने आम्ही असे म्हणू शकतो? तुम्ही असं करा, आमच्या शिबिरात काय चालते ते बघायला तुमचे पोलीस धाडा.’ त्याप्रमाणे दोन पोलीस दिवसभर होते. नेहमीप्रमाणे शिबीर उत्स्फूर्त आणि उत्कृष्ट झाले. दिवस संपताना दोन्ही पोलीस भेटायला आले. ते खूष होते. संजय सावरकर फलज्योतिष विषयावर बोलले. ते त्यांना फारच आवडले, असे त्यांनी आवर्जून सांगितले.आमच्या बैठका जेथे भरतात, त्या केशव गोरे स्मारकाजवळच अंबामाता मंदिर आहे. नवरात्रीत तेथे जत्रा भरते. ‘सनातन’चा स्टॉल असतो. त्यांच्या पुस्तकांतून असते तरी काय, हे बघण्याचे आम्ही ठरवले. त्यांची पुस्तकं विकत घ्यायला अलकाताई गेल्या. पुस्तकं घेतल्यावर त्या विक्रेत्यांना त्यांनी, ‘तुम्ही आमच्या माणसाला का ठार मारलं,’ असं खडसावून विचारलं. ते गप्प बघत राहिले. एकाच वेळी शांत आणि धाडसी व्यक्तिमत्त्व होते त्यांचे. आपले हितचिंतक आणि देणगीदार यांच्याशी चांगला संपर्क ठेवणे संघटनेच्या हिताचे असते, असे डॉ. दाभोलकर नेहमी म्हणत. नव्वदीच्या घरात असलेले मा. सुधाकरराव आठल्ये या आपल्या देणगीदाराकडे अलकाताई श्रीयुत चाफेकरांसह फुलांचा गुच्छ घेऊन वाढदिवसाला त्यांचे अभीष्टचिंतन करायला गेल्याचे मला आठवते. त्यांनी डॉक्टरांसमवेत श्री. आठल्यांची भेट घेतली, संवाद साधला, तेव्हा त्यांनी आपणहून आपली देणगी रक्कम काही लाखांनी वाढविली. या देणगीतून देण्यात येणारा पहिला गौरव पुरस्कार इस्लामपूरच्या राज्य कार्यकारिणीत अलकाताईंनाच देण्यात आला. त्या हसत-हसत डॉक्टरांना म्हणाल्या, ‘डॉक्टर, तुम्ही फार लबाड आहात. ही तुमची युक्ती छान आहे! पाठीवर शाबासकी देऊन कार्यकर्त्याला अधिक काम करायला प्रवृत्त करायचे.’ त्यांची मनमोकळी प्रतिक्रिया ऐकून कार्यकर्त्यांच्यात हशा पिकला. खरोखरच कार्यकर्ते जमा करायचे, वेगवेगळ्या मोहिमा राबवून त्यांना व्यस्त ठेवायचे, त्यांच्या कर्तृत्वाला वाव देऊन त्यांना घडवायचे, यात डॉक्टर माहीर होते. असा परिसस्पर्श झालेले अनेक जण संघटनेत आहेत, अलकाताई त्यापैकी एक.

स्त्री कार्यकर्ती म्हटले म्हणजे तिला घरगाडा ध्यानात ठेवूनच सामाजिक काम करावे लागते. घरीदारी कुणी विन्मुख होऊन जाऊ नये, ही स्त्रीसुलभ जाणीव तर त्यांच्या कृतीतून सतत दिसत असे. अशा या अलकाताई एकत्र कुटुंबाचा तोलमाल तितक्याच लीलयेने सांभाळीत असत. त्यांना आलेले फोन त्यांचे यजमानच तत्परतेने आणि अगत्याने घेत असत. वाढत्या वयाने व प्रकृतिअस्वास्थ्याने बाधित आपल्या यजमानांची काठी बनून हसतमुखाने त्यांना सर्व बाबतीत त्या साथ देत असत. ‘लोकसत्ते’त माझं पत्र छापून आलं की, पहिला फोन अलकाताईंचा असे. आल्या-आल्या त्यांचे यजमान वर्तमानपत्र वाचीत आणि ‘अलका, अगं तुझ्या मैत्रिणीचं पत्र आलंय,’ म्हणून सांगत. आज ‘लोकसत्ते’त माझं पत्र आलं आहे छापून; पण आज माझ्या मैत्रिणीचा फोन येणार नाही आणि यापुढे कधीच येणार नाही.