मौजे पिंपळगाव (डोळा) ता. कळंब, जि. उस्मानाबाद येथील एक गरीब कुटुंब. त्या कुटुंबातील कृष्णा नामक शाळकरी मुलगा 26 जानेवारीच्या प्रभात फेरीत सामील झाला. तो घरी परत आलाच नाही. आई घरी वाट पाहत होती. घरी आला नाही म्हणून आई कृष्णाला शोधत – शोधत शाळेत आली. कुणीच दिसले नाही, म्हणून गावातील नातेवाईक, मित्र यांच्याकडे शोध घेतला, सर्वांनी कृष्णा घराकडं गेला, असं सांगितलं- रात्र झाली दिवस उजाडला, कृष्णाचा काही पत्ता लागेना. गावच्या बाहेर शेतात घर असल्यामुळे शेतातील उभ्या पिकात शोधलं, लांबच्या पाहुण्याला फ़ोन करून विचारलं तरी कृष्णाचा काही पत्ता लागत नाही, म्हणून पोलीस स्टेशनला कळवलं पोलिसांनी तपास चालू केला; पण सुरुवातीला काहीच तपास लागला नाही, कृष्णाच्या अशा गायब होण्याने सर्वांच्या मनात बेचैनी निर्माण झाली. दुसर्या दिवशी अचानक शेजारची कुत्री भुंकायला लागली, त्या दिशेने जाऊन बघितलं तर काय, कृष्णाचं संपुर्ण शरीर छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून आलं! त्याचं संपूर्ण शरीर रक्ताने माखलं होतं. रडण्या-ओरडण्याच्या आवाजाने परिसरातील लोकांची गर्दी जमली. कोण म्हणालं, कुत्र्याने चावा घेतला असंल, कोण म्हणालं रानटी जनावरानं झडप घातली असंल; कोण म्हणालं, भूत-भानामतीनं झपाटलं असंल; पण कृष्णाच्या शरीरावरील जखमा वेगळ्याच काहीतरी सांगत होत्या, पोलिसांनी पंचनामा केला, कृष्णाच्या मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यात आले; पण सर्वांच्या मनात प्रश्न कायमच राहिला, कृष्णाचा मृत्यू कशामुळे झाला? पोलिसांसमोर एक मोठे आव्हानच होते. घटनेच्या दोन महिन्यानंतर पोलीस तपासाला यश आले, स्थानिक वर्तमानपत्रामध्ये बातमी आली – ‘मृत आत्म्याच्या शांतीसाठी निष्पाप कृष्णाचा बळी; मांत्रिकाने सुचवला नरबळीचा उपाय’ बातमी सुन्न करणारी होती. एकविसाव्या शतकामध्ये असं होतंय यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, असंच काहीतरी होतं. या प्रकरणात जादूटोणाविरोधी कायद्यातील कलमान्वये एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली, यामध्ये मांत्रिक बुवा व त्याची महिला सहकारी यांना पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. वर्तमानपत्रातील आलेल्या माहितीवरून मयत कृष्णाच्या नात्यातील एक महिलेला संसारिक सुख मिळत नाही, मूलबाळ होत नाही, या कारणांनी ती मनोविकाराने पीडित होती. 35 वर्षांपूर्वी तिचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता; तिचा आत्मा भटकत असल्याची त्यांची भावना होती. त्यामुळे घरी सुख-शांती टिकत नसल्याची तक्रार होती. अशातच एक तांत्रिक बुवा त्यांच्या संपर्कात आला. त्यानं या सर्व समस्यांवर व भटकता आत्मा शांत करण्यासाठी पूजा मांडून नरबळी देण्याचा उपाय सुचवला. त्यासाठी अमावस्येची तारीख निश्चित केली, नरबळीसाठी भावकीतील कृष्णाला हेरून ठेवले. त्याप्रमाणे 26 जानेवारी रोजी कृष्णाला उचलले व रुमण्याने डोक्यात घाव घालून त्याचा बळी दिला. कृष्णाच्या शरीरावर काही ठिकाणी टोचून रक्त काढल्याच्या खुणाही आढळून आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तांत्रिकाकडून मृत महिलेची काळ्या पाषाणाची मूर्ती मिळाली. मूर्तीला मृत स्त्रीचा चेहरा लावण्यात आला होता. समाधीसाठी ख़ड्डा खोदला होता. त्या ठिकाणी कृष्णाचे रक्त टाकल्याचे तपासात समोर आले.
या बातमीची शहानिशा करण्यासाठी उस्मानाबाद अंनिस शाखेचे प्रा. किरण सगर, अॅड. अजय वाघाळे, डोंगरे सर, पाशा कोतवाल यांनी घटनेच्या गावी जाऊन कृष्णाची आई व आजोबांची भेट घेतली. (वडील बाजाराला गेल्यामुळे भेट झाली नाही.) कृष्णाच्या आईने संपूर्ण प्रकार सांगितला. हंगामात ऊस तोडून व इतर वेळी शेतात मजुरी करून कुटुंबाचा गाडा चालतो. यावर दोन मुलांचं शिक्षण, पती-पत्नी, सासरा, असे एकूण कुटुंब, गावापासून थोड्या अंतरावर शेतामध्ये कुडाचे घर. त्यालाच लाकडाचा आधार देऊन पत्रे. बाजूंनी तुराट्याच्या भिंती. खाली शेणाने सारवलेले घर व अंगण. बघताक्षणी अठराविश्वे दारिद्य्राच्या कळा. अशातच कुटुंबावर आलेलं हे मोठं संकट, सर्वांच्या डोळ्यांत अश्रू… आणि नातवाच्या अकस्मात जाण्याने आजोबांचे दु:ख अनावर झालेले पाहायला मिळाले.
उस्मानाबाद अंनिस आपल्या दु:खात सहभागी आहे. शाखेचे पदाधिकारी आपणास भेटत राहतील, अगदी आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे, असा विश्वास प्रा. किरण सगर यांनी कुटुंबीयांना दिला. हे प्रकरण उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात असल्यामुळे अॅड. अजय वाघाळे यांनी या प्रकरणात सरकारी वकिलांना मदत करण्याचे कबूल केले. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन आम्ही परत निघालो. झालेला प्रकार गंभीर असल्यामुळे आमच्यातील अस्वस्थता जाणवत होती.
कृष्णाच्या प्रकरणामुळे मला रात्रभर झोप आली नाही. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आठवण आली. मनात ठरवलं, या कुटुंबाला आपण मदत करायची. मी दुसर्याच दिवशी कोर्ट गाठले. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या ऑफीसमध्ये गेलो. या प्रकरणाबद्दल माहिती सांगितली व आपणाकडून पीडित कुटुंबाला कशा स्वरुपात मदत करता येईल, याची माहिती घेतली. केंद्र व राज्य सरकारची ‘महाराष्ट्रात बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई योजना 2014’ याविषयी माहिती मिळाली. लाखावर मदत मिळते, हे कळाले. यावरून पीडित कुटुंबाला निरोप देऊन बोलावले, योजनेची माहिती दिली. कागदपत्राची पूर्तता केली. न्यायालयीन कामकाज पाहत पाठपुरावा केला.
एक लाख रुपयांची मदत जाहीर झाली. एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते, ‘महाराष्ट्रात बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई योजना 2014’ अंतर्गत दोन लाख रुपयांचा धनादेश पीडित कुटुंबीय कृष्णाचे आई-वडील यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात आला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हा विधी सेवा कार्यालय व प्रशासन अधिकारी यांचे ऋण व्यक्त करते.
अॅड.अजय वाघाळे
लेखक संपर्क ः 9850753502