Categories
अफवा

शिर्डीत साईबाबा प्रकट झाले का?

सप्टेंबर - २०१८

बुधवार, दिनांक 12 जुलै 2018 रोजी रात्री 12 नंतर शिर्डी येथे द्वारकामाईच्या भिंतीवर साईबाबांची छबी दिसून आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर तिथे साईभक्तांची गर्दी झाली. सोशल मीडियावर सर्वत्र चमत्काराच्या नावाने प्रसिद्धी मिळाली. याही आधी शिर्डीत व भारतातील इतर ठिकाणीही, कॅनडासारख्या प्रगतशील देशात अशा प्रतिमा दिसल्याचा दावा आहे. त्याचे फोटो व्हिडीओ उपलब्ध आहेत. असे प्रकार घडले की, त्या स्थळाचे धार्मिक महत्त्व वाढते व भक्त गर्दी करतात. याचे चांगले उदाहरण म्हणजे मुंबईत दहा वर्षांपूर्वी माहिमच्या जवळील समुद्र गोड झाला होता. तो तिथे असलेल्या मगदूम बाबाच्या दर्ग्यामुळे, असा दावा होता, नंतर तिथेच असलेल्या चर्चमध्ये येशूच्या छातीतून रक्त येत असल्याचा दावा झाला. त्यानंतर तिथलेच हिंदूचे देव दूध पिण्याचा चमत्काराचा दावा अशी हॅट्ट्रिक झाली होती. त्यामागील कार्यकारणभाव शोधल्यावर ते प्रकार बंद झाले होते; मग आजही विज्ञानयुगात असा चमत्काराचा दावा का केला जातो? चिकित्सा का केली जात नाही, याचा विचार करायची गरज आहे.

साईबाबांची प्रतिमा कशी दिसली, हे जर आपल्याला शोधायचे असेल, तर भक्ताच्या भूमिकेतून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून विवेकी भूमिकेतून याकडे बघावे लागेल. मूळ घटना बुधवारी, 12 जुलैला द्वारकामाई येथे भिंतीवर घडली. तिथला कर्मचारी साफसफाईसाठी गेला होता. रात्री 12 वाजता त्याठिकाणी त्याला व काही इतर लोकांना प्रतिमा दिसली. साधारण दोन ते तीन तास दिसल्यानंतर तो प्रकार बंद झाला. काहींनी त्याचे फोटो काढले व सोशल मीडियावर टाकले. नंतर ही बातमी पसरताच साईभक्तांचा पूर शिर्डीत आला. त्यानंतर काहीजणांना ही प्रतिमा दिसली, काहींना दिसली नाही किंवा ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात वाहिन्यांच्या कॅमेर्‍यालाही कैद करता आली नाही. मग प्रतिमा फक्त साईभक्तांनाच कशी दिसली, याची कारणमीमांसा करूया. मी जर एखाद्या देवाचा भक्त असेन व मला देवाला भेटायची आस (तीव्र इच्छा) असेल, तर तशी माझ्या मनाला स्वयंसूचना दिली गेली असेल, तर समोर असलेली आकृती मला त्याच देवाची प्रतिमा दिसेल आणि जर आजूबाजूच्या भक्तिपूर्ण वातावरणात या विषयाने भारावून गेलेले भक्त असतील, तर त्यांना तशी साहजिकच आपल्या देवाची प्रतिमा वाटू शकेल, दिसू शकेल. हा दृष्टिभ्रमही असू शकेल. काळोखी रात्र आहे, खिडकी बंद आहे व खिडकीवर असलेली दोरी हलली असेल, तर एखाद्या व्यक्तीला तो साप वाटू शकेल. याला ‘ऑप्टिकल इल्युजन’ असे विज्ञानाच्या भाषेत म्हटले जाते. ती प्रतिमा तीन तासांनंतर गायब झाली; पण तिथे येणार्‍या काही भक्तांना तरीही प्रतिमा दिसत होती, मीडियाच्या कॅमेर्‍याला किंवा मोबाईलला नाही. काही भक्तांना खरोखर दिसतही नव्हती; पण ते सांगायला घाबरत होते. कारण त्यांच्या मनात असे विचार येत होते की, मला दिसत नाही म्हणजे माझी भक्ती कमी आहे का? मी पापी आहे का? आणि प्रवाहाच्या विरुद्ध मत देणे तर फारच बिकट व कठीण काम असते. म्हणून ते सत्य बोलायला टाळत होते.

आता दुसरी बाजू तपासूया. विवेकी व वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजा रात्री तिथे साईबाबांची प्रतिमा दिसली, छबी दिसली, ही साधी घटना. याचा अर्थ तिथे साईबाबा जिवंत होऊन चमत्कार घडला, असा होत नाही. अशी प्रतिमा तयार करता येते. ती कशी केली, हेही शोधता येते. त्याप्रकारे विचार करणे, प्रश्न उपस्थित करणे, चिकित्सा करणे गरजेचे आहे. अशा प्रतिमा कशा प्रकारे करता येतात, हे पाहूया. अशी प्रतिमा प्रोजेक्टरद्वारे, लेझरद्वारे, आरश्याने परावर्तित करून किंवा काही मोबाईलमध्ये अशी सोय असते इत्यादी प्रकारे अशा प्रतिमा भिंतीवर प्रकट करता येतात.

अशा प्रकारे त्या ठिकाणी चमत्कार करून त्या स्थळाचे महत्त्व वाढविण्याने साहजिकच तिथली अर्थव्यवस्था तेजीत येते. उदा. राहण्याची सोय, वाहतूक व्यवस्था, हॉटेल, खाणे इत्यादी. पर्यटन वाढते म्हणून अशा चमत्कारांना स्थानिक लोक विरोध करीत मूकसंमती देतात. याचे चांगले उदाहरण ‘देऊळ’ या चित्रपटात आले आहे. दैवी चमत्कार, प्रचार-प्रसार करून लोकांना फसवणे, ठकविणे, लुबाडणे हा जादूटोणाविरोधी कायद्याने गुन्हा आहे. सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवू नका, असे खुद्द मुख्यमंत्री धुळ्यातील घडलेल्या अमानुष हत्येच्या घटनेनंतर बोलले आहेत. हा गुन्हाही आहे. तरीही प्रशासन, पोलीस यंत्रणा किंवा शिर्डी संस्थान यांनी या प्रकाराची दखल घेतली नाही, ही मोठी खेदाची बाब आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, प्रचार-प्रसार करणे, या कर्तव्याचंही भान सर्वजण विसरून गेले. साईभक्तांच्या भावनांशी खेळ चालू केला. याचा साईभक्तांनाही विसर पडला. साईभक्त पण श्रद्धा, सबुरी विसरून लगेचच चमत्काररुपी अंधश्रद्धेच्या पायी शिर्डीत गर्दी करू लागले. साई संस्थानमध्ये विश्वस्त आहेत, सरकारचे प्रतिनिधीही आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अहमदनगरचे जिल्हाधिकारीही आहेत; पण यापैकी कोणीही किंवा पोलीस प्रशासनानेही संविधानपूरक भूमिका घेतली नाही. ती त्यांची जबाबदारी व कर्तव्याचा भागही होता. अंधश्रद्धेची एवढी मोठी घटना घडते; पण मुख्यमंत्री प्रशासनप्रमुख व गृहखात्याचे प्रमुख म्हणून कोणतेही भाष्य केले नाही. यामध्ये एक नमूद करण्याची चांगली गोष्ट म्हणजे या विषयावर माध्यमांनी घेतलेल्या चर्चेची. त्या चर्चेत कार्यकर्त्यांनी साईबाबांच्या झालेल्या चमत्काराविषयी समर्थपणे व समतोलपणे विषय हाताळला. साईबाबांची संत म्हणून गोरगरिबांची सेवा, हिंदू-मुस्लिम सलोखा, ऐक्य, भूमिका, श्रद्धा-भक्ती असावी, अंधश्रद्धा नसावी हे ठामपणे माध्यमांपुढे, समाजापुढे मांडणी केली. एवढेच नव्हे, तर टी.व्ही.-9 च्या कार्यक्रमात ‘लाईव्ह’ चमत्कार करता येतात, हे दाखवून व त्यामागील कार्यकारणभाव, हातचलाखी, रासायनिक अभिक्रिया स्पष्ट केली. यामध्ये पाण्याने दिवा पेटविण्यापासून ते धारदार खिळ्याच्या पाटावर झोपण्यापर्यंतचे प्रयोग करून दाखविले. चर्चेत आलेले साईभक्त प्रतिनिधी, मानसोपचारतज्ज्ञ, वारकरी यांनाही अंनिसची भूमिका जवळजवळ पटलेली होती. त्यांनीही तशीच पूरक भूमिका मांडली. साईभक्तांनी आपल्या भक्तीचे स्वातंत्र्य, श्रद्धेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून चमत्काराला व त्यामुळे होणार्‍या शोषणाला जाहीरपणे विरोध केला. चमत्काराला नमस्कार ही आमची भूमिका नाही, असेही म्हटले.

नंदकिशोर तळाशीलकर, मुंबई