Categories
संपादकीय

विवेकवादी समाज घडविण्याच्या स्वप्नाच्या दिशेने…

ऑगस्ट २०१८

20 ऑगस्टला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या शहिदत्वाला पाच वर्षे पूर्ण होतील. अजूनही त्यांच्या; तसेच कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी यांच्या खुन्यांचा पत्ता तपास यंत्रणांना लागलेला नाही. न्यायालयीन दबाव असूनही तपास ‘जैसे थे’ असल्यासारखी परिस्थिती आहे. सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण या संघटनांच्या साधकांची नावे आरोपपत्रात नमूद असूनही त्या संघटनांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. या संदर्भातला मुक्ता दाभोलकरांचा तपशीलवार लेख आम्ही या अंकात देत आहोत. गेली पाच वर्षे अंनिस खुनाच्या तपासाबाबत होत असलेल्या तपास यंत्रणांच्या चालढकलीसंदर्भात रस्त्यावरही आवाज उठवत आहे. महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या अनेक शाखा ‘निर्भय मॉर्निंग वॉक’, निषेध मोर्चे, सत्याग्रह, व्याख्यानमाला असे विविध लोकशाही मार्ग अवलंबत या प्रश्नांची तीव्रता गेली पाच वर्षे सातत्याने जागती ठेवत, आपला निषेध व संताप व्यक्त करत आहेत. त्या संदर्भातील काही शाखांच्या कार्यक्रमांचा वृत्तांतही उदाहरणादाखल आम्ही या अंकात देत आहोत; पण तपासयंत्रणांच्या या चालढकलीस प्रामुख्याने या प्रश्नाबाबतची भाजपसारख्या केंद्र व राज्य सरकारातील सत्ताधारी पक्षांची राजकीय उदासीनताच जबाबदार असल्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी अशा रस्त्यावरील कार्यक्रमांची तीव्रता आणि व्यापकता समविचारी संघटनांच्या सहभागाने वाढवणे गरजेचे आहे, या संदर्भात महाराष्ट्र अंनिसने पुकारलेल्या ‘जबाब दो!’ आंदोलनाची तीव्रता अंनिस कार्यकर्त्यांना वाढवावी लागणार, हे मात्र निश्चित. गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासाला कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीनंतर थोडीफार गती आलेली आहे. त्या संदर्भात नुकतीच दहावी अटक झालेली आहे.

डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम थंडावेल, या भ्रमात सनातनी होते; किंबहुना डॉक्टरांच्या खुनामागील त्यांचा हाच प्रमुख हेतू होता; पण अंनिस कार्यकर्त्यांनी सनातन्यांचे सारे मनसुबे उधळून लावले. अंनिस कार्यकर्त्यांच्या लेखी ‘माणूस मारला तरी विचार मारता येत नाहीत’ हा केवळ पुस्तकी सुविचार राहिला नाही, तर गेल्या पाच वर्षांत त्यांनी तो प्रत्यक्षात आणून दाखवला. सामोरे आलेल्या आव्हानांना डॉ. दाभोलकरांनी रूळवलेल्या ‘विवेकी विचारां’च्या मार्गाने तोंड देत संघटना केवळ टिकविलीच, असे नव्हे, तर तिचा प्रभाव सर्वदूर पोचविला; परिणामी फेब्रुवारी 2018 मध्ये झालेल्या ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स काँग्रेस’ मध्ये 20 ऑगस्ट हा डॉक्टरांचा स्मृतिदिन ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून या वर्षीपासून दरवर्षी साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कार्यकर्त्यांनी विविध पातळ्यांवर केलेल्या कार्याचा विनायक सावळेने पत्ररूपाने घेतलेला या वर्षीचा लेखा-जोखा आम्ही या अंकातून वाचकांपर्यंत पोचवीत आहोत.

पाच वर्षांपूर्वी 20 ऑगस्ट 2013 ला दाभोलकरांचा खून झाला. या पाच वर्षांत देशातील परिस्थिती उत्तरोत्तर अराजकतेकडेच वाटचाल करीत आहे. डॉ. दाभोलकरांचा खून ही जणू त्या अराजकतेची चाहूलच होती. आज सोशल मीडिया, वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी माध्यमांचा वापर करून अफवा पसरवत पंतप्रधानांपासून गल्लीबोळातल्या पुढार्‍यांपर्यंत अवैज्ञानिक, अनैतिहासिक, धर्मांध दावे करत देशभरात असहिष्णू, हिंसक, उर्मट, बीभत्स, मागास, चिंतेचे, धार्मिक केंद्रीकरणाचे, जाती-जातीतील तेढीचे, द्वेषाचे, दहशत निर्माण करणारे वातावरण पसरवले जात आहे. त्याच्या परिणामी प्रत्यक्ष जमिनीवर स्त्रिया, दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. पुणे, दादरी, अलवार, उना, कथुआ, उन्नाव, भीमा-कोरेगाव ही गेल्या चार वर्षांतील; तर अगदी अलिकडील महाराष्ट्रातील धुळे, राजस्थानातील अलवार, कर्नाटकातील मुक्री, त्रिपुरातील सब्रूम ही काही उदाहरणे. एप्रिल 2018 पासून गाय तस्करीच्या आणि मुले पळविण्याच्या संशयाखाली 46 जणांना जमावाने ठार मारल्याची नोंद ‘एनसीआरबी’कडे आहे. अशा या हिंसक वातावरणाच्या विरोधात अंनिसने 20 जुलै ते 20 ऑगस्ट आयोजित केलेली ‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ ही मोहीम महत्त्वाची ठरते.

2003 साली इचलकरंजी येथे झालेल्या अंनिसच्या वार्षिक संमेलनाला तेथील हिंदुत्ववादी संघटनांनी दहशत पसरवत कडवा विरोध केला होता; पण त्या दहशतीला, विरोधाला न जुमानता इचलकरंजीतील डाव्या आणि पुरोगामी संघटनांच्या सहाय्याने अंनिसने ते संमेलन यशस्वी केले होते. त्या संमेलनात डॉ. दाभोलकरांनी ‘सावध…! ऐका पुढील हाका’ असे शीर्षक देऊन धर्मांध संघटनांच्या धोक्याची मांडणी केली होती. त्यात त्यांनी हिंसेच्या, दहशतीच्या वातावरणाचा सर्वांत मोठा धोका लोकशाही मूल्यांना कसा असतो व लोकशाही मूल्यांच्या र्‍हासामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीसारख्या चळवळीसमोर अस्तित्वाचेच प्रश्न उभे राहू शकतात. त्यामुळे या वातावरणाच्या विरोधात आपला विवेक न सोडता ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे विवेचन केले होते. आजची लोकशाहीची स्थिती तर त्यावेळेपेक्षाही बिकट आहे. आज ‘हिंसा’ आपल्या घराच्या उंबरठ्यावर आहे. भारतीय घटनेलाच आव्हान दिले जात आहे. अशा आव्हानात्मक काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती येत्या 9 ऑगस्टला 30 व्या वर्षांत प्रवेश करीत आहे. कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी या संदर्भात कार्यकर्त्यांशी साधलेला संवादही आपण या अंकात वाचाल. या तीस वर्षांच्या काळात आपण बरेच काही कमावले असले, तरी आपण आपला ‘हाकारा’ गमावला आहे. तरीही या पाच वर्षांत ज्या प्रमाणे ‘आम्ही सारे दाभोलकर’ बनत आपण प्रत्येक आव्हानाला संघटितपणे तोंड दिले, त्याचप्रमाणे पुढील काळातही येणार्‍या प्रत्येक आव्हानावर मात करीत विवेकवादी समाज घडविण्याच्या स्वप्नाच्या दिशेने आपण ठामपणे वाटचाल करीत राहणे, हीच आपली डॉ. दाभोलकरांना त्यांच्या 5 व्या स्मृतिदिनानिमित्तची आदरांजली ठरेल.