चंद्रपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेले चोरगाव अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले पाहून येथे कार्यरत असलेले शिक्षक बंडू फुलझेले यांच्या पुढाकाराने मुख्याध्यापक वर्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावाला प्रबोधित करण्याकरिता पी. एम. जाधव यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली. याच कार्यक्रमात या गावातील आंतरजातीय विवाहित जोडप्याचा सत्कार करण्यात आला. यापुढे असेच संत व समाजसुधारक यांचे प्रेरणादायी विचार लोकांमध्ये रुजविण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून सतत कार्यक्रम घेण्यात येतात. फुले-आंबेडकर विचार संवर्धन समिती, चंद्रपूरचे अध्यक्ष गोपाळराव देवगडे यांच्या पुढाकाराने भारतीय संविधानाबद्दल जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमामुळे या गावामध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झाली आणि 2018 मध्ये या गावात आमूलाग्र बदल झाला. ‘अंधश्रद्धा व कर्मकांडमुक्त धर्मनिरपेक्ष भावनेचे चोरगाव बनले,’ अशी वार्ता कळताच 3 जानेवारी 2019 ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘भारतीय संविधान हक्क परिषद’ या कार्यक्रमाचे आयोजन चोरगाव येथे करण्यात आले. या गावाची वास्तविक वस्तुुस्थिती जाणून घेण्याकरिता या कार्यक्रमाला उपस्थित झालो. आश्चर्यचकित करणारे असेच या कार्यक्रमाचे भव्य आयोजन होते. विज्ञाननिष्ठ व विवेकी विचारांनी समाजाला प्रबोधित करणारे बुद्ध, सम्राट अशोक, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बिरसा मुंडा, शहीद बाबूराव शेडमाके, संत तुकाराम महाराज, संत कबीर, क्रांतिसूर्य जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर, पेरियार रामस्वामी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पथदर्शक पोस्टर संपूर्ण गावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा लावून त्यांच्या कार्याची आठवण करून देत होते.
गोपाळराव देवगडे, डॉ. राकेश गावतुरे, अॅड. हिराचंद बोरकुटे (अध्यक्ष, अ. भा. सत्यशोधक समाज मंडळ, चंद्रपूर), प्रा. धीरज शेडमाके, खुशाल तेलंग, बंडू फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या या मंचाचे प्रमुख सूत्रधार या गावचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंगजी कोकोडे असून, त्यांनी गावातील सर्व सहकार्यांच्या सहकार्याने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून वैचारिक क्रांती घडवून आणली. आपल्या गावाला आदर्श गाव बनविण्यासाठी सर्व गावकर्यांनी एकमताने खालीलप्रमाणे सर्वमान्य निर्णय घेतले.
सत्यनारायणाची पूजा करावयाची नाही. मंदिरांना कुलपे लावायची. कारण ती भौतिक अथवा मानसिक उन्नतीसाठी उपयोगाची नाहीत. दगडाच्या देवांची पूजा करावयाची नाही. त्याऐवजी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या पुरोगामी महामानवांच्या विचारांचा वारसा, क्रांतिकारी बिरसा मुंडा, शहीद वीर बाबूराव शेडमाके व संताच्या विचारांच्या वारसा पुढे चालू ठेवणे; तसेच भारतीय संविधानच देशाला कल्याणाचा वास्तविक मार्ग दाखवू शकते. त्यामुळे संविधानाचे प्राणपणाने जतन करणे आपले कर्तव्य आहे, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. या गावात सत्यशोधक पद्धतीने विवाह लावले जातात. या गावामध्ये ओबीसींचे 125, आदिवासींचे 120, बौद्धांचे 7, एनटीचे 4 आणि खातेवाडीचे 4 अशी एकूण 260 घरे आहेत. सर्व गावकरी स्नेहभावनेने, एकोप्याने, बंधुभावाप्रमाणे एकत्र राहत आहेत. या क्रांतिकारी गावाचे चोरगावऐवजी ‘क्रांतीनगर’ असे नाव ठेवण्याचा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या गावाचा आदर्श या परिसरातील वरवट, निंबाळा, बोर्डा, मोहुर्ली, मसाळा, सिनाळा, पद्मापूर, किटाळी, अडेगाव, वायगाव, मामला ही गावे घेणार असल्याचे कळते. चोरगाव गावाला क्रांतिकारी व विज्ञाननिष्ठ बनविण्यासाठी पांडुरंगजी कोकोडे, डॉ. नरेश गेडाम, बंडू चौधरी, विकी लोनबले, मारोती सुरपाम, चंद्रशेखर वेलादी, शरद मोहुर्ले, सविता वाडगुरे (सरपंच), सिंधूताई लोणबले (पंचायत समिती सदस्य), पौर्णिमा कोकोडे व बंडू फुलझेले यांचे मोलाचे योगदान असून या सर्वांच्या सहकार्यामुळेच सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, नागपूर यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम सर्व गावकर्यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला. हे गाव आदर्श गाव बनून इतर गावांसाठी पथदर्शक बनावे, अशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चंद्रपूरच्या वतीने सदिच्छा!
–पी. एम. जाधव, चंद्रपूर