जाती व्यवस्थेशी झुंजणारे म. बसवाण्णा यांच्या पुरोगामी वचनांची ओळख वाचकांना या सदरातून दरमहा करून देत आहोत.
अग्नीस देव मानून घरी विप्र करितसे हवन,
घर त्याचे पेटता आग भडकून
नहाणीचे पाणी नि रस्त्याची धूळ टाकून
बोलवितो सर्वांना बोंब ठोकून
कूडलसंगमदेवा
निंदितात हो, वंदायचे विसरून॥
महात्मा बसवण्णा हे मध्ययुगीन कालखंडात समग्र क्रांती घडवून आणलेले युगपुरुष होत. विशेषत: धर्म व धर्ममार्तंड यांचा भारतीय समाजावरील गाढ प्रभाव पाहून त्यांनी धर्मचिकित्सा करून धर्माचे शुद्धिकरण करण्याचा प्रयत्न केला. हिंसा, विषमता, वेदप्रामाण्य, अनीती, अंधश्रद्धा, अन्याय व गुलामी यांचे खंडण केले आणि दयासहित व समताधिष्ठित धर्माचे प्रतिपादन केले. वेद, आगम, पुराण, शास्त्र यांना प्रमाण मानून यज्ञाच्या नावावर हिंसा करणार्या वेदिक संस्कृतीवर बसवण्णांनी प्रखर हल्ले केले आहेत. विप्रांचे बोलणे एक आणि चालणे एक असते. अशा ढोंगी लोकांना आमुचा कूडलसंगमदेव प्रसन्न होणार नाही, असे ते निक्षून सांगतात. अग्नीला देव समजून त्याची पूजा करणारे, त्या अग्नीत तूप इत्यादी आहुती देणारे विप्र, स्वत:च्या घराला आग लागल्यावर; मात्र मोरीचे पाणी व धूळ टाकून ती आग विझविण्याचा प्रयत्न करतात- असे सांगून बसवण्णा होमहवन संस्कृतीचे विडंबन करतात.
भारतीय समाजजीवनाचा मूलाधार म्हणजे कृषिसंस्कृती. भारताला कृषी परंपरेचा महान वारसा आहे. हा वारसा इथल्या भूमिपुत्रांनी अत्यंत निष्ठेने जपला व उत्तरोत्तर त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहिले. ही कृषी परंपरा विकसित होत असताना या देशात आर्यांच्या यज्ञसंस्कृतीने कृषिसंस्कृतीवर आक्रमण केले. वामनरुपातील ही यज्ञसंस्कृती कृषी परंपरेचा महानायक असलेल्या बळीराजाला गिळंकृत करून भारतभर पसरली. या यज्ञसंस्कृतीच्या विरुद्ध कृषिनिष्ठ शिवसंस्कृतीने प्रखर लढा दिल्यासंदर्भात दक्षराजाची वीरभद्राने केलेली उद्ध्वस्तता आपण ऐकत आणि वाचत आलो आहोत. या महत्त्वपूर्ण घटनेचे स्मरण करून देत आपल्या एका वचनात महात्मा बसवण्णांनी यज्ञसंस्कृतीविरुद्ध बंड पुकारले. या संदर्भातील बसवण्णांचे पुढील वचन यज्ञसंस्कृतीरक्षकांचा चांगलाच समाचार घेते, ते वचन पाहा –
दक्षयज्ञ पार पडावा म्हणून जमलेल्या
आजादीसुरांचे उन्मत्त मुख पाहा.
तोंड चुकवून भोजनावर ताव मारायला आलेल्या देवांचे पोळलेले तोंड पाहा.
खाल्ल्याविना, नेसल्याविना धुरात गुदमरून मरणार्या विप्रांची दुर्दशा पाहा
कूडलसंगमदेवा॥
(ब.व.क्र.574)
यज्ञाच्या नावावर विप्रांनी पशुबळीसारखी अत्यंत हिंस्त्र पद्धत जोपासली होती. यज्ञात शेतकर्यांनी अत्यंत कष्टाने पिकविलेल्या धान्याची, कृषिपूरक गाय, बैल, शेळी, बोकड यासारख्या प्राण्यांची आहुती दिली जात होती. त्यांचीं क्रूरता एवढ्यावरच थांबत नव्हती, तर त्या गायीचे, बोकडाचे मांस हे लोक मिटक्या मारून खात. विपर्यास म्हणजे मृत जनावरांना उचलून नेणार्यांना मात्र अस्पृश्य समजून त्यांना गावकुसाबाहेर ठेवले; परंतु यज्ञाच्या नावावर जिवंत प्राण्यांचा बळी देऊन त्याचे मांस खाणारेच खर्या अर्थाने अस्पृश्य आहेत, असे बसवण्णांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे.
बसवण्णा यज्ञातील हिंसेचे चित्रण आपल्यासमोर हुबेहूबपणे उभे करतात. यज्ञात बळी देण्यासाठी आणलेला बोकड हा त्या यज्ञशाळेतील शूपस्तंभाला बांधला जातो. त्याच्या पुढे हिरवागार चारा टाकला जातो. तो बोकड आपण थोड्यावेळात मरणार आहोत, हे न जाणता ते कोवळे हिरवे गवत खाण्यात मग्न होतो. त्या निष्पाप बोकडाबद्दल बसवण्णांच्या मनात अतीव करुणा निर्माण होते आणि ते त्या बोकडाला उद्देशून म्हणतात –
वेदांचा दाखला देत तुज ठार मारतात म्हणून
अरे, बोकडा रड रे तू!
वेदपठण करणार्यांपुढे रड रे तू!
शास्त्र श्रवण करणार्यांपुढे रड रे तू!
तुझा आक्रोश ऐकून, तयांना योग्य शासन देईल,
आमचा कूडलसंगमदेव॥
(ब.व.क्र.572)
महात्मा बसवण्णा आपल्या दुसर्या एका वचनात दोन उदाहरणे देऊन यज्ञयागातील ढोंगीपणावर प्रहार करतात. “मादक फळ खाल्लेला कोल्हा सृष्टी फिरत आहे म्हटल्यागत, तिलकधारी विप्राची वाणी सत्य समजता येईल का? दिवस न पाहू शकणार्या घुबडाने रात्र झाली म्हटल्यास, जगात रात्र होईल का? होमाच्या नावे बोकड बळी देऊन खाणार्या अनामिकांबरोबर चर्चा करून काय उपयोग, कूडलसंगमदेवा.” याचा अर्थ, विप्र हे देव, धर्म व यज्ञाच्या नावावर समाजाचे शोषण करून स्वत:चे पोट भरून घेतात; शिवाय आम्ही हे कृत्य वेदात सांगितले आहे म्हणून करतो, असे म्हणत असतात. सर्व काही आपणच करायचे आणि दोष मात्र दुसर्याला द्यायचा, ही विप्रनीती! म्हणूनच “मी न वधिले, दोरीने प्राण घेतला म्हणणार्या कपटी लोकांस प्रसन्न होणार नाही, आमुचा कूडलसंगमदेव.” असा स्पष्ट निर्वाळा देत महात्मा बसवण्णा यज्ञसंस्कृती नाकारतात.
महात्मा बसवण्णांचा वारसा जपणार्या, 16 व्या शतकातील संत मन्मथ स्वामींनी यज्ञसंस्कृती नाकारली आहे, ते म्हणतात, ‘यज्ञाचिया वाटा टाकिल्या मोडोनी। तीर्थालागी जाणे खुंटविले॥’ महापुरुषांनी आम्हाला सत्य, अहिंसा, दया व समतेचा मार्ग दाखविला असतानाही आम्ही मात्र मुखाने त्यांचे नाव घेत नेमके त्यांनी सांगितलेल्या उलट मार्गांचे आचरण करतो. कौटुंबिक सोहळ्यात विवाह, गृहप्रवेश, दीक्षा संस्कार यात यज्ञाचा आग्रह केला जातो. दुर्दैव म्हणजे अशिक्षितांपेक्षा उच्चविद्याविभूषित लोकांत त्यांचे वेड अधिक दिसून येते. या संदर्भात सूज्ञजनांनी गांभीर्याने चिंतन करण्याची नितांत गरज आहे.
-राजू ब. जुबरे, भालकी
मोबा. 08904638908