प्रत्येकाकडे इतरांना सांगण्यासाठी काही ना काही अनुभव वा गोष्टी असतात. खरे पाहता या गोष्टीत स्वतः भर घातलेला भाग बराच असतो. मुळात कुठलीही गोष्ट फुगवून सांगण्याची हौस प्रत्येकात थोड्या–फार प्रमाणात असते. ऐकणार्यावर प्रभाव पाडण्यासाठी आपण गोष्टी फुगवून सांगत आहोत, याची कल्पनासुद्धा आपल्याला नसते. आपल्या मेंदूची ती फेकाफेकी असते व कळत न कळत आपण त्यात गुरफटून जातो. काल्पनिक असूनसुद्धा ते पूर्ण खरे आहे, अशीच आपली समजूत असते व हा स्वैरपणा नेहमीच आपल्याला फसवणारा असतो.
1925 च्या सुमारास माणसांच्या विचारप्रक्रियेसंबंधी भाष्य करत असताना बर्ट्रांड रसेल यांनी ‘आपल्या पूर्वग्रहांना धक्का न लावणार्या विचारांकडेच आपला कल असतो. आपल्या मतांच्या विरोधातील किंवा आपल्या विचारांना छेद देणारे विचार आपल्याला स्वीकारार्ह होणार नाहीत. तसले विचार आपल्या दृष्टीने अविचारी असतात,’ असे मत व्यक्त केले होते. हे विधान वाचत असताना आपण अजूनही बदललेलो नाही, याची खात्री वाटू लागते. कारण अजूनही अविचारीपणाचीच सरशी आहे हे पदोपदी लक्षात येते. फेक बातम्या, षड्यंत्र सिद्धांत (conspiracy theory), कॉमन सेन्स इत्यादींच्या साधक-बाधकतेविषयी कितीही गप्पा मारत असलो तरीही आपली मानसिकता मात्र अजूनही ींहळपज्ञळपस रशि च्या पातळीवरच आहे.
हे असे का होत असावे? खरे पाहता इतर लोक जे नेहमी करत आले आहेत, तेच आपण करत असतो. आपले आई-बाबा जे करत आले आहेत, तेच आम्ही करतो. आमचे आई-बाबासुद्धा त्यांचे आई-बाबा जे करत होते तेच करत होते. असे पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या रूढी-परंपरा (कुठल्याही शंका-कुशंका न काढता) आपण पाळत आलो आहोत. लकिरोंके फकीर होण्यात आपल्याला कधीच कमीपणा वाटला नाही. या कृतीमागे अविचार असू शकतात, असेही कधी वाटले नाही. कदाचित तगून राहण्यासाठी याच (अ)विचारांचे पाठबळ आपल्याला मिळत गेले. त्यामुळे वेगळे काही विचार करण्याची वेळच आली नाही. लाखो-करोडो वर्षांच्या उत्क्रांतीतून तावून, सुलाखून विकसित झालेला व तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता असलेला आपला मेंदू अनेक वेळा बधिरावस्थेत असल्यासारखा वाटतो. तर्कशुद्ध विचार करणे म्हणजे जिवावर येते, अशीच धारणा बहुतेकांची असावी. म्हणूनच वेगळे काहीही विचार न करता वर्षानुवर्षे चालत आलेल्या गोष्टींना चिकटून राहणे या शॉर्टकटमुळे आपले जीवन सुखकर होऊ शकते, यावर बहुतेकांचे एकमत असावे. गंमत म्हणजे अशा प्रकारच्या पठडीतल्या विचारांसाठी मेंदूवर अजिबात ताण पडत नाही. मुळात विचार करणे हा नेहमीच वेळखाऊ व ऊर्जेचा अपव्यय करणारा आहे, अशी पूर्वी कधीतरी खात्री झाल्यामुळे आपल्या पूर्वजांनी काही शॉर्टकट्स शोधून काढले होते. या शॉर्टकटमुळे निसर्गाच्या प्रकोपातून आपली सुटका होत गेली व आपण आपले अस्तित्व टिकवू शकलो; परंतु आधुनिक जग फारच वेगळे असल्यामुळे यापूर्वीचे ठोकताळे वा विनासायास मिळालेले विचार व कल्पना आपल्याला कितपत उपयोगी पडतील, याबद्दल शंका आहे. एवढेच नव्हे तर ही मानसिकता आपल्याला काही वेळा गोत्यातही आणू शकते. त्यामुळे आपल्याला या गोत्यातून सहीसलामत बाहेर पडण्याची व विचारातील उतरंडीवर मात करण्याची गरज भासत आहे.
शून्य बेरीज (Zero Sum)
लहान मुलं खेळत असताना स्वतःसाठी जास्तीत जास्त घेण्याच्या प्रयत्नात असतात. खेळातील मोक्याची जागा त्यांना हवी असते. खाता-पितानासुद्धा आपल्या वाट्याला जास्त हवे यावर कटाक्ष असतो. केकचा मोठा तुकडा त्यांना हवा असतो. मोठेपणीसुद्धा थोड्या-फार फरकाने ही वृत्ती तशीच राहते. न्याय्यवाटपाबद्दल आपण नेहमी संवेदनशील असतो. फक्त हे न्यायवाटप आपल्या तोंडचा घास हिसकावून तर घेत नाही ना याबद्दल आपण नेहमीच जागरूक असतो. आपल्या जवळच्या शाळेत वा नावाजलेल्या एखाद्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात असताना 25 टक्के जागा दारिद्य्र रेषेखालील पालकांच्या मुलांसाठी राखीव ठेवल्या आहेत, ही बातमी येऊन थडकल्यावर आपला जीव वरखाली होऊ लागतो. आपण कितीही उदार असलो तरी (वा उदारतेचे सोंग वठवत असलो तरी!) हे काही बरोबर नाही असेच राखीव जागांच्या बाबतीत वाटण्याची शक्यता आहे. बारावीला चांगले गुण मिळवून पास झालेल्या आपल्या (लाडक्या!) पाल्याला हवे असलेल्या कॉलेजमध्ये आरक्षणामुळे प्रवेश न मिळाल्यास आपल्यातील उदारवृत्ती नष्ट पावते. खरे पाहता त्या कॉलेजमध्ये विनाआरक्षण असलेल्या काहींना नक्कीच प्रवेश मिळाला असेल. परंतु आपल्या पाल्यास खुल्या गटाच्या कट ऑफपेक्षा एक-दोन गुण कमी मिळाले म्हणून ‘प्रवेश मिळाला नाही; आमच्यावर अन्याय झाला.’ म्हणून आपल्याला नक्कीच राग आला असेल आणि तो राग आपण आरक्षणाच्या धोरणाला लाखोली वाहत व्यक्त करतो. मुळात अभ्यास करण्यासाठी सर्व सोई-सुविधा असूनसुद्धा व पिढ्यान्पिढ्याची शिक्षणाची परंपरा असूनसुद्धा आपल्या पाल्याने खुल्या प्रवेशातील इतरांच्या बरोबर स्पर्धेत उतरून त्यांच्यापेक्षा जास्त गुण मिळवून दाखवायला हवे होते; परंतु ते त्याला सोयीस्कर न ठरल्यामुळे राखीव जागेविषयी अनुद्गार काढून राग व्यक्त करत असतो. आपल्या पाल्याजवळ हिंमत असल्यास खुल्या गटातील इतरांच्यापेक्षा जास्त गुण मिळवून प्रवेशपात्र व्हायला हवे होते. परंतु अविचारच करायचा असे ठरवल्यास आरक्षणाला दोष देत राहणे, हा शॉर्टकट आपल्या कामी येतो. शासकीय नोकर्यांच्या बाबतीतही अनेक तरुण-तरुणींना आरक्षणाच्या धोरणावर ताशेरे ओढलेले आपण नेहमीच ऐकत असतो.
या आगपाखडीच्या प्रकाराला शून्य बेरीज (Zero Sum) परिस्थिती असे म्हटले जाते. जेव्हा स्रोतांची कमतरता असते, तेव्हा एखाद्याचा फायदा हा दुसर्याचे नुकसान करणारा ठरतो. आपल्या जीवनातील अनेक प्रसंगात अशी स्थिती अनुभवावी लागते. परंतु काही वेळा अशी स्थिती नसते सुद्धा! प्रत्येक वेळी स्पर्धेशी वा स्रोतांच्या कमतरतेशी तोंड द्यायलाच हवे असे काही नसते. काही वर्षापूर्वी इंजिनिअरिंग वा एमबीएच्या प्रवेशासाठी विद्यार्थी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असत; परंतु आज ती स्थिती नाही. कारण हे विषय शिकवणारी कॉलेजेस ओस पडली आहेत. परंतु आपण मात्र आपल्या अप्पलपोटेपणामुळे आधीचीच स्थिती आहे म्हणून मनाची समजूत करून घेत स्पर्धेच्या तयारीत राहतो. स्पर्धा नसली तरी संधीच्या विचाराने आंधळे झालेलो असतो. त्यातून वैताग वाढत जातो.
शून्य बेरीज हा उत्क्रांतीतील जुळवून घेण्याच्या कालखंडातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्या काळी माणसं टोळी करून शिकारीवर वा रानावनातील गोळा केलेल्या खाद्यपदार्थांवर जीवन जगत होते. त्या काळी मुळातच अनेक गोष्टींची कमतरता जाणवत होती. एखाद्याने पोटभर खाल्ल्यामुळे दुसरा उपाशी अशी स्थिती होती; परंतु आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.
जगभरातील उदारीकरणाच्या धोरणामुळे अनेक राष्ट्रं एकमेकांशी उद्योग-व्यापार करण्यासाठी वाणिज्य करार करत असतात. या प्रकारच्या उत्पादनांच्या आदानप्रदानच्या व्यवहारात दोन्ही बाजूंना काही ना काही मिळत असल्यामुळे दोन्ही राष्ट्रं समाधान व्यक्त करत असतात. एका प्रकारे ही एक ‘विन विन’ (win – win) स्थिती असते. तुलनेने फायदा हे सूत्र येथे कामी येते. एखाद्या राष्ट्रात उत्पादनाची कमतरता असल्यास ती भरून काढण्यासाठी वाणिज्य करार केलेली इतर राष्ट्रं पुढाकार घेऊन निर्यात करून परिस्थिती काबूत ठेवतात. काही तज्ज्ञांच्या मते मुक्त व्यापाराचा हा प्रकार शून्य बेरजेचीच सुधारलेली आवृत्ती आहे. या देवाण-घेवाणीत देशाचा जीडीपी वाढत असला, तरी त्या देशातील सामान्यांना त्याचा फार मोठा फायदा होत नाही. काही वेळा काही मूठभर लोकांना रोजगाराची संधी मिळू शकते,” परंतु बहुतेकांना नाही. असाच काहीसा प्रकार देशांतर केलेल्या विस्थापितांच्या बाबतीतही होतो. सार्वजनिक दवाखाने, शाळा, स्वस्त घरं इत्यादी सोयी-सुविधांचा अगोदरच तुटवडा असल्यास, विस्थापितांना मुक्त प्रवेश दिल्यास हा तुटवडा आणखी तीव्र होतो. त्यामुळे विस्थापितांवर स्थानिक लोक राग काढतात.
परंतु कुठला व्यवहार शून्य बेरजेचा आहे व कुठला नाही, हे सहजपणे कळत नाही. त्यातूनही अमुक व्यवहार हा शून्य बेरजेचा नाही, हे सामान्यांना समजावून सांगणे व अविचारी निर्णयापासून त्यांना परावृत्त करणे हे सुद्धा फार जिकिरीचे ठरते. अनेक वेळा तुम्ही काय देऊ शकता त्यात व तुम्हाला काय मिळणार आहे, हे नीटपणे कळतसुद्धा नाही. त्यामुळे काही गोष्टी ‘नॉन झिरो सम’ असू शकतात हे पटवून देणे कठीण जाते.
अमेरिकेत ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड ही ‘नॉन झिरो सम’ची फलश्रुती असे म्हणता येईल. इंग्लंडचे ‘ब्रेक्सिट’ मतचाचणीयुद्धा अशाच प्रकारचे ‘नॉन झिरो सम’चे उदाहरण. लोकांना आपण काय करत आहोत, आपण कशाचे समर्थन देत आहोत, हेच मुळात कळत नसते. कुणाची तरी पोपटपंची ऐकून भावनोद्वेगाच्या स्थितीत आपण अतिमहत्त्वाचे निर्णय घेत असतो. वर्णभेद, वंशभेद अशा एखाद्या जुजबी कारणाची ढाल पुढे करून आपले अज्ञान झाकण्याचा प्रयत्न करत असतो. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर गोर्या नागरिकांनी त्यांच्या विरोधात आघाडीच उघडली होती. कारण त्यांना मिळत असलेल्या सोयी-सुविधांवर या कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्षामुळे गदा येणार की काय, अशी भीती त्यांच्या मनात होती. मुळात सर्व privileges गोर्यांना मिळत असूनसुद्धा ओबामांवर शिंतोडे उडवले जात होते. ओबामा कृष्णवर्णीयांसाठी जास्त काही तरी तरतूद करून गौरवर्णीयांच्या सोयी-सुविधा कमी करतील, या भीतीमुळे त्यांच्यावर बेछूट आरोप केले जात होते. अविचारांचा जोर वाढला की भीतीमुळे माणसं कुठल्या थराला जाऊ शकतील, याचे हे एक मासलेवाईक उदाहरण आहे.
बालबुद्धी
लहान मुलं म्हणजे एका दृष्टीने वैज्ञानिकच असतात, असे अनेकांचे मत आहे. कारण मुलं जेव्हा खेळत असतात, तेव्हा त्यांचा तो खेळ हा एक वैज्ञानिक प्रयोगच असतो. त्यात त्यांची involvement असते, निरीक्षण असते व निष्कर्षही असतो. परंतु जेव्हा ही मुलं शाळेला जाऊ लागतात, तेव्हा मात्र हे जग कसे आहे, जगाचे व्यवहार कसे चालतात, इत्यादीसंबंधीच्या दंतकथा वा भन्नाट व चुकीच्या कल्पनांनी त्यांचे डोके भरले जाते. खर्या शिक्षणाचे काम – त्यातल्या त्यात विज्ञान शिक्षणाचे काम – या दंतकथांचा कचरा साफ करून पुराव्यानिशी सिद्ध झालेल्या गोष्टी वा सिद्धांत त्याच्या डोक्यात भरणे हे असेल. काहींच्या बाबतीत ही एक अत्यंत अवघड अशी गोष्ट ठरू शकेल आणि हीच मंडळी मोठमोठे वैज्ञानिक म्हणून मिरवत असतात. काही प्रमाणात शिक्षण डोक्यातला भुस्सा बाहेर काढण्यात यशस्वी होऊ शकते; परंतु नेहमी नाही. म्हणूनच जग हे एक अज्ञानाची कोठडी झाली असे म्हणता येईल. दंतकथा, पुराणकथा, मिथकं इत्यादी परंपरागत ज्ञानाचा पगडा विज्ञानातील सर्व क्षेत्रात सर्रासपणे आढळतो. तावातावाने त्याचे समर्थनही केले जात असते. विश्वाची उत्पत्ती कशी झाली, माणूस कसा जन्माला आला, प्राणिमात्रांचा पर्यावरणरक्षणात कसा उपयोग होतो इत्यादी जीवशास्त्रीय घटनाक्रमाबद्दल काही साचेबंद उत्तरं जगभरातील पारंपरिक ज्ञानात सापडतील. सूर्य, चंद्र, तारे, धुमकेतू, ज्वालामुखी, भूकंप इत्यादीबद्दल वैचित्र्यपूर्ण तथाकथित ‘वैज्ञानिक’ माहितीची यादी जगभरातील सर्व पुरातन संस्कृतीत सापडतील. एवढेच नव्हे, तर आकाशातील पक्षी उडण्यासाठीच जन्म घेतात, डोंगरावरील मोठमोठे दगड प्राण्याची पाठ खाजवण्यासाठी असतात, फुलांना पाकळ्या उघडता याव्यात म्हणून पाऊस पडतो, उष्णता ही एक वस्तू असून ती एका जागेतून दुसर्या जागेकडे सरकत असते, सूर्य आकाशात पूर्वेकडून पश्चिमेकडे रोज प्रवास करत असतो इत्यादी गोष्टी अगदी लहानपणापासूनच आपल्या मनावर ठसवलेल्या असतात. रोजच्या व्यवहारात यांच्याविरोधात चकार शब्दही काढता येत नाही; परंतु त्या तद्दन खोट्या, दिशाभूल करणार्या व विज्ञानविसंगत असतात.
बाल्यावस्थेत मुलं अशा प्रकारच्या ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवत मोठी होतात. हा विश्वास श्रद्धेत व श्रद्धा अंधश्रद्धेत बदललेला असतो, हे लक्षातच येत नाही. जेव्हा एखादी समस्या वा जटिल संकल्पना मांडली जाते, तेव्हा तर आणखीच जास्त प्रमाणात जुन्या गोष्टीकडे कवटाळून बसतात. अगदी मोठेपणी सांगूनसवरूनसुद्धा आपण कुठेतरी चुकत आहोत, हेच लक्षात घेतले जात नाही. अजूनही कित्येकांना डार्विनचा ‘उत्क्रांतीवाद’ हा बकवास वाटतो. माणूस हा माकडापासून कसा काय उत्क्रांत होऊ शकतो, याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रमावस्था आहे. कारण माणूसप्राणी परमेश्वराचा अत्यंत लाडका प्राणी असून त्यांनेच माणसांना पृथ्वीवर पाठवले आहे, याबद्दल अशा लोकांच्या मनात अजिबात शंका नाही. विचार करण्याची शक्ती कुंठित होत जाते व अविचाराचा पगडा आणखी घट्ट बसतो.
विज्ञानातील काही मूलभूत सिद्धांतांच्या शिक्षणातून अविचारांची पीछेहाट होऊ शकेल, असे शिक्षणतज्ज्ञांना वाटत होते. त्यामुळे पारंपरिक ज्ञानाचे जोखड उतरवणार्या अभ्यासक्रमावर भर दिला गेला. अल्प प्रमाणात याचा फायदा झाला, हे आपण नाकारू शकत नाही; परंतु कितीही प्रयत्न केले तरी पारंपरिक ज्ञानाचा पगडा निघून जात नाही. फार-फार तर वैज्ञानिक शिक्षण काही काळ त्याला थोपवून धरू शकते; परंतु ते पूर्णपणे कधीच जात नाहीत. आपण करत असलेल्या बहुतेक कृतीमागे विचारापेक्षा अंतःप्रेरणेवर भर दिलेला असतो. अंतःप्रेरणेतून सुचलेल्या गोष्टीवर दुसर्या कुठल्यातरी गोष्टीने वरचढ होता येईलही, परंतु ती पूर्णपणे पुसता येणार नाही. अंतःप्रेरणेचा इतका मोठा प्रभाव असतो की, भल्याभल्या अनुभवी वैज्ञानिकांनासुद्धा स्वतःच्या प्रयोगातील निष्कर्षावर विश्वास ठेवणे जड जात असते. यांच्या मेंदूचे ‘ब्रेन स्कॅन’ केल्यास वैज्ञानिक सत्याला नाकारले जात आहे, हेच दर्शवते. एक हलका व दुसरा जड अशा दोन वस्तूंना उंचावरून फेकल्यानंतर त्या दोन्ही एकाच वेळी जमिनीवर येतात हे (वैज्ञानिक) सत्य अजूनही आपल्या पचनी पडलेले नाही. त्याचा व्हिडिओ बघताना ‘ब्रेन स्कॅन’ केल्यास मेंदूत गोंधळ उडाला आहे, हे स्पष्टपणे जाणवेल.
वैज्ञानिकरित्या तर्कशुद्ध विचार करणे हे नेहमीच कठीण असते व तसले विचार शेवटपर्यंत टिकतील, याचा कुठलाही भरवसा नाही. त्यामुळे हवामान बदल, सजीवांची उत्क्रांती, लसीकरण, लोकसंख्या नियंत्रण इत्यादी गोष्टी पटवून घेण्यासाठी फार बौद्धिक श्रम लागतात.
साचेबंद, ठराविक विचार
आपण नेहमीच एखाद्याच्या चेहर्याकडे बघून माणूस कसा आहे, याचा अंदाज करतो. कदाचित हे आमच्या मेंदूत ‘हार्ड वायरिंग’ झालेले असावे. नुकतेच जन्माला आलेले बाळसुद्धा इतर अवयवापेक्षा चेहर्याकडे निरखून पाहत असतं. एका वर्षाचे झाल्यांनतर ओळखीच्या चेहर्याकडे रांगत-रांगत जातं. अनोळखी चेहर्याकडे लक्ष देत नाही. वयाने मोठे झाल्यानंतर आपले अंदाज पक्के होत जातात. काही क्षणासाठी चेहरा बघून त्याचे सामाजिक, आर्थिक व नैतिक स्थानमानाचे ठोकताळे बांधण्याचा प्रयत्न करतो. लहान बाळासारखा निरागस चेहरा वाटत असल्यास तो विश्वासार्ह माणूस आहे, थोडासा उभट व चौकोनी चेहरा असल्यास तो डामरट असावा म्हणून इतर कुठलाही विचार न करता, चौकशी न करता आपण निष्कर्ष काढतो.
अशा प्रकारे त्या व्यक्तीबद्दल शिक्का मारणे अन्यायकारक आहे हे मान्य. परंतु उत्क्रांत काळातील अस्तित्वासाठी अशा प्रकारच्या ठोकताळ्यांचा नक्कीच उपयोग झाला असेल. टोळी करून राहिलेल्या समाजात मित्र कोण व शत्रू कोण हे चेहरेपट्टीवरूनच अंदाजाने कळत असावे. आपला अंदाज चुकल्यास त्याला अपवाद समजले जात असावे; परंतु अंदाज करण्यात चूक नाही, हे मात्र पक्के. अनोळखी माणूस आपल्याला मदत करणारा ठरेल की त्रासदायक, यासाठी हे ‘फेस रीडिंग’ नक्कीच आपल्या मदतीला धावून आले असेल; परंतु आताच्या मानसतज्ज्ञांच्या मते हे ‘फस्ट इम्प्रेशन’ नेहमीच चुकीचे असते. याचे स्पष्टीकरण देता येत नसले, तरी या पूर्वीच्या समाजापेक्षा आताचा समाज फार मोठ्या प्रमाणात अनोळखींच्या संपर्कात येत असावा, त्यामुळे आपले अंदाज चुकण्याची शक्यता जास्त आहे.
गंमत म्हणजे आपला हा साचेबंद अंदाज एकेक चेहरा निरखून बघत ठरवला जात नाही. आपण सर्वांना एका गटात ढकलून त्यातील प्रत्येकाबद्दल बरे-वाईट ठरवून भेदभाव करत असतो. गटाच्या बद्दलचा साचेबद्धपणासुद्धा तो गट मदतीचा हात देणारा की तुमच्या विरोधात स्पर्धेत उतरणारा, याचा निर्णय घेत असतो. गटातील प्रत्येकाची खालील प्रकारे चार विभागात मांडणी करता येते. गटातील काहीजण उच्च दर्जाचे स्पर्धक असणारे वा काही जण कमी दर्जाचे स्पर्धक असणारे, काहीजण उच्च दर्जाचे स्पर्धक नसणारे व काहीजण कमी दर्जाचे स्पर्धक नसणारे असे हे प्रकार आहेत. उच्च दर्जाचे स्पर्धक डॉक्टर, वकील, उद्योजक आदी श्रीमंत प्रोफेशनल्स असू शकतात व त्यांच्याबद्दल आपल्या मनात अढी असते, असूया असते. कमी दर्जाचे स्पर्धक नेहमीच वंचित, विस्थापित वा निराश्रित असतात. त्यांना पाहिले की आपल्याला तिटकारा वाटतो. उच्च-दर्जाचा स्पर्धक नसलेल्याबद्दल अभिमान वाटतो व यातील कमी दर्जांच्या बद्दल – अपंग, वृद्ध, तिरस्कृत महिला – कणव वाटते.
लांगूलचालन
टीव्हीवरील बातम्यांच्या वेळी राजकारणातील पुढार्यांच्या सभा-परिषदांबद्दलच्या बातम्या दाखवत असताना काही जण पुढे येऊन पायाला हात लावून व/वा नमस्कार/मुजरा करत (पाठ न दाखवता) परत गेलेले आपण नेहमीच पाहत असतो व त्यात काही वावगे नाही, असेच आपल्याला वाटते. जरी तो नेता 25-30 वर्षे वयाचा असला तरी पन्नाशीचे पुढचेसुद्धा तितक्याच नम्रतेने वाकून नमस्कार करत असतात. खरे पाहता या नेत्याला आपणच निवडून दिलेले असते, आपल्यामुळेच तो स्टेजवर उत्सवमूर्ती म्हणून मिरवत असतो. तरीसुद्धा आपल्यातील लाचारी त्याला मान-पान देण्यास भाग पाडते. तो आपल्यासाठी त्याच्या खिशातून एकही पैसा देणार नाही, याची आपल्याला शंभर टक्के खात्री असते. तरीसुद्धा आपण त्याला महत्त्व देत असतो. कारण सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या या व्यक्तीबद्दल आपल्या मनात भीतियुक्त आदराची भावना असते. आपण चारचौघांसमोर त्याचा योग्य मान न राखल्यास तो आपला काहीतरी वाकडा करेल ही भीती मनात असते. म्हणूनच त्याच्या भोवती पिंगा घालणार्यांची संख्याही जास्त असते.
अशा प्रकारे नेत्यांच्या पुढे-पुढे करणे अगदी अनादि काळापासून चालत आलेली प्रथा आहे. इतिहास काळात राजा-महाराजांना, त्यापूर्वी टोळीच्या प्रमुखांना त्या-त्या काळचा समाजसमूह मानमरातब देत होता. जनसामाऩ्यांच्या या वागणुकीमुळे हे राजे-महाराजे वा टोळीप्रमुख सुखावत असावेत. म्हणून तर ही पद्धत जगभर शेकडो वर्षे पाळली जात आहे. लोकशाहीत नेत्यांनासुद्धा हा मान मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या मागे असलेली प्रतिष्ठा! आपण सर्व त्या प्रतिष्ठेला बळी पडतो व लांगूलचालन करत असतो.
छोट्या-छोट्या टोळ्या करून अस्तित्वासाठी झगडत असलेल्या समाजातसुद्धा अशा प्रकारची हांजी-हांजी करण्याची वृत्ती होती. सर्व माणसं समान असली तरी काहींच्यातील विशेष गुणामुळे ती इतरांपेक्षा वेगळी वाटत होती. मुळात माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे समाजाच्या रीति-नीतीचे पालन करणे हे त्याचे कर्तव्य ठरते व त्यासाठी सर्वांत सोपा मार्ग म्हणजे अनुकरण करणे. हे असे का हा प्रश्न न विचारता डिट्टो कॉपी करत राहिल्यास सर्व प्रश्न सुटतात, अशी एक समजूत आपल्या मनात घर करून बसलेली आहे. ज्यांना कॉपी करणे जमते ते चांगले शिकारी होऊ शकले, कुशलता प्राप्त करू शकले व तेही कुठल्याही प्रकारचे धोके न पत्करता! अशांची आरती करा, त्यांना खूश ठेवा, त्यांची वाहवा करा, त्यांच्या मागे-पुढे करीत राहा व काही सामाजिक बंधनातून त्यांना मुक्त ठेवा. तुमचे काम फत्ते! आपलाही फायदा व त्यांचाही! आपल्या ज्या पूर्वजांनी ही रणनीती पाळली, ते तग धरू शकले. त्यांची भरभराट झाली. म्हणूनच उत्क्रांती अशा भाटांची पदर धरते.
परंतु आधुनिक युगात अशा प्रकारामुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आताच्या काळात आपण आपल्याला भेटलेल्या व्यक्तीचे मूल्यमापन तिच्या तथाकथित प्रतिष्ठेवरून ठरवत नाही. तरीसुद्धा समाजात राहायचे असल्यास नाईलाजाने इतरांचे अनुकरण करून, नको त्या व्यक्तीचा उदो-उदो करत असतो, हेही तितकेच खरे! एखाद्याच्या भोवती फार जण गर्दी करून उभे असल्यास आपणही त्या गर्दीचा भाग होऊन जे काही मानमरातब द्यावेसे वाटते, ते देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेले राजकीय नेते, साहित्यिक, नट-नट्या इत्यादींना आणखी प्रसिद्धी मिळत जाते.
प्रतिष्ठा एखाद्या चुंबकासारखी पिढ्यान्पिढ्या आकर्षित करत असते व या प्रतिष्ठेला मान देणे आपण टाळू शकत नाही. अनेक वेळा आपण आपल्या स्वतःला फसवतो, याची कल्पना असूनसुद्धा चारचौघांबरोबर राहण्याच्या अट्टहासामुळे अशा लोकांचे भाव वधारलेले दिसतात. कर्तृत्व, यश व प्रतिष्ठा यांच्यापुढे मान तुकवणारेसुद्धा काही प्रमाणात लाभधारी ठरतात. म्हणूनच पुढे-पुढे करण्यासाठी आटापिटा करत असतात, हे नाकारता येत नाही. अविचारापुढे मान तुकवणे तर नेहमीच आढळणारी गोष्ट ठरत आहे.
रुढी व परंपरा
अविचाराच्या उत्कर्षात रूढी – परंपरांच्या मानसिकतेचा फार मोठा वाटा आहे. आपल्या मनाच्या कोपर्यात ‘आहे तसे राहू दे, चित्ती असू दे समाधान’ हे कुठे तरी दडलेले असते. यासाठी भांडवलशाही व्यवस्था फार चांगले साधन ठरत आहे. या व्यवस्थेत बाजारालाच सर्व अधिकार दिल्यामुळे आपण वेगळे काही करण्याची गरज नाही, याची आपल्याला खात्री असते. त्यामुळे आपण हात-पाय हलवायचे नाही, विरोधात बोलायचे नाही, कुठल्याही गोष्टीला आक्षेप घ्यायचा नाही, स्वतःचे नुकसान झाले तरी व्यापकहिताचे भान ठेवत राग मानायचे नाही, ही पथ्ये या व्यवस्थेत पाळली जातात. त्यामुळे डाव्या विचारसरणीच्या वा क्रांती-बिंतीच्या भानगडीत पडायचे नाही, असे आपल्याला वाटत असते. कातडी बचाव धोरणाची नेहमीच सरशी होत असते. मुळात विचार करून कृती करण्याच प्रश्न येथे उद्भवत नाही. याचा अर्थ रुढीवादी ‘ढ’ वा ‘मठ्ठ’ आहेत असे नाही. मुळात शहाणपणा व समाजात टिकून राहणे, यांचा संबंध फार गुंतागुंतीचा असू शकतो. आपली विशिष्ट मतं समाजाला आवडत नसल्यास ती काही वेळा बाजूला ठेवण्यातच शहाणपणा असतो. डावीकडे झुकणारे मुळात त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे कमी बुद्धिवंत असतात, असे ढोबळमानाने म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे जास्त बुद्ध्यांक असणार्यातील सुमारे 20 टक्के डाव्या विचारांचे किंवा उदारमतवादी असतात.
मुळात विचार करण्याची सवय नसलेल्यांचा व विचार करण्यास विरोध करणार्यांचा आहे त्याच स्थितीतच राहण्याकडे कल असतो. तद्विरुद्ध राजकीयदृष्ट्या परिपक्व असलेले कुठल्याही गोष्टीचे विश्लेषण करून आपली मतं बनवतात. डाव्या राजकारणात विचार करण्याची सक्ती असते; त्यात अंतःप्रेरणांना वाव नसतो. त्यामुळे अंतःप्रेरणेला वाव असलेल्या रूढीवादी राजकारणाला जास्त पसंती मिळते. म्हणूनच सुमारे 80 टक्के जनता नेहमीच रूढीवादी, परंपरावादी, उजव्या राजकारणाचा ‘उदो-उदो’ करत असते. त्यांच्यावर मतांचा वर्षाव करून निवडून देते. तरीसुद्धा मुंगीच्या पावलाने का होईना अपेक्षित विकास होताना दिसत आहे, हेही नसे थोडके!
ट्रायबॅलिझम
‘मॅनवॉचिंग’ आणि ‘नॅकेड एप’ या 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात गाजलेल्या पुस्तकाचे लेखक डेस्माँड मॉरिस हे मानववंशशास्त्रज्ञही आहेत. त्यांची इतर पुस्तकेही भरपूर गाजलेली आहेत. असेच एकदा इंग्लंडमधील फुटबॉल मॅचच्या वेळी त्या मैदानातील प्रेक्षकांची उत्कंठा, टोकाचे भावप्रदर्शन, क्षुल्लक कारणासाठी हमरी-तुमरीवर येणे, तुफान हाणामारी इत्यादी गोष्टी बघितल्यावर त्यांनी ‘सॉकर ट्राइब’ नावाचे एक पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी युरोपमधील वेगवेगळे फुटबॉल क्लब्स म्हणजे एकेकाळच्या आदिमानवांच्या टोळीसदृश टोळ्या आहेत, असे निष्कर्ष काढले. या सर्व क्लबमधील सॉकरच्या खेळाच्या वेळचे वर्तन हे मानवी उत्क्रांतीशी संबंधित असून ज्या प्रकारे आपले पूर्वज टोळी करून राहत होते; प्रसंगी स्वतःच्या टोळीसाठी प्राण पणाला लावत होते, तीच मानसिकता अजूनही शिल्लक आहे याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे.
एखाद्यामध्ये टोळीची मानसिकता व शत्रुत्वाची भावना यांचे उद्दीपन करण्यास फार कष्ट पडत नाहीत. 20-25 जणांच्या समूहातील 10-12 जणांची दोन गटात विभागणी करून एखादे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची स्पर्धा ठेवल्यास टोळीची मानसिकता ठळकपणे दिसेल, असा तज्ज्ञांचा कयास आहे. आपापल्या गटातील प्रत्येक जण काही कालावधीत एकरूप होऊन काम करू लागतो, त्या गटातील इतरांशी सौजन्याने वागतो, ऋणानुबंध असल्यासारखे मदतीला धावतो. त्याचवेळी विरुद्ध गटाकडे वैरत्वाच्या भावनेने पाहू लागतो. विरुद्ध गटाबद्दल उणे-दुणे बोलणे, शिवीगाळ करणे, मारामारी करणे इथपर्यंत त्यांची मजल जाऊ शकते. हे वैरत्व जोपर्यंत अजून एखादा काल्पनिक वा प्रत्यक्ष वैरी दिसत नाही, तोपर्यंत टिकून राहते. काहीही कारण नसताना ‘ते’ आणि ‘आम्ही’ हा संघर्ष येथे बघावयास मिळतो. खरे पाहता आताच्या जागतिकीकरण झालेल्या आधुनिक जगासाठी अशा प्रकारचे जमातीकरण सोयीस्कर ठरू शकते. कारण स्पर्धात्मक जगात पुढे जाण्यासाठी एखादा गट दुसर्या गटावर मात करून काही उपयुक्त सुविधा निर्माण करत असल्यास ते समाजाला उपयोगी ठरेल. परंतु या ‘ट्रायबॅलिझम’मध्ये सर्जनशीलतेपेक्षा वंशविद्वेष, अपरिचित विषयीचे भयगंड व आपापसातील हेवेदावे प्रकर्षाने जाणवतात.
परंतु अशा प्रकारच्या नकारात्मक गोष्टीवर आणि ‘ते’ व ‘आम्ही’ या प्रवृत्तीवर मात करणे अशक्यातली गोष्ट नाही. फुटबॉल क्लब्सच्या फॅन्सचेच उदाहरण घेतल्यास इंग्लंडमध्ये मॅच असताना एकमेकांचा जीव घेण्याचा पवित्रा घेणारे इटली वा अर्जेंटिनाबरोबरच्या राष्ट्रीय पातळीवरील अटीतटीच्या मॅचमध्ये सर्व क्लब्सचे फॅन्स एकत्र येऊन आपल्या टीमला उत्तेजन देत आहेत, हे चित्र दिसेल. हा ‘ट्रायबॅलिझम’ क्रीडा क्षेत्रात यशस्वी होत असल्यास इतर क्षेत्रात यशस्वी का होत नाही, हा प्रश्न आपल्यासमोर आहे. कदाचित भावनेच्या भरात विवेकी विचार व त्याप्रमाणे कृती होत नाहीत म्हणूनच ‘ट्रायबॅलिझम’ची मानसिकता अजूनही डोके वर काढत आहे.
परमेश्वराचा अधिक्षेप
परमेश्वरानेच जर मानवी मेंदूची निर्मिती केलेली असल्यास ही निर्मिती तद्दन तकलादू व सुमार दर्जाची आहे असे म्हणता येईल. मनात उडणारा गोंधळ, पूर्वग्रहदूषित दृष्टी, ढीम्मपणा, आलस्य, निरुत्साह यासारख्या गोष्टींची रेलचेल, शरीराच्या देखभालीसाठी सक्तीची आठ तासाची विश्रांती, ऐषारामी जीवन जगण्यासाठी कराव्या लागणार्या करामती, शरीराची काळजी व ती कुठल्याही क्षणी बिघडण्याची शक्यता इत्यादीमुळे परमेश्वराचे हे उत्पादन तकलादू म्हणून परत पाठवण्याच्या लायकीचे आहे. असे कित्येक गुण-दोष असले तरी या मेंदूचे एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे देव/देवीवरील अदम्य विश्वास (श्रद्धा) असे म्हणता येईल.
आतापर्यंत जे कोणी या पृथ्वीवर जगले असतील, त्यातील प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या तरी देव/देवतावर (काही काळापुरते का होईना) श्रद्धा ठेवली असेल, यात शंका नाही. आजच्या ऐहिक सुखोपभोगाच्या कालखंडातसुद्धा परमेश्वरावर विश्वास न ठेवणार्या नास्तिकांची संख्या तुलनेने अगदीच तुरळक आहे. कारण नास्तिकतेसाठी विचार करण्याची पूर्वअट असते; तसे आस्तिकांसाठी बंधन नाही. काही वेळा बुद्धिवंत नास्तिकसुद्धा परमेश्वराला नाकारत असला, तरी जगात अलौकिक शक्ती असू शकते, याविषयी तावातावाने चर्चा करत असतो, तेव्हा अलौकिक शक्तीचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारा आस्तिक किस झाडकी पत्ती!
या विषयावरील अभ्यासक नेहमीच आपल्या मेंदूत परमेश्वरानेच खास स्वतःसाठी एखादी पोकळी (God’s hole) तयार करून ठेवलेली असावी, असे चेष्टेच्या स्वरात आपापसांत बोलत असतात. जर आपल्याला अगदी लहानपणापासूनच देव-धर्माविषयीची अगदी बारीक-सारीक गोष्टीसुद्धा या पोकळीत संग्रहित होत असतात. एक अदृश्य शक्ती या पोकळीवर कायम नजर ठेवत असते व आपल्या दैनंदिन व्यवहारात अधिक्षेप करत परमेश्वरावरील श्रद्धा दृढ करत असते आणि नैतिकतेविषयी निर्णय घेत असते, असे काही सांगत असल्यास त्याबद्दल काहीही विचार न करता त्यावर आस्तिकांचा विश्वास बसतो. आपल्या जीवनातील घडामोडींची ही अदृश्य शक्तीच नियंत्रण करत असते, या विधानावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो.
खरे पाहता हा काही ‘ब्रेन वाशिंग’चा प्रकार नाही. गेली हजारो वर्षांपासून मानवी प्राण्यात जाणिवा उत्क्रांत होऊ लागल्या, तेव्हापासून धर्मश्रद्धा हे जाणिवांचे एक उपउत्पादन म्हणून मानवाची साथ देत आहे. या उपउत्पादनामुळे प्रत्येक घटनांचा एखादा सूत्रधार असतो; रानातील पानं वार्यानेच हलतात, असे नसून एखाद्या नरभक्षक प्राण्यापासून माणसाचे रक्षण करण्यासाठीची अदृश्य शक्तीने केलेली तरतूद असे काही तरी त्याच्या डोक्यात भरलेले असते. कदाचित वार्यापासून दूर पळून गेलेल्यांचे जीव वाचल्यामुळे तीच जनुकं पुढच्या पिढीत उतरली असतील व परमेश्वरावरील श्रद्धा दृढ होत गेली असेल.
पुढील काळात मानसशास्त्र जसजसे उत्क्रांत होत गेले, तसतसे कोणीही समोर नसतानासुद्धा त्यांची मानसिक अवस्था व त्यांच्या अपेक्षा यांचा अचूक अंदाज करणे शक्य झाले. मानवी मनाचा वेध घेण्याचे कौशल्य प्राप्त झाले. या कुशलतेमुळे एक समूह म्हणून एकत्रपणे राहण्यास फार मोठी मदत मिळाली; परंतु हीच कुशलता काही अदृश्य वा अवास्तव कल्पनांनासुद्धा भावनेच्या आहारी देऊ लागली. धर्माचा प्रभावसुद्धा याच भावनेचाच भाग असून त्यामुळे आपल्या पूर्वजांना भावनिक सुरक्षितता मिळण्यास मदत मिळाली असेल. धर्माच्या शिकवणीतून अनपेक्षित वा मानवी नियंत्रणाबाहेरील घटना, जन्म-मृत्यूबद्दलचे गूढ, नैसर्गिक प्रकोपाच्या प्रसंगी होणारे अकाली मृत्यू इत्यादीमधून होणार्या भावनाकल्लोळापासून माणूस मुक्त झाला. सर्व काही देवाची अगाध लीला हे मनावर कोरण्यात धर्म यशस्वी होऊ लागले. आपला सांभाळ करणारा कोणीतरी आकाशात आहे, मृत्यू हा अस्तित्वाचा शेवट नाही, आयुष्यभरातील सर्व गोष्टींचा कार्यकारण भाव मांडता येऊ शकतो इत्यादी गोष्टींवर धर्मांचा भर असल्यामुळे माणसातील जाणिवा विकसित होऊ लागल्या, विचार करणे शक्य होऊ लागले.
हीच धर्मसंकल्पना समाजातील वेगवेगळ्या ठिकाणी वसलेल्या अपरिचित गटांना एकसंध ठेवण्यास कारणीभूत ठरली. मानवी संस्कृतीच्या संवर्धनासाठी धर्मसंकल्पना आधारभूत ठरली. अजूनही याच धर्मसंकल्पनेच्या आकर्षणात तसूभरही कमी झालेली नाही. धर्मासाठी युद्धं खेळली गेली. लाखोंची हत्या झाली. देव-धर्म यांचे स्तोम माजवत अनेकांनी जनसामान्यांना लुटले. विज्ञानानंसुद्धा या धर्मसंकल्पनेसमोर हात टेकले.
परंतु आता ही धर्मसंकल्पना निरुपयोगी ठरत आहे. दहशतवाद, दंगली, विद्वेष, यांचे मूळ या धर्मात आहे, याची जाणीव होत आहे. धर्मसत्ता व राजसत्ता यांची फारकत केल्याविना खर्या अर्थाने मानवाची प्रगती होणार नाही, याबद्दल ठिकठिकाणी चर्चा चालू आहे. धर्माचे अवडंबर ही अविचारी कृती आहे, याबद्दल जनजागृती होत आहे. नास्तिकतेचा विचार समाजात रुजल्यास या धर्मसंकल्पनेवर मात करणे शक्य होईल व माणूस विवेकी होत-होत विचार करून कृती करण्यास प्रवृत्त होऊ शकेल; परंतु यास नक्कीच भरपूर वेळ लागेल.
सूडबुद्धी
सूडबुद्धीने वागणे कदाचित जगभरातील सर्व समाजामध्ये आढळणारा गुणविशेष आहे. शिकारी अवस्थेत असताना तर सूड घेणे हेच एक प्रमुख कार्य असल्यासारखा समाज वागत होता. सर्व समाजामध्ये सूड घेण्याची कारणंसुद्धा – खून, मारामारी, चोरी, लैंगिक अत्याचार, व्यभिचार, अपमानाचा बदला इ. इ. – जगभर समान होत्या. आपल्या टोळीतील एखाद्यावर अन्याय होत असल्यास ‘अॅन आय फॉर अॅन आय’ या नियमाप्रमाणे हे सूडसत्र पिढ्यान्पिढ्या चालू राहत होते. माघार घेणे हे भेकडपणाचे लक्षण मानले जात असे. अपराधाच्या गांभीर्यानुसार सुडाची पातळी बदलत होती.
याविषयीच्या अभ्यासकांना सूडबुद्धी म्हणजे सहनशीलतेच्या विरोधातील शारीरिक जडणघडण असे वाटत होते. परंतु आता मात्र समाजव्यवस्थेच्या संवर्धनासाठी आवश्यक वाटणारा गुणविशेष आहे, याबद्दल अनेक अभ्यासकांचे एकमत झाले आहे की काय, असे वाटत आहे. एखादा तुमच्याशी काही उणे-दुणे ठेवून वागल्यास वा प्रत्यक्ष मारहाण करून तुम्हाला वेदना देत असल्यास त्याला शिक्षा देणे क्रमप्राप्त आहे व तो नैसर्गिक न्याय आहे हा समज दृढ होत आहे. मूळ चूक दुरुस्त करू शकत नाही; परंतु शिक्षा दिल्यास यानंतर ती चूक होणार नाही व इतरही याचा धडा घेतील, हा समज स्वीकारार्ह ठरत आहे. त्यामुळे सूडबुद्धीला अविचार म्हणणे हे अनेकांना आक्षेपार्ह वाटू शकते.
तरीसुद्धा हा सुडाचा प्रवास काही वेळा अंगलट येऊ शकतो. गंमत म्हणजे तुम्ही सौम्यपणे वागत असल्यास तुमचे शोषण होण्याची शक्यता असते; कठोरपणे वा जशास तसे वागत असल्यास सूडसत्राला आमंत्रण देण्याचा धोका पत्करावा लागतो. आपल्या या चुकीच्या निर्णयामुळे आपण इतके सहिष्णू कसे, हेही लक्षात येईल. कारण क्षमाशीलता ही नेहमीच उत्स्फूर्तपणे घडणारी प्रक्रिया आहे. मानसतज्ज्ञांच्या मते, सहिष्णुता सूडसत्रामुळे होणारे नुकसान टाळण्याचे एक प्रभावी साधन आहे. एकदा या प्रक्रियेला सुरुवात झाल्यास परस्परसंबंध जुळण्यास मदत होऊ शकते व तुटलेली नाती (पुढील सूडसत्रापर्यंत!) जोडली जाऊ शकतात. ही एक विवेकी विचारप्रक्रिया असून अविचाराला येथे थारा नाही.
आधुनिक समाजात राज्यव्यवस्थाच सुडाचे काम करत आहे. काहींना शिक्षा म्हणून जन्मभर कोंडून ठेवू शकते किंवा फाशीची शिक्षा देऊन त्याला नष्ट करू शकते. शिक्षेच्या तरतुदीमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती तसूभरही कमी झाली नाही; फक्त कायद्याच्या कचाट्यात न सापडण्यासाठी नवीन वाटा शोधल्या जात आहेत. अपराध्यांची संख्या वाढतच आहे. मनमानी करत आपल्या हातात कायदा घेत सूडसत्र चालू ठेवले जात आहे. दहशतवाद्यांचे हिंसक कारवाया अशाच सूडनाट्याचे प्रदर्शन असावे. एका अंदाजाप्रमाणे सूडसत्रामुळे दरवर्षी सुमारे 20 टक्के लोक मृत्यूस बळी पडतात. सूडबुद्धी ही एक अविचारी कृती असून समाजस्वास्थ्य बिघडवणार्या या प्रवृत्तीचा त्याग करणे अत्यंत गरजेचे ठरू शकेल.
स्वैरविचार
प्रत्येकाकडे इतरांना सांगण्यासाठी काही ना काही अनुभव वा गोष्टी असतात. खरे पाहता या गोष्टीत स्वतः भर घातलेला भाग बराच असतो. मुळात कुठलीही गोष्ट फुगवून सांगण्याची हौस प्रत्येकात थोड्या-फार प्रमाणात असते. ऐकणार्यावर प्रभाव पाडण्यासाठी आपण गोष्टी फुगवून सांगत आहोत, याची कल्पनासुद्धा आपल्याला नसते. आपल्या मेंदूची ती फेकाफेकी असते व कळत न कळत आपण त्यात गुरफटून जातो. काल्पनिक असूनसुद्धा ते पूर्ण खरे आहे, अशीच आपली समजूत असते व हा स्वैरपणा नेहमीच आपल्याला फसवणारा असतो.
विचारातील हा स्वैरपणा बुद्धिभ्रमिष्टांच्यात सामान्यपणे आढळतो. स्मृतीमधील पोकळी भरून काढण्यासाठी ते नेहमीच गोष्टी रचून ऐकणार्यांना भांबावून सोडतात. त्यांची एखादी आवडती व्यक्ती समोर न दिसल्यास तिला कुणीतरी फूस लावून पळवून नेले आहे, यावर त्यांचा भरवसा असतो. त्यांच्यातील स्वैरविचार संवेदनांतील फरक भरून काढत असतो.
सामान्यपणे दोन वस्तू दाखवून त्यातील एखाद्याबद्दल चार शब्द सांगण्यास सांगितल्यावर तुम्ही मनात त्याबद्दल शब्दांची जुळवणी करता. तुमचे वस्तूकडे लक्ष नसताना त्या वस्तूऐवजी दुसरी एखादी वस्तू ठेवल्यास ते तुमच्या लक्षात येते व वस्तूबद्दलच्या माहितीचे स्वरूप पूर्णपणे बदलते. तुम्ही सतर्क होत ठामपणे वस्तू बदलल्याचा उल्लेखही करता. परंतु हाच प्रयोग चार भिंतीच्या आड एखाद्या लॅबमध्ये करत असताना न बदललेल्या वस्तूचेच वर्णन करता. कारण लॅबमध्ये जे घडले ते कुणालाही कळणार नाही, याची तुम्हाला खात्री असते. यात आपले काही तरी चुकत आहे, हेसुद्धा जाणवत नाही. स्वैराचारात खरे-खोटे यांना स्थान नाही; फक्त वेळ मारून नेणे, असे केले जाते.
आपला मेंदू नेहमीच सर्व संवेदनांमधून काही अर्थपूर्ण गोष्ट निघावी, या प्रयत्नात असतो. मेंदूत एखादा संकेतवाचक असावा व हा संकेतवाचक आपली काळजी घेत असतो, असे वाटण्याची शक्यता असते. आपल्या सर्व निर्णयात तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत याची हमी हा संकेतवाचक देत असतो. सुप्त मेंदूतील प्रक्रियांना जागृत मेंदू हाताळत असतो. त्यामुळे माहितीतील त्रुटी भरून काढण्याचे काम व त्यासाठी पर्याय सुचविणे या गोष्टी मेंदूत सातत्याने घडत असतात. यावरून आपण बाहेरच्या जगातील घडामोडींना आपापल्या परीने अर्थ लावण्याच्या प्रयत्नात असतो.
कल्पनेच्या राज्यात
आपले खाणे, पिणे, नैसर्गिक क्रिया, लैंगिक क्रिया इत्यादी जैविक व्यवहारांना अर्थपूर्ण करण्यासाठी माहितीतील उणिवा भरून काढण्याचे काम मेंदू करत असतो. त्यासाठी कल्पनांचा आधार घेऊ शकतो. या गुंतागुंतीच्या जगातील घडामोडींबद्दल स्वतःच्याच स्पष्टीकरणाची निर्मिती करतो (व त्यालाच खरे मानतो); परंतु काही वेळा आपला हा तर्क वा स्पष्टीकरण अत्यंत तकलादू असू शकते. त्याची भिस्त फँटसीवर असते. कल्पनाजगात वावरत असताना वास्तवाचे भान सुटू लागते. कदाचित आपल्या जाणिवातील उणिवांची भरपाई करण्यासाठी धर्मसंकल्पना कामी आली असेल. म्हणूनच अजूनही आपण त्याला कवटाळत आहोत. हा आधार सुटल्यास आपले काय होईल, या भीतीनेच नको त्या गोष्टींचा आधार घेत असतो. ‘फेकन्यूज’ वा ‘कॉन्स्पिरसी थेअरी’सारखे प्रकार या भीतीची अपत्ये आहेत.
गोष्टीवेल्हाळपणा आपल्या नसनसांत असला तरी त्यांच्यातील कल्पनांमध्ये किंचित प्रमाणात तरी वास्तवाचा, सत्याचा अंश असणे गरजेचे आहे. केवळ भास होतात म्हणून त्यांना दुर्लक्षित करण्यापेक्षा त्यांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे शक्य आहे. वेगवेगळे स्पष्टीकरण देणे शक्य आहे का, एखाद्या ठाम निष्कर्षाप्रत येणे शक्य आहे का, सुरुवातीच्या विचारात व नंतरच्या विचारात काही फरक आहे का, इत्यादींचाही विचार होणे क्रमप्राप्त ठरेल.
थोडक्यात, या नंतरच्या जगात टिकून राहण्यासाठी तर्कशुद्ध विचार प्रक्रियेला पर्याय नाही.
लेखक संपर्क ः 9503334895