Categories
अघोरी प्रथा महिला

आदिवासी समाजातील कुरमा पद्धतीविरोधात महाराष्ट्र अंनिस करणार प्रबोधन

ज्योतिष चिकित्सा विशेषांक - मे २०१९

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, कुरखेडा, भामरागड तालुक्यातील आदिवासी समाजामध्ये कुरमा पध्दती आढळते. या पध्दतीत महिलांना मासिक पाळीच्या कालावधीत निवासीघरात न ठेवता गोटुल, झोपडी किंवा लगतच्या जंगलात झाडाखाली एकट्याने ठेवले जाते. खाली जमिनीवर झोपविले जाते.

या पाच दिवसांत त्यांना घरून जेवण पाठवले जाते किंवा जंगलातील अन्नावर पोट भरावे लागते. असे का वागविले जाते, याबाबत जाणून घेतले असता यामागे महिलांना या कालावधीत आराम मिळावा असा दृष्टिकोन नसून घर विटाळते, दु:ख दारिद्य्र येते, दैवी-दैत्य शक्ती कोपतात, असे गैरसमज व अंधश्रद्धा असतात.

या मासिक पाळीच्या कालावधीत असह्य महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. एटापल्ली तालुक्यातील एका मुलीचा मासिक पाळीदरम्यान विषारी सर्पदंश होऊन मृत्यू झाला होता. या कालावधीत एकटेपणाचा गैरफायदा घेऊन महिलावर लैंगिक अत्याचार व हिंस्त्र प्राण्यांपासून धोका नाकारता येत नाही.

शास्त्रीय दृष्टीने मासिक पाळीचा विचार केल्यास ही पवित्र नैसर्गिक क्रिया असून आमचा तुमचा जन्म याच प्रकियेतून झाला आहे. जगाची मानवनिर्मिती यातूनच झालेली आहे. विटाळ होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या कालावधीत महिलांना, मुलींना खर्‍या मानसिक आधाराची व स्वच्छतेची गरज असते.

कुरमा पध्दती आदिवासी महिला, मुलींसाठी अन्यायकारक व अमानवीय असून ही संकल्पना अवैज्ञानिक व अंधश्रद्धेवर आधारित आहे. यासाठी कठोर कायदे व जनजागृतीची गरज आहे. जिल्हा विकासाच्या गप्पा मारणार्‍यांना ही जबरदस्त चपराक आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील बर्‍याच आदिवासी पाड्यांमध्ये, कुरखेडा तालुक्यामध्ये काही ठिकाणी कुरमाता प्रथा सुरू आहे. शिवाय, छत्तीसगढला लागून असलेल्या कोरची व आणखी काही गावांमध्ये, तसेच एटापल्ली, भामरागढ, भागातही बघायला मिळतात.

या कुरमा पद्धतीविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, गडचिरोली जनजागृती करणार आहे.

उद्धव डांगे

जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस, गडचिरोली