Categories
न्याय

आसारामबापू बलात्कार प्रकरण – न्यायालयाचा निकाल मराठीत

वार्षिकांक - २०१८

आसारामबापू प्रकरणी, जोधपूर येथील न्यायमूर्ती मधुसूदन शर्मा यांच्या विशेष न्यायालयाने 25 एप्रिल 2018 रोजी दिलेल्या निकालाचे निकालपत्र 156 पानी आहे.

उत्तम जोगदंड यांनी ‘अंनिवा’च्या वाचकांसाठी तो निकाल हिंदीतून मराठीत अनुवादित केला आहे.

अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी या निकालातील महत्त्वाचे तपशील या लेखात दिले आहेत. हा निकाल वाचून या प्रकरणातील बुवाबाजीची भयानकता वाचकांच्या लक्षात येईल.

काय घडले?

सुरुवातीलाच हे स्पष्ट करणे गरजेचे आहे की, हे प्रकरण भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 354 आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम,2012 च्या विविध कलमांशी संबंधित असल्याने फिर्यादी बालिकेच्या सन्मानाची सुरक्षा जपण्यासाठी, या निर्णयात फिर्यादी बालिकेचे नाव लिहिण्याऐवजी त्या जागी फिर्यादी पीडितेला ‘सु’ असे संबोधण्यात आले आहे.

फिर्यादी ‘सु’ ही संत श्री आसाराम गुरुकुल, परासिया रोड, छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथे 12 वी च्या वर्गात शिकत होती.

याच्याशी एके दिवशी अचानक तिला चक्कर आली, तेव्हा तिच्या वसतिगृहाची वॉर्डन शिल्पी हिने तिला सांगितले की, तिला भूत-प्रेताची बाधा झाली आहे व शिल्पी याबाबतीत आसारामबापू यांच्याशी बोलेल. दिनांक 7 ऑगस्ट 2013 रोजी शिल्पी ने ‘सु’ च्या घरी फोन लावून कळवले की, ‘सु’ हिची तब्येत बरी नाही, सबब तिला मोठ्या शहरात नेऊन तिच्यावर इलाज करावा लागेल. दिनांक 8 ऑगस्ट 2013 रोजी रात्री 10 ते 11 दरम्यान तिचे आई-वडील गुरुकुलामध्ये पोचले. दिनांक 9 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी वडील मुलींच्या वसतिगृहात पोचले, तेव्हा शिल्पीने ‘सु’ला भूत-प्रेताची बाधा झालेली असल्याने, ‘सु’ला बोलावले आहे. बापू जिथे कुठे असेल तिथे लवकरात लवकर ‘सु’ला घेऊन जावे, असे त्यांना सांगितले. दिनांक 9 ऑगस्ट 2013 रोजी ‘सु’आपल्या शाहजहाँपूर येथील घरी पोचली. तिच्या वडिलांनी बापू कुठे आहे, याचा शोध घेतला तेव्हा त्यांना असे कळले की, ते दिनांक 12 ऑगस्ट 2013 रोजी दिल्लीला येणार आहे. ‘सु’ व तिचे आई-वडील दिनांक 13 ऑगस्ट 2013 रोजी दिल्लीला पोचले, तेव्हा त्यांना असे कळले की, बापू जोधपूर (राजस्थान) येथे आहे. बापूच्या सेवेत असणार्‍यात शिवाने त्यांना लवकर जोधपूर येथे या, असे सांगितले. ‘सु’चे कुटुंबीय जोधपूरच्या पुढे मणई गावात पोचले, तेव्हा गेट बंद होते व सर्व साधक बाहेर उभे होते. ‘सु’च्या वडिलांनी शिवाला फोन केला असता त्यांनी गेट उघडले; आतमध्ये जेथे बापू खुर्चीवर बसून सत्संग करीत होते, तेथे ते जाऊन बसले. थोड्या वेळाने ते कोठून आले आहेत, याची बापूने चौकशी केली असता, ‘सु’गुरुकुलात शिकत आहे, असे त्यांनी बापूला सांगितले. तेव्हा ‘भूत काढून टाकू’ असे बापूने सांगितले. त्यानंतर अध्यात्म व future संबंधी बोलणे झाले; मग बापूने एका सेवकाला पाठवून तिघांना आपल्या जवळ बोलावले, आपली कुटी दाखवली आणि प्रसाद देऊन आराम करण्यासाठी पाठवले. ‘सु’ आणि तिचे कुटुंबीय, त्यांना दिलेल्या खोलीमध्ये थांबले.

दुसर्‍या दिवशी दिनांक 15 ऑगस्ट 2013 रोजी त्यांच्यासाठी जेवण पाठवण्यात आले. त्यांनी बापूच्या सत्संग प्रवचनात भाग घेतला. त्या रात्री आसाराम यांनी त्यांना कुटीमध्ये बोलावले, ‘सु’ हिच्या आई-वडिलांशी बोलणे केले व नंतर त्यांना ‘गेटजवळ बसून जप करा, ध्यान करा,’ असे सांगितले. त्यानंतर बापूने ‘सु’ला पाठीमागे एका चबुतर्‍यावर बसवले. तिला दूध दिले व ते प्यायल्यावर बापूने तिच्या आई-वडिलांना निघून जायला सांगितले. थोड्या वेळाने वडील निघून गेले; पण आई तिथेच बसून राहिली. त्यानंतर आसारामबापू पुढच्या दरवाजाने आपल्या खोलीत गेला व थोड्या वेळात त्याने खोलीतील लाईट बंद केली आणि मागील दरवाजातून ‘सु’ला आत बोलावले. आत गेल्यावर तिला आपल्या जवळ बसवून तो बोलू लागला. थोड्या वेळाने त्याने तिला तिचे आई-वडील काय करत आहेत, ते बघून येण्यास सांगितले. ज्या वेळेस तिने सांगितले की आई बसली आहे व वडील निघून गेले आहेत, त्या वेळी त्याने खोली बंद केली आणि फिर्यादीसोबत छेडछाड सुरू केली. ती ओरडू लागली तेव्हा बापूने तिच्या आई-वडिलांना मारून टाकायची धमकी दिली व घाबरवून तिचे तोंड बंद करून चुंबन घेतले. तिच्या सर्व शरीरावर आपला हात फिरवून तिला वाईट स्पर्श केला, जबरदस्तीने तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाचे चुंबन घेतले आणि तिला आपले लिंग चोखण्यास सांगितले. तो जबरदस्तीने तिचे कपडे उतरवू लागला. ‘सु’ रडू लागली, ओरडू लागली, तेव्हा त्याने तिचे तोंड दाबून बंद केले. जवळपास एक ते दीड तासापर्यंत त्याने ‘सु’सोबत छेडछाड केली. खोलीच्या बाहेर त्याचे दोन ते तीन सेवकसुद्धा होते. ‘सु’ जेव्हा बाहेर आली, तेव्हा या प्रकाराबाबत कुणालाही काहीही न सांगण्याविषयी तिला धमकी देण्यात आली. नंतर ती तिच्या आईसोबत, ज्या ठिकाणी उतरली होती तिथे आली. दिनांक 16 ऑगस्ट 2013 रोजी बापू तिथून दिल्लीला जायला निघाला व ‘सु’चे कुटुंब आपल्या घरी आले. जायच्या आधी बापूने तिच्या वडिलांना सांगितले की, ‘हिला अहमदाबादला पाठवा, तिथे सात-आठ दिवस ती अनुष्ठान करेल; मग तिला मी छिंदवाडा येथे पोचवीन; परंतु घरी पोचल्यावर ‘सु’ने आपल्या आई-वडिलांना काय झाले ते सर्व सांगितले व ती अहमदाबाद येथे गेली नाही.

दिनांक 20 ऑगस्ट 2013 रोजी मध्यरात्री 2.45 वाजता, फिर्यादी ‘सु’ द्वारा दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, लोकनायक इस्पितळ, दिल्ली येथे तिची वैद्यकीय चाचणी झाली व 0/2013 हा एफआयआर नोंदला गेला. नंतर फिर्यादीचे ‘एनजीओ’ कार्यकर्त्यां मार्फत समुपदेशन केले गेले आणि दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 164 अनुसार तिची साक्ष नोंदविली गेली. प्रकरण जोधपूर (राजस्थान) न्याय क्षेत्राशी संबंधित असल्याने फिर्यादी व तिच्या आई-वडिलांना नियमांनुसार जोधपूर येथे पाठविण्यात आले. तिथे पोलिस ठाणे महिला (पश्चिम) जोधपूर येथे 21 ऑगस्ट 2013 रोजी भारतीय दंड संहिता, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2000 व लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, 2012 च्या विविध कलमांच्या अंतर्गत अपराध नोंदवून सहायक पोलिस आयुक्त (पश्चिम) जोधपूर यांना प्रकरण सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर आसाराम व अन्य व्यक्तींच्या विरुद्ध विविध कलामांंतर्गत जिल्हा व सत्र न्यायाधीश, जोधपूर जिल्हा, जोधपूर यांचे समक्ष आरोपपत्र सादर केले गेले. युक्तिवाद ऐकून वरील आरोपींवर विविध कायद्यांच्या विविध कलमांखाली अपराध निश्चित केले गेले. आरोप निश्चित करून आरोपींना ते ऐकवले व समजावले गेले. त्यांनी आरोप ऐकले, समजून घेतले व ते त्यांनी अमान्य केले आणि सुनावणीची अपेक्षा केली.

फिर्यादी पक्षातर्फे पुराव्यांच्या स्वरुपात 229 पानी दस्तावेज व भौतिक स्वरूपातील 21 वस्तू सादर करण्यात आल्या; तसेच 44 साक्षीदार तपासण्यात आले.

दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 313 नुसार आरोपी आसाराम याने लेखी जबानी सादर केली, त्यात त्याने असे सांगितले की, त्याला या प्रकरणात एका षड्यंत्राच्या अंतर्गत खोटेच अडकवले गेले आहे. फिर्यादी व तिचे आई-वडील, विनोद गुप्ता, पंकज दुबे, सतीश वाधवानी, राहुल सचान, देवेन्द्र प्रजापती, अमृत प्रजापती, महेंद्र चावला, दीपक चौरसिया आणि त्यांचे साथीदार यांनी मिळून त्याची संपत्ती हडप करण्यासाठी व त्याला ब्लॅकमेल करून पन्नास कोटी रुपये प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्या विरुद्ध हे गुन्हेगारी षड्यंत्र रचले, खोटी, कपोलकल्पित कहाणी बनवली आणि या उद्देशाच्या पूर्ततेसाठी खोटे पुरावे रचून, खोटा खटला भरून व खोटे निराधार साक्षी, पुरावे कोर्टात सादर केले आहेत. या प्रकरणात तपास अधिकार्‍याने निःपक्षपाती तपास केलेला नाही. त्याला निर्दोष सिद्ध करणारे ठोस कागदोपत्री व मौखिक पुरावे लपवून व नष्ट करून त्या निष्पक्ष पुराव्यांना न्यायालयासमोर येऊ दिलेले नाही. कारण त्याला शिक्षा व्हावी. त्याचा शक्ती ट्रस्ट, छिंदवाडा येथील संत श्री आसारामजी गुरुकुल, सीनियर सेकंडरी स्कूल, बालक व बालिका वसतिगृह यांच्याशी कसलाही संबंध नाही. त्याने कधीही कोणत्याही नोकराशी मोबाईलवर बोलणे केले नाही. फिर्यादी व तिचे आई-वडील यांना तो ओळखत नव्हता आणि त्यांच्याशी त्याने कधीही बोलणे केलेले नाही. तो देवाचा भक्त आहे आणि ईश्वराच्या भजनात रत असतो. भूत मुळीच अस्तित्वात नसते. ही एक दूषित मानसिक वृत्ती आहे. त्याचा याच्याशी कधीही संबंध नव्हता. त्याच्या विरुद्ध भुताचे आरोप वाईट हेतूने केलेले आहेत. त्याने कोणत्याही महिलेला आई किंवा मुलगी या स्वरुपात पाहिले आहे. तो सर्व प्राणिमात्राचे शुभ चिंतितो. त्याला शिक्षा करण्यासाठी मीडियाद्वारा खोटा, दुष्ट हेतूने व दूषित प्रचार केला जात आहे. कारण न्यायिक प्रक्रिया प्रभावित होऊन येनकेनप्रकारेण त्याला शिक्षा व्हावी. या प्रकरणात मीडिया ट्रायल व खोटा प्रचार-प्रसार होऊ नये, यासंबंधी प्रार्थनापत्रसुद्धा प्रस्तुत केले गेले होते. दिनांक 14, 15 आणि 16 ऑगस्ट 2013 रोजी मणई गाव, जोधपूर येथे त्याच्या खोलीत आरोपी व तिचे आईबाबा आले नव्हते. दिनांक 15 ऑगस्ट 2013 रोजी सत्संग संध्याकाळी उशिरा सुरू झाला, ज्यात जोधपूर, बाडमेर, गुजरात, सुमेरपूर, पुणे आदी ठिकाणांहून लोक आले होते. सत्संग रात्री जवळजवळ 10.45 वाजेपर्यंत चालला. त्यानंतर सुमेरपूर व पुणे येथून आलेल्या मुलगा व मुलीचा साखरपुडा – रोका- कार्यक्रम चालू होता. बेहराणा साहेबांचा देखावा केला गेला होता, जो रात्री 11 वाजेपर्यंत चालला. सुमारे 11.30 वाजता जे लोक बाहेरगावाहून आले होते, त्यांचा निरोप घेतला. रात्री सुमारे 12 वाजता तो आपल्या खोलीत गेला. त्या खोलीत इतरांना प्रवेश निषिद्ध असतो व रात्री त्या खोलीत कोणीही आले नव्हते. त्याच्या विरुद्ध जे आरोप लावले आहेत, ते दुष्ट हेतूने लावले आहेत. तो विवाहित आहे. त्याला एक मुलगा व मुलगी आहे. तो आपल्या निवासस्थानी आपल्या पत्नीबरोबर राहतो. त्याच्या विरुद्ध लावलेले आरोप हे पूर्वनियोजित षड्यंत्र आहे. ते खोटे, कपोलकल्पित व निराधार आहे. तो पूर्णतः निर्दोष आहे.

आरोपी शिल्पी उर्फ संचिता हिने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 313 नुसार कथन करताना सांगितले की, भूत-प्रेत असे काही नसते, तिने कधी कोणाला भुतामुळे घाबरलेले पाहिले नाही. ती निर्दोष आहे व तिला या खोट्या आरोपात फसवले गेले आहे. ती स्वतः संत आसाराम, शिवा, प्रकाश यांना ओळखत नाही आणि तिचे त्यांच्याशी कधी फोनवर बोलणे झालेले नाही. आरोपी प्रकाश, शरद्चंद्र, शिवा ऊर्फ सावाराम यांनीही ते निर्दोष आहेत व त्यांच्याविरुद्ध खोटी केस केलेली आहे, अशाप्रकारचे कथन केले.

बचाव पक्षाच्या वतीने 225 दस्तावेज, 6 वस्तू व 31 साक्षीदारांचे म्हणणे हे पुराव्याच्या स्वरुपात सादर करण्यात आले. आरोपीची ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या आरोपांपासून मुक्तता व्हावी, यासाठी घटनेच्या वेळी पीडित मुलगी अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाची होती, हे सिद्ध करण्याकरिता बचाव पक्षाने बरेच प्रयत्न केले. इयत्ता 2 री ते बारावीपर्यंतच्या सर्व कागदपत्रांत; तसेच शालांत परीक्षेच्या प्रमाणपत्रावर फिर्यादीची एकच एक जन्मतारीख असून देखील ही सर्व कागदपत्रे खोटी पाडण्याचा प्रयत्न बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला; परंतु लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 2 डी अंतर्गत बालक या परिभाषेत ती येते, असा निर्णय न्यायालयाने दिला.

सदर निकालपत्राच्या परिच्छेद 188 मध्ये असे म्हणण्यात आलेले आहे की, सरकारी पक्ष व फिर्यादी पक्षातर्फे हा तर्क दिला गेला आहे की, या प्रकरणाची सुरुवात आरोपी आसाराम याची प्रबळ कामवासना व कमी वयाच्या मुलीबाबत असलेले त्याचे लैंगिक आकर्षण याने झाली आहे, हे साक्षीदारांच्या साक्षीतून सिद्ध झाले आहे. केवळ आसारामच नव्हे, तर त्याचा संपूर्ण परिवार आध्यात्मिक साम्राज्याचा उपयोग अल्पवयीन व नौजवान स्त्रियांना फसवून आपल्या लैंगिक आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी वापरीत होता, ज्यामध्ये त्याची मदत काही खास साधिका करीत होत्या.

यापूर्वी सुद्धा आसाराम व त्याच्या परिवाराविरुद्ध प्रथम माहिती अहवाल नोंदले गेलेले आहेत. आसारामने संपूर्ण भारतात असलेल्या गुरुकुलांमध्ये अशा साधिकांची नियुक्ती केली की, त्यांचे काम गुरुकुलातील भोळ्या विद्यार्थिनींना आमिष दाखवून, फसवून आसारामकडे पाठवणे हे होते, ज्यायोगे त्याची लैंगिक वासना शांत केली जाईल. त्या बालिका आसाराम यास विरोध करू शकत नव्हत्या. कारण विरोध केल्यास त्यांना कुटुंबीयांसह नष्ट करण्याची धमकी देऊन घाबरवले जात होते व भीतीने त्या विरोध करू शकत नव्हत्या व तक्रारही करू शकत नव्हत्या; परंतु प्रस्तुत प्रकरणात आसारामचे दुर्दैव हे की पीडितेने धाडस करून आपल्या कुटुंबीयांना या घटनेबाबत सांगितले. कुटुंबीयांनीसुद्धा आसारामला भेटून जाब मागायचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश न आल्याने शेवटी त्यांनी प्रथम माहिती अहवाल नोंदविला.

बचाव पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेला एक मुद्दा म्हणजे, फिर्यादी जेव्हा घटना घडल्याचे सांगत आहे, त्यानंतर प्रत्यक्ष पोलिसांत तक्रार करेपर्यंत काही दिवसांचा वेळ गेला आहे. आरोपी आसारामची सफलता पाहून त्याच्याकडून 50 कोटी रुपये उकळण्याच्या इराद्याने हा कट रचला गेला. स्मशानात गाडलेले मानवी सांगाडे आणून त्याच्या जम्मू येथील आश्रमात ठेवण्यात आले. एफआयआर नोंदवून नंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याऐवजी आधी वैद्यकीय तपासणी करून त्यानंतर एफआयआरची नोंद करण्यात आली, असे मुद्दे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. यावर न्यायालयाने असे म्हटले आहे की, लैंगिक अप्रथांपासून बालकांचे संरक्षण 2012 या कायद्याचा विचार करता एफआयआरच्या आधी वैद्यकीय तपासणीकरिता पाठवून महिला पोलीस अधिकार्‍याने कोणतीही चूक केलेली नाही. परिच्छेद 237 मध्ये बचाव पक्षातर्फे करण्यात आलेला एक युक्तिवाद मांडण्यात आलेला आहे. त्यात म्हटले आहे की, बचाव पक्षाच्या साक्षीदार असलेल्या दोन तरुणींच्या साक्षीवरून हे स्पष्ट होते की, आरोपीची मानसिक स्थिती अत्यंत उच्च दर्जाची आहे, तो परमज्ञानी आहे, त्याने आपल्या मेंदूची सर्वोच्च क्षमता प्राप्त केलेली आहे, तो सर्व महिलांचा सन्मान करतो, सांसारिक वस्तू व इच्छा या त्याच्या दृष्टीने गौण बाबी आहेत. 1974 पासून तो ब्रह्मचार्याचे पालन करत असून तो दुष्कर्माचा विचार देखील करू शकत नाही. त्यामुळे त्याच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.

परिच्छेद क्रमांक 223 मध्ये मा. न्यायालयाने असे म्हटले आहे की, ‘फिर्यादीची केवळ एक संशयातीत व सुसंगत साक्ष गुन्हेगारास दंडीत करण्यास पुरेशी आहे. या साक्षीला पुष्टीकरण करणार्‍या साक्षीची आवश्यकता नाही. वरील साक्षीच्या आधारे असे म्हणता येते की, फिर्यादी पक्ष हा आरोपीत गुन्ह्याची आधारशिला सिद्ध करण्यात सफल झाला आहे. न्यायालयास वरील साक्ष पाहून या टप्प्यावर अशी उपधारणा करावी लागेल की, आरोपीने त्याच्यावरील आरोप असलेला गुन्हा केला आहे.’

बचाव पक्ष व फिर्यादी पक्ष यांच्यामध्ये काही मुद्द्यांवर झालेले युक्तिवाद पुढीलप्रमाणे :

एफआयआर नोंदविण्यास फिर्यादीला उशीर झाला, असे बचाव पक्षाचे म्हणणे होते, त्यावर फिर्यादी पक्षातर्फे असा तर्क दिला गेला की, बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणांत पीडिता सामान्यतः घाबरलेली असते. या प्रकरणात तर आरोपीने तिच्या कुटुंबाला नष्ट करण्याची धमकी दिली होती. तिच्या आईने तिला उदास असल्याचे कारण विचारल्यावर तिने कारण सांगितले, जे आईने तिच्या वडिलांना सांगितले. संपूर्ण परिवार आरोपीचा साधक असल्याने आरोपीला स्पष्टीकरण विचारावे, असा त्यांनी निर्णय घेतला. आरोपी दिल्लीत आहे, असे कळल्यावर ते दिल्लीला गेले; पण तिथेही आरोपीची भेट न मिळाल्याने निराश होऊन त्यांनी दिल्लीतील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. याबद्दल मत व्यक्त करताना मा. न्यायालयाने असे म्हटले आहे की, प्रथम माहिती अहवाल नोंदण्यात झालेल्या उशिराचे पुरेसे स्पष्टीकरण फिर्यादी पक्षाद्वारा दिले गेले आहे. कारण आरोपी पक्षाच्या साक्षीदारानेच आरोपीस राष्ट्रपती, प्रधानमंत्री व विविध मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके मिळाल्याचे कथन केले आहे व त्यावरून आरोपी हा प्रभावशाली व्यक्ती असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत पीडितेला भीती वाटणे स्वाभाविक आहे. आरोपीने दिलेली धमकी खरी केल्यास आपल्या कुटुंबीयांना तो मारून टाकेल, हा विचार ती कमी वयाची मुलगी करू शकेल; यापेक्षा अधिक विचार ती करू शकेल, अशी अपेक्षा ठेवता येत नाही. म्हणून तिने सुरक्षित वाटल्यावर, आईने खोदून विचारल्यावर घटना कथन केली व पुढील घटनाक्रम घडला. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा हवाला देऊन मा. न्यायालयाने असे म्हटले आहे की, लैंगिक गुन्ह्यात एफआयआर नोंदविण्यात विविध कारणांमुळे उशीर होतो.

या प्रकरणात दोन आठवडे उशीर झाला होता, तो स्वीकारला गेला होता. बचाव पक्षाच्या युक्तिवादात एक मुद्दा असा आहे की, मुलगी घाबरलेली होती, तर आई-वडिलांसोबत दिल्लीत आरोपीला भेटायला का तयार झाली? त्यावर न्यायालयाने असे मत मांडले आहे की, मुलीला आई-वडिलांनी पाठबळ दिल्यास तिच्यात समाजाला तोंड देण्यासाठी हिम्मत निर्माण होते आणि त्यामुळे म्हणून बचाव पक्षाचा हा युक्तिवाद स्वीकारण्याजोगा नाही.

एफआयआर संदर्भातील बारीक सारीक त्रुटी लक्षात आणून देणार्‍या युक्तिवादातील मुद्द्यांबाबत मा. न्यायालयाने असे म्हटले आहे की, एफआयआर म्हणजे विश्वकोश नाही व त्यामध्ये घटनेचे संपूर्ण वर्णन व सगळ्या आरोपींची नावे लिहिली जावीत, हे आवश्यक नाही.

‘रोका’ व झुलेलालचा देखावा हे दोन कार्यक्रम आश्रमात चालू असल्याने, प्रश्नांकित रात्री आरोपी कार्यक्रमस्थळी उपस्थित असल्याचे कथन बचाव पक्षाच्या साक्षीदारांनी केलेलं आहे. त्यावर न्यायालयाने माहितीच्या महाजालाचा वापर करून सिंधी समाजातील लग्नविधींची माहिती घेतली व साक्षीदार जे सांगत होते, त्यातील विसंगती स्पष्ट करताना मा. न्यायालयाने असे मत नोंदवलेले आहे की, अशा मोठ्या कार्यक्रमांचे फोटो अस्तित्वात नसणे, हेच दर्शविते की, केवळ आसारामचे भक्त असल्याने सदर साक्षीदार हे विधी झाल्याचे खोटे सांगत आहेत. आरोपी आसारामचे भक्त किंवा आश्रित असलेले लोक साक्षीदार म्हणून उभे केलेले दिसतात.

उदाहरणार्थ मदनसिंह नावाची एक व्यक्ती सांगते की, या दिवसांमध्ये तो आश्रमामध्ये चौकीदार म्हणून कार्यरत होता आणि आश्रमात आसारामव्यतिरिक्त कोणीही आलेले नव्हते; परंतु पीडिता किंवा तिच्या आई-वडिलांच्या उलट तपासणीत आश्रमात चौकीदार काम करत असल्याचे बचाव पक्षाने सूचित देखील केलेले नाही; तसेच चौकीदार म्हणून काम करण्यासाठी मनई या ठिकाणी बरेच लोक मिळणे शक्य असताना दूरच्या गावातून हा चौकीदार का बोलावला, असा प्रश्नदेखील न्यायालयाला पडतो. एक खोटे लपविण्यासाठी अजून एक खोटे बोलायचे? असे करताना शेवटी खोटे बोलण्याची कसरत करणारा उघडा पडतो, तसे बचाव पक्षाच्या साक्षीदारांबाबत घडलेले दिसते. सदर केसमध्ये साक्षीदारांपेक्षा परिस्थितीच जास्त साक्षी देत आहे, असे मत मा. न्यायालयाने व्यक्त केलेले आहे.

बचाव पक्षाचे म्हणणे आहे की, कुटीमध्ये कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती; परंतु पीडितेने पोलिसांना कथन केलेले कुटीच्या आतील वर्णन एकदम खरे आढळून आले. त्यावर बचाव पक्षाने असे सुचवले की, पीडितेने हरिद्वार, शाहजहाँपूर येथील आसारामच्या कुटी आधी पहिल्या असतील; परंतु त्याचा पीडितेने इन्कार केलला. व्यक्ती खोटे बोलू शकते; परंतु परिस्थिती कधीच खोटे बोलत नाही, हा कायद्याचा स्पष्ट सिद्धांत असल्याने परिस्थिती न्यायालयासमोर हे स्पष्ट करीत आहे की, पीडिता त्या कुटीमध्ये गेली होती, जिथे जाण्यास बचाव पक्षाच्या अनुसार कोणालाही परवानगी नव्हती.

आसारामच्या गुरुकुलातील काहीजणांनी संगनमताने एका साधिकेचे होणारे बाळ हे कल्की अवतारात प्रकट होणार असल्याचे पसरविण्याचा कट केला होता, असा आरोप करून आसारामने काही लोकांना गुरुकुलातून काढून टाकले होते. ‘सु’ चे वडील करमवीरसिंह देखील या कटात सहभागी असल्याने त्यांनी पुढे जाऊन आसारामवर आरोप केल्याचा बचाव पक्षाचा दावा होता; परंतु त्या संदर्भातील एकही पुरावा बचाव पक्ष सादर करू शकला नाही.

फिर्यादी ही आसाराम विरुद्ध षड्यंत्र रचणार्‍या मोठ्या नेटवर्कशी संबंधित असून तिने आरोपीविरुद्ध खोटी केस दाखल करण्याचा प्रयत्न जयपूर येथे देखील केला होता, असे बचाव पक्षाचे म्हणणे आहे व या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी एक पत्रकार आणि एक वकील देखील साक्षीदार म्हणून पेश केले. फिर्यादीने जयपूर येथे आरोपीविरुद्ध केस दाखल करण्याचा प्रयत्न केला व त्यात यश न आल्याने दिल्ली येथे तक्रार दाखल केली, असे या साक्षीदारांनी सांगितले; परंतु या दोन्ही साक्षीदारांच्या साक्षीबाबत ‘सु’ च्या आई-वडिलांच्या उलटतपासणी दरम्यान काहीही सुचविले गेले नव्हते. तसेच न्यायालयाने असा प्रश्न उपस्थित केला की, बचाव पक्षाच्या म्हणण्यानुसार फिर्यादी जर कट रचणार्‍या एका मोठ्या नेटवर्कशी संबंधित आहे, तर जयपूरमध्ये एका अनोळखी वकिलाकडे जायची वेळ तिच्यावर का येईल? तिच्या सूत्रांमार्फत ती हवा तेथे खटला दाखल करू शकेल.

लैंगिक छळाच्या प्रत्यक्ष कृत्याबद्दल जबानी व उलट तपासाला सामोरे जाण्याचा अनुभव हा पीडित व्यक्तीसाठी अत्यंत क्लेशकारक असतो. सदर प्रकरणात पीडितेने 94 पानी प्रदीर्घ जबानी दिलेली आहे. त्यातील तपशिलांतील त्रुटी दाखवून देण्याचा प्रयत्न बचाव पक्षाने युक्तिवादात केलेला आहे; परंतु तिच्या कथनात कोणतीही विसंगती किंवा विरोधाभास नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. या संदर्भातील बचाव पक्षाचे युक्तिवाद व त्याबाबतचे न्यायालयाचे म्हणणे हे पुढील काही परिच्छेदांमध्ये आलेले आहे. त्यातून बलात्कार, लैंगिक हल्ला यासंदर्भातील कायद्याच्या तरतुदीवर देखील प्रकाश पडतो. आरोपीच्या विधिज्ञांचा हा तर्क आहे की, ‘सु’चा आक्षेप जास्तीत जास्त गुप्तांगास स्पर्श करणे व चुंबन घेण्याच्या सीमेपर्यंत आहे. तिच्या तोंडात अथवा योनीमध्ये आरोपी आसारामने आपल्या लिंगाचा प्रवेश करविला किंवा तिच्या योनीमध्ये शरीराचा लिंगाव्यतिरिक्त कोणता भाग घातला, असा आरोप तिने केलेला नाही, म्हणून वरील कृत्य लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, 2012 च्या कलम 3 च्या परिभाषेत येत नाही. जास्तीत जास्त लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, 2012 च्या कलम 7 च्या परिभाषेत ते येते.

निकालपत्रात पुढे म्हटले आहे की, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, 2012 च्या कलम 3 मध्ये भेदक लैंगिक हल्ल्याची व्याख्या दिली आहे. भारतीय दंडसंहितेच्या कलम 375 मध्ये बलात्कार या शब्दाची व्याख्या दिलेली आहे. या व्याख्या लक्षात घेता न्यायालय हे आरोपीच्या विधिज्ञांच्या तर्काशी सहमत नाही. कलम 3 (C) स्पष्ट करते की, आरोपी मुलीच्या शरीराच्या कोणत्याही भागास अशा प्रकारे हाताळतो की, योनी, मूत्रमार्ग, गुदद्वार या शरीराच्या कोणत्याही भागात लिंग प्रवेशिले जाऊ शकते, तर तो प्रवेशित लैंगिक हल्ला मानला जाईल. याचप्रमाणे कलम 375 (ग) देखील स्पष्ट करते. तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, 2012 चे कलम 3(D) स्पष्ट करते की आरोपीने बालकाच्या लिंग, योनी, गुदद्वार, मूत्रमार्ग यावर आपले तोंड लावले असेल, तर तो भेदक लैंगिक हल्ला या वर्गात धरला. त्याच प्रकारे भारतीय दंड संहितेचे कलम 375 (D) स्पष्ट करते की आरोपी आपले

तोंड महिलेच्या योनी, गुदद्वार किंवा मूत्रमार्गावर रिश्रिू करीत असेल तर ते बलात्काराच्या वर्गात येते. लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, 2012 याचे कलम 7 हे या बाबतीत अधिक स्पष्ट करते. वरील कलमामध्ये लैंगिक अर्थाने कोण्या बालिकेच्या योनी, लिंग, गुदद्वार किंवा स्तन यास स्पर्श करणे किंवा संमतीशिवाय लैंगिक अर्थाने असे कार्य करणे जे विनाप्रवेशित शारीरिक संपर्काच्या वर्गात येते, त्यास शिक्षापात्र मानले गेले आहे.

सदर प्रकरणात, आरोपीने फिर्यादी ‘सु’ वर भेदक लैंगिक हल्ला आणि बलात्कार केला हे संशयातीतपणे सिद्ध होत आहे; तसेच बालिकेला सदोष पद्धतीने बंदी बनवणे, तिचा लैंगिक छळ करणे, तिला गुन्हेगारी स्वरुपाचा त्रास देणे आणि तिचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यासमोर आपले लिंग प्रदर्शित करणे, हे आरोपीचे गुन्हेदेखील संशयातीतपणे सिद्ध होत आहेत.

वरील विवेचनानुसार फिर्यादी पक्ष आरोपी आसाराम याच्या विरुद्ध कलम 342, 370(4), 120-बी, 506, 354-ए, कलम 376 – डी, कलम 376 (2) (एफ), कलम 509

भारतीय दंड संहिता /कलम 5 (जी)/6 व कलम 7/8 लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, 2012, तसेच कलम 23 बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2000 च्या अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा सिद्ध करण्यात यशस्वी ठरला आहे,

म्हणून आरोपी आसारामवरील गुन्ह्यांच्या आरोपात दोष सिद्ध होण्यायोग्य आहे.

याद्वारे आरोपी आसाराम यास वरील कलमांच्या अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी दोषी सिद्ध केले जात आहे; तर हे स्पष्ट आहे की, भारतीय दंड संहिते मध्ये लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, 2012 पेक्षा अधिक प्रमाणात शिक्षेची तरतूद आहे. म्हणून आरोपी आसाराम भारतीय दंड संहितेच्या कलम 342, 370 (4), 120-बी, 376-डी, कलम 376(2) (एफ), कलम 509 तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2000 च्या कलम 23 अन्वये शिक्षेस पात्र आहे.

आरोपी शरदचंद्र व शिल्पी उर्फ संचिता भारतीय दंड संहितेच्या कलम 370 (4), 120-बी, 376- डी; तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, 2012 कलम 5 (जी)/6, कलम 7/8 अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी सिद्ध झाल्याचे घोषित करण्यात येत आहे; परंतु ते भारतीय दंड संहितेच्या 370 (4), 120-बी, 376-डी अंतर्गत शिक्षेस पात्र आहेत. आरोपी प्रकाश व शिवा हे दोन आरोपी दोषमुक्त झाले.