आपल्या अभंगाच्या पदातून, आपल्या गीतातून, सामाजिक वास्तवतेवर प्रहार करणारे संत रैदास (संत रोहिदास) आपल्या अभंगाच्या पदाचा, गीताचा शेवट ‘कह रैदास चमारा’ अशा ओळीने करत. असा जातिवाचक उल्लेख काही जण सहजपणे घेतील, तर काहीजणांना तो आक्षेपार्ह वाटेल. पण या ओळीच्यामागे रैदासांची
जी भावना आहे, ती सामाजिक वास्तवाची त्यावेळेची आणि आजची स्थिती लक्षात घेऊनच समजून घेतली पाहिजे.
ज्या मध्ययुगीन काळात वर्णव्यवस्थेचे पाश करकचून आवळले गेले होते, अस्पृश्यता कठोरतेने पाळली जात होती, धार्मिक कट्टरता, कर्मकांडे म्हणजेच धर्म असे मानले जात होते, त्या काळात कबीर, रैदास असतील अगर नानक, चोखा, दादू, बशीरा, सेना, पिपा यासारखे दलित संतकवी मठ-मंदिरे-गढ यातून बाहेर येत जनतेमध्ये जात, वैदिक धर्माला करकचून वेटोळे घालून बसलेल्या वर्णवादावर आपल्या अभंगातून, कवितेतून, गीतातून बिनतोड प्रहार करत होते. त्यांच्या सृजनात ना राजा-महाराजांची स्तुती होती, ना असलेले वास्तव ‘तैसेचि’ राखण्याची मनीषा! ते ढोंगीपणा, अंधश्रद्धा, विषमता आणि कर्मकांडे यावर सातत्याने कडवे प्रहार करत होते.
धर्म कोणताही असो, जेथे-जेथे त्यांना आचारविचारातील विसंगती, विषमता दिसत होती तेथे-तेथे ते कोणत्याही आमिषाला बळी न पडता, कोणत्याही दहशतीला न घाबरता, गरिबीची पर्वा न करता, आपल्या कौटुंबिक समस्यांना दूर ठेवत त्यावर तुटून पडत होते, लोकांसमोर ठेवत होते.
रैदासांना आपल्या पदाच्या शेवटी आपल्या नावाबरोबर आपल्या जातीचा उल्लेख करण्यात कोणतीही कमजोरी वाटत नाही; तर उलट ते जोर देऊन म्हणतात कमजोरी त्यांना वाटेल, ज्यांनी ही जातिव्यवस्था निर्माण केलेली आहे. त्यांनी जातीचे नाव लावून जातीच्या अहंकाराला उत्तेजन दिलेले नाही; तर उलट जातींना निरर्थकच सिद्ध केलेले आहे. ते म्हणतात, ‘कोणाच्याही जन्म-जातीच्या गोष्टी नका करू, जाती-पातीचे महत्त्वच काय आहे? जे
लोक या जाती-पातीच्या जंजाळात अडकलेले आहेत, ते अंधाऱ्या गुहेत भरकटत आहेत.’ पुढे ते म्हणतात, ‘जातिवादाचा रोग मानवतेला गिळून टाकत आहे. कोणत्या जातिधर्मात, पंथात जन्म झाला, याला काहीच महत्त्व नाही, आपले कामच खरे, त्यावरच त्याची उच्च-नीचता अवलंबून आहे. ब्राम्हण जातीत जन्मलेल्या दुराचाऱ्यासमोर झुकण्याचे काहीही कारण नाही; पण चांडाळ जातीत जन्मलेल्या सद्गुणी माणसाला सन्मान दिलाच पाहिजे.’ आपल्या जातीला दुय्यम मानले जाते म्हणून आपण जे सांगत आहोत, तेही दुय्यम आहेत, हा जो भ्रम आहे तो दुय्यमत्वाचा भ्रम तोडण्यासाठी रैदास आपल्या जातीला ‘खलास’(मुक्त) असे संबोधत आहेत. रैदास म्हणतात, ज्याने वेद वाचला तो ब्राह्मण झाला आणि जो चपला बनवायला लागला तो चांभार झाला. पण मनुष्य तर एकच आहे. केवळ वेगवेगळ्या व्यवसायामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी नावे चार वर्णांना पडली.
पण आज इतक्या वर्षांनंतरही लोकांच्यात वर्णश्रेष्ठत्वाची जी भावना रुजलेली आहे, त्यातील बहुसंख्य लोक त्या भावनेतून बाहेर पडू शकलेले नाहीत. सामान्य लोकांची गोष्ट सोडा; पण साहित्यिक, कलाकार, नोकरशहा असे जे समाजातील बुद्धिवादी समजले जातात, त्यांच्यातही ही भावना खोलवर रुजलेली दिसून येते. बाहेर ते मोठी जातिअंताची भाषा करतील; पण आपल्या वर्तुळात गेल्यावर मात्र त्यांचा मूळ स्वभाव उफाळून येतो. हे घाव
कितीही खोलवर असले तरी अनेकजणांचा ते सर्व घाव झाकण्याचाच प्रयत्न असतो. पण मी त्या मताचा नाही, मी लोकांना ते घाव दाखवू इच्छितो. त्या घावामुळे निर्माण होणारे दु:ख सांगू इच्छितो, ते दु:ख संपवू इच्छितो. त्यामुळे त्यावर प्रहार करण्यासाठी संत रैदासांपेक्षा कोणते योग्य व्यक्तिमत्त्व असू शकते?
आज राजकीय क्षेत्र असो अगर साहित्याचे; दलितांची मुक्ती, त्यांची समानता व स्वतंत्रता याचा संघर्ष याची चर्चा सर्वत्र होत आहे. आता त्याकडे पहिल्यासारखे दुर्लक्ष करता येणे अशक्य आहे. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीही हा प्रश्न सुटलेला नसला, तरी आता तो केंद्रस्थानी आलेला आहे. आज देशातील एखाद्याच कोणत्या तरी भागात हा संघर्ष धुमसत नसून तर संपूर्ण देशभर त्याची धग जाणवत आहे.
दलित प्रश्नांना घेऊन असमानता, अस्पृश्यताविरोधी संघर्ष आज एक आंदोलनाचे रूप घेऊ पाहत आहे. अनेक कथा, कविता, लेख लिहिले जात आहेत, ज्यातून निश्चितपणे एक जमीन तयार होत आहे; पण तिला एका ठोस भूमिकेची गरज आहे. त्यामुळे राजकीय संधिसाधूपणामुळे पुन्हा समाजाला वर्णव्यवस्थेच्या दलदलीत फसवले जाणार नाही. पाठ्य पुस्तकात ज्या दलित कवींचा समावेश केला जातो, त्यात त्यांचा दृष्टिकोनच बदलला जातो. समावेश करणारा त्याच्या खास दृष्टिकोनातून त्याचा समावेश करतो. रैदासांसारख्या जनकवीबाबत तर अशी गोष्ट नेहमीच घडते. संत रैदासांनी वर्णव्यवस्थेच्या अमानवीयतेवर चढविलेला हल्ला पाठ्यपुस्तकात बाजूलाच ठेवला जातो व रैदासांना एखाद्या भक्ताच्या रुपात उभे केले जाते. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक बाजूच जास्त प्रभावीपणे सामोरी येते. दैनंदिन जीवनात पारंपरिक वर्णवादी मानसिकतेबद्दल काहीच प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. कर्मकांडे, अनुष्ठान किंवा वर्णवादाच्या अभेद्य गडावर प्रखर प्रहार करत लढणारा अशा रुपात संत रैदासांना कधीच दाखवले जात नाही; उलट नेहमीच एका चिंतकाच्या रुपात दाखवले जाते.
इतिहासाच्या गर्भात एकापेक्षा एक असे नायक आणि अशा घटना दडलेल्या आहेत. लोक आपल्या जरुरीप्रमाणे आणि विचारधारेप्रमाणे अशा घटनांचे खोदकाम करतात. अशा फायद्यातोट्याच्या गणितात रैदासांसारखे नायक बाजूलाच पडतात. पण आज असे नायक आणि घटना पुढे आणण्यासाठी सर्वांत उपयुक्त काळ आहे. कारण दलित प्रश्नांशी जोडलेली वर्णवादी व्यवस्थेविरुद्धची लढाई एक राष्ट्रीय प्रश्न बनून उभारून आलेली आहे.
त्या मुळेच रैदासांसारखे जे महामानव आपल्या साऱ्या जीवनात वर्णवादी व्यवस्था, धार्मिक कट्टरता आणि आर्थिक विषमता यांच्या विरोधात संघर्ष करत राहिले त्या संघर्षाची कहाणी लोकांसमोर आणणे, तिचे विश्लेषण करणे, हे कोणाही रचनाकाराचे लक्ष्य असायला हवे व त्यापासून प्रेरणा घेत आजच्या संघर्षाला सामोरे जाण्यास त्यांच्या पाठीराख्यांनीही तयार राहिले पाहिजे.
Categories
कह रैदास खलास चमारा