गॉड ब्लेस एव्हरी वन…! मी मुस्लिम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धार्मिकता कधी संपेल?
आणि हो, मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश्श आवाज का? जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणार्या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही. ही गुंडागर्दी आहे…! – सोनू निगम
सोनू निगमने ट्विटरवरून ही मते व्यक्त केली आणि एका जुन्याच वादाला पुन्हा एकदा नवी फोडणी मिळाली…!
त्याच्या या ट्विट्सवर सोशल मीडियात इतका हंगामा झाला की हा चर्चेचा प्रमुख विषय ठरला…!
अगदी बरोबर. सर्वच धर्मांच्या धार्मिक झुंडी बंद होणे अत्यावश्यक. कोणताही धर्म असो. धार्मिक अतिरेकामुळे देशाचा ‘सीरिया’ होऊ शकतो.
– निशांत रेडकर
जुने दिवस गेलेत अजान लावून उठवण्याचे आता प्रत्येकाकडे मोबाईल आलेत. त्यावर अलार्म लावता येतो, कालबाह्य रुढी बंद व्हयलाच हव्यात; मग त्या कुठल्याही धर्मातील असोत.
– मनीषा सुर्वे
सोनू निगम नवरात्र किंवा गणेशोत्सवाबद्दल का बोलला नाही, असा प्रश्न आणि तुम्ही फक्त हिंदूंच्या अंधश्रद्धांबद्दल बोलता असा आरोप करणे यात काही फरक नाही. या देशात बहुसंख्याकांची धर्मांधता राष्ट्रवादाचे स्वरुप घेऊ शकते तसेच अल्पसंख्याकांची धर्मांधता सामाजिक न्यायाची झूल पांघरू शकते…अस दिसतंय…!
– नीलेश देशमुख
हा विषय loudspeaker चा आहे फक्त. त्याच्याकडे पर्यावरणपूर्वक, आरोग्याच्या दृष्टीने पाहिले जावे.सोनूच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदरच आहे. त्याच्यावर react होण्यापेक्षा positively घेऊन भोंगे बंद केले, तर या देशात social democracy येईल.
– तन्वी पाटील
आमचा तो डीजे, तुमचा तो भोंगा
आमचं ते संस्कृतिभूषण, तुमचं ते ध्वनिप्रदूषण
– संदीप लोहार
सोनू निगम जी की बात से सहमत हूँ । हिन्दू केवल त्योहारों पर ही साउंड सिस्टम का प्रयोग करते हैं लेकिन मुस्लिमों के हर मस्जिद पर लाउड स्पीकर रोजाना सुबह सुबह तेज़ आवाज़ में बजते हैं जो नींद में खलल ड़ालते हैं । it should be stopped as soon.
– सोनू शर्मा
सोनू निगम तुझ्या गाण्यांमुळे माझे डोके दुखते…उद्यापासून तू गाणे बंद कर…मशिदीची अजान किंवा मंदिरातील कीर्तन हे तुझ्या गाण्यापेक्षा हजारोपटीने चांगले आहेत समाजाला चांगल्या गोष्टीकडे वळवतात…तू अकरा महिने अमेरिकेत राहतोच ना… तर आणखी एक महिना मुक्काम वाढवून घे…म्हणजे तुझी झोपमोड होणार नाही..
– शहानूर पाथरवट
सोनू निगमने विषय छेडला आहे, त्याच विषयावर बोलायला काय हरकत आहे? प्रत्येकवेळी मुस्लिमांचा विषय आला की, बॅलन्स करण्यासाठी हिंदूंना त्यात ओढलेच पाहिजे का? एरव्ही फक्त हिंदुत्ववाद्यांना झोडपता तेव्हा नाही मुस्लिमांना त्यात ओढत ?
– कुणाल जोशी
सोनू निगमचे ट्विट्स नीट वाचा…त्याने मंदिरे, गुरुद्वारा अन् मशिदी यांच्या लाऊडस्पीकरचा त्रास होतो त्याबद्दल लिहिलेय…! फक्त मशिदींबाबत नाही लिहिलेले..हिंदू, मुस्लिम असा भेद आवाजाच्या बाबतीत होऊच शकत नाही. सर्वांनाच त्याचा त्रास होतो. मुळातच हा प्रश्न आवाजाच्या पातळीचा आहे आणि त्यावर उपाय एकच आहे. सर्व भोंगे धार्मिक कारणासाठी बंद व्हावेत. त्यांचा वापर सभांसाठी फक्त व्हावा.
– प्रशांत भालेराव
कुणाची झोप मशिदीच्या भोंग्याने मोडते
कुणाची मंदिरातल्या काकड आरतीने
शेतकर्यांच्या आक्रोशाने कुणाचीच झोप मोडत नाही…?
– विनायक चौगुले
जुन्या तपसाधनांच्या प्रसारासाठी नव्या वैज्ञानिक साधनांची गरजच कशाला? आणि हो, डॉल्बी वाजवणारच म्हणणार्यांना सोनूचं समर्थन करता येईल का???
– तन्मय कोटगी
बरोबर…! हिंदूंचे सण येतात वर्षातून एकदा, तेव्हा यांना आवाज सोसत नाहीत…आणि हे रोज अजान करत असतात कर्कश्श भोंगा लावून…! बंदच करा ते..!
– वरद तांदळे
सोनूला अचानक भोंग्याचा त्रास होतो आणि त्याचे ट्विट्सही देशभर ब्रेकिंग न्यूज बनते. देशासमोरचा सर्वांत महत्त्वाचा असा प्रश्न म्हणून जगातला दोन नंबरचा अविश्वासू मीडिया पण या घटनेला महत्त्व देतो. हिंदुत्ववादी लोकांना सोनूचा हा पवित्रा एकदम भावतो. सोनूच्या नावाखाली मग ही लोक हा आपला अजेंडा रेटायचा प्रयत्न करतात. याची प्रतिक्रिया म्हणून मग कट्टर मुस्लिम लोक डबल पेटत्यात. सोनू कसा फालतू आहे आणि तो कसं चुकीचा बोलला आहे, हे सिद्ध करायला मग ही लोक नाना पद्धतीने प्रयत्न करतात. कट्टर मुस्लिम आणि कट्टर हिंदू लोकांना आता एकमेकांचा कंड जिरवायला चांगली संधी मिळते…!
– सलीम शेख
अजान भोंगा लावूनच करावी, असे कुराणमध्ये कुठेच लिहिले नाही, ही गोष्ट कुराण विरुद्ध आहे म्हणून भोंगा लावून अजान पढण्याच्या पद्धतीचा मी जाहीर निषेध करतो
– रोहित शिंदे
लाऊडस्पीकर सगळ्यांनाच हवे आहेत… मशिदीवरचे तर हवेच आहेत… मुस्लिमविरोधाची बांग द्यायला सोपे पडतात.
– कुशल शेवाळे
या काही मोजक्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया या वादाचे स्वरूप स्पष्ट करतात…! त्यातच एका मौलानाने सोनू निगमने हिंदुस्थान के शान के खिलाफ बात की है… असं म्हणत त्याचे टक्कल करावं, त्याला फाटक्या चपलांची माळ घालावी आणि भारतातील सर्व घराघरामध्ये जाऊन त्याच्याकडून माफी मागवावी आणि हे काम जो कुणी करेल त्याला माझ्याकडून 10 लाखाचे बक्षीस देण्यात येईल, असा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा फतवाच जारी केला…!
त्यानंतर सोनू निगमने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका पुन्हा मांडली…मंदिर असो, गुरुद्वारा असो वा मस्जिद असो…त्याठिकाणी लाऊडस्पीकरची गरज नाही…आणि धर्मस्थापनेवेळी लाऊडस्पीकरचा शोध लागलाच नसल्याने हा धर्माचा भाग राहत नाही…तेव्हा मंदिरात वा मस्जिदमध्ये मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणं ही गुंडागर्दी आहे असं म्हणून मौलानाचे आव्हान स्वीकारत नंतर तो टक्कल करून मीडियासमोर आला…!
एक महत्त्वाची आठवण अशी की, हा सर्व गदारोळ ज्या दिवशी चालू होता त्या 18 एप्रिलला बरोबर 51 वर्षांपूर्वी एका विवेकसूर्याने तोंडी आणि ट्रिपल तलाकविरोधात 7 महिलांचा संसदेवर मोर्चा काढला होता…तो विवेकसूर्य म्हणजे हमीद दलवाई…!
दुसरं असं, ज्या वेळी सोनू निगमवरील ही चर्चा तुफान चालू होती त्याचवेळी सादिया नावाच्या मुस्लिम महिलेला तिच्या नवर्याने व्हॉट्सअॅपवरून तलाक दिला म्हणून तिच्या न्यायासाठीचा एक विषय ज्वलंत होता…हा डिजिटल तलाक ग्राह्य मानायचा की नाही, यावरची ही चर्चा; पण दुर्लक्षित…!
खरं तर ट्रिपल तलाक, तोंडी तलाक, पोटगी प्रश्न हे मुस्लिम बाईचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त करणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत…! जे मौलाना 10 लाखाचे बक्षीस सोनू निगमला चपलाचे हार घालणार्याला जाहीर करतात ते मुस्लिम महिलांच्या वा मुस्लिम समाजाच्या महत्त्वाच्या प्रश्नावर काम करण्याबाबत अगदी सोयीस्कर गप्प राहतात…! मुस्लिम समाजाला अजून बरीचशी प्रबोधनाची वाट चोखाळायची आहे…यात कुणाचं दुमत नसावं…! त्यामुळे आता सामान्य मुस्लिमांनी विचार करते होण्याची नक्कीच गरज आहे…!
प्रसिद्ध संत कबीर म्हणतात,
मस्जिद भीतर मुल्ला पुकारे , क्या साहिब तेरा बहिरा है।
चींटी के पग जेवर बाजे, सो भी साहिब सुनता है।
मुंगीचा पायरव ज्याला ऐकू येतो तो परमेश्वर सर्वशक्तिमान असेल तर त्याला भजायला ही भेसूर उठाठेव कशाला ? 700 वर्षांपूर्वी असा सवाल उभा करणारीे ‘कबीरवाणी’ आजही विचार करायला लावणारी आहे…!
लेखक संपर्क : मो. 9011560460