नोव्हेंबर महिना जवळ आलाय. आपणा सर्व कार्यकर्त्यांना आणि आमच्या वाचकांना वैचारिक साहित्याची मेजवानी देणार्या विशेषांकाची तयारी आम्ही सुरू केलीय. आपल्या नेहमीच्या अंकात अंनिसच्या चळवळीचे रिपोर्टिंग हा प्रमुख विषय असतो, काही वैचारिक लेखही असतात. सामाजिक क्षेत्रात घडणार्या अविवेकी घटनांवर प्रतिक्रिया नोंदविणारे लेख पण आपण या अंकातून प्रसिद्ध करतो; पण विशेषांकाची यापेक्षा वेगळी अशी खासियत असते. त्यामुळे या अंकाविषयीची आतुरता आणि कुतूहल आपणा सर्वांना नेहमीच वाटत असते. या वर्षीच्या विशेषांकात काय असणार?
आपल्या महाराष्ट्र राज्यातच नव्हे, तर भारतातील विविध राज्यांत आणि जागतिक पातळीवर विवेकवादाच्या चळवळीचे वास्तव काय आहे, याचा परिचय हे येणार्या विशेषांकाचे वैशिष्ट्य ठरेल. नुकतीच महाराष्ट्र अंनिसच्या पुढाकाराने भारतातील धार्मिक दहशतवाद आणि वाढती असहिष्णुता या विषयावर पुणे येथे परिषद झाली. या परिषदेत विविध नामवंत विचारवंतांनी आपले विश्लेषण मांडले. या मान्यवरांच्या भाषणांची सविस्तर मांडणी करणारा परिसंवाद आपण विशेषांकात प्रसिद्ध करणार आहोत. दहशतवाद ही जागतिक समस्या असली, तरी सध्या भारतात धार्मिक दहशतवादाने जे उग्र रूप धारण केले आहे, त्याची भीषणता सर्व भारतीयांच्या मुळावर उठणारी आहे. यावरचे उपाय शोधून त्याला नामोहरम करण्यासाठी अहिंसात्मक उठाव करावा लागेल. इतर समविचारी संघटनांना आवाहन करून हा उठाव तीव्र करण्यासाठी – साने गुरुजींच्या भाषेत बोलायचे तर – ‘आता उठवू सारे रान’ अशी गर्जना करावी लागेल.
अंनिसप्रमाणेच विवेकी समाजाच्या निर्मितीसाठी भारतात अनेक सामाजिक संघटना कार्यरत आहेत. केरळमधील शास्त्र-साहित्य परिषद, पंजाबमधील तर्कशील समाज, तामीळनाडूमधील पेरियर यांची संघटना आपापल्या परीने त्या-त्या राज्यात विवेकाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापैकीच आपणास जिची फारशी माहिती नाही; पण जी उत्तर प्रदेशसारख्या धार्मिक कट्टरता वाढीस लागलेल्या राज्यात विवेकाचा आवाज बुलंद करीत आहे, त्या ‘अर्जक संघा’चा परिचय हे येणार्या विशेषांकाचे खास आकर्षण ठरेल. ‘अंनिवा’चे व्यवस्थापक राहुल थोरात आणि संपादक मंडळातील अनिल चव्हाण ‘अर्जक संघा’चा परिचय आपणास करून देतील. ते काशी या धर्मस्थळाला भेट देऊन तेथील अंधविश्वासाच्या विविध प्रकारांचा परिचय आपणास करून देतील.
विवेकवादासाठी आयुष्य समर्पण करणारा जागतिक पातळीवरील प्रख्यात जादूगार जेम्स रँडी यांच्या ‘जेम्स रँडी एज्युकेशनल फाऊंडेशन’चा परिचय हे या विशेषांकाचे आणखी खास आकर्षण ठरणार आहे. छद्मविज्ञानाच्या विरोधात जेम्स रँडी जगात सर्व देशांत फिरले आणि शोषण करणार्या विविध प्रकारांविरोधात त्यांनी यशस्वी संघर्ष केला. भविष्यात फसव्या विज्ञानाविरोधात आपणासही तीव्र संघर्ष करावा लागेल. याविषयीचे प्रबोधन खूपच उपयोगी ठरेल.
वैचारिक मेजवानी देणार्या या अंकासाठी आपण सर्वांनी आतापासूनच जोरदार तयारी करायला हवी. आपण प्रतिवर्षी ज्या जाहिरातींच्या आधारे ‘अंनिवा’ची आर्थिक गरज भागवित होतो, त्यास जी.एस.टी.च्या जाचक अटीमुळे अडचण आली; परिणामी गेल्या वर्षी आपण देणगीरुपाने जी.एस.टी.चा अडथळा दूर केला. गतवर्षीप्रमाणेच वार्षिक अंकासाठी देणग्या मिळवूनच पुढची वाटचाल आपणास करावी लागेल. जाहिरातींना देणग्यांचा पर्याय उपलब्ध झाल्याने, विशेषांक सुटसुटीत बनण्यास व वैचारिक लेखांना अधिक स्पेस मिळण्यास मदत होणार आहे. सर्व साथींना महाराष्ट्र अंनिसतर्फे चळवळीचे आवाहन की, आपण आता देणगी रुपाने ‘अंनिवा’ची वाटचाल पुढे गतिमान करूया. चळवळीचे सामर्थ्य वाढविण्यासाठी कृतिशील राहणे ही काळाची गरज आहे. आपण आपले कर्तव्य निभावून विवेकाचा आवाज असाच बुलंद करूया!