सावली तालुक्यातील डोनाडा या गावात श्री पत्रूजी मानगुडदे या कुटुंबाबरोबर त्याच गावातील एका अन्य कुटुंबाकडून जादूटोण्याच्या संशयावरून नेहमी वाद होत असे. दुसर्या कुटुंबातील; परंतु त्यांच्याच नात्यात असलेल्या एका (काल्पनिक नाव छगन) मुलाचे आधी लग्न झाले होते. त्याच्या पहिल्या पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरा घरोबा केला. पहिली पत्नी सुटण्याला कारणीभूत पत्रूजी मानगुडदे परिवार आहे, असे त्यांना टेकेपार येथील एका मांत्रिकाने सांगितले. त्यामुळे या कुटुंबाविषयी त्यांच्या मनात राग होता. काही दिवसांनी त्या मुलाचा दुसर्या अन्य मुलीसोबत विवाह झाला. लग्न होऊन वर्ष संपत आले; पण तिला गर्भधारणा होत नव्हती. मात्र हिच्याशी लग्न होताच पत्रूजी मानगुडदे यांच्या सुनेला दिवस राहिलेत. एकीकडे हिला दिवस जाणे व दुसरीला दिवस राहण्याऐवजी सतत आजारी पडत राहणे हे तिला व तिच्या कुटुंबातील सदस्यांना कुठे तरी खटकत होते. एवढेच नाही, तर ती सतत आजारी पडायची. यामुळे ती बेचैन असायची. पहिल्यांदा तिला सावली येथील डॉक्टरकडे तपासणी करण्याकरिता नेण्यात आले व रक्ताची कमतरता, सदोष मासिक पाळी, पोटात दुखणे आधी व्याधींवर औषधोपचार सुरू होते; पण ती नियमित औषधी सेवन करत नव्हती. यावरून ती व तिची सासू यांच्यात वाद देखील होत होते. कुटुंबातील सदस्यांचा विश्वास डॉक्टरपेक्षा मांत्रिक व अंगात दैवी शक्तीचा संचार असणार्या व्यक्तीवर असल्याने या कुटुंबातील सदस्यांनी आजारी सुनेला परत टेकेपार येथील मांत्रिक-कम-दैवी शक्तीचा संचार असलेल्या गेडाम नामक व्यक्तीकडे नेले. त्यांनी मानगुडदे परिवारच याला कारणीभूत असल्याचे सांगितल्याने त्यांनी कशाचीही शहानिशा न करता मानगुडदे यांच्या कुटुंबाला दोषी ठरवून त्यांच्याशी वाद घालून, ‘तुम्ही जादूखोर आहात, माझी पहिली सून सुटण्याला कारणीभूत तुम्हीच आहात व आताही माझ्या दुसर्या सुनेला मूल होऊ नये, ती सतत आजारी पडून तिनेही घटस्फोट घेऊन कुटुंबाला सोडून जावे म्हणून आमच्यावर जादूटोणा तथा करणी केली आहे’ हा आरोप लावला. त्यामुळे या दोन कुटुंबांमध्ये सतत भांडणे व्हायची. भांडणाचे रुपांतर मारामारीत होण्याआधीच पत्रूजी मानगुडदे यांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे, कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, प्रधान सचिव पुरुषोत्तम ठाकरे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव कोठारे व बुवाबाजी संघर्ष प्रमुख गजानन राऊत यांनी डोनाडा येथील सरपंच सुखदेव बोदलकर, उपसरपंच श्रीमती प्रतिमा शेंडे , सामाजिक कार्यकर्तेमनोहर कुकडे, माजी सरपंच लोमाजी चलाख, पोलिस पाटील नामदेव शेंडे, नामदेव बांबोळे, आनंदराव वासेकर ग्रामपंचायत सदस्य, पत्रू बोदलकर, सावली पोलीस स्टेशनचे डोनाडा बीटचे सहाय्यक फौजदार झलके साहेब, गावातील नागरिक, दोन्ही कुटुंब उपस्थित होते. दोन्ही कुटुंबांना त्यांचे मत मांडण्यासाठी संधी देण्यात आली. दोन्ही कुटुंबातील सदस्य अशिक्षित असून मानगुडदे परिवार श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्तेअसल्याने त्यांचा असल्या भाकडकथांवर मुळीच विश्वास नव्हता; परंतु दुसर्या कुटुंबामुळे आपली नाहक बदनामी होत आहे, असे मनोमन वाटत होते, तर दुसर्या कुटुंबाचा विश्वास मांत्रिकावर असल्याने त्याचाच आधार घेऊन मानगुडदे परिवारासोबत भांडण व्हायचे. याचाच अर्थ भांडणाला कारणीभूत टेकेपार येथील मांत्रिक असल्याचे लक्षात आले; शिवाय पीडित महिला आजाराने ग्रस्त असून तिला पोषक आहार व तज्ज्ञ महिला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचाराची आवश्यकता असल्याचेही जाणवले. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण उपस्थितांसमोर जर का एखादा मांत्रिक किंवा पुजारी मंत्रशक्तीच्या द्वारे कोणत्याही अंनिसच्या कार्यकर्त्यांवर प्रभाव पाडून दाखवत असेल, तर त्या मांत्रिक अथवा पुजार्यावर कुठलीही कारवाई न करता त्याला महा. अंनिसकडून 21 लाख रुपये देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. त्याने हे आव्हान स्वीकारावे, असे अंनिसतर्फे आवाहन करण्यात आले. जादूटोणाविरोधी कायदा 2013 अंतर्गत दुसर्या कुटुंबातील सदस्यांना सात वर्षांची शिक्षा व रु. 2500 आर्थिक दंड, दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा, अशा कायद्यातील तरतुदीची जाणीव करून देताच दुसर्या कुटुंबातील सदस्यांची घाबरगुंडी उडालेली दिसली. मानगुडदे परिवारानेही आपण गावात शांतता टिकून राहण्यासाठी उपस्थित पंच जे निर्णय देतील, ते मला मान्य राहील व पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवणार नाही, असे आश्वासित केले. त्यानंतर दुसर्या कुटुंबातील सदस्यांनी आपली चूक कबूल करून सर्वांसमोर माफी मागितली व माफीनामा लिहून दिला. एकमेकांना आलिंगन देऊन व हातात हात घेऊन दोन्ही कुटुंबांमध्ये सौहार्दाचे वातावरण तयार करण्यात आले. अशा प्रकारे दोन्ही कुटुंबांतील मनभेद व मतभेद दूर करण्यात अंनिसच्या प्रयत्नाला यश आले. गावकर्यांनी व दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी अंनिस कार्यकर्त्यांचे आभार मानले.
Categories