महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘जोडीदाराची विवेकी निवड’ व युवा विभागातर्फे या वर्षीपासून 12 जानेवारी (राष्ट्रीय युवा दिन) ते 14 फेब्रुवारी (आंतरराष्ट्रीय प्रेम दिवस) दरम्यान ‘जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प अभियान’ राबविले जात आहे. या राज्यव्यापी युवा संकल्प अभियानाची उद्घाटन परिषद लातूर येथील मुक्ताई मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाली. 200 युवकांनी व पालकांनी या संकल्प अभियानात सहभाग घेतला आणि ‘जोडीदाराच्या विवेकी निवडी’चा संकल्प केला.
या परिषदेचे उद्घाटन तरुणाईचे प्रतीक असणार्या गुलाबी रंगातील फुगे, हृदयाच्या आकाराचे सिम्बॉल यांचा वापर करत व अभियानातील संकल्पनांशी सांगड घालत अभिनव पद्धतीने करण्यात आले. नको असणार्या गोष्टी व कर्मठ रुढींचे स्टीकर चिकटवलेले फुगे फोडून त्याखालील आधुनिक पत्रिकेचे मुद्दे (बदामाच्या आकारांवर लिहिलेले) मोकळे करत गुलाबी वातावरणात संकल्प अभियानाची सुरुवात झाली. माननीय आमदार विक्रम काळे, श्रीराम जाधव व शोभा शिरढोणकर, अविनाश पाटील (राज्य कार्याध्यक्ष महा.अंनिस), माधव बावगे (राज्य प्रधान सचिव), निशाताई भोसले (राज्य सहकार्यवाह जोडीदाराची विवेकी निवड विभाग); तसेच चळवळीतील काही तरुण जोडपी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेमागची भूमिका आरतीने सर्वांना सांगितली; पण त्या आधी महाराष्ट्रभर व आजूबाजूला घडत असणार्या ‘ऑनर किलिंग’च्या घटनांचा उल्लेख करत या गोष्टी आपल्या समाजाची प्रतिष्ठा वाढवणार्या नसून धुळीस मिळवणार्या असल्याने यांना आपण ‘डिसऑनर किलिंग’ म्हणायला हवे, असे प्रतिपादन करून या सर्व घटनांमागच्या जातीय/धार्मिक हिंसक प्रवृत्तींचा निषेध व्यक्त केला. याच वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘जोडीदाराची विवेकी निवड’ उपक्रमाची ओळख देणार्या नवीन लोगोचे अनावरणही करण्यात आले व उपक्रमाच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन झाले.
या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक निशाताई भोसले यांनी केले. त्यांनी या संकल्प अभियानाची भूमिका मांडली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार विक्रम काळे यांनी तरुणांना हा विषय अधिक गरजेचा असून भविष्याची ही गरज असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात ‘ऑनर किलिंग’च्या नावाखाली होणार्या घटनांचा निषेध व्यक्त केला. जुने विचार सोडून पालकांनी देखील मुलांचे जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य मान्य करायला हवे. हुंड्यासाठी पूर्णपणे नकार देत मुलांच्या शिक्षणासाठी तो पैसा खर्च करावा, असे त्यांच्या मांडणीत सांगितले. सत्राचे अध्यक्ष व महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी या उपक्रमाची आतापर्यंतची वाटचाल सांगत त्यांच्या अनुभवांतून ‘जोडीदाराच्या विवेकी निवडी’चे महत्त्व वेगवेगळ्या अंगाने पोचवण्याचा प्रयत्न केला. तसेच लग्न या व्यवस्थेमध्ये बस्तान मांडून बसलेल्या फलज्योतिष आणि त्यातील थोतांडावरसुद्धा त्यांनी कडक शब्दांत भाष्य केले. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने महाराष्ट्र अंनिसच्या या संकल्प परिषदेत विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी काढलेले परिपत्रक रद्द केल्याचा निषेध करत यामागचे कारण शोधून काढायला हवे व आम्ही विद्यापीठाशी या विषयावर बोलायला तयार आहोत. त्यांनी हे परिपत्रक का रद्द केले, यावर आमच्याशी चर्चा करावी व आम्ही त्यांनाही परिषद तरुणांसाठी कशी व किती महत्त्वाची होती हे लक्षात आणून देऊ असे आवाहनही केले. तसेच सहजीवनातील सहजशीलता आपल्यात कशी आणता येईल, हे उपक्रमातील मोठे आवाहन असल्याचे स्पष्ट केले.
या सत्राचे सूत्रसंचालन युवा कार्यकर्ती मानसी पवार यांनी केले. युवा कार्यकर्ता राजवैभव शोभा याने या उद्घाटन सत्राचे आणि उपस्थितांचे आभार मानले.
सत्र दुसरे– परिसंवाद
‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा उपक्रम नक्की काय आहे, हे सांगणारा हा परिसंवाद होता. कार्यक्रमाचा मुख्य गाभा असणार्या या परिसंवादाचे सूत्रसंचालन युवा कार्यकर्ती मानसी पवार यांनी केले. परिसंवादात ‘जोडीदाराची विवेकी निवड’ टीमचे महेंद्र नाईक, सचिन थिटे, निशा फडतरे यांनी सहभाग घेतला. या सत्राचे अध्यक्ष राज्य प्रधान सचिव माधव बावगे हे होते. महेंद्र याने आजच्या निवड पद्धतीस दिले जाणारे प्राधान्य व प्रत्यक्ष असणार्या अपेक्षा यातील विसंगती मांडली. हे टाळण्यासाठी जोडीदाराची विवेकी पद्धतीने निवड का करायची? त्याची गरज काय? हे स्पष्ट केले. सचिनने आजच्या प्रचलित ‘अरेंज मॅरेज’ व ‘लव्ह मॅरेज’ यांना योग्य असा ‘परिचयोत्तर निवडी’चा पर्याय हवा हे स्पष्ट केले. जोडीदाराची विवेकी निवड कशी करायची, हे सांगतानाच पारंपरिक कुंडली नाकारून आधुनिक पत्रिका स्वीकारण्याचे आवाहन केले. निशाने सहजीवनाचा पाया असणार्या लिंगसमभावाबद्दल मांडणी केली. या लिंगभाव विषमतेचा सर्वाधिक परिणाम स्त्रीच्या वाट्याला येतो; तसेच लग्नामुळे जोडीदाराबरोबरच वेगवेगळी नाती दोघांनाही जोडली जातात, या नात्यातील सुरेल संवादासाठी प्रत्येक नात्याला प्रशिक्षणाची गरज कशी आहे, हे निशाने तिच्या सत्रातून सांगितले. या सत्राचे अध्यक्ष राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी या निवड पद्धतीची गरज स्पष्ट केली. पालकांबरोबर कसा संवाद साधला जातो, हे उदाहरणांसह मांडले. युवा कार्यकर्ता किरण ईशी याने सत्राच्या शेवटी सर्वांचे आभार व्यक्त केले.
सत्र तिसरे– मुलाखत
या उद्घाटन परिषदेतील प्रत्येक सत्र हे वेगळेपण जपणारे होते. तिसरे मुलाखतीचे सत्रसुद्धा कार्यक्रमाची शोभा वाढवणारे ठरले.

‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमात सहभागी असणारे साथी, ज्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून जोडीदार मिळाला अशा दीक्षा-आनंद, तुषार-नंदना, कुणाल यांची मुलाखत घेण्यात आली. स्वाती कृष्णात हिने या मुलाखत सत्राचे आपल्या खुमासदार शैलीत निवेदन करत हे सत्र अत्यंत बोलके केले.
मराठीचा फारसा गंध नसणार्या मूळचा कर्नाटकचा असणार्या आनंदने व्हॉट्सअॅप ट्रेनिंगच्या वेळी घेतलेला कुटुंबीयांचा सहभाग, दीक्षा-आनंदच्या कुटुंबीयांनी एकमेकांच्यात मैत्री होण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न ऐकताना या उपक्रमाची ‘कुटुंबीयांच्या सहभागाची भूमिका’ किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट होत होतं. या उपक्रमाचे स्वतःला महत्त्व जाणवल्याने तो इतरांपर्यंतही पोचावा म्हणून दीक्षा आज या उपक्रमाचा भाग बनली आहे, असे तिने सांगितलं.
तुषार- नंदनाने एकमेकांना समजून घेण्यासाठी ग्रुपवर ‘अॅॅड’ होण्याचा घेतलेला निर्णय, त्याचा त्यांच्या सहजीवनाला झालेला फायदा मांडला. तसेच तुषारच्या लग्नात कुटुंबीयांबरोबर झालेला संवाद हा कुटुंबात मोठे परिवर्तन घडवणारा होता. कुटुंबीयांनी त्याच्या छोट्या भावाच्या लग्नाच्या वेगळ्या निर्णयाचा सुद्धा सहज केलेला स्वीकार हे प्रेरणादायी आणि उपक्रमाची गरज स्पष्ट करणारा होता. कुणालने नेमक्या शब्दांत त्याच्यात या उपक्रमामुळे झालेले बदल मांडले. तसेच कुटुंबीयांबरोबर कसं संवादी राहायचं, हे स्वतःच्या उदाहरणातून मांडलं. निर्णयाआधी कुणाल-तेजल यांच्यात झालेले वाद-विवाद आज सहजीवन सुंदर घडवत आहेत, म्हणून निर्णयाआधी पुरेसा वेळ घेणं किती आवश्यक आहे, हे त्याने स्पष्ट केलं.
मुलाखतकार स्वाती कृष्णात हिने या जोड्यांबरोबर साधलेला संवाद, त्यांच्या उत्तरांचा उपक्रमाच्या दृष्टीने मांडलेला अन्वयार्थ हे या मुलाखत सत्राचं वैशिष्ट्य होतं.
या सत्राचे सूत्रसंचालन पनवेल शाखेची कार्यकर्ती प्रियंका खेडेकर हिने केले.
सत्र 4थे– ‘दिल–दोस्ती–दुनियादारी’
विनायक सावळे, राज्य सरचिटणीस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी ‘दिल-दोस्ती-दुनियादारी’ या सत्राची मांडणी केली. आपले मन हे प्रसंगानुरूप कसे काम करते, हे छान अशा डेमोतून स्पष्ट केले. प्रेमातून होणारा गोंधळ, मैत्रीचा टप्पा, त्यातील मेंदूच्या रचनेतील वाटा खुमासदार शैलीत त्यांनी मांडला. दुनियादारी ही युवा पिढीची लाईफ स्टाईल झालीय; परंतु ती करताना आवश्यक असणारे भान विनायकने मांडलं. युवा कार्यकर्ता रमेश माने यांनी सत्राचे आभार मानले.
सत्र 5वे – ‘संकल्प अभियान’
‘जोडीदाराची विवेकी निवड’ युवा संकल्प अभियान या सत्राची मांडणी आरती नाईक, राज्य कार्यवाह, जोडीदाराची विवेकी निवड विभाग आणि कृष्णात स्वाती, राज्य कार्यवाह युवा सहभाग विभाग यांनी केली. ‘जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियाना’मागची भूमिका कृष्णातने स्पष्ट केली. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक तरी मोठा कार्यक्रम होणार आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये दोन किंवा तीन तासांच्या युवा संकल्प परिषदा होतील; तसेच शक्य असेल तिथे संपूर्ण दिवसाची संवादशाळा घेतली जाणार आहे. युवा व पालक यांच्याकडून संकल्प पत्रंही भरून घेतली जाणार आहेत. मुले- मुलींच्या संकल्प पत्राचे वाचन आरती नाईक हिने केले. त्यातील प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरणही दिले. तसेच पालकांसाठीच्या संकल्पपत्राचे वाचन व स्पष्टीकरण कृष्णात स्वाती याने केले. त्यानंतर उपस्थित युवा व पालक यांच्याकडून संकल्पपत्रं भरूनही घेतली गेली. भरलेल्या संकल्पांचे वाचन पालक प्रतिनिधी म्हणून पांडुरंग देढे यांनी केले. मुलींची प्रतिनिधी म्हणून अनिता घोरड हिने व मुलांचा प्रतिनिधी म्हणून तुषार कलबुर्गी याने वाचन केले. परिषदेला उपस्थित असणार्या तरुणांपैकी एका तरुणाने स्वेच्छेने अनुभवकथन केले आणि त्यात त्याने विद्यापीठाने परिपत्रक मागे घेतल्याबद्दल समस्त विद्यार्थ्यांच्या वतीने निषेध पण व्यक्त केला.
सत्र 6वे–
समारोप सत्राचे प्रास्ताविक राज्य कार्यवाह आरती नाईक हिने केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक, साहित्यिक आणि माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी ‘जोडीदाराची विवेकी निवड’ आणि ‘आंतरजातीय विवाह’ ही काळाची गरज असल्याचे त्यांच्या मांडणीतून स्पष्ट केले. तरुणांनी जात-धर्म विसरून जोडीदाराची निवड करावी. जात संपवण्याचा हा एक मार्ग आहे. आंतरजातीय विवाह करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येेष्ठ विधिज्ञ अॅड. मोहनराव गोमारे सर यांनी अध्यक्षीय भाषणात तरुणांना अशा उपक्रमास जोडून घेण्यास सांगितले. अविनाश पाटील (राज्य कार्याध्यक्ष), माधव बावगे (राज्य प्रधान सचिव), विनायक सावळे (राज्य सरचिटणीस), कृष्णात (राज्य कार्यवाह), आरती (राज्य कार्यवाह) आदी मंडळी या समारोप सत्रासाठी उपस्थित होती.
शेवटी 12 व 13 तारखेच्या कार्यक्रमांच्या संयोजनात सहभागी असणार्या लातूरच्या सर्व कार्यकर्त्यांना स्टेजसमोर बोलावून त्यांचे जाहीर धन्यवाद व अभिनंदन केले गेले आणि त्यानंतर ‘हम होंगे कामयाब’ या गीताने उद्घाटन परिषदेची सांगता झाली.
एकूणच, या उद्घाटन परिषदेला राज्यभरातील तरुण कार्यकर्त्यांचा असणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, नियोजनाच्या प्रत्येक लहान-सहान गोष्टींमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा स्वेच्छेने सहभाग, स्टेजवरील गुलाबी रंगाचा झळकणारा बॅनर, उद्घाटनाची गुलाबी थीम व गुलाबी फुगे, प्रत्येक सत्राची वेगवेगळी स्टेजरचना, बाहेर असणारा तरुणांना आकर्षित करणारा ‘सेल्फी कॉर्नर’ व जोडीदाराची विवेकी निवड उपक्रमाची भूमिका सांगणारे वेगवेगळे आकर्षक पोस्टर्स हे सगळेच सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. सर्वांत शेवटी ‘जोडीदाराची विवेकी निवड’च्या व्हॉट्सअॅप ट्रेनिंग उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या उपक्रमातून प्रशिक्षण घेऊन गेलेल्या, या उपक्रमाशी संबंधित असणार्या व यात सक्रिय असणार्या सर्व तरुणांनी राज्य कार्याध्यक्ष मा. अविनाश पाटील, राज्य प्रधान सचिव माधव बावगे सर व राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांच्या उपस्थितीत केक कापून आनंद साजरा केला.
– लेखन सहाय्य : निशा फडतरे, सचिन थिटे
सेल्फी कॉर्नर
कार्यक्रमाचा आणखी एक आकर्षणबिंदू ठरलेला ‘सेल्फी कॉर्नर’ महत्त्वाचा भाग ठरला. वेगवेगळ्या आकारात तयार केलेली पोस्टर्स तरुणांसह ज्येष्ठांनाही आकर्षित करीत होती- ‘जोडीदाराची विवेकी निवडीचा संकल्प मी केला आणि तुम्ही?’
‘आकर्षण आणि प्रेम आहे वेगळे, समजून घेऊ आम्ही सगळे.’ ‘नात्यातील सुरेल संवादासाठी, जोडीदाराची विवेकी निवड’ ‘समतेच्या वाटेवरून सहजीवनाचा प्रवास’, ‘say No to Violence’ असे म्हणत तरुणांनी ‘सेल्फी’ची नवी style अनुभवली.
बदलती स्टेजरचना
प्रत्येक सत्राचे अगदी बारीक नियोजन होते. प्रत्येक वेळी त्या-त्या सत्राच्या गरजेनुसार स्टेजची रचना केली जात होती. सत्रानुरूप नव्या रुपात पुढे येणारे स्टेज त्या सत्राची शोभा वाढवत होते. या गुलाबी वातावरणाला तरुणाईची झालर आणि प्रचंड उत्साह होता.
पोस्टर्स
सभागृहात प्रवेश करण्याच्या वाटेवर ‘जोडीदाराची विवेकी निवडीचे’ आधुनिक निकष मांडणारी पोस्टर्स लावण्यात आली होती. आकर्षक व अर्थपूर्ण चित्रांमुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. अभियानाचा अर्थ नेमकेपणाने पोस्टर्समधून पोचत होता.