Categories
चळवळ

जो प्रशिक्षण घेईल, तोच पदाधिकारी होईल

जून - २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यभरात असलेल्या सर्व शाखांमधील प्रत्येक कार्यकर्ता जून 2019 पर्यंत संघटना बांधणीच्या किमान एका प्रशिक्षणातून पुढे गेलेला असेल आणि असा प्रशिक्षित कार्यकर्ताच यापुढे शाखा, जिल्हा किंवा राज्य पदाधिकारी होऊ शिकेल, असे उद्दिष्ट आपण फेब्रुवारी 2018 मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या राज्य कार्यकरिणीमध्ये निश्चित केले. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या आवाहनानुसार प्रशिक्षण विभागाने पाहिलेल्या VISON 2025 चा हा पहिला टप्पा आहे.आणि याची आता धडाक्यात सुरुवात झाली आहे.

दि. 4 मे पासून आतापर्यंत कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, बीड, लातूर, जालना अशा सहा जिल्ह्यांची प्रशिक्षण शिबिरे झाली सुद्धा! जळगाव, धुळे, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांच्या शिबिरांच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तेथीलही प्रशिक्षण शिबिरे पूर्ण होतील. इतर जिल्ह्यांच्या कार्याध्यक्ष, प्रधान सचिवांनी आपल्या जिल्ह्यांच्या तारखा लवकर ठरवाव्यात.

ही शिबिरे ‘संघटना बांधणी’विषयीची आहेत. दोन दिवसांच्या या प्रशिक्षण शिबिरांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा विशिष्ट असा कोणता एखादा विषय घेतलेला नाही. विषय पत्रिका पाहिल्यास हे आपल्याला सहज जाणवेल. नाव नोंदणी, उद्घाटन सत्रानंतर परिचय सहकार्‍याचा हे सत्र असते. यामध्ये स्वतःचा परिचय स्वतः करून देण्याऐवजी आपल्या सहकार्‍याचा परिचय करून दिला जातो. ‘अंनिस म्हणजे काय रे भावा ?’ या सत्रामध्ये चार गटात चर्चा घडवली जाते आणि त्यांचे सादरीकरण होते. यामध्ये संघटनेचा व्यापक विचार काय आहे, संघटनेने आतापर्यंत प्रबोधनाच्या आणि कृतीच्या पातळीवर घेतलेले अनेक कार्यक्रम व त्यामागील भूमिका काय आहे, संघटनेची अंतर्गत रचना कशी आहे आणि गेल्या 28 वर्षांत अंनिसने काय साध्य केले आहे, या सर्व गोष्टींचा व्यापक पट समोर येतो. लोक अनेक प्रश्न विचारतात, उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात, प्रशिक्षक त्या चर्चेला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करतात. यातून अंनिसच्या विवेकाधिष्ठित आणि भारतीय संविधानाला अनुसरून घेतलेल्या भूमिकेची, कृतिशीलतेची आणि परिणामकारकतेची जाणीव होऊन कार्यकर्ता अंतःप्रेरित होतो. हत्ती आणि सात आंधळे अशी चळवळीविषयी असणारी अपुरी समज बदलते आणि धूसर का असेना; पण पूर्ण हत्ती दिसल्याचा आनंद कार्यकर्त्यांचा चेहर्‍यावर दिसून येतो. हे आम्ही प्रशिक्षक म्हणून काम करणार्‍यांनाही प्रेरणादायी आहे.

‘डॉक्टर काय म्हणाले होते..’ या सत्रामध्ये प्रोजेक्टरवर डॉक्टरांची मुलाखत दाखवली जाते. अंनिसच्या वैचारिक भूमिकांविषयी डॉक्टरांची उत्तरे खूप प्रभावी परिणामकारक ठरतात.

यानंतर ‘चार महत्त्वाच्या गोष्टी पाच मिनिटात’ या सत्रात अंनिसची समर्पक व प्रभावी ओळख कशी करून द्यावी, याचे डेमो सादर होतात. संघटनेच्या वाढीसाठी संवादक्षमता वाढवणारी ही प्रात्यक्षिके खूपच महत्त्वाची आहेत.

‘मी कोण आहे, मी काय करतो..’ या सत्रामध्ये कार्यकर्त्यांची संघटकापर्यंतची जडणघडण हा समृद्ध करणारा प्रवास उलगडतो. ‘आमची शाखा, आमची मीटिंग’ या सत्रामध्ये शाखा कशी चालवावी, यांचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन होते, यातही खूप शंका, प्रश्न उपस्थित होतात. शाखेची मीटिंग कशी घेतली पाहिजे, याचे डेमो सादर केले जातात. ‘हे पण मला आलं पाहिजे’ या सत्रामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करताना कुटुंबात, संघटनेत आणि समाजात कसे उत्तम नाते जपावे, याचे कौशल्य, पत्रकारांना, पोलीस इन्स्पेक्टरांना, शाळा कॉलेजच्या प्राचार्यांना, जाहिरातदार किंवा देणगीदारांना, ‘अंनिवा’च्या वाचक सभासदांना सामोरे जातानाची प्रात्यक्षिके गटांकडून सादर होतात, या वेळी खूपच धमाल, मजा येते, शिकायला मिळते. कार्यकर्ता आणि शाखा यांची पुढील ध्येयनिश्चिती असे सर्व विषय या शिबिरात हाताळले आहेत.

वैशिष्ट्य म्हणजे या दोन दिवसांमधील 13 तासांच्या एकूण नियोजनात एकही थेट व्याख्यान ठेवलेले नाही, सर्व विषय गटचर्चा, सादरीकरण, खुले प्रश्न-मुक्त उत्तरे, पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन, अभिनय, गाणी या माध्यमातून मांडले जातात. भरपूर चर्चा होते, आत्मचिंतन होते, आंतरक्रिया होतात, लोक मोकळे होतात, खुलतात, ऐकतात, समजून घेतात, स्वतःला दुरुस्त करतात आणि मुख्य म्हणजे प्रेरणा घेतात. या शिबिरांमध्ये 25 वर्षांपासून काम करणार्‍याअगदी सिनिअर कार्यकर्त्यांपासून नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचा सहभाग होता.वैचारिक स्पष्टता येण्यासाठी आणि संघटनेची भूमिका, रचनाकक्षात येण्यासाठी हे शिबीर खूपच उपयुक्त असल्याची एक सामायिक प्रतिक्रिया सर्व स्तरातील कार्यकर्त्यांची होती.

कोकण आणि पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातील शिबिरे प्रशांत पोतदार, मी स्वतः, कृष्णात कोरे, सुजाता म्हेत्रे आणि आरती नाईक यांनी पार पाडली, तर मराठवाड्यातील सर्व शिबिरांसाठी विनायक सावळे, मिलिंद देशमुख आणि सविता शेटे यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले. शाहीर संजय जाधव यांनी कोल्हापूर आणि सातारा येथे सादरीकरणाचे प्रशिक्षण दिले. तयारीसाठी कमी वेळ मिळूनही छान नियोजन करणार्‍या इचलकरंजी शाखा, चिपळूण शाखा, सातारा शाखा, लातूर शाखा, बीड शाखा आणि जालना शाखा यांचे कार्याध्यक्ष, प्रधान सचिव, इतर कार्यकर्ते आणि जिल्ह्यांचे पदाधिकारी यांचे कौतुक आणि अभिनंदन! जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांसाठी हे प्रशिक्षण सक्तीचे आहे. परीक्षा, लग्नकार्यक्रम अशा कारणाने उपस्थिती कमी राहिली; पण शेजारच्या जिल्ह्यातील प्रशिक्षणावेळी अशा कार्यकर्त्यांनी येणे आवश्यक आहे.

दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सर्व खर्च ज्या-त्या शाखांनी स्वतः निभावला आणि शिबिरासाठी विविध शाळा, कॉलेजच्या संस्था चालकांनी आनंदाने आपल्या साधनसुविधा उपलब्ध करून दिल्या. अंनिसच्या कामासाठी नवी माणसे व ठिकाणे मिळण्याची शक्यता यातून निर्माण होत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर संघटना बांधणीच्या कामाला प्रथम प्राधान्य द्यायचे, याचे कारण काय असावे हे या प्रशिक्षण शिबिरातून समजते. ध्येय+कार्यकर्ता+रचना म्हणजे चळवळ. या तिन्ही गोष्टी समान महत्त्वाच्या आहेत, हे अशा शिबिरातच स्पष्ट होते. वैचारिक शिदोरी आणि कृतिशील राहण्याची प्रेरणा या प्रशिक्षणातून मिळते. अशी शिबिरे वरचेवर होतात, असे नाही. त्यामुळे वेळ काढा आणि संधी साधा, समृद्ध व्हायला चला. आणि हे विसरू नका, ‘जो प्रशिक्षण घेईल, तोच पदाधिकारी होईल!’

सुनील स्वामी

राज्य प्रशिक्षण विभाग कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती