ज्येष्ठ शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी प्रो. यशपाल (वय 90 वर्षे) यांचे 25 जुलै 2017 ला नोएडा येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. यशपाल यांचा जन्म पंजाब प्रांतातील झांग येथे 26 नोव्हेंबर 1926 रोजी झाला होता. त्यांचे बालपण व शिक्षण हरियाणातील कैथल येथे झाले. 1949 ला त्यांनी फिजीक्स विषयात मास्टर पदवी पंजाब विश्वविद्यालयातून मिळवली. पुढील उच्च शिक्षण त्यांनी अमेरिकेतील ‘मेसाक्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ मध्ये घेऊन तेथे भौतिकशास्त्रामध्ये पीएच. डी. मिळवली. अॅस्ट्रोफिजीक्स व कॉस्मिक किरणांवर त्यांनी संशोधन केले. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात मुंबईत ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ मध्ये केली. भारतातील ‘अंतरिक्ष कार्यक्रमांचे जनक’ म्हणून ते परिचित आहेत. 1972 साली देशात प्रथमच स्थापन केलेल्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटर, अहमदाबादचे ते संचालक होते. पुण्यातील ‘आयुका’ या संस्थेची स्थापना त्यांच्याच पुढाकाराने झाली. अवकाश संशोधन क्षेत्रात त्यांनी देशाला पुढे नेण्यासाठी भरीव कार्यक्रम आखले आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली.
प्रो. यशपाल यांनी संशोधन क्षेत्राबरोबरच मुलांच्यामध्ये विज्ञानप्रसार व्हावा यासाठी विविध कार्यक्रम दूरदर्शनवर ‘टर्निंग पॉईंट’ या नावाने केले. सोप्या भाषेत विज्ञान सांगण्याचा त्यांचा हा कार्यक्रम टी.व्ही.वर लोकप्रिय होता. सर्वसामान्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी आपले अधिकार वापरले. त्याची शासकीय पातळीवर अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न केले.
भारत सरकारच्या योजना आयोगाचे ते 1983-84 मध्ये मुख्य सल्लागार होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे ते 1986-91 पर्यंत अध्यक्ष होते. 2007-2012 पर्यंत ते जे. एन. यू., दिल्लीचे कुलगुरू होते. उच्च शिक्षणाचे देशाचे धोरण ठरविणार्या ‘यशपाल कमिटी’चे ते अध्यक्ष होते. ‘सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ विभागाचे सचिव, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही त्यांचे कार्य सर्वपरिचित आहे. प्रो. यशपाल यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना 1976 मध्ये पद्मभूषण, तर 2013 मध्ये पद्मविभूषण हे सर्वोच्च सन्मान दिले. त्याचबरोबर त्यांना इंदिरा गांधी अॅवॉर्ड, मेघनाथ साहा मेडल आणि युनेस्कोचे ‘कलिंगा अॅवॉर्ड’ मिळाले होते. प्रा. यशपाल हे प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी असल्याने त्यांचा अनेक पुरोगामी चळवळींशी संबंध होता. अंधश्रद्धा निर्मूलन कार्याबद्दल त्यांना आदर होता. आम्ही त्यांना मागील सप्टेंबरमध्ये भेटायला गेलो होतो. अंनिसच्या वेबसाईटची सुरुवात त्यांच्या हस्ते दिल्लीत संपन्न झाली होती. त्यांची एक सविस्तर मुलाखत अं.नि.वा.च्या वार्षिक 2017 च्या अंकात घेण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी कार्याध्यक्ष अविनाश पाटील हे त्यांच्या संपर्कात होते. परंतु त्या अगोदर त्यांचे निधन झाल्याने आम्ही एका वैचारिक मुलाखतीस मुकलो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रो. यशपाल यांना विनम्र अभिवादन करते. त्यांचे विज्ञानप्रसाराचे कार्य आम्ही विज्ञानबोध वाहिनी-च्या रुपाने पुढे नेत आहोत.

–राहुल थोरात