Categories
उपक्रम

‘टग्यांची’ पाडळी ते ‘सत्यशोधक’ पाडळी

फेब्रुवारी – २०१७

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पाडळीची खरी ओळख महाराष्ट्राला झाली ती ‘फटाकेमुक्त दिवाळी’मुळे. पाडळी गाव, रानातील घरे, वाडी व वस्ती कुठेही दिवाळीत फटाका फोडला जात नाही. दुकानदार फटाके विकत नाहीत. विद्यार्थी व शिक्षक गावातून प्रबोधन फेरी काढतात. ‘मी फटाके फोडणार नाही,’ अशी प्रतिज्ञा घेतात. गेली चार वर्षे पाडळी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करीत आहे. शेतकरी मोफत वाचनालय, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, समाजवादी प्रबोधिनी, शाखा पाडळी यांच्यातर्फे दिवाळीत विविध स्पर्धा होतात. तरुण उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी होतात. तालुक्याचे राजकारण करणार्‍या नेत्यांनीही गावच्या विकासात व विधायक वाटचालीत राजकारण न आणण्याची शाश्वती दिली आहे. ‘गाव करील ते राव करील काय?’ ही उक्ती सार्थ ठरवीत पाडळीने ‘टग्यांची’ पाडळी ते ‘सत्यशोधक’ पाडळी हा केलेला प्रवास अनेक गावांसाठी दिशादर्शक असाच आहे…

परिवर्तनाची सुरुवात एका घटनेने झाली. गावातील एक तरुण नशीब काढण्यासाठी मुंबईला गेला. मारुती चंद्रू पाटील असे त्या तरुणाचे नाव. मुंबईत व्यापार करू लागला. प्रारंभी पडतील ती कामे करणे, अंगमेहनतीची, ओझी उचलण्याची कामे करीत मिरचीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. कष्ट, सचोटी, जिद्द, प्रामाणिकपणा, मनमिळाऊ स्वभाव यामुळे व्यापारात जम बसला. मारुतीआप्पा या नावाने गावात ते लोकप्रिय झाले. कर्तबगार मारुती चंद्रू पाटील यांचा किरकोळ आजाराने मृत्यू झाला. गाव हळहळले. मित्र, नातेवाईक दु:खसागरात बुडाले. मारुतीची दोन मुले लहान होती. मेहुण्यांनी व्यवसायात लक्ष घातले.

मारुतीआप्पांचा पहिला स्मृतिदिन आला. पहिला स्मृतिदिन मोठ्या पद्धतीने घातला जातो. गावजेवण, पै-पाहुणे, नातलगांना जेवण, सत्यनारायण घालणे, दानधर्म, आहेर इत्यादी. काही लोक पहिला स्मृतिदिन पाळतात. नंतर मृत व्यक्ती विस्मृतीत जाते. त्याचा फोटो अडगळीत जातो. 30 जून 2013 हा मारुती पाटील यांचा पहिला स्मृतिदिन. हा सत्यशोधक पद्धतीने पाळण्याचा विचार मारुतीचे मित्र, नातेवाईक यांनी ठरवले. करमाळे या पाडळी जवळच्या गावातील अमर लक्ष्मण पाटील या वार्ताहराने आपला विवाह सत्यशोधक पद्धतीने केला होता. शिराळा तालुक्यातील हा अलिकडचा पहिला सत्यशोधक विवाह होता. आहेर, मानपान, मांडव, भटजी टाळून केलेला हा विवाह लोकांना भावला. अक्षता म्हणून तांदूळ न टाकता फुले टाकली. तांदळाची नासाडी टाळली. मारुती पाटील यांची सासरवाडी करमाळे आहे. आप्पांचे मेहुणे कृष्णा पाटील, डॉ. सुनील पाटील, अंनिसचे सांगली जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वत: काम पाहत होतो. आम्ही एकत्र येऊन स्मृतिदिन सत्यशोधक पद्धतीने पाळण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. त्यात डॉ. सुनील पाटील यांचा पुढाकार महत्त्वाचा होता.

स्मृतिदिनाचा होणारा खर्च टाळून सामाजिक कामाकडे खर्च करायचे ठरले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत तुकाराम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, कालवश मारुती पाटील यांच्या फोटोंसह संत तुकारामांची गाथा, महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय, भारतीय राज्यघटना यांचे पूजन झाले. संत तुकारामांच्या निवडक अभंगांचे वाचन व विवेचन केले. हा कार्यक्रम घरी न करता शाळेत केला. यशवंत विद्यालय व जिल्हा परिषद शाळा, पाडळी येथील चारशे विद्यार्थी यात सहभागी झाले. त्यांना वही, पेन, शब्दकोष व खाऊवाटप असा कार्यक्रम होता. ग्रामस्थ व शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग दिला. तेव्हापासून आजपर्यंत हा उपक्रम त्याच पद्धतीने साजरा होत आहे. दुसर्‍या स्मृतिदिनी त्याच शाळांमध्ये 25 हजार रुपये खर्च करून वृक्षारोपण केले. तिसर्‍या वर्षी ढोल, ताशे, झांज यासाठी पंधरा हजार दिले. चौथ्या वर्षी पुन्हा वृक्षारोपणाची मोहीम राबविली.

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य व सत्यशोधक समारंभाचा परिपाठ मारुतीआप्पांचे चिरंजीव सत्यजित, अभिजित आणि मेहुणे कृष्णा यांनी चालू ठेवला आहे. त्यांची स्मृती म्हणून ‘कर्तव्यसूर्य आप्पा’ या घराचा गृहप्रवेशाचा कार्यक्रमही सत्यशोधक पद्धतीनेच पार पडला. आहेर, मानपान टाळले. महात्म्यांची प्रतिमा व ग्रंथपूजन केले. प्रा. विजय गायकवाड, कॉम्रेड धनाजी गुरव, प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आम्ही हा कार्यक्रम पार पाडला. रात्री पारंपरिक भजन आणि सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाची ध्यनिचित्रमुद्रिका (सीडी) दाखवली होती.

गावात सत्यशोधक जावळ व बारसे साजरे करण्याची प्रथा चंद्रकांत वसंत पाटील यांनी सुरू केली. चंद्रकांत इंजिनिअर आहे, एक भाऊ फौजी व दुसरा पोलीस. वडील आदर्श शेतकरी आहेत. पाडळीतील हे मातृसत्ताक कुटुंब आहे. चंद्रकांतच्या आईला आदर्शमाता पुरस्कार मिळाले आहेत. चंद्रकांत यांना 15 ऑगस्ट 2015 ला मुलगा झाला. स्वातंत्र्यदिनी पुत्रलाभ झाला म्हणून बाळाचे नाव भगतसिंग ऊर्फ विघ्नेश ठेवले. सत्यशोधक बारसे विधी करण्याचा संकल्प कुटुंबाने केला. आहेर, मानपान, गोडधोड जेवण टाळून बारसे झाले. आलेल्या पाहुण्यांना दूध दिले गेले. या आगळ्या-वेगळ्या विधीला मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवरांना पाचारण केले होते. कागल येथील जवान कुंडलिक केरबा माने सीमेवर हुतात्मा झाले होते. त्यांची वीरपत्नी, कन्या करिश्मा व कुटुंबियांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. बाळाला पाळण्यात घालून शिवाजी महाराज, नरवीर तानाजी यांचे पोवाडे व देशभक्तिपर गीते गाऊन हा कार्यक्रम साजरा झाला. हुतात्मा कुंडलिक यांच्या कन्येच्या शिक्षणासाठी मदत म्हणून पन्नास हजार रुपये देण्यात आले. मानपान, कर्मकांड, संपत्तीचा बडेजाव टाळून आदर्श सत्यशोधक समारंभाचा आदर्श पाटील परिवाराने घालून दिला. भगतसिंग याचा वाढदिवस यानंतर वसंतराव पाटील कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपून साजरा करण्यावर भर दिला आहे. शाळांना विविध वस्तू भेट देऊन, मान्यवरांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करणे, असे कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवले आहेत. महाड जवळील सावित्री पूल कोसळला, तेव्हा अनेकांचे प्राण वाचविणार्‍या वसंतकुमार यांना बोलावून त्यांचा उचित सन्मान त्यांनी केला. त्या कार्यक्रमात वसंतकुमार यांना दिलेले सात हजार रुपये त्यांनी पुन्हा समाजकार्यावरच खर्च करावेत, या भावनेने पाटील कुटुंबियांनाच परत केले. भगतसिंगचा जावळविधीचा खर्चही टाळून ती अठरा हजार रुपयांची रक्कम पुस्तकांच्या रुपाने गावातील शाळेच्या वाचनालयाला भेट दिली. चंद्रकांत यांचे बंधू संतोष, फौजी अमोल यांनीही ही परंपरा सुरू ठेवली. वसंतराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी, मुलांनी सनातन कर्मकांडांतून मुक्त करून पुरोगामी विचारांचा स्पर्श दिला आहे.

पाडळी गावातील अनेक तरुण हा पुरोगामी विचार व कृती करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. दिनकर जगन्नाथ पाटील यांनी स्वत:चा वाढदिवस साधेपणाने साजरा करत गावातील वाचनालयाला दहा हजारांची देणगी दिली. जयसिंग खंडू पाटील व संदेश पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सर्व वर्गखोल्यांना लाईट फिटिंग करून पंखे बसवून दिले आहेत. मोहन बंडू पाटील व अर्जुन आकाराम पाटील यांनी दहा हजार रुपये खर्चून खुर्च्या दिल्या आहेत. मुंबईत पोलीस असणारे प्रदीप पाटील यांनी मुंबईतील अनाथालयातील मुलांच्या समवेत वाढदिवस साजरा केला. के. आर. पाटील यांनी पाडळीच्या शाळेला 52 हजारांचा प्रोजेक्टर भेट दिला. पाडळीची जिल्हा परिषद शाळा विजेअभावी अनेक दिवस अंधारात होती. वीजबिल न भरल्याने महावितरण कंपनीने कनेक्शन तोडले होते. रात्रीची अभ्यासिका बंद होती. डॉ. सुनील पाटील यांनी मुलगा सोहम याचा जावळविधी सत्यशोधक पद्धतीने साजरा केला. वाचलेली पाच हजारांची रक्कम शाळेच्या वीजबिलापोटी भरली आणि वीज सुरू केली. पिंटूदादा पाटील यांनी शाळेच्या कंपाऊंडसाठी वीस हजार, जगन्नाथ पाटील यांनी पाच हजार, अर्जुन पाटील यांनी झाडांसाठी काही रक्कम खर्च केली आहे. नीलेश पाटील व सदाशिव पाटील यांनी शेतकरी वाचनालयाला पुस्तके व कपाट यासाठी दहा हजार दिले. जिल्हा परिषद शाळा ‘हरित शाळा’ करण्याचा विडा ग्रामस्थ, शिक्षक, शालेय समिती सदस्यांनी उचलला. आपली मराठी शाळा ‘अ’ वर्गात आली पाहिजे, अशी सर्वांची इच्छा होती. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी वृक्षारोपणासाठी 35 हजार रुपये दिले. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी पाण्याच्या व्यवस्थेसाठी एक लाख रुपये दिले. महाराष्ट्रात सगळीकडे मराठी माध्यमाच्या जिल्हा शाळा रोडावत असताना पाडळी गावाने मराठी माध्यमाची शाळा ‘क’ वर्गातून ‘अ’ वर्गात आणली.

रवी पाटील व मारुती पाटील या भावांनी ‘सूभीम’ या बांधलेल्या नव्या घराचा गृहप्रवेश सत्यशोधक पद्धतीने घेतला. यासाठीचा खर्च खासदार राजू शेट्टी यांच्याकडे दुष्काळ निधी म्हणून जमा केला. सन 2013 ला राज्यात भीषण दुष्काळ होता. अनावश्यक खर्च टाळून दुष्काळासाठी रक्कम देण्याच्या कल्पनेने गावाचे लक्ष वेधले. अशोक पाटील यांनी नातवाचे बारसे साध्या पद्धतीने साजरे करून ती रक्कम शाळेतील सौरदिव्यासाठी खर्च केली.

दिवाळीत क्रीडा स्पर्धा, धूलिवंदनानिमित्त होळी क्रीडा महोत्सव, 31 डिसेंबर हा व्यसनमुक्ती दिन, दारूड्याचा प्रतीकात्मक तिरडी मोर्चा, 26 जानेवारीला व्याख्यानमाला आदी उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे होतात. गाव हागणदारीमुक्त, व्यसनमुक्त, तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प इथल्या तरुणांनी केला आहे. तसे काम सुरू आहे. जात-पात, राजकारण, गट-तट विसरून तरुण एकत्र येऊन काम करतात. ‘टग्यांची’ पाडळी ते ‘सत्यशोधक’ पाडळी व ‘फटाकेमुक्त दिवाळी’ हा प्रवास पाडळीतील तरुणांमुळेच शक्य झाला आहे. त्यांना गावातील ज्येष्ठांची व विविध राजकीय नेत्यांची साथ मिळते.

विजयकुमार जोखे, शिराळा

संपर्क : 9405586558