Categories
मंथन

डार्विन, उत्क्रांती आणि बटलर कायदा!

मे - २०१८

दृश्य 1 – वेदात सर्व ज्ञान आहे, त्यामुळे ‘वेदांना विरोधी मांडणी अक्षम्य आहे,’ असे मानणारे सत्यपाल सिंह जसे आपल्याकडे आहेत, तसे बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींच्या विरोधी मत मांडणारे ‘पाखंडी, सबब वध्य होत’, असे मानणारे अनेक जण युरोप आणि अमेरिकेत होते. साहजिकच सर्व प्राणिसृष्टी एकाच वेळी उत्पन्न झालेली नाही, तर हळूहळू प्राथमिक अवस्थेतील प्राण्यांपासून उत्क्रांत होत गेली’, असे सिद्ध करणार्‍या डार्विनच्या उत्क्रांतीवादाला अशा धर्मनिष्ठ लोकांच्याकडून कडाडून विरोध झाला. त्याची पुढची पायरी म्हणजे विसाव्या शतकातही हा सिद्धांत शाळांतून शिकवण्यास बंदी घालणारे कायदे अमेरिकेतील काही राज्यांनी मंजूर केले. 1925 साली टेनेसी राज्यातील एका आमदाराने असा कायदा मांडून तो मंजूर करून घेतला, तो ‘बटलर कायदा’ या नावाने ओळखला जाऊ लागला.

दृश्य 2 – या राज्यातील डेटन हे एक लहानसे गाव. एक नागरिक वृत्तपत्रात एक लेख वाचतो. त्यात लिहिलेले असते की, ‘अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन’ ही संस्था, बटलर कायद्याला आव्हान देण्यासाठी, हा विषय ‘शाळेत मुद्दाम शिकवणार्‍या स्वयंसेवी शिक्षकाच्या शोधात आहे.’ आपल्या गावाने असा सत्याग्रह करावा (म्हणजे आपल्या आर्थिक आघाडीवर मरगळलेल्या गावाला जरा चेतना मिळेल) असा विचार तो मांडतो आणि गावकरी त्याला मान्यता देतात. स्कोप्स नावाचा एक शिक्षक यासाठी तयार होतो. नवीनच नोकरी लागलेला हा 25 वर्षे वयाचा विज्ञान शिक्षक; शिवाय फुटबॉल प्रशिक्षक म्हणूनही काम पाहत असतो आणि गंमत म्हणजे जीवविज्ञान हा त्याचा विषयही नसतो. त्याने कधी उत्क्रांतीवाद हा विषय शिकवलेलाही नसतो. आपल्या या ‘उद्योगा’ला पुढे राष्ट्रीय महत्त्वाचे रूप येईल, याची त्याला आणि डेटन गाववाल्यांनाही कल्पना नसते. ‘स्कोप खटला’ या नावाने हा खटला आजही ओळखला जातो, आणि नावाला साजेसा या सुनावणीचा ‘स्कोप’ पुढे वाढतच जातो. सामान्य लोक मात्र या खटल्याला ‘मर्कट अभियोग’ (मंकी ट्रायल) या नावाने ओळखत.

दृश 3 – अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले, उत्कृष्ट वक्ते आणि ‘गॉस्पेल ट्रुथ’ मानणारे श्री. विल्यम ब्रायन तारेने कळवतात की या अभियोगात सरकारी वकिलांना मदत करण्याकरिता येण्याची त्यांची तयारी आहे. सरकारी वकील हा प्रस्ताव मान्य करतात.

त्या काळातील सर्वांत प्रसिद्ध वकील, आपण अज्ञेयवादी आहोत असे जाहीर करणारे, श्री. क्लॅरेन्स डॅरो, हे प्रतिवादीच्या बाजूने लढण्यास आपण काहीही शुल्क न घेता तयार आहोत, असे जाहीर करतात; जणू उज्ज्वल निकम विरुद्ध राम जेठमलानी!

ही वाघ-सिंहाची लढत पाहण्यास कानाकोपर्‍यातून वार्ताहर थडकतात आणि एका किरकोळ खटल्याला राष्ट्रीय महत्त्व येते. इतिहासात प्रथमच, या खटल्याची प्रक्रिया रेडिओवर थेट प्रसारित होते.

आपल्या गावाला एवढी प्रसिद्धी मिळालेली पाहून गावकरी खूष होते. ब्रायन यांच्या मते, लोकशाहीत, बहुमताने मान्य झालेला कायदा लोकांनी पाळणे अत्यावश्यक होते. तर ए.सी.एल.यू.च्या मते हा भाषणस्वातंत्र्यावर आणि विचारस्वातंत्र्यावर घाला होता. लोकशाहीच्या दोन आविष्कारांची ही लढाई होती. हा खटला 12 दिवस चालला आणि अमेरिकेची घटना, नागरिकांचे मूलभूत हक्क, सेक्युलर राज्य आणि धर्म अशा बर्‍याच मुद्द्यांवर इथे दीर्घ वाद झाले. डॅरोने बायबल आणि त्यातील अवैज्ञानिक सिद्धांत यांची खिल्ली उडवली, तर ब्रायनने कायदेभंग करणार्‍याला शिक्षा झालीच पाहिजे, हा मुद्दा लावून धरला. निकालात स्कोपला दोषी ठरवून 100 डॉलर दंड करण्यात आला. बिचार्‍या शाळा मास्तरला त्या काळात ही फार मोठी रक्कम होती, त्यामुळे ‘द बाल्टिमोर सन’ या वृत्तपत्राने हा दंड भरला.

क्लॅरेन्स डॅरो आणि विल्यम ब्रायन (खटल्याचे वेळी)

ही झाली 20 व्या शतकातील हकीकत. पण चिवट धर्मनिष्ठ गट इतक्या सहज हार पत्करत नाहीत. 21 व्या शतकातही त्यांचे डार्विनवर मात करण्याचे प्रयत्न चालूच आहेत. बायबल किंवा परमेश्वर असे न म्हणता, हे जग कोणा बुद्धिमान यंत्रणेने निर्माण केले आहे, असे शब्द हे वापरतात. मात्र ही यंत्रणा कोणी निर्माण केली, ते मात्र हे लोक सांगत नाहीत. डार्विनची उपपत्ती अद्याप पूर्णपणे सिद्ध झालेली नाही; सबब एक पर्यायी उपपत्ती म्हणून ‘बुद्धिमान यंत्रणा’ सिद्धांतही शाळांतून शिकवला जावा, अशी यांची मागणी असते. आमचा सिद्धांत मांडणार्‍या शिक्षकांना त्रास सोसावा लागतो, त्यांना संरक्षण मिळावे, अशीही मागणी असते. अमेरिकेतील सनातनी विचार गट ही मोहीम जोमदारपणे चालवत आहेत आणि ‘शैक्षणिक स्वायत्तता प्रस्ताव’ या नावाने अनेक राज्यांच्या कायदे मंडळात त्यांनी अशा प्रस्तावांचा धडाका लावला आहे. अलाबामा, ओक्लाहोमा, मेरिलंड, न्यू मेक्सिको, फ्लोरिडा, लुइज़ियाना, ही यातील काही राज्ये. मात्र कोठेही असा कायदा मंजूर होऊ शकला नाही. असे स्वातंत्र्य दिल्यास त्याविरुद्ध अनेक पालक आक्षेप घेणार, न्यायालयात जाणार, अपिलावर अपिले होणार आणि मोठा गदारोळ माजणार, अशी त्यांना खात्री असावी. ‘सायंटिफिक अमेरिकन’ या मासिकाने तर ‘डार्विन सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही’ असे म्हणणार्‍या लोकांची चक्क ‘खोटारडे’ अशी संभावना केली होती.

दरम्यान, बेन स्टीन या चित्रपट कलाकाराने ‘एक्स्पेल्ड’ (तडीपार) या नावाचा एक चित्रपट निर्माण केला. यात स्वतंत्र विचार (बुद्धिमान निर्माता) मांडणार्‍या शिक्षकाचा कसा छळ होतो, त्याचे चित्रण आहे. कायदेमंडळ प्रतिनिधींसाठी याचे खास शो त्याने आयोजित केले होते; पण त्याला कोणी फारसा प्रतिसाद दिला नाही.