Categories
पर्दाफाश

देवी रडल्याचा चमत्कार : महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केला पर्दाफाश…!

ऑक्टोबर - २०१८

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे चंचल वाघमारे नावाच्या व्यक्तीच्या घरी महालक्ष्मी मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. स्थापना केल्यानंतर मूर्ती रडत असल्याचे शेजारील काही व्यक्तींनी वाघमारे यांच्या लक्षात आणून दिले. त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांनाही देवींच्या मूर्ती रडत असल्याच्या चमत्काराबाबत सांगितले. या चमत्काराची बातमी बघता-बघता भोकरदन व पंचक्रोशीत वार्‍यासारखी पसरली. भाविकांची गर्दी होऊ लागली. अनेकजण मूर्तींसमोर पैसे टाकू लागले. त्यामुळे ही मूर्ती एका महाराजाच्या सांगण्यावरून विसर्जित करायची नाही, असा निर्णय घेण्यात आला.

याबाबतची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांना मंगळवार, दिनांक 18 सप्टेंबर रोजी एका पत्रकाराने फोन करून कळवले. त्यावेळी शहाजी भोसले हे खुलताबाद येथील दर्ग्यातील मौलानाची तक्रार देण्यासाठी ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना भेटण्यास गेले असल्याने भोकरदन येथे जाऊन याबाबतचा तपास करणे शक्य नव्हते. म्हणून भोसले यांनी महाराष्ट्र अंनिसच्या भोकरदन शाखेचे राजेंद्र दारुंटे यांच्याशी संपर्क केला. त्यांना मूर्ती रडल्याचा चमत्कार कसा असू शकतो, त्यामागील विज्ञान काय असू शकते; तसेच शहनिशा कशी करावी याबाबतची पूर्ण कल्पना दिली व तेथे जाऊन त्या चमत्काराचा छडा लावण्यासाठी सांगितले.

राजेंद्र दारुंटे यांनी आपल्या सोबत महाराष्ट्र अंनिसचे कमलाकर इंगळे व त्र्यंबक पाबळे या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वाघमारे यांचे निवासस्थान गाठले. तेथील प्रकरणाची पाहणी केली. कायदा व सुव्यवस्था याचे भान ठेवून तपास केला. योग्य ती शहानिशा केल्यावर खरा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

देवींच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्या होत्या. त्या मूर्तींचे डोळे हुबेहूब मानवी डोळ्यांसारखे होते. डोळ्यांना चकाकी येण्यासाठी रासायनिक रंगांचा वापर केला असल्याने मूर्तींचे डोळे पाणीदार वाटत होते. त्या मूर्तींवर मर्क्युरी लाईटचा फोकस पडल्यानंतर डोळे चमकू लागत असल्याने देवींच्या मूर्तींच्या डोळ्यांची चमक डोळ्यात पाणी (अश्रू) असल्याचा आभास निर्माण करत होती. त्यामुळे मूर्ती रडत आहे, अशी अफवा पसरवण्यात आली होती. खरं तर डोळ्यातून पाणी निघत नव्हते.

या प्रकाराची सत्यता महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वाघमारे यांच्या लक्षात आणून दिली. अंधश्रद्धा पसरवून लोकांची दिशाभूल करणे हा गुन्हा ठरू शकतो व त्यामुळे आपल्यावर काही कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशी समज वाघमारे यांना दिली. वाघमारे यांना कार्यकर्त्यांचे म्हणणे पटले व त्यांनी दिनांक 18 सप्टेंबर रोजी रात्री देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले.

महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने पुढील होणारा अनर्थ टळला, हे मात्र तेवढेच खरे.

शहाजी भोसले, औरंगाबाद