Categories
पर्दाफाश

नागपूरच्या शस्त्रधारी भोंदूबाबाचा पर्दाफाश

सप्टेंबर - २०१८

समाजात अस्थिरता निर्माण करणार्‍या एका भोंदूबाबाचा खापरखेडा पत्रकार संघ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने खापरखेडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुरुवारी, 19 जुलैला रात्रीच्या सुमारास भोंदूबाबाच्या ठिकाणावर छापा टाकून पर्दाफाश केला. ही घटना स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत भानेगाव येथे घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित भोंदूला खापरखेडा पोलिसांनी विविध कलमांन्वये अटक केली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव संदीप प्रभूदास शिडाम (वय 28, रा. बीपीएल टोली, टीचर कॉलनी, भानेगाव) असे आहे. जवळपास दोन वर्षांपासून भोंदू संदीप आपल्या राहत्या घरी बाबागिरी करीत होता. फिर्यादी दिलीप गणपत खारकर (वय 55, वॉर्ड नं. 3, खापरखेडा) यांच्या पत्नीची प्रकृती मागील अनेक महिन्यांपासून बरी नव्हती. डॉक्टरांकडून आराम मिळत नसल्याचे पाहून फिर्यादी दिलीप मित्राच्या सांगण्यावरून आरोपी भोंदूबाबा संदीप याच्याकडे घेऊन गेला असता फिर्यादीच्या पत्नीच्या अंगावरून राखेची पुडी, भस्म, लिंबू ओवाळून बाहेर फेकून दिले व तलवार, कट्यार दाखवून त्यांच्या मनात भीती निर्माण केली. फिर्यादी दिलीप याला ‘तुझ्या पत्नीची तब्येत बरी करतो,’ असे सांगून त्याच्याकडून 50 ते 60 हजार रुपये उकळले. फिर्यादी दिलीप त्यांच्या पत्नीला आराम होत नसल्याचे पाहून आरोपी भोंदूबाबा संदीप यांच्याकडे घेऊन गेला; मात्र यावेळी भोंदूबाबा संदीपने फिर्यादी दिलीपला शिवीगाळ करून त्यांना मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक होत असल्याचे पाहून फिर्यादी दिलीप खारकर यांनी 18 जुलैला रीतसर तक्रार दाखल केली. खापरखेडा पोलिसांनी खापरखेडा पत्रकार संघ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने गुरुवारी रात्री भोंदूबाबा संदीप शिडामच्या दरबारात छापा टाकून त्याला ताब्यात घेऊन कलम 3 नुसार महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अघोरी प्रथा जादूटोणाविरोधी अधिनियम 2013 सहकलम 4/25 आर्म्स अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून, घटनास्थळावरून पोलिसांनी 3 तलवारी, 1 खंजीर, 4 चाकू, 1 मोठी नागकाडी, 5 अंगठ्या, दोन मोबाईल, कट्यार, दोन कडे, लिंबू, भस्म आदी विविध साहित्य पोलिसांनी जप्त केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बारंगे, नीलेश पिपरोदे, वीरेंद्र नरड, बेवणे, बंडू कोकाटे, पंकज भट्टा, संदीप धुर्वे, राजेश पिसे, दीपक दरोडे, स्वप्नील बोंडे करीत असून रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.

मागील दोन वर्षांपासून सुरू होता भोंदूबाबाचा दरबार

भोंदूबाबा संदीप पूर्वी ट्रॅक्टरचालक होता; मात्र भोंदूगिरीत पैसा अधिक असल्याने त्याने सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून आजार बरे करीत असल्याचे भासवून आपल्या मोहजालात ओढले. आई-वडील व कुटुंबीयांची सोबत घेऊन मागील दोन वर्षांपासून प्रत्येक गुरुवारी आपला दरबार चालवित होता.

पत्रकार व मअंनिसच्या प्रयत्नांना यश

मागील अनेक वर्षांपासून भानेगाव येथील बीपीएल टोलीत आरोपी संदीप भोंदूबाबा बनून सर्वसामान्यांची हजारो रुपयांनी लूट करीत होता. यासंदर्भात खापरखेडा पत्रकारांकडे तक्रारी होत्या; मात्र कोणीही रीतसर तक्रार करायला तयार नव्हते. अखेर फिर्यादी दिलीप खारकर यांनी तयारी दर्शविली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, खापरखेडा सावनेरचे सक्रिय कार्यकर्ते शेखर कोलते, पत्रकार बंधूंसह फिर्यादी खारकर यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भोंदूबाबाचा पर्दाफाश केला.

पोलिसांनी मोठ्या शिताफीने केली भोंदूबाबाला अटक

भोंदूबाबा संदीप याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली; मात्र पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक साखरकर यांनी व्यूहरचना आखली. महिला पोलीस शिपाई प्रिया महल्ले, जितेश झडाने यांना पुरावे जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शेखर कोलते व पत्रकारबंधू सोबतीला होते व्यूहरचनेनुसार महिला पोलीस शिपाई प्रिया महल्ले यांनी आजार असल्याचे नाटक केले आणि नेमका भोंदूबाबा संदीप पोलिसांच्या जाळ्यात अडकला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शेखर कोलते यांनी या घटनेची चित्रफीत तयार केली आणि त्यानंतर पोलीस ताफा गोळा करून भोंदूबाबाच्या दरबारात छापा टाकण्यात आला. पोलिसांची यशस्वी कामगिरी बघता त्यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भोंदूबाबाच्या दिमतीला स्थानिक राजकीय नेते

आजच्या विकसनशील देशात अंधश्रद्धांसारख्या कुप्रथेचा समाजातल्या सर्वच स्तरातून विरोध होत आहे. अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे काळाची गरज आहे. समाजाला दिशा देणारे राजकीय नेते अंधश्रद्धा व भोंदूगिरी पसरविण्याचे कार्य करीत आहेत. स्थानिक राजकीय नेते खुद्द निवडणुकांपूर्वी भोंदूबाबाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्या दिमतीला हजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकशाहीचे आधारस्तंभ असलेल्या नेत्यांनी असे दुष्कृत्य केल्यास भोंदूबाबासारखे पाखंडीकडून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्यास वेळ लावणार नाहीत, हेही तितकेच खरे….

गौरव आळणे, नागपूर