Categories
संपादकीय

नादियाला सलाम!

फेब्रुवारी २०१९

नादिया मुराद. इराकमधील याझिदी या धार्मिक समूहातील ही युवती. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या अत्याचाराला बळी पडलेली नादिया खचून गेली नाही. गुलाम म्हणून विकले गेल्यानंतर मोठ्या धैर्याने ती इराकमधून निसटली. तिने जर्मनीत आश्रय घेतला आणि जगाच्या व्यासपीठावर आपली दर्दभरी कहाणी सांगायला सुरुवात केली. ‘दि लास्ट गर्ल’ (The Last Girl) या आत्मवृत्ताद्वारे नादिया आणि याझिदी अल्पसंख्याकांवरील अत्याचार उजेडात आले. या अत्याचाराविरोधात झुंज देणार्‍या या मनस्वी युवतीला 2018 चे नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. नादियाला नोबेल शांतता पारितोषिक देताना नोबेल समितीने जे पत्रक प्रसिद्ध केले आहे, त्यात म्हटले आहे – ‘आपल्यावरील अत्याचार मुकाटपणे सहन करणे आणि त्याबद्दल स्वत:चीच लाज वाटणे या प्रस्थापित संकेताचा भंग करून नादियाने असामान्य धैर्याने स्वत:वरील आणि आपल्यासारख्याच इतरांवरील अत्याचारांना वाचा फोडली आहे.’

सर्वसामान्यपणे बलात्कारपीडित स्त्री आपल्यावरील अत्याचाराबाबत मूक राहते. आपण आणि कुटुंब यांची अब्रू जाईल, या भीतीने तोंड दाबून बुक्क्यांचा मार ती सहन करीत असते; पण नादियानं तसं केलं नाही. आपले उर्वरित बांधव आणि भगिनी यांच्यावर अन्याय व जबरदस्ती भविष्यात तरी होऊ नये, यासाठी तिने आपली कर्मकहाणी जगाच्या समोर मांडली. 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने भरवलेल्या अल्पसंख्य समूहांच्या प्रश्नांबाबतच्या एका परिषदेत नादियाने पहिल्यांदा आत्मकथन केले. त्यानंतर तीन वर्षांत तिने ही कहाणी हजारोवेळा जगातील विवेकवादी राजकीय नेते, पत्रकार, सिनेदिग्दर्शक यांच्यासमोर मांडली आहे. याचबरोबर ‘दि लास्ट गर्ल’ या आत्मकथनाद्वारे ती जगभरच्या वाचकांपर्यंत पोचली. हे आत्मकथन वाचताना नकळत आपल्या डोळ्यांतून अश्रू ओघळायला लागतात आणि धार्मिक कट्टरतेविरोधात आपला क्रोध अनावर होऊन अंग थरथरू लागते.

अमेरिकेने इराकमधून काढता पाय घेतल्यानंतर तेथे शिया आणि सुन्नी पंथियांत संघर्ष सुरू झाला. याचा फायदा उठवीत इराकमध्ये सीरियातून घुसून इस्लामिक स्टेट या दहशतवादी क्रूर संघटनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या संघटनेच्या अत्याचाराला नादिया बळी पडली. इराकमध्ये याझिदी या धार्मिक पंथाचे लोक राहतात. त्यांना इस्लामिक स्टेटच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी धर्मांतराची सक्ती सुरू झाली. याझिदींचा क्रूरपणे वंशविच्छेदही सुरू झाला. पन्नास वर्षांवरील सर्व याझिदी स्त्रियांची व 10 वर्षांवरील तरुणांची हत्या करण्यात आली. तरुण याझिदी स्त्रियांना पकडून गुलाम म्हणून विकण्यात आले.

नादिया इस्लामिक स्टेटच्या अत्याचाराची बळी ठरली. तिच्या कुटुंबातील सर्वांची हत्या केली गेली व तिला गुलाम म्हणून विकण्यात आले. तीन महिने तिने अनेक नव्या मालकांनी केलेल्या बलात्काराच्या यातना भोगल्या. एकदा पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना तिला पकडण्यात आले आणि मालकाने व त्याच्या सुरक्षारक्षकांनी रात्रभर बेशुद्ध होईपर्यंत तिच्यावर बलात्कार केला. अखेर एका मालकाच्या घराचे दार उघडे असल्याचे हेरून ती निसटली. एका इराकी कुटुंबाने धोका पत्करून तिला आश्रय दिला व अखेर ती जर्मनीला पळून जाण्यात व स्वत:वरील आणि इतर धर्मबांधवांवरील अत्याचाराला वाचा फोडण्यात यशस्वी झाली. हिटलरने ज्यूंचा जसा वंशसंहार केला केला, त्यापेक्षाही भयानक असा हा एका धार्मिक गटाचा संहार होता. सॉमरसेट मॉम या प्रसिद्ध साहित्यिकाने म्हटल्याप्रमाणे देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली माणूस किती अधम थराला जाऊ शकतो, नाही का?

आपल्या देशात अल्पसंख्याक समूहावर गेल्या काही वर्षांत धार्मिक दंगली आणि इतर मार्गांनी जे अत्याचार सुरू झालेत, त्याची भीतीच वाटायला लागते. हे अत्याचार वाढू नयेत यासाठी नादियाची कहाणी भारतात सर्वदूर माहीत व्हायला हवी. तिच्या धैर्याला सलाम!