शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर निर्घृण खून करण्यात आला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले. पुण्यात खून झाल्यामुळे, पुण्यात त्याचे विशेष पडसाद उमटणे स्वाभाविक होते. कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची न होता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम तेवढ्याच हिरिरीने पुढे चालू राहावे, यासाठी काही पावले उचलणे आवश्यक होते, काही ठोस कार्यक्रम देणे जरुरीचे होते. या विचारमंथनातून जेथे डॉक्टरांचा खून झाला, त्या वि. रा. शिंदे पुलावर दर महिन्याच्या 20 तारखेला जमून निदर्शने करण्याची कल्पना पुढे आली. त्याप्रमाणे पुणे शहरातील कार्यकर्ते गेली 59 महिने, एकदाही खंड पडू न देता वि. रा. शिंदे पुलावर जमत आहेत. डॉक्टरांच्या मारेकर्यांना व त्यामागील सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करून त्यांना शासन करा, अशी मागणी सरकारकडे करत आहेत. सनदशीर मार्गाने चालणार्या या आंदोलनात ‘फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर’, ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया’ आदी घोषणा दिल्या जातात, चळवळीची गाणी म्हटली जातात. या आंदोलनाला एकसुरीपणा येऊ नये, यासाठी कल्पकतेने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यातील काही निवडक उपक्रमांची माहिती पुढे देत आहे.
धारातीर्थी पडो आंदोलन :- डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर एक महिन्याने पुलावर जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी ‘धारातीर्थी पडो’ हे आंदोलन केले. यामध्ये सर्व कार्यकर्ते जमिनीवर पडून राहिले. आम्ही धारातीर्थी पडू; पण डॉ. दाभोलकरांनी दाखविलेला मार्ग सोडणार नाही, हा संदेश यातून दिला गेला.
मोर्चाचे आयोजन : – खुनाला दोन महिने पूर्ण झाले, त्या दिवशी वि. रा. शिंदे पुलापासून लक्ष्मी रस्ता मार्गाने शिवाजीनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध संघटनांनी दिलेल्या निवेदनाचा हार करून महाराजांच्या पुतळ्यास घालण्यात आला. या मोर्चात अंनिसबरोबरच राष्ट्र सेवा दल, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती, महाराष्ट्र दगडखाण कामगार परिषद, शिवप्रेमी जनजागरण समिती, संभाजी ब्रिगेड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या.
पुस्तिकेचे वाटप : – डॉ. दाभोलकर यांच्या खुनानंतर जादूटोणाविरोधी कायदा सरकारने संमत केला. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन करून या कायद्याच्या पुस्तिकेचे वाटप नागरिकांना करण्यात आले. त्याचवेळेस महाराष्ट्र अंनिसतर्फे या कायद्याच्या प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्या संवादयात्रेचे स्वागत 20 मे 2014 रोजी पुण्यात पुलावर करण्यात आले. त्यातील सहभागी कार्यकर्त्यांनी या कायद्यातील विविध कलमांची विस्तृत माहिती दिली.
कीर्तन :- कीर्तनातून अंधश्रद्धा निर्मूलन करणारे श्यामसुंदर महाराज सोन्नर, अक्षय महाराज भोसले यांचे कीर्तन पुलावर दोन वेळा आयोजित करण्यात आले होते. संतांच्या विवेकी विचाराचाच प्रसार डॉ. दाभोलकरांनी केला, असे श्यामसुंदर सोन्नर यांनी प्रतिपादन केले.
रक्तदान शिबीर : – डॉ. दाभोलकरांचे जेथे रक्त सांडले, तेथेच रक्त गोळा करायचे या भावनेतून 20 एप्रिल 2014 रोजी पुलावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 57 बाटल्या रक्त गोळा करण्यात आले होते.
स्वच्छता मोहीम :- पुलाखाली नदीपात्रात खूपच कचरा व प्लॅस्टिक जमत असते. एका 20 तारखेला कार्यकर्त्यांनी पुलाखाली जाऊन तेथे साफसफाई केली. या कामात पुणे महानगरपालिकेच्या कर्मचार्यांनी बहुमोल मदत केली.
सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा व्हावा म्हणून आंदोलन चालू असताना जातपंचायतीच्या निवाड्याने पीडित झालेल्या व्यक्तींनी पुलावर येऊन आपले अनुभवकथन केले.
अभिनव कला महाविद्यालयाच्या मुला-मुलींनी पुलावरील आंदोलनात सहभागी होऊन वेगवेगळी चित्रे रेखाटली. एका आंदोलनाच्यावेळी कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी देहदान व अवयवदानाचे फॉर्म्स भरले. देशातील व परदेशातीलही अनेक पत्रकारांनी आंदोलनात सहभागी होऊन विचारवंतांच्या हत्येचा निषेध केला.
पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव या 20 तारखेला विशेष उपक्रम राबवितात. पुण्यातील होळकर पुलावर म्हसोबाचे देवस्थान आहे. तिथे करणीसाठी हजारो काळ्या बाहुल्या खिळ्यांनी एका झाडाला ठोकलेल्या होत्या. दि. 20 एप्रिल 2017 रोजी त्यांनी इतर कार्यकर्त्यांच्या आणि पोलिसांच्या मदतीने या बाहुल्या काढल्या. तसेच एका 20 तारखेला एका महिलेची जट सोडवून एक चांगला पायंडा पाडला.
फुरसुंगी येथील बापू गुंड हे अनेकदा प्रबोधनपर घोषणा लिहिलेले कपडे घालून आंदोलनात सहभागी झाले. एकदा रक्ताने माखलेले कपडे, साखळदंडाने बांधलेल्या देह अशा अवस्थेत ते सहभागी झाले होते.
20 जुलै 2014 रोजी नाशिक येथील डी. आर. चोपडेकर यांनी काढलेल्या शहीद डॉ. दाभोलकरांच्या चित्रांचे प्रदर्शन पुलावर भरविण्यात आले होते.
प्रत्येक आंदोलनाच्या वेळेस अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे वर्गणीदार होण्याविषयी आवाहन केले जाते. समितीच्या विविध उपक्रमांची व नवीन योजनांची माहिती दिली जाते.
पुणे शहरातील कार्यकर्त्यांबरोबरच पिंपरी-चिंचवड, चाकण, भोर, लोणावळा शाखांचे कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी होतात. दाभोलकर कुटुंबीयांपैकी एकजण कायम उपस्थित राहून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवतात; तसेच महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह इतर अंनिसचे पदाधिकारी, महाराष्ट्रभरातील विविध शाखांचे कार्यकर्ते व केवळ पुण्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर अनेकदा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरील आंदोलनात सहभागी झाले आहेत.
20 ऑगस्ट रोजी मात्र पुण्यातील एखाद्या मध्यवर्ती सभागृहात दिवसभराच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. अनेक लेखक, अभिनेते, विचारवंत व ज्येष्ठ नेते यात सहभागी होतात. विविध विषयांवर विचारमंथन करतात, कलाकृती सादर करतात. 20 ऑगस्टच्या या चारही वर्षांच्या कार्यक्रमाचे नियोजन प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते अतुल पेठे यांनी अतिशय नेमेपणाने व कौशल्याने केले आहे. कार्यकर्ते सकाळी पुलावर जमून कार्यक्रमस्थळापर्यंत पायी मोर्चाने जातात. या संबंधी त्या-त्या वेळी वार्तापत्रातून विस्तृत माहिती आलेली आहेच, त्यामुळे पुनरुक्ती करत नाही.
महर्षी विठ्ठल रामजी पुलावर गेली पाच वर्षे कार्यकर्ते प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला जमून जगाला या ठिकाणी सनातन्यांनी केलेल्या एका कार्यकर्त्या विचारवंताच्या खुनाची जाणीव करून देतात. खुनी अजून मोकाट आहेत, याबद्दल ‘निषेध’, ‘संताप’ व्यक्त करतात. पण हे सर्व ‘विवेकी विधायकते’च्या मार्गाने! यात मोलाचा वाटा आहे मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, सदाशिव फाळके, वसंत कदम, सुरेश सपकाळ, सोहम व्होरा आदी कार्यकर्त्यांच्या विशेष परिश्रमाचा!
–श्रीपाल ललवाणी
संपर्क : 9823977472