आज आम्ही उभे आहोत, त्यामागे एन. डी. पाटील सरांच्या विचारांची स्वच्छता, स्पष्टता आहे. इतका कणखर सत्यशोधकी वारसा चालवणारी फारच कमी माणसे महाराष्ट्रात असतील. अनेक वेळा प्राध्यापकांच्या सभेत ते म्हणाले की, “तुम्ही विज्ञानाचे प्राध्यापक असाल आणि घरात सत्यनारायण करत असाल, तर मी कुलगुरू झाल्यास तुमच्या विज्ञानाच्या पदव्या काढून घेण्याची शिफारस करीन.” या पद्धतीची त्यांची कणखर वैचारिक भूमिका आहे. त्यामुळेच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत त्यांनी असणं, ही स्वाभाविक गोष्ट आहे. शनि शिंगणापूरच्या आंदोलनाच्या वेळी ते आमच्याबरोबर नगरला उपोषणाला तीन दिवस बसले होते. त्यांच्या यापेक्षाही दोन महत्त्वाच्या गोष्टी मला जाणवतात. एक म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातल्या सत्यशोधकी चळवळीची अतिशय चांगली मांडणी ते करतात. रूढार्थाने विठ्ठल रामजी शिंदे हे सत्यशोधक नाहीतच; पण त्यांचे विचार किती संपन्न होते, याचं चांगलं भान त्यांच्यामुळे कार्यकर्त्यांना येतं. दुसऱ्या बाजूने जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरण यांच्या विरोधात ते लढत असल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळींची नाळ ही व्यापक परिवर्तन चळवळीशी कशी जोडली जायला पाहिजे, हेही समजतं.
या दृष्ठीने ‘फ्रेंड, गाईड अँड फिलॉसॉफर’ या भूमिकेमध्ये एन. डी. सर सतत अंधश्रद्धा निर्मूलन समितीला लाभले आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी एन.डी. सरांच्या बद्दल एका कार्यक्रमात व्यक्त केलेली कृतज्ञता…