Categories
भांडाफोड

भूत उतरविणाऱ्या पाटील बाबावर गुन्हा दाखल

जानेवारी - २०१८

मोराळे (ता. तासगाव, जि. सांगली) येथील एका लहानश्या खेडेगावात प्रशस्त घर. या घरात अनेक महिला-पुरुष, तरुणींच्या अंगात भूत येते आणि ही तथाकथित भुते भालचंद्र पाटील ऊर्फ दत्त महाराज यांना प्रचंड घाबरत असतात व पाटीलबुवा भूत उतरविण्याचे काम ‘इमान-इतबारे’ करीत असतात. कधी भुताला शब्दाने घाबरवून, तर कधी केस ओढून ‘पेड सर्व्हिस’ देत असतात.
हा भूत उतरविण्याचा सर्व दरबार जसाच्या तसा बाबाचा पुतण्या यू-ट्यूबवर अपलोड करतो आणि पुरोगामी महाराष्ट्रातील भोळीभाबडी जनता याला अजूनही ‘लाईक’ देते आणि एक लाखापेक्षाही जास्त लोक याला ‘व्ह्यू’ करतात, बघतात, ‘शेअर’ करतात.
परंतु अनेक लोक जरी चूक करीत असतील, तर ते बरोबर नाही. हा डॉ. दाभोलकरांचा संस्कार असल्याने व डॉक्टर नेहमी ‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोक व्यसन करीत असतील, तर ते समर्थनीय नाही’, असे म्हणत असल्याने तासगाव अंनिसने याबाबत पर्दाफाश करायचे ठरविले. नेहमीप्रमाणे धोके तर होतेच, बाबाला नेहमीप्रमाणे राजकीय वरदहस्तही होता. बाबाची संपूर्ण माहिती घेण्यात आली आणि अचानक कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक मा. विश्वास नांगरे-पाटील यांचा तासगावमध्ये जनतेच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी जनता-दरबार आयोजित करण्यात आल्याचे कळाले. शाखेमध्ये जनता-दरबारातच निवेदन देऊन बाबावर कारवाईची मागणी करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे जनता दरबारात फारूक गवंडी यांनी प्रभावीपणे मुद्दा उपस्थित करीत याबाबत कार्यवाहीची मागणी केली. उघडपणे कायद्यास आव्हान देत भूत उतरविण्याचा धंदा यू-ट्यूबच्या माध्यमातून पुरोगामी महाराष्ट्रात चालत असतात. पोलीस गप्प का?
असा प्रश्न उपस्थित राहून, आणखी आपण राम-रहिमची वाट पाहतोय का? असे मुद्दे अंनिसतर्फे मांडण्यात आले आणि ही कारवाई विश्वास नांगरे-पाटीलच करू शकतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. याला सकारात्मक प्रतिसाद देत मा. नांगरे-पाटील यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
दुसऱ्या दिवशी स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला; पण अंनिसचे चारित्र्य आणि संघर्ष करण्याची तयारी लक्षात आल्यानंतर रत्नागिरीनंतर मोराळेतील दुसऱ्या पाटीलबाबाला अटक करण्यात आली आणि तासगाव तालुक्यातील जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा क्र. ४८२ दि. १/१२/२०१७ अन्वये दाखल करण्यात आला. हा गुन्हा पोलिसांनी सोमोटो दाखल केला नाही म्हणून अंनिस जिल्हा उपाध्यक्ष मा. बाबूराव जाधव यांच्या नावे दाखल करण्यात आला.
भालचंद्र पाटील हा भूत उतरविण्यासाठी स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचे भासवून पुरुष, महिला, युवक-युवती यांच्या शरीरात झालेली भूतबाधा बाहेर काढण्यासाठी मंत्राच्या सहाय्याने भूतपिशाच्यांना आवाहन करीत होता. तसेच बाधित महिलांचे केस ओढून मृत्यूची भीती घालणे, असे अघोरी प्रकार करीत होता. पोलिसांच्या सोबत अंनिसचे डॉ. विवेक गुरव व शरद शेळके यांनी दरबारात धाड टाकून कारवाईत सहभाग घेतला.
पाटीलबाबाच्या दरबारात येणाऱ्या बाधित लोकांची तपासणी प्रत्यक्ष व रजिस्टरवरून डॉ. विवेक गुरव यांनी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. २१ व्या शतकात बी.ए., एम.ए., बी.बी.ए., एम.बी.ए., बी.ए.एम.एस. झालेल्या युवतींच्या, महिलांच्या अंगात आजदेखील भुते येतात आणि ती उतरविण्यासाठी त्यांना पाटीलबाबांची गरज लागते आणि म्हणूनच आपण २१ व्या शतकाच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या कितीही बाता हाणीत असू, तरी मानसिकदृष्ट्या आपण आजही १६ व्या शतकात वावरत आहोत आणि म्हणूनच दाभोलकरपानसरेंची गरज आजदेखील आहेच.
मा. पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर, पोलीस निरीक्षक तनपुरे, प्रियांका सराटे यांच्या सहकार्यामुळे व अंनिस तासगावचे साथी बाबूराव जाधव, डॉ. विवेक गुरव, अमर खोत, अशोक म्हस्के, प्रा. वासुदेव गुरव, शरद शेळके, पांडुरंग जाधव, दीपक कांबळे, लक्ष्मण रणवरे, कुंदन सावंत, अशोक पाटील, चंद्रकांत पोळ, आकाश कांबळे, अविनाश देसाई यांच्या निश्चयामुळे मध्यरात्री दोन वाजता जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत तासगाव तालुक्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना खरी आदरांजली वाहिल्याचे समाधान व्यक्त होत होते.