Categories
उपक्रम व्यसन

महाअंनिस व राष्ट्र सेवादलकडून इचलकरंजीमध्ये व्यसनमुक्ती अभियान

जानेवारी २०१९

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्र सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला, व्यसनाला बदनाम करूया!’ हे अभियान राबवण्यात आले. व्यसनमुक्ती सप्ताहानिमित्त श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालय, देशभक्त बाबासाहेब खंजिरे नाईट कॉलेज व अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले येथील ‘विवेकवाहिनी’च्या तरुणांकडून व्यसनविरोधी जनजागरण करण्यात आले. यामध्ये व्यसनांचे व्यक्तीवरील, कुटुंबावरील; पर्यायाने राष्ट्रावर होणारे दुष्परिणाम, व्यसनांमुळे होणारे अपघात, विविध लहान-मोठे गुन्हे आणि महिला व बालकांवरील शारीरिक, मानसिक अत्याचार अशा विषयांची चर्चा करण्यात आली. या महाविद्यालयांमध्ये प्रा.अरुण भोसले, अमोल पाटील, विभावरी नकाते, सौरभ पोवार या तरुणांनी मनोगत व्यक्त केले. तसेच रत्नदीप हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कोरोची येथेही हे अभियान राबविण्यात आले. अभियानाच्या समारोपप्रसंगी येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ तरुणांना ‘दारू नको, दूध प्या,’ असे आवाहन करीत दुग्धवाटप करण्यात आले. यावेळी ‘द दारूचा नव्हे, द दुधाचा’, ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच पोस्टर प्रदर्शन करण्यात आले. यावेळी रमेश लोहार, संजय रेंदाळकर, सुनील स्वामी आदींनी मनोगत व्यक्त केले. शरद कुंभार यांनी ‘बोलक्या बाहुल्यां’च्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने ‘व्यसनमुक्त व्हा’ असा संदेश तरुणांना दिला. यावेळी अभय दूध डेअरी यांच्याकडून दुग्धपानाची सोय करण्यात आली. विनायक चव्हाण, मंगल सुर्वे, शामराव नकाते, रिनिषा पाटील, रमेश पाटील, अनिल होगाडे, अशोक चौगुले, विनायक होगाडे, शहनाज मोमीन, वैशाली हुबळे, प्रफुल्ल आवळे, शरद वास्कर आदी उपस्थित होते.

– विभावरी नकाते, इचलकरंजी