Categories
अनिष्ट रुढी - परंपरा जट निर्मूलन

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे 100 वे जटा निर्मूलन

फेब्रुवारी २०१९

11 वर्षांच्या मुलीची केली जटेतून मुक्तता

राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या घावर गावातील एका व्यक्तीने जटा निर्मूलनाविषयी तीन महिन्यांपूर्वी पेपरमधील बातमी वाचून मला फोन केला, ‘माझे नाव गुपित ठेवणार असाल तर आपल्याला एक गोष्ट सांगावयाची आहे.’ ‘मी आपले नाव गुपित ठेवेन,’ हे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मला सांगितले की, ‘घावर या गावात इयत्ता 6 वीत शिकत असलेल्या (11 वर्षाच्या) मुलीच्या डोक्यात तीन वर्षांपासून जट आहे. तर आपण काही करू शकाल का?’ तेव्हा मी त्यांना विनंती केली की, ‘नाव आणि मोबाईल नंबर दिला, तर मी प्रथम फोनवर संपर्क करून त्यांना समुपदेशन करू शकेन.’

त्या व्यक्तीने मला नाव व माबाईल क्रमांक दिला. तसे तीन महिन्यांपासून मी सीता रांजणे यांना सतत फोन करून समुपदेशन करत राहिले. सीता रांजणे यांना तीन मुली व एक मुलगा. पतीच्या निधनानंतर सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. दोन मुलींची लग्नं झाली. मुलगा 11 वीत व सर्वांत छोटी मुलगी हर्षदा (वय 12 वर्षे) हिच्या डोक्यात गेली तीन वर्षांपासून जट होती; पण देवाच्या भीतीमुळे तिची जट काढण्यास तयार नव्हती. भेटावयास येते म्हटले तर नको म्हणून सांगायच्या. शेवटी ठरवले त्यांना फोन न करता, कोणतीही कल्पना न देता घावर गावी जाण्याचा निर्णय घेतला. मी, मिलिंद सर, नलावडे सर, सोलंकी सर राजगडाच्या जवळ असलेले घावर हे गाव शोधून सीता रांजणे यांचे घरी पोचलो.

गावात रांजणे आडनावाची माणसं आणि सर्व भावकीच…

फोनवरतीच नेहमी एकमेकींशी बोलणे होत होते. त्यामुळे एकमेकींना ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. मी माझे नाव सांगितले; नंतर आम्ही सर्व त्यांच्या घरी गेलो. मग आमची नेहमीची कसरत चालू झाली. जटेविषयी माहिती दिली. जटा निर्मूलनाचे फोटो, व्हिडीओ दाखवले. इथूनच खरी आमची परीक्षा चालू होते… हर्षाला बोलवून घेतले. डोक्याला ओढणी गुंडाळलेली प्रकृतीने बारीक असलेली हर्षा येऊन बसली. तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला; पण हर्षाने तोंडातून एक शब्द काढला नाही. या जटेमुळे तिचे सर्व बालपण हरवले होते. त्याचा परिणाम या कोवळ्या जीवावर पडला होता. शारीरिक व मानसिकदृष्ट्या कमकुवत झाली होती. शाळेतील इतर मुलींची शिवाशीव होते, त्यामुळे ती सतत आजारी पडते, असे सीताताईंचे मत होते. त्यामुळे तिला शाळेतही दोन-दोन महिने पाठवत नव्हत्या. आम्ही गेल्यानंतर गावातील सर्व भावकीचे लोक जमा झाले. सर्वांच्याच मनातील जटांविषयी विविध शंका दूर करता-करता दोन ते अडीच तास घेतले. पाहुण्यांचे फोनवर फोन येऊ लागले. जट काढू नका म्हणून सर्वच सांगत होते. आईची तर जट काढण्याची बिलकुल इच्छा नव्हती. ‘पौर्णिमा झाल्यानंतर बघूया,’ असं त्या म्हणत होत्या; पण मी मनाशी ठरवलेच होते की… हर्षाला आज या जटेतून मुक्त करूनच जायचे.

सीताताई खूप कारणे सांगत होत्या, ‘आम्हाला सूतक आहे, देवाच्या इथेच जट काढायची.’ तेव्हा मी, ‘देवाच्या दारात जट काढूया’ म्हटले आणि त्यांच्या मनाची तयारी झाली. जवळच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी मोकळ्या हवेत आज जटा निर्मूलन करणार होते.

गेली तीन वर्षे केसांना कंगवाच लावला नव्हता. जसजसी मी जट कापत होते, तशी हर्षा रडत-ओरडत होती. तिला प्रचंड त्रास होत होता. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. जट कापल्यानंतर तर मला धक्काच बसला. आतापर्यंत 99 महिलांचे जटा निर्मूलन केले; पण 100 वी जटा निर्मूलन करताना अशा छोट्या मुलीचे जटा निर्मूलन करावे लागेल, हे कधी ध्यानी-मनी आले नाही.

जटा कापत असताना मनात प्रचंड राग येत होता. कारण जेव्हा केसांच्या मुळाशी असलेले केस कापले, तेव्हा समोरचे दृश्य मन विचलित करत होते. कारण वारुळातून जशा मुंग्या बाहेर पडतात, त्याप्रमाणेच डोक्यात उवांची वारुळे तयार झाली होती. त्यातून असंख्य उवा बाहेर पडत होत्या. या छोट्याशा जीवाने तीन वर्षेहा त्रास कसा सहन केला असेल! आईला याविषयी काहीच कसे वाटले नाही? ‘देवाची जट आहे म्हणून उवांसाठी औषधही लावायचे नाही,’ असे देवऋषी बाईने सांगितले होते.

डोक्यातील उवांमुळे तिला ताप येत होता. ती सतत आजारी पडत होती; पण आईला वाटायचे पाळी असणार्‍या मुलीने स्पर्श केल्यामुळे हर्षाला त्रास होतोय. त्यामुळे ती आजारी पडते, असा गैरसमज झाला होता. त्यामुळे तिला शाळेत पाठवले जायचे नाही. खेळायच्या, बागडायच्या वयात या छोट्या जीवाला जटेच्या अंधश्रद्धेत जखडून ठेवले होते. हर्षाला जटेतून मुक्त करायचे, हे ध्येय उराशी बाळगूनच आले होते. अशा जटा असलेल्या अनेक महिलांना जटामुक्त करून त्यांना अंधश्रद्धेतून मुक्त करावयाचे आहे.

यावेळी गावातील महिला; तसेच विंजर येथील शाळेतील शिक्षक शेख सर, महाराष्ट्र अंनिसचे पदाधिकारी मिलिंद देशमुख, श्रीराम नलावडे, सुभाष सोलंकी या सर्वांनी समुपदेशनासाठी मोलाचे सहकार्य केले.