Categories
चिकित्सा

मोक्षाचा बाजार : काशी-वाराणशी

वार्षिकांक - २०१८

मी कोण? मला आत्मा आहे का? आत्म्याला पूर्वजन्म, पुर्नजन्म आहे का? मृत्यूनंतर त्याचे काय होते? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा, आहे हे जीवन सुखी–आनंदी करा. त्यासाठी अष्टांग मार्गाचा अवलंब करा, असे प्रतिपादन गौतम बुद्धांनी केले.

आत्मा–परमात्मा, स्वर्ग–नरक सर्व पुरोहितांनी दक्षिणा मिळविण्यासाठी रचलेल्या भाकडकथा आहेत. तेव्हा “भस्मिभूतस्य देहस्य, पुनरागमनम् कुत:” – मेल्यावर, देह जाळल्यावर परत येत नाही, असे प्रतिपादन चार्वाकांनी केले; पण लोकांना ते पचले नाही.

“मेलं की सगळं संपलं,” असं म्हणण्यापेक्षा “आत्मा अमर आहे,” “आपल्यामागेही तो हयात आहे,” हे ऐकायला बरे वाटते. तो आत्मा पुन:पुन्हा जन्म घेतो, पाप–पुण्याचा हिशोब करून स्वर्ग किंवा नरकात जातो, पुन:पुन्हा दु:ख भोगतो; पण त्यातून सुटका हवी असेल, तर “पुण्य करा” म्हणजे धर्माप्रमाणे वागा– जातिभेद पाळा, महिला–शूद्रांना शिक्षण देऊ नका, ब्राह्मणांना दक्षिणा द्या– उपवास करा – आणि काशीत गेलात, तर हेही करायची गरज नाही. काशीत मृत्यू आला की, परत जन्म नाही. फक्त मोक्षच! म्हटलं बघावी तर काशी कशी आहे?

गंगादर्शन

पहाटे पाचची वेळ. काशीतल्या गंगेच्या काठावरचे धार्मिक कार्य पाहण्यासाठी मी आणि राहुल दशाश्वमेध घाटावर पोचलो. राहुल कॅमेरा घेऊन फिरू लागला, तर मी सात-आठ फूट रुंद चौथर्‍याच्या कोपर्‍यावर बसलो. दगडी चौथर्‍यावर एक लाकडी चौथरा होता. पाच-सहा फळ्या जोडून, त्याला तीन इंच जाड लाकडाचा आधार देऊन हा उंचवटा तयार केलेला दिसत होता. त्यावर मध्ये एक दीड-दोन फूट लांब-रुंद दगडी फरशी होती. तिच्या दोन कोपर्‍याजवळ, दोन इंच व्यासाची दोन छिद्रे होती. या छिद्रात बांबू उभे केले की, दिवसा उन्हा-पावसापासून संरक्षण देणार्‍या सात फूट व्यासाच्या छत्र्या उभा करता येतात.

काशी के पंड्ये

एकेक भाविक गंगास्नानाला येऊ लागले होते. एकाने माझ्याशेजारीच कपडे उतरवून ठेवले. पिशवी ठेवली आणि लंगोटीवर तो पाण्यात उतरला. तीन डुबक्या मारल्या. पटकन बाहेर आला. पिशवीतून टॉवेल काढून अंग पुसले. धोतर-सदरा घालून त्याच चौथर्‍यावर गंगेकडे पाठ करून बसला. पिशवीतून नारळाच्या करवंट्या काढल्या. त्यात वेगवेगळ्या रंगांचे गंध होते; पांढरे, तांबडे, पिवळे!

कपाळावर प्रथम पांढरे पट्टे ओढले, त्यावर तांबडा ठिपका दिला. पिशवीतून पाकळ्या काढून त्याचा ढीग करवंटीच्या शेजारी ठेवला. दर्भाच्या म्हणजे वाळलेल्या गवताच्या काड्या बाजूला ठेवल्या. छोटा पितळेचा तांब्या बाहेर काढला. पटकन भरून आणला. कपडे पिशवीत भरले; बाजूला ठेवले. एकावर एक पाय ठेवून मांडी घातली आणि दोन सेकंदासाठी हात जोडले. तेच हात डोक्यावरून फिरवले. केस व्यवस्थित कापलेले; भांग पाडता येईल असे. मागे शेंडी सोडलेली. हाताला शेंडी सापडल्यावर हात पुन्हा पुढे आले. समोरचे साहित्य मागे-पुढे हलवले आणि माझ्याकडे वळला- “टिका लगाना है?…. गंगापूजा करनी है?….. पितृकार्य है?…”

मी मान हलवत राहिलो. एवढ्यात शेजारच्या चौथर्‍यावर कपडे ठेवून गंगास्नानाला गेलेल्या महिला परत आल्या. होड्यांच्या आडोशाने त्यांनी स्नान आटोपले होते. त्यांच्याकडे पाहत महाराजांनी आवाहन केले – “सब लोग आओ… टिका लगाओ.. जो इच्छा होगी… वो दे दो….”

स्नान संकल्प

एकेक महिला पुढे येऊ लागली. सगळ्या चौथर्‍याशेजारी येऊन हात जोडून उभ्या राहिल्यावर मग सुरू झाले- “…. विश्वमेधा… बृहस्पती… गंगाभवन… नमो नम:,…. गंगामाई ध्यान करो! “ॐ नमो भगवत्यै नारायण्यै, दशपाप हारायै, शिवायै, गंगायै, क्षयायै, रेवत्यै, भागीरथ्यै नमो नम:!” जन्म-जन्मांतरीय सर्व पापक्षय पूर्वक – परमेश्वरप्रीत्यर्थ गंगास्नानं करिष्यै!….

… कलियुगे…. भरतखंडे… विमुक्त…. बौद्ध्यावतारे… सबपरिवार… पुण्यपर्व… गंगास्नान:…. जय गंगे महादेवी.. सर्वकष्ट सर्व पाप हरो…. देवी नारायणी नमोस्तुते…. कुलके देव… महादेव… काशी लोक….

देणगी संकल्प

शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते; पण मंत्रोच्चार सुरू आहे, हे समजत होते. पुढचे शब्द मात्र मोठ्या आवाजात, स्पष्ट ऐकू येऊ लागले- “काशी लोक… ब्राह्मण-ब्राह्मणी, अन्नदान-भोजनदान, गोदान, वस्त्रदान, सुवर्णदान…. यथाशक्ती ब्राह्मण भोजन करेंगे.”

“संकल्प करो! ब्राह्मण का वचन करके 101 रुपये, 51 रुपये दक्षिणा दो।” प्रत्येक महिलेने मनातल्या मनात संकल्प आणि प्रत्यक्षात हाताची मूठ सोडली. 101, 51 रुपयांच्या सुरळी केलेल्या नोटा समोर पडल्या.

महाराजांनी “ओम नमो: शिवाय” म्हणत मान हलवली. नोटा गोळा करून व्यवस्थित लावल्या, वरच्या खिशात ठेवल्या. पुन्हा माझ्याकडे वळले – “आप कहाँ के है?”

“मैं कोल्हापूरसे आया हूँ।”

“अच्छा, मैं एक बार गया था कोल्हापूर, पूजा करने के लिए। एक्कीस हजार रुपये दक्षिणा मिली थी। पाटीलजी थे। उनके बहुत बुलडोझर है।”

“अरे, वो पाटील तो हमारे बाजू में रहते है। दोस्त है। अब उनके बहुत बुलडोझर है।” मला आधार मिळाला.

दोघांची ओळख पटली, नाते जुळले आणि सोनू महाराजांनी घाटाबद्दल माहिती दिली.

‘सर्टिफाईड’ गंगाजल

दोन तरुण आले. हातात प्लॅस्टिकचे छोटे गाडगे! पूर्वी तांब्याचा गडू असे, आता प्लॅस्टिकचे आले आहेत. त्याशिवाय लहान-मोठे कॅनही आहेत. पाच-दहा-वीस रुपये अशा त्यांच्या किमती आहेत. घाटाकडे येणार्‍या रस्त्यावर केवळ कॅन विकणारीही दुकाने आहेत. रोजचा खप किमान पोट भरण्याएवढा तरी असावा.

तरुणांनी हातातले गाडगे महाराजांच्या समोर ठेवले. त्यात त्यांनी किनार्‍यावरचेच पाणी भरले होते. महाराजांनी बेलट्यातला गंध गाडग्याला लावला. हातात फुलाच्या दोन-दोन पाकळ्या आणि तांदळाचे चार दाणे दिले.

“ओम हो पवित्रोहा पवित्रोऽऽ….” गंगामाताका ध्यान करो… पुष्पं समर्पयामी… अक्षतां समर्पयामी…. बौध्दावतारे… भारत वर्षे…” आणि शेवटी- “ब्राह्मण-ब्राह्मणी अन्नदान, भोजनदान, गोदान…” एका तरुणाने 51 रुपये समोर ठेवले. दुसर्‍याने 21 रुपये ठेवले. “तीस रुपये और चाहिए… अपने संकल्प किया है….”

पण खिशात पैसेच नव्हते किंवा असले, तर बसभाड्याएवढेच असतील. त्या तरुणाने दाद दिली नाही. तेव्हा “रहने दो, फिरसे आओगे, तब तीस रुपये देना ब्राह्मणके सामने संकल्प किया है…” असे सांगत पैसे व्यवस्थित खिशात ठेवले. दोघांनाही आशीर्वाद दिल्यावर हा अंक संपला. गंगेचे पाणी पंड्याकडून दक्षिणा देऊन पवित्र करून घ्यावं लागतं.

आध्यात्मिक ‘टॅक्स’

गंगास्नान करणारे आणि गंगाजल घरी नेणार्‍यांवरील हा ‘टॅक्स’ कुवतीप्रमाणे वाढत जातो. अस्थिविसर्जनाचा ‘टॅक्स’ एकवीसशे, अकराशे असा असतो.

अस्थिविसर्जन

दोन भाऊ आणि एक बहीण अस्थिविसर्जनासाठी आले होते. त्यांना आपले गोत्र काही सांगता येईना, तेव्हा कश्यप गोत्र जोडून मंत्र सुरू झाला- “ओम महामांगल्ये… कश्यप गोत्र उत्पन्न… तीर्थक्षेत्रे… पिंडपूजन… गोदान, वस्त्रदान….. पंडितजी ये देंगे … भोजन एक बारतो देना है… पिताजीको आत्मशांती…. एक बार कह दिये…. आप नहीं मानते।”

सर्व धार्मिक कार्यात ब्राह्मणाला काय काय देतो हा संकल्प सर्वांत महत्त्वाचा! 2100 रुपये दक्षिणा घेतल्यावर त्यांनी बाजूच्या नावाड्याला हाक मारली…. “ए ठाकरू- इनको जरा… आधा गंगेमें ले जाकर छोड दो।… कम पानी में नहीं छोडना, पैर लगते है।”

काठावर कमी पाण्यात सोडले, तर अस्थींना आंघोळ करणार्‍यांचे पाय लागणार, तेव्हा गंगेच्या मध्यावर जाऊन सोडा, असा महत्त्वाचा सल्ला त्या मुलांना मिळाला.

‘ठाकरू’ म्हणजे एक दाढीचे खुंट वाढलेला, साध्या कपड्यातला इसम टॉवेलने तोंड पुसत पुढे आला! त्याने आल्याबरोबर घोषणा केली- ‘तीन सौ पचास लेंगे’ “कम पानी में…. ’ चा सल्लाही पुन्हा दिला. शेवटी शंभर रुपयांमध्ये सौदा पटला.

नावेतून नदीच्या मध्यावर जायचे असल्याने तिघेही सावरून चालू लागले. किनार्‍याला उभ्या असणार्‍या होडीत त्यांनी पाय ठेवले. दहा-पंधरा फूट लांबीची होडी, तिला लागून दुसरी-तिच्यामध्ये टोकाला गेल्यावर ‘ठाकरू’ म्हणाला – ‘छोड दे इधर…’

दोन नावा चालत ओलांडण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी त्याने शंभर रुपये घेतले आणि पाहायला येणार्‍या आमच्या पुढेही ‘पचास रुपये दो’ म्हणत हात पसरला.

गंगाघाट

गंगेच्या काठावर मोठमोठ्या इमारती आहेत. त्यात धर्मशाळा किंवा मंदिरे आहेत. तिथून पाण्यात उतरता यावे म्हणून पायर्‍या बांधल्या आहेत. सर्वसाधारणपणे पन्नास-साठ पायर्‍या उतरल्यावर पाण्यात पाय ठेवता येतो. पायर्‍या जिन्याप्रमाणे फूटभर रुंदीच्या असतात; पण काही दहा-बारा फूट रुंद करून त्यांचा चौथरा तयार केलेला असतो.

पन्नास-शंभर फूट लांबीच्या किनार्‍यावर पायर्‍या बांधल्या की, एक घाट तयार होतो. काशीमध्ये असे अनेक घाट आहेत. एका बाजूला वरुणा नदी, तर दुसर्‍या बाजूला ‘अस्सी’ नदीचा घाट. या दोन्हीचा मधला भाग म्हणजे वाराणशी!-काशी!!

त्यालाच मधल्या काळात ‘बनारस’ म्हटले जाऊ लागले; पण शासनाने पुन्हा त्याची ‘वाराणशी’ केली. किनार्‍याच्या छोट्या-छोट्या भागाला, घाटाला नाव दिल्याने प्रत्येक घाटासाठी नवीन धार्मिक कथा तयार करता येते. प्रत्येकाचे महत्त्व वेगळे सांगता येते. तशी देवदेवता आणि ऋषींची संख्या अफाट असल्याने कथा आणि पात्रे रिपीट करावी लागत नाहीत.

आता पाहिलेला ‘दशाश्वमेध घाट’ – इथे कुठल्यातरी राजाने की, ब्राह्मणाने, दहा अश्वमेध यज्ञ केले होते. म्हणून हा दशाश्वमेध! शीतला घाटावर नवरात्रात नऊ दिवस वेगवेगळे दिवे लावून ‘शितला मैय्या’ची भक्ती केली जाते. अस्सी घाट प्रशस्त आहे, इथे अस्सी नदी गंगेला मिळते- संगम होतो.

तुलसीदास एका घाटावर नेहमी येत. इथले निसर्गसौंदर्य त्यांच्या आवडीचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्या घाटाला तुलसीदास घाट नाव मिळाले. हरिश्चंद्र घाटाशी राजा हरिश्चंद्राची कथा जोडली आहे. इथे आणि मणिकर्णिका घाटावर प्रेतांना अग्नि दिला जातो; त्याशिवाय केदार, ललिता, हनुमान, मनमंदिर, भोसला, सिंधिया, शिवाला इत्यादी नावे घाटांना आहेत.

इथे गंगा उत्तरवाहिनी आहे. म्हणजे नागमोडी वाहणार्‍या गंगेच्या प्रवाहाची इथली दिशा उत्तर आहे. पावसाळ्याप्रमाणे उन्हाळ्यातही गंगेचे पात्र पाण्याने भरलेलेच असते. उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळल्याने पाणी येत राहते.

पापमोचनासाठी गंगास्नान

गंगेत स्नान केल्याने सर्व पापे-जन्मजन्मांतरीची पापे-दशविध पापे नष्ट होतात- म्हणून दहावेळा डुबकी मारायची असते, अशीही माहिती सोनू महाराजांनी दिली. आम्ही पापे केली नसल्याने डुबकी न मारताच महाराजांचा निरोप घेतला. अशा पंडितांचे अनेक चौथरे ओलांडले. संकल्प सांगताना त्यांचा एक डोळा नव्या भाविकांचा शोध घेत असे. दिसणार्‍या भाविकाला ‘पूजा करनी है?…. पिंडदान करना है?….’ विचारले जाई. शेवटी ‘ब्राह्मण भोजन दो।’ ही विनंती तरी आहेच. शेवटी एकाकडे बघून मी म्हटले – “सुबहसे कुछ खाया नहीं? सात बजे है।”

सात वाजताही बर्‍यापैकी ऊन पडले होते. इथे सूर्य लवकर उगवतो आणि लवकर मावळतो. हा भाग आपल्या पूर्वेला आहे. पुढच्या पायर्‍यांवरचा चिखल ओलांडत मणिकर्णिका घाटाकडे चाललो. हरिश्चंद्र घाट आणि मणिकर्णिका घाट इथे प्रेते दहन केली जातात.

मणिकर्णिका घाट ः महास्मशान

चिखलात, प्रेताला बांधून आणलेल्या तिरडी म्हणजे ताटीच्या काठ्या, प्रेतावरील चुनरी, राख, कोळसे यांचा खच पडलेला. ताटीच्या काठ्यांवर पाय देऊन चालल्याने पायाला चिखल लागत नव्हता. या घाटावर शेडमध्ये दोन आणि खाली किनार्‍याजवळ दोन प्रेते जळत होती. धूर होऊ नये, हवा मिळावी म्हणून सिमेंटच्या जाळी व स्टँडचा वापर केला जातो.

स्टँडमधील कोळसा व राख खोर्‍याने काढण्याचे काम शेजारी सुरू होते. स्टँड लवकरात लवकर रिकामे करून देण्यासाठी पाणी मारून चिता विझवली जाते, त्यामुळे लाकडाचा कोळसा शिल्लक राहतो.

मागे लहान-लहान बोळ असून सर्वत्र पंधरा-वीस फूट उंचीपर्यंत लाकडे व्यवस्थित रचून ठेवलेली दिसतात. “आपण चारशे रुपये मण प्रमाणे लाकूड विकतो आणि एका प्रेताला पाच मण लाकूड लागते,” अशी माहिती एका लाकूड विक्रेत्याने पुरवली.

गावकर्‍यांनी बाहेरून लाकूड आणले तरी चालते; पण विक्रेत्यांचे हितसंबंध इथल्या लाकडात गुंतले आहेत. ते बाहेरून लाकूड आणणार्‍याला अडवण्याचे उपाय शोधतात. त्यातील एक उपाय म्हणजे प्रेतासाठी लागणारा अग्नी न देणे! अग्नी देण्याचे काम डोंब करतात. डोंबचा अर्थ अग्निदहन काम करणारा इसम. हिंदू धर्मातील 16 संस्कारातील शेवटचा संस्कार… अग्निदहन!

प्रेतांना अग्नी देणारा डोंबराजा

मणिकर्णिका घाटावर एका दगडी इमारतीचा तळ मजला- मोठ्या इमारतीत पार्किंगसाठी जागा सोडावी, तसा काटकोनात मोकळा आहे. खांब तीन-चार फूट रुंदीचे भक्कम दगडी आहेत. या व्हरांड्यात दोन हात लांबीची आणि पाच इंच व्यासाची दोन लाकडे जळत होती. हा प्रेतासाठी तयार असणारा अग्नी. हा हजारो वर्षे जळत आहे. म्हणजे त्यात विझण्यापूर्वी नवीन लाकूड टाकतात; पण त्याचेही कौतुक. महाराष्ट्रात प्रेत जाळण्यासाठी अग्नी ज्याच्या-त्याच्या घरून एका मडक्यातून नेला जातो. गावाबाहेर, रानात अग्नी पेटविण्यासाठी सोबत नेणे हा उपाय आहे. वाराणशीमध्ये अशा रीतीने अग्नी घरून आणण्याची गरज नाही, रुढी नाही. अग्नी सतत पेटत ठेवण्याचे काम इथे डोंब समाज करतो. त्याचबरोबर डोंबानीच प्रेताला अग्नी देण्याची प्रथा आहे. डोंबाने अग्नी दिल्याशिवाय आत्म्याला सद्गती नाही, असा समज आहे. या कामासाठी रु. 250 द्यावेत, अशी लेखी नोटीस लावलेली दिसते.

सूचना :- “सर्वसाधारण को सूचित किया जाता है की…”

चौधरीचे 501 व आग लावण्याचे 250 रुपये घ्यावेत, अशी सूचना असली, तरी हा दर झाला सरकारमान्य! खरा दर याच्यावर किती वाढेल, याचा अंदाज करणेही आपल्या हाती नाही.

एकेकाळी गरीब लोकांच्या जमिनी नावावर करून घेण्यापर्यंत या दराची कमाल मर्यादा वाढली होती. राजे-रजवाडे, सरदार, जमीनदार, व्यापारी, श्रीमंत व्यक्ती यांनी खुशीने दिलेल्या देणग्यांनी अनेक डोंबांना कोट्यधीश केल्याचेही एकाने सांगितले.

सध्या डोंब समाजाची 350 घरे असून, लोकसंख्या पाच हजार असल्याची माहिती मिळाली. हे काम वंश-परंपरेने मिळाले असल्याने, त्याच्या भावकीनुसार वाटण्या केल्या आहेत. ठरलेल्या दिवशी त्यांनी दहन संस्कार करून मृताला मोक्षाचा रस्ता दाखवावा आणि त्या दिवसाचे उत्पन्न घ्यावे, अशी प्रथा आहे.

डोंब स्वत:ला ब्राह्मण समजतात; पण त्यांचा समज स्मशानघाटापर्यंतच मर्यादित आहे. बाहेर त्यांना ब्राह्मणाचा सन्मान मिळत नाही.

ब्राह्मण बनले डोंब

डोंब ब्राह्मण बनल्याची कथा शंकर-पार्वतीशी जोडली आहे. काशीला त्याकाळी आनंदवन म्हणत असत. एकदा भगवान शंकर इथे पार्वतीसह भ्रमण के लिए म्हणजे फिरायला आले. त्यांनी मणिकर्णिका घाटावरचा कुंड जटांनी भरला. त्यानंतर त्यात माता पार्वतीने स्नान केले. स्नान करताना पार्वतीचे कुंडल हरवले. ते कल्लू नावाच्या ब्राह्मणाने उचलले. भगवान शंकरांनी विचारूनही त्यांनी कबूल केले नाही. तेव्हा शंकरांनी कल्लूला त्याच्या पुढच्या पिढीसकट शाप दिला. तेव्हापासून कल्लू आणि त्याचे वंशज डोंब बनले आणि चितेला अग्नी देऊ लागले. म्हणजे ते मूळचे ब्राह्मण; पण इतरांना मान्य नाही. आता त्यांचा पूजापाठाशी संबंध नाही.

डोंब राजा बनले

डोंबाना राजा उपाधीही मिळाली आहे. ते कुठल्या राजवंशाशी संबंधित नाहीत किंवा त्यांची राजे-महाराजे-सरदारांशी सोयरिक होत नाही.

त्यांना राजा हरिश्चंद्राने ‘राजा’ बनवले. ऋषीने हरिश्चंद्राचे सर्व काही काढून घेतल्यावर पोट भरण्यासाठी डोंबाकडे कामाला राहिला. राजा ज्याच्याकडे नोकर आहे, तो मालक आपोआपच राजा-महाराजा बनला. डॉक्टरची बायको डॉक्टरीण तसे राजाचा मालक महाराजा बनला.

राजा हरिश्चंद्र घाट

राजा हरिश्चंद्राने प्रेताचे दाहसंस्कार करण्याचे काम या घाटावर केले. त्या घाटाला ‘राजा हरिश्चंद्र घाट’ नाव मिळाले. दारिद्य्राने राजा हरिश्चंद्राचा मुलगा वारला. त्याचे अंत्यसंस्कारही मोफत झाले नाहीत. त्याला आपल्या बायकोच्या अंगावरील साडीचा तुकडा डोंबाला द्यावा लागला. ‘साडीचा तुकडा’ ही प्रतीकात्मक कल्पना असावी.

त्यामुळे इथे अग्नी कोणालाही मोफत मिळत नाही.

हरिश्चंद्राची कथा

सत्यव्रती राजा हरिश्चंद्राची कथा लोकप्रिय आहे. राजा हरिश्चंद्र अयोध्येचा राजा आहे. तो सत्यप्रिय, न्यायप्रिय आणि लोकप्रिय आहे. त्याची राणी तारामती आणि राजपुत्र रोहिदास आनंदाने, सुखाने राज्यशकट हाकत होते.

राजाची परीक्षा घेण्याचे एकदा विश्वामित्र ऋषींच्या मनात येते. विश्वामित्र राजर्षी आहेत, म्हणजे क्षत्रिय असूनही स्वकर्तृत्वाने ते ऋषिपदाला पोचलेले आहेत. ब्राह्मण बनले आहेत.

राजाची परीक्षा घेण्यासाठी ऋषी त्याचे राज्य आणि संपत्ती दान म्हणून मागतात. ती देऊन राजा काशीला येतो. अजून भरपाई करण्यासाठी राजा आपल्या बायको व मुलाला विकतो, ते दास-दासी बनतात. राजा स्वत:लाही विकतो. प्रेतावर अग्निसंस्कार करणे, प्रेताच्या अंगावरील कपडे गोळा करणे, अग्निसंस्काराचा कर गोळा करणे, हे त्याचे काम आहे.

दासी बनलेल्या तारामतीला पडणारे प्रचंड कष्ट, मुलाचे कष्ट आणि हरिश्चंद्राचे निकृष्ट काम याची वर्णने करून अनेक कीर्तनकारांनी करुण रस आळवला आहे. श्रोत्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहिले आहेत.

शेवटी जंगलात लाकडे तोडायला गेलेल्या रोहिदासला सर्पदंश होतो व तो मरतो; तारामती मालकाला विनंती करून, आपले काम पूर्ण केल्यानंतर अग्निसंस्कार करण्यासाठी मुलाचे प्रेत स्मशानात नेते. तिथे हरिश्चंद्राला ही संकटे पाहून अत्यंत दु:ख होते. अग्निसंस्कारासाठी पैसे आणायला गेलेली तारामती चोराकडून अलंकार घेते आणि शिपायांच्या हाती लागते. तिला शिक्षा म्हणून ठार मारण्यासाठी स्मशानात आणतात. तिचे मुंडके उडवण्याचे काम हरिश्चंद्रालाच करायचे असते. हरिश्चंद्र कुर्‍हाड उचलतो; प्रत्येक वेळी ‘आपले वचन मागे घे’ असे आवाहन त्याला विश्वामित्र करतो; पण वचन पाळण्यासाठी सर्व कष्ट सहन करतो. शेवटी ऋषी प्रसन्न होतो, राजाला राज्य व बायको-मुलगा परत मिळतात.

कष्ट कुणासाठी?

कथेत राजा, त्याची बायको व मुलाने प्रचंड कष्ट व दु:ख सहन केले आहे; पण ते कुणासाठी? स्वत: सुखी व्हावे, बायका-पोरांना सुखी करावे, म्हणून नाही; प्रजेला सुखी करावे म्हणूनही नाही.

त्या काळी माणसे विकत घेऊन त्यांना दास-दासी बनवून, राबवून घेण्याची प्रथा होती, त्यांना क्रूरतेने वागवले जाई, याचे वर्णन कथेत आहे; पण त्या विरोधात राजाने ‘ब्र’ शब्द उच्चारलेला नाही. चांडाळांना प्रेतावर अग्निसंस्कार करण्याचे, मृत्युदंड अमलात आणण्याचे काम आहे, या क्रूर कामापासून त्यांची सुटका करावी, असे राजाच्या मनातही येत नाही.

कथा संपली, तरी दास-दासी आणि चांडाळाच्या दु:खात फरक पडत नाही. राजा सर्व कष्ट उपसतो, दु:ख सहन करतो, ते ऋषीला दिलेल्या वचनाला जागण्यासाठी. ऋषीला दिलेले वचन पूर्ण करणे, म्हणजेच सत्यव्रत!

घाटावर धर्माच्या नावाखाली गोदान, सुवर्णदान, अन्नदान इत्यादी संकल्प वदवून घ्यायचे आणि त्यानंतर त्या बदल्यात घसघशीत दक्षिणा मिळवायची, ही जुनी ऋषींची परंपरा काशीत आजही गिरवली जाते; किंबहुना त्यावरच काशी-वाराणशीचे ‘अर्थशास्त्र’ अवलंबून आहे.

डोंब समाजापुढील आव्हाने

डोंब राजांची संख्या वाढली, तसे कामाचे दिवस आपसांत वाटले गेले आहेत. दर दिवसाच्या मानधनावर त्यांचा अधिकार आहे. पूर्वीप्रमाणे राजेरजवाडे राहिले नाहीत. भरमसाठ देणगी किंवा जमिनी दान मिळण्याचे दिवस निघून गेले.

लाकडे जाळून प्रचंड प्रदूषण होते; हवेचे आणि राखेमुळे पाण्याचेही. गंगाशुद्धिकरण चळवळ सुरू आहे; शासन उपाय योजत आहे. काशी स्मशानात विद्युतदाहिनी आली आहे; मग अग्नी डोंबाकडून घेण्याची गरज भासणार नाही. डोंब राजांची नवी पिढी-राजपुत्र हे कष्टाचे काम करायला नाखूष आहेत.

सर्व राजेरजवाडे नष्ट झाले, त्यांचे वंशज परंपरा-रुढी सोडून नवी कामे करत आहेत. शिक्षण घेऊन अधिकारी बनत आहेत, निवडणुकीला उभे राहून मुजरे स्वीकारण्याऐवजी जनतेला मुजरा करत आहेत. बापजाद्यांच्या संपत्तीवर त्यांचे बरे चालले आहे.

डोंबांची परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्याकडे वडिलार्जित संपत्ती फारशी नाही; परंपरा-रुढी मात्र पाळावी लागत आहे. अशी आव्हाने त्यांच्यासमोर आहेत.

पंड्ये

अशी आव्हाने ब्राह्मणांच्या पुढे कमी आहेत. इथे ब्राह्मणांना पंडित म्हणतात; त्याचा अपभ्रंश ‘पंड्ये’ झालेला आहे. ‘काशी के पंड्ये,’ असा त्यांचा उल्लेख केला जातो.

घाटावर पिंडदान, पितृकार्य, अस्थिविसर्जन, गंगापूजा करणे, गंगाजल मिळवणे इत्यादी कार्याच्या इच्छेने, देशभरातून श्रद्धाळू येतात. त्यांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत आहे. पंड्यांच्या मिळकतीमागे भ्रमापेक्षा श्रद्धेचा भाग मोठा आहे.

काशीबाबत श्रद्धा

काशीबद्दलची श्रद्धा वाढवण्याचे काम आज टी.व्ही. चॅनल करताना दिसत असले, तरी फार पूर्वीपासून हे काम धर्मग्रंथांनी केले आहे. हरिश्चंद्राची कथा पुराणात आहे.

गंगास्नानाने पापमुक्ती होते; काशीत मृत्यू आल्यास जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्ती मिळते, म्हणजे मोक्ष मिळतो; मरताना गंगाजल तोंडात घातल्याने पुण्यप्राप्ती होते. गंगेत अस्थिविसर्जन केल्याने मुक्ती मिळते; मणिकर्णिका घाटावर-डोंबाच्या हातून अग्निसंस्कार केल्यास प्रेतात्म्यास मोक्ष मिळतो.

अशा तर्‍हेच्या अनेक श्रद्धांचा भडिमार धर्मग्रंथ सतत करत असतात. त्यातून काशीचे महात्म्य सतत वाढताना दिसते.

काशीत मरण ः मोक्षप्राप्ती

‘आपल्याला काशीत मरण यावे,’ अशी इच्छा अनेक भाविक बाळगून असतात. त्यावर एक उपाय म्हणजे बाहेर राहत असले तरी, मरताना काशीत यायचे! अनेकजण असे मरण्यासाठी काशीत येतात. असे मुद्दाम आणल्यास त्याला काशी करवट म्हणतात.

काशीत मरून मोक्ष मिळवणार्‍यांना मदत करावी, अशा सद्हेतूने काही प्रतिष्ठितांनी ‘मोक्षभवन’ उभे केले आहे. अस्सी घाटाजवळ मोक्षाची इच्छा धरून मृत्यूची वाट पाहत असलेल्या परगावच्या नागरिकांसाठी हे मोक्षभवन आहे.

जगभर विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग आहेत. नोकरदारांसाठी बोर्डिंग काढणारे महाभाग फक्त काशीतच दिसतील. स्वयंसेवी संस्था उभी करून लोकांच्या देणग्यांवर, शरीरत्याग करण्यासाठी आलेल्या भाविकांना इथे नि:शुल्क खोली मिळवून दिली जाते.

महिन्याभरात मृत्यू आला नाही, तर मात्र त्यांना खोली खाली करावी लागते. त्यांना परत त्यांच्या गावी पाठवले जाते. मानवी जीवनामध्ये मृत्यू ही एक अपरिहार्य व सत्य बाब आहे. मग मृत्यू आनंदाने का स्वीकारू नये? त्याला भ्यायचे कारण काय? मोक्षभवन उभारण्यात आणि चालवण्यामागे हा विचार आहे. आजपर्यंत पंधरा-वीस हजार व्यक्तींनी इथे देह सोडला असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले.

मुक्तीसाठी इनाम

गंगास्नानाने मुक्ती मिळते, हे अनेकजण सांगत असले तरी काही भाविक त्यावर विश्वास ठेवत नाहीत. अशा अश्रद्ध नागरिकांसाठी ‘काशीदर्शन महात्म्य’ ही माहितीपूर्ण पुस्तिका प्रकाशित करणार्‍या राजेंद्रकुमार आचार्य यांनी इनाम जाहीर केले आहे. – ते म्हणतात – “जो व्यक्ती इस पुस्तक को पढकर यह सिद्ध कर दे की, गंगास्नान करनेसे मुक्ती नहीं होती है, उसे 5000 रुपयेका इनाम दिया जायेगा।”

ग्रंथातील काशीमहात्म्य

‘काशीदर्शन महात्म्य’ या पुस्तिकेत पुराणातील काशीवर्णनाची ओळख करून दिली आहे. पहिल्या अध्यायात नारद काशीचे वर्णन करत असून काशी पुराधिश विश्वनाथ, विष्णू आणि लक्ष्मीच्या सहाय्याने इथल्या दिवोदास राजाला पराभूत करून काशीमध्ये राहत असल्याचे म्हटले आहे.

नारदीय पुराणानुसार पापी असो की पुण्यात्मा-ज्या व्यक्तीने काशीला प्रदक्षिणा केली, त्याला सप्तद्वीप, सप्तसमुद्र, सातपर्वतांसह पृथ्वीप्रदक्षिणेचे फळ मिळते.

दुसर्‍या अध्यायात शूरवीर भूरिद्युम्न नावाचा राजा राज्य गेल्यावर राणीसह रानात जातो. भूक लागल्यावर राणीला मारून खातो, पुढे चार ब्राह्मणांना मारून त्यांच्याकडील धान्य खायला घेतो. उपरती झाल्यावर शाकल्य मुनीच्या आश्रमात येऊन प्रायश्चित्त विचारतो. ऋषींनी त्याला पाच काळे कपडे घालून काशीला दर्शनासाठी जायला सांगितले. काशीचे दर्शन होताच पाचही कपडे पांढरे झाले आणि राजाचे पाप फिटले. काशीमध्ये कोठेही शरीर त्यागले असता पाप्याला सुद्धा मोक्ष मिळतो, या नियमानुसार राजालाही मोक्ष मिळाला.

तिसर्‍या अध्यायात काशीत राहून पापकर्म केले, तर तीन हजार वर्षे रूद्रपिशाच्च होण्याची भीती घातली आहे, त्यासाठी इथे धर्माचरणच करावे. पृथ्वीवर अनेक तीर्र्थे आहेत; पण सुधारण्यासाठी एकमेव काशी असल्याची ग्वाही दिली आहे.

इथे राहून एक वर्षभर ब्राह्मणभोजन दिले, तर गंगेत जेवढे वाळूचे कण आहेत, तितकी वर्षे ब्राह्मण भोजन घातल्याचे पुण्य मिळते. नोटा दुप्पट करणारे आपण पाहिले आहेत; पण इथे पुण्य लाखोपट करण्याची सोय आहे.

चौथ्या अध्यायात नारदजींनी खुद्द सूर्यनारायणालाच काशीमहात्म्य विचारले- तेव्हा सूर्यनारायणांनी सांगितले की, सर्वत्र मनुष्याचा धर्म उपयोगी पडतो. इथे मरणार्‍याला ‘काशी’ ही केवळ दोन अक्षरे तारकमंत्राद्वारे तारतात आणि मोक्ष मिळवून देतात; मग मरणारा पापी असो की, पुण्यात्मा! पाप्याला फक्त भैरवी यातना भोगाव्या लागतात; नरकात जावे लागत नाही. (ही खास सवलत आहे.) पाचव्या अध्यायात बळीसुद्धा काशीला येऊन शिवमूर्तीची स्थापना करून गेला.

धीर देणे

काशीत मेल्यास पाप्यालासुद्धा मोक्ष मिळण्याची चांगली सोय इथे आहे. लोकप्रियता मिळायला अजून काय हवे?

मृत्यू आणि मृत्यूनंतर आपले कसे होणार? ही काळजी प्रत्येक माणसाला सतावत असते. अशा भयग्रस्तांना धीर देण्याचे, मोक्षाचे आश्वासन देण्याचे काम काशीने केले आहे.

पुराणात काशी

काशीचा उल्लेख अनेक पुराणात आहे. त्यापूर्वीच्या ऋग्वेदातही उल्लेख दाखवला जातो. ही शिवाची नगरी आहे. त्या अर्थी वेदपूर्वकालीन असल्याचेही काशीप्रेमी सांगतात. ब्रह्माचे पाचवे शिर काटल्यामुळे खुद्द शंकराला ब्रह्महत्येचे पाप लागते. कापलेले शिर शंकराच्या हाताला चिकटले. बारा वर्षे अनेक तीर्थे फिरूनही उपयोग झाला नाही. शेवटी काशीमध्ये प्रवेश करताच त्यांचे ब्रह्महत्येचे पाप फिटले आणि शिर हातापासून वेगळे झाले.

महाभारतातली काशी

महाभारतात काशीराजाचा उल्लेख असून भीष्माने काशीराजाच्या तीन कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचे ‘विचित्रवीर्या’साठी अपहरण केल्याचा उल्लेख आहे. त्यातील एक पुढे शिखंडी बनून भीष्माच्या मृत्यूला कारण ठरते. उरलेल्या दोघींना नवरा मेल्यावर ‘नियोग’ पद्धतीने व्यासापासून धृतराष्ट्र, पंडू ही दोन मुले होतात, तर दासीपासून विदूर जन्मतो. म्हणजे महाभारताची सुरुवातच काशीकन्यांपासून होते. आजच्या काळात आवडलेल्या तरुणींचे अपहरण करून लग्न लावून देतो, असे तरुण कार्यकर्त्याला नुसते आश्वासन दिले, तर आमदाराला तोंड चुकवत जगावे लागते. भीष्माने तर तिघींचे अपहरण केले होते.

बुद्धकालीन काशी

बुद्धजन्माच्या वेळी काशी ‘जनपद’ प्रसिद्ध होते. ‘अंगुत्तर निकाय’मध्ये भारतातील 16 महाजनपदामध्ये एक काशी आहे. जातककथांमध्ये काशीमधील सुंदर आणि मौल्यवान रेशीम; तसेच सुगंधित द्रव्यांचा उल्लेख आहे.

कोसलच्या राजकुमारीचा बिंबीसार या मगध राजाशी विवाह झाला, तेव्हा काशी त्याला हुंड्याच्या रुपात मिळाली. चौथ्या शतकात चिनी प्रवासी फाह्यान आणि सातव्या शतकात युवान च्वांगने काशीला भेट दिली होती. त्याला 30 बौद्धविहार आणि शंभर हिंदू मंदिरे पाहायला मिळाली.

बौद्धांचा पाडाव झाल्यावर काशीचे महत्त्व अधिक वाढले. मोगल साम्राज्यातही काशीचे महत्त्व टिकून होते. मोगलसत्ता क्षीण बनली, तेव्हा अवधचा नबाब सफदरजंग याने काशीवर अधिकार प्राप्त केला; त्याच्या वंशजांनी काशी ईस्ट इंडिया कंपनीला देऊन टाकली. काशीनरेशांनी नबाबापासून मुक्ती मिळवली.

काशीमधील देवळे

काशीमध्ये सुमारे पंधराशे देवळे आहेत. प्रत्येक देऊळ आपला इतिहास वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगते. त्यांच्या उत्पत्तीच्या पुराणकथा अनेक देवदेवता आणि ऋषिमुनींच्या चमत्कारिक वर्तनांनी भरलेल्या आहेत.

यापैकी विश्वनाथ, संकटमोचन आणि दुर्गामंदिर देशभर प्रसिद्ध आहे. मूळ विश्वनाथ मंदीर फार प्राचीन असल्याचे सांगितले जाते. सध्याचे मंदिर मात्र अलिकडचे आहे. याच्या शिखरावर महाराजा रणजितसिंहाने सोन्याचा पत्रा मढवला होता. काशिविश्वेश्वराच्या देवालयाचे एक वैशिष्ट्य म्हणजे – रोज सकाळी इथे सनई वाजवली जाते, मगच दरवाजे उघडले जातात, ती सनई वाजवण्याचे काम पिढ्यान्पिढ्या मुस्लिम करतात. याच वंशात उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब होऊन गेले. ब्राह्मणी संस्कृतीच्या आक्रमणातही ही भारतीय संस्कृती टिकून आहे, हे विशेष. संकटमोचन मंदिराची स्थापना गोस्वामी तुलसीदास यांनी केली. दुर्गामंदिर सतराव्या शतकात मराठ्यांनी तयार केले. घाटावर आदिकेशव मंदिरही प्रसिद्ध आहे. या सर्व मंदिरांचे कार्य देशातील इतर मंदिरांसारखेच चालते. वंशपरंपरेने ब्राह्मण-पुरोहित म्हणजे पंड्ये पूजाअर्चा करतात. दान-दक्षिणा जास्तीत जास्त मिळवण्यासाठी नवनव्या सणसमारंभांना जन्माला घालतात. महत्त्व वाढवण्यासाठी सोवळ्या-ओवळ्याचे अवडंबर वाढवतात. चमत्कार तिखटमीठ लावून सांगतात. नव्या चमत्कारांना जन्म देतात.

स्वत:ला राहता यावे आणि जनतेलाही उपयोग व्हावा अशा हेतूने राजे-महाराजांनी काशीत धर्मशाळा बांधल्या. धर्मशाळेत एक देऊळ बांधले जाते, त्याची पूजा-अर्चा करण्यासाठी ब्राह्मण नेमतात, आता राजेरजवाडे गेले आणि पुरोहितच मालक बनले.

तारकमंत्र

काशीमध्ये कुठेही मृत्यू झाला, तरी मृत्युसमयी, काशिविश्वेश्वर प्राण्याच्या उजव्या कानात तारकमंत्राचा उपदेश देतात. तारकमंत्र ऐकल्याबरोबर प्राणी भावबंधनातून मुक्त होतो. अशी ‘डायरेक्ट’ मुक्तीची सोय फक्त काशीतच आहे. इतर तीर्थक्षेत्रे मुक्तीसाठी काशीचा मार्ग दाखवतात.

महास्मशानाजवळ तारकेश्वर मंदिर आहे. तिथल्या प्रेतांना तारकमंत्र देणे, त्यामुळे सोयीचे होत असावे.

मणिकर्णिका घाटावर नाचतात वारांगणा

मणिकर्णिका घाटावर महास्मशान नाथ-शिवाचे मंदिर आहे. वर्षातून एकदा इथे नगरवधू नृत्याच्या सहाय्याने शिवाची आराधना करतात. एका बाजूला चिता जळत असते. प्रेतात्मा मोक्षाची वाट चालत असतो. त्याचे नातेवाईक, मित्र आणि कुटुंबीय दु:खात चूर असतात, तर शेजारीच पायात चाळ बांधून नृत्यांगना गीते सादर करत असतात.

महास्मशाननाथाची पूजा केल्यावर गणिका दीप प्रज्वलित करतात आणि आपल्या जीवनातला अंधार दूर व्हावा, पुढच्या जन्मी असले दु:ख आपल्या वाट्याला येऊ नये, अशा अर्थाची प्रार्थना आर्त स्वरात गातात. भजनांच्या बरोबर फिल्मी आणि भोजपुरी गीतांवर नृत्य करतात. दरवर्षी चैत्र-नवरात्री अष्टमीला मोक्षाच्या आशेने दूरदूरच्या गणिका यामध्ये भाग घेतात. शेळी मेली जिवानिशी – खाणारा म्हणतो वातड तसे श्रोते आनंद घेत असतात.

चितेचा अग्नी वापरून डोंबराजाचा स्वयंपाक

प्रेताला अग्नी देण्याचे काम करणारे डोंब त्याच अग्नीने स्वत:च्या घरातील चूल पेटवतात. दिवसभर किंवा रात्रभर चितेला अग्नी दिल्यानंतर घरी जाताना ते आपल्या सोबत इथलाच अग्नी नेतात. त्याच अग्नीवर त्यांच्या घरचे अन्न शिजते. ही परंपराही हजारो वर्षांपासून सुरू आहे.

तांत्रिक विधीसाठी स्मशानघाटाचा वापर

मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटावर प्रेतांना अग्नी दिले जातात. तिथेच अमावस्येच्या रात्री मंत्र-तंत्र साधनाही केली जाते. यासाठी देशी आणि परदेशी तांत्रिक व मांत्रिक खास वाराणसीत डेरेदाखल होतात.

शिवाच्या त्रिशुलावर काशी वसली असून त्यामुळे इथे तांत्रिक साधनेला; त्यातही कार्तिक अमावस्येला सर्वांत जास्त महत्त्व असल्याचे मांत्रिक सांगतात.

दुष्ट ग्रह, दुष्ट आत्मा आणि दुश्मनांना चितपट करण्यासाठी अनेक भाविक मांत्रिकांना शरण जातात; भरपूर दक्षिणा देऊन मालामाल करतात. मृत्यूनंतर आपले कसे होईल, त्याचबरोबर आपल्या पितरांचे स्वर्ग-नरकात कसे चालले असेल, अशीही काळजी लोकांना असते. भृगू ऋषींनी ‘मनुस्मृती’ रचताना त्यांचाही विचार केला आहे. त्यासाठी बारा अध्यायांपैकी तिसर्‍या अध्यायाचा निम्मा भाग श्राद्धाच्या मार्गदर्शनासाठी खर्च केला आहे.

गृहस्थानी जप, होम, भूतबळी, ब्राह्मणाची पूजा आणि पितरांचे श्राद्ध हे पंचयज्ञ 71 व 72 व्या श्लोकात रोज करायचा सल्ला दिला नाही.

पितरांची प्रीती संपादन करण्यासाठी अन्न, दूध, तूप, फळे, मुळे याबरोबरच मासे, हरिण, मेंढी, बकरी, पक्षी, रानडुक्कर, रानरेडा, ससा, कासव अशा विविध प्राण्यांचे मांस ब्राह्मणाला आग्रह करून खाऊ घालायचे आहे.

श्राद्धासाठी ब्राह्मण लबाड, अडाणी, रोगी, व्यापार-उद्योग करणारा किंवा नास्तिक चालत नाही. तो वेदशास्त्रसंपन्न असावा, अशीही सूचना केली आहे.

श्राद्धाचा फोलपणा

श्राद्धाचा फोलपणा सांगणार्‍या कथा प्रचलित आहेत. एका कथेत कबीरांना साधूने पितरांच्या श्राद्धाला खीर करण्यासाठी दूध आणायला भांडे दिले. बराच वेळ कबीर परत आला नाही, तेव्हा साधू स्वत:च त्याला शोधायला बाहेर पडले.

कबीर रस्त्याच्या कडेला एका मृत गायीजवळ भांडे घेऊन बसले होते. गायीच्या तोंडाजवळ थोडे गवत पडले होते. साधूने त्यांना हटकले. “अरे, दूध आणायला सांगितले आणि तू इथे काय करतोस?”

“गाय गवत तर खाऊ दे, म्हणजे दूध काढता येईल म्हणून थांबलोय”- कबीर.

“मेलेली गाय कधी गवत खाईल काय वेड्या?”

“मेलेले पितर जर खीर खात असतील, तर मेलेली गाय का खीर खाणार नाही?” असा प्रश्न कबीरांनी विचारला.

पितरांच्या नावावर अलंकार, गादी, रजई, छत्री अशा विविध वस्तू हडपणार्‍या ब्राह्मण पुरोहिताला बिरबलाने पूजेला बोलावले आणि तापलेल्या उलथण्याने काखेत डाग दिला. प्रकरण राजापर्यंत गेले, तेव्हा पितरांना थंडी वाजते म्हणून ब्राह्मणाला रजई दान दिली, तसे पितरांचे करट (गळू) बरे व्हावे म्हणून ब्राह्मणाला तापलेल्या उलथण्याने डाग दिल्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले. अशाच आशयाच्या चतुर व्यक्तींच्या लोककथा प्रचलित आहेत.

स्वर्गातले पितर जमिनीवरचे भोजन करतात. या कल्पनेची टर उडवताना संत गाडगेबाबांनी, नदीत उभे राहून ओंजळीने पाणी काठावर फेकणे सुरू केले. ते म्हणत, ‘मी दोनशे मैलावरच्या माझ्या शेताला पाणी घालतोय.’

गंगाआरती ः नवं फॅड

अलिकडच्या काळात गंगाआरतीला महत्त्व येत आहे. दशाश्वमेध घाटावर प्रशस्त रुंद पायर्‍या आहेत. एका पायरीवर स्टेज तयार केले जाते. रोज सायंकाळी 7 वाजता दशाश्वमेध घाटावर गंगाआरती होते. आम्ही 6 वाजताच जाऊन पायरीवर पुढे जागा धरली. पलिकडच्या बाजूला खुर्च्यांचीही सोय केली होती. त्याशिवाय अनेक प्रेक्षक नावेत बसूनही गंगाआरतीचा सोहळा पाहतात.

स्टेजवर जाजम अंथरून त्यावर गंगानदीच्या बाजूला पाच चौरंग मांडण्यात आले. ते एकमेकांपासून सात-आठ फुटावर होते. त्यावर टेबलक्लॉथ अंथरून कापराने भरलेले भांडे ठेवले गेले. वेळ होताच पाच गोरे, गुटगुटीत तरुण सिल्कचा गडद भगवा शर्ट, सिल्कचे पांढरे तयार धोतर, सिल्कचा व्यवस्थित घडी घातलेला दुपट्टा खांद्यावर व कमरेला बांधून डाव्या हातात मंजुळ स्वर काढणारी घंटा आणि उजव्या हातात मोठी धातूची धूपदाणी घेऊन मंचावर अवतरले.

शेजारी बसलेल्या भैय्याची मी ओळख करून घेतली होती. पलिकडच्या गावचा तो सामान्य मुलगा होता. त्याला म्हटले, ‘ये कौन है?’ त्याने तत्परतेने माहिती दिली – ‘ये ही पंडितजी है।’

त्यातील दोघांनी खांद्यावर रुळतील असे मुलीसारखे किंवा सीरियलमधील ऋषीसारखे केस वाढवले होते. दोघांनी गुळगुळीत दाढी केलेली, तर एक मिशावाला होता. दुसर्‍याने फक्त दाढीच वाढवली होती. सर्वांचे केस भांग पाडता येतील, असे कापलेले असून दोघांनीच शेंडी ठेवली होती. इथले पंड्ये डोक्याचा तुळतुळीत गोटा करत नाहीत; शेंडी मात्र ठेवतात.

पाच जणांच्या पंचवीस तर्‍हा होत्या. विविधतेतून एकता हीच असावी. माईकवरून आरती सुरू झाली. त्याचवेळी मागच्या बाजूला वीस-पंचवीस फूट उंचीवर टांगलेली मोठी घंटा एकाच सुरात वाजू लागली.

ॐ जय गंगे माता, श्री जय गंगे माता

जो नर तुमको ध्याता, जो नर तुमको ध्याता।

मन वंछित फल पाता, ॐ जय गंगे माता॥

मी शेजार्‍याकडे चौकशी केली – “ये नर क्यूँ कहते है?”

“नर याने मानव, स्त्री-पुरुष दोनो” त्याने माहिती दिली. पुढे होते – ‘चन्द्र सी ज्योती तुम्हारी, निर्मल जल आता।’

इथे गंगा चंद्रकोरीप्रमाणे वाहते; पण जल निर्मल याला म्हणणार काय?

पाचही पंडितजी एका तालात धूपदाणी फिरवत होते. वर-खाली, बाजूला, समोरून अर्धवर्तुळाकार, पुन्हा वर्तुळाकार असे विविध प्रकारे; एका दिशेला झाले की, ते काटकोनात वळत. चारही दिशा पूर्ण झाल्यावर आरती संपली.

आता हातात धूपारतीऐवजी अनेक ज्योती असलेली आरती घेतली गेली. वरच्या दिशेने लहान होत जाणार्‍या सात प्लेटांवर या ज्योती बसवल्या होत्या. सर्वांत खाली 21, तर सर्वांत वरती 5 ज्योती होत्या.

पहिली आरती सुरू असताना या ज्योती पेटविण्याचे काम पुढे बसलेल्या उत्साही भाविक महिलांनी अत्यंत श्रद्धेने केले. ‘ये क्या है?’ मी शेजार्‍याला विचारले. त्याला काही सांगता आले नाही. दुकानासमोर एक शेंडीवाला प्रेक्षकांना बसण्याच्या सूचना करत होता. त्याला विचारल्यावर त्याने म्हटले – ‘इसको आरती का थाल कहते है।’

ही आरतीही सर्व दिशांनी विविध पोझमध्ये फिरत राहिली. पुढच्या गीताच्या वेळी नव्या आकाराची, काळाभोर धूर ओकणारी धूपदाणी आली. पुन्हा तसेच नृत्य झाले. गोल फिरून तोंड पुन्हा नदीकडे झाले की, पंडितजी समोरच्या भांड्यातील कापूर आरतीमध्ये टाकत. मध्ये मदतीसाठी ताट फिरले. त्यानंतर पावतीबुक घेऊन एकजण आला व आवाहन करू लागला.

एक पुस्तकविक्रेता आला. तो पुस्तके आणि धातूवर कोरलेले ‘सूर्य’ चिन्ह विकत होता. त्याची रोज हजार-दीड हजाराची विक्री होते.

पुढच्या आरतीला प्रथम पुष्पवृष्टी केली. म्हणजे फुलांच्या पाकळ्या समोर पडतील, अशा उधळल्या. घडी घातलेला भगवा सिल्कचा खण घेऊन सर्व दिशांनी पूर्वीप्रामणेच पोझ देत फिरवत नृत्य केले. त्यानंतर मोरपिसांचा पंखा घेऊन त्याच तालात गंगेला, स्वत:च्या सर्व बाजूंनी फिरून वारा घातला. पुन्हा एकदा पाकळ्या उधळल्या.

सर्वांनी एका सुरात शंखध्वनी केला. वीरासनात बसून नमस्कार केला. त्याच आसनात बसून केसासारखे लांब धागे व हातभर मूठ असलेले चामर की चौमर सर्व दिशांना फिरवून पूर्वीचाच व्यायाम केला. आपण त्याला ‘चौर्‍या दळणे’ म्हणतो.

‘ॐशांती’ म्हणून पाया पडल्यावर – ‘गंगा माता जी जय, शंकराचार्य महाराज की जय, गोमाता… भारतमाता…’ असे बरेच जय झाले.

शेवटी ‘हर-हर महादेव’ म्हणून हा कार्यक्रम संपला व शेवटचे ‘गोड’ काम- देणग्या, दक्षिणा गोळा करण्याचे – सुरू झाले. मोबाईल व पाकीट सांभाळण्याच्या सूचना माईकवरून दिल्या गेल्या. भाविकांनी सांभाळलेले पाकीट देणग्या देऊन रिकामे केले. काही दिवसांपूर्वी गंगाआरतीसाठी पंतप्रधान जातीने हजर राहिले. सोबत जपानचे पंतप्रधानही होते. आरतीसाठी तीन तास खर्च केल्यावर त्यांनी लोकांचा वेळ वाचावा म्हणून जपानशी वेगवान मेट्रोचा करार केला.

‘ऑनलाईन’ पंडित

देशभर ‘डिजिटल इंडिया’चा नारा जोरात आहे. त्याला काशीही अपवाद नाही. इथल्या एका संस्कृत विद्यापीठ म्हणवणार्‍या संस्थेने पूजा, अनुष्ठान आणि पंडितांशी संपर्क करण्यासाठी ‘ऑनलाईन’ वेबसाईट तयार केली आहे.

त्यांच्या वेबसाईटवर ‘लॉग ऑन’ केल्यावर पूर्ण माहिती मिळते. देशातल्या आणि परदेशातल्या पंडिताला शोधता येते; ‘ऑनलाईन’ फॉर्म भरल्यावर काशीमध्ये पूजन आणि अनुष्ठान करता येते. पितृपक्षामध्ये पितृदोष पूजा केवळ 501 रुपयांत करता येते.

यातून तरुण, होतकरू पंडितांना रोजगार उपलब्ध होईल. योग्य पद्धतीने (?) अनुष्ठान करवून घेता येईल. पूजापाठासाठी काशीमध्ये येण्याची गरज नाही. पोस्टाने प्रसाद पाठवत येईल. वैवाहिक कर्मकांड, ज्योतिष समाधान, रूद्राभिषेक, सत्यनारायण, पितृदोष पूजन, गंगापूजन, असे अनेक अनुष्ठान आणि पूजाविधी ‘ऑनलाईन’ करता येतील.

या संस्थेने ‘ऑनलाईन’ शुल्क भरण्यासाठी एका बँकेचा अकौंट नंबरही दिला आहे.

पाप–पुण्याचा अकौंट

आता प्रत्यक्षात आपल्या खात्यावरचे पाप किती कमी झाले आणि पुण्याचा बॅलन्स कितीने वाढला, याची माहिती सांगणारी वेबसाईट तेवढी भरायची बाकी आहे. त्या बॅलन्सशीटवरून मोक्ष मिळणार की नाही, त्यासाठी अजून किती पुण्यकर्म करण्याची गरज आहे? किंवा थोडे पाप करायची सवड आहे काय? इत्यादी माहितीही मिळेल.

‘ऑनलाईन’ योगाने वेबसाईट वेबसाठी आज तरी गुगलवरच अवलंबून राहावे लागणार आहे. योगाच्या सहाय्याने किंवा मंत्रातंत्राच्या सहाय्याने, अगर पूजा आणि अनुष्ठान अगर, शेकडो ब्राह्मण भोजने घालून वेबसाईट तयार होऊ शकते का? यावर अभ्यास करण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची गरज आहे.

पंड्यांच्या राखीव जागा

शासकीय नोकरभरतीत राखीव जागांना महत्त्व आहे. राखीव जागांमुळे वंचित समाज, दुर्बल घटक मुख्य प्रवाहात येऊ शकले. अलिकडे राखीव जागांमुळे गुणवत्ता ढासळल्याचा ‘साक्षात्कार’ अनेकांना होत आहे.

गुणवत्ता नसलेल्यांना राखीव जागांमुळे अधिकाराची पदे मिळतात, त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होतो, असा आक्षेप घेतला जातो.

काशीमधील घाटावरील पंड्ये पूर्वीपासून एकाच जातीतले आहेत. काशिविश्वनाथा पासूनच्या मंदिरातील पंडित पुरोहित त्याच जातीचे आहेत. विवाहविधी, ज्योतिषफल सांगणारे, मुहूर्त काढणारे, शांती करणारे, सत्यनारायण कथा सांगणारे, अनुष्ठानास बसणारे, फार पूर्वी होमहवन आणि यज्ञ करणारेही एकाच जातीचे ब्राह्मण आहेत. काही हजार वर्षे त्यांची पदे राखीव आहेत. गुणवत्तेला फाटा देऊन केवळ जन्माने ब्राह्मण आहे, या एकाच क्वालिफिकेशनवर त्यांना हव्या, तेव्हा वरील नोकर्‍या मिळतात. त्यांचा पगार म्हणजे मेहनताना ठरविण्याचा अधिकारही तेच वापरतात. विशेष म्हणजे या राखीव जागांबद्दल कोणीही बोलत नाही.

इतर जातीच्या होतकरू, गुणवान तरुणांना आता संधी द्यावी, असा विचार चुकूनही त्यांच्या मनात येत नाही. असा विचार इतर जातींच्या मनातही येत नाही. त्यासाठी धर्म सतत कार्यरत असतो.

ब्राह्मणांचे हित सांभाळणे, हेच एकमेव धार्मिक कार्य आहे, असा प्रचार सतत केला जातो. या मार्गाने राखीव जागा टिकवल्या जातात.

काशीतला ‘अर्थव्यवहार’

धर्मस्थळामुळे वाराणशीला यात्रेकरू खूप असतात. ते एक पर्यटनस्थळ बनले आहे; परिणामी विविध प्रकारचे उद्योग इथे वाढले आहेत. यात्रेकरूंना काशीपर्यंत पोचवण्याचे महत्त्वाचे काम रेल्वे आणि बसेस करतात. रेल्वेस्टेशन आणि बस स्टँड सतत गजबजलेली असतात. त्याच्या बाहेर रिक्षावाल्यांचा कोलाहल सुरू असतो. रिक्षा इथे तीन प्रकारच्या आहेत – पहिला प्रकार पेट्रोल किंवा सीएनजीवर चालणार्‍या तीन सीटच्या रिक्षा. या रिक्षांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आता इलेक्ट्रीक बॅटरीवर चालणार्‍या चिंचोळ्या दिसणार्‍या चार सीटच्या रिक्षा आणि तिसरा प्रकार म्हणजे पायाने चालवल्या जाणार्‍या दोन प्रवासी बसतील अशा सायकलरिक्षा.

पेट्रोल व बॅटरीवर चालणार्‍या रिक्षांची संख्या तीस ते पस्तीस हजार सांगितली जाते. पैकी पाच हजार चारशे रिक्षा या नियमित म्हणजे नोंदवलेल्या आहेत. इतर अवैध रिक्षा ‘चिरीमिरी’ मार्गाने अस्तित्व टिकवून आहेत.

पायाने चालवायच्या सायकल रिक्षांचे प्रमाण आजही इतर रिक्षांच्या बरोबरीने आहे. हे रिक्षावाले गावाबाहेर दूर राहतात. त्यामुळे स्वत: दहा-बारा हजार रुपये खर्चून रिक्षा घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. गावात मध्यवस्तीत सायकलरिक्षा भाड्याने मिळते. दिवसभराचे साठ रुपये किंवा अर्ध्या दिवसाचे चाळीस रुपये देऊन सायंकाळपर्यंत त्यांना चार-पाचशे रुपये सुटतात. रस्ते सपाट असल्यामुळे या रिक्षा चालतात; पण तरीही ते चालवण्याचे कष्ट जास्तच आहे. त्यामुळे सायकलरिक्षावाला दूरचे भाडे स्वीकारत नाही. प्रवाशांच्या नापसंतीमुळे त्यांचे प्रमाण अलिकडे कमी होत आहे. मानवी कष्ट कमी करण्यासाठी स्वस्तातली मोटार शोधणे अजून शक्य झालेले नाही.

रिक्षावाले ‘शेअर-ए-रिक्षा’ पद्धतीने दहा-पंधरा रुपयांत प्रवाशांना नेतात. नवागतांना मात्र दोनशे-तीनशे भाडे सांगून शेवटी शंभरपर्यंत येतात. देवळांच्या प्रचंड संख्येने फुलांचा व्यवसाय मोठा चालतो. झेंडू, गुलाब, मोगरा, बेल अशा फुलांचे हार आणि ढीग पाहायला मिळतात. विविध आकाराच्या महादेवाच्या पिंडी, प्लॅस्टिक मण्यांच्या माळा, शंकर-पार्वतीच्या धातूच्या, प्लॅस्टरच्या मूर्ती, पूजेचे साहित्य, तांब्याची भांडी, गंगाजलासाठी प्लॅस्टिकचे कॅन, लाकडी खेळणी, कपडे, साड्या, प्रेतावर घालण्यासाठी चुनरीवस्त्र अशा विविध वस्तूंचे अक्षरश: हजारो विक्रेते इथे आपले पोट भरतात.

धर्मशाळा, लॉज, हॉटेल, खाद्यपदार्थांच्या गाड्या, टपर्‍या, रेस्टॉरंट यांचाही उद्योग जोरात आहे. गंगेच्या काठावर शेकडो छोट्या होड्या उभ्या असतात. प्रवाशाकडून एका फेरीला शंभरपासून 1200 पर्यंत भाडे आकारतात. एका होडीत 5 पासून 25 पर्यंत प्रवासी बसू शकतात. स्थानिक मात्र 30 रुपये हातावर टेकवतो.

याशिवाय पूर्वीपासून विभिन्न कुटिरोद्योग सुरू आहेत. त्यामध्ये बनारसी रेशमी साडी तयार करणारे मागवाले, कपडा उद्योग, हस्तशिल्प बनवणारे कारागीर, बनारसी पान विक्रेते व्यावसायिक आहेत. डिझेल, रेल इंजिनचा कारखाना, मिठाईनिर्मिती हे व्यवसायही आपले स्थान टिकवून आहेत. गर्दीने ओसंडून वाहणार्‍या रस्त्याकडे पाहिले की, इथला माणूस सतत धावपळीत आहे, असे वाटते.

ज्ञानीपंडीतांची काशी

पूर्वी बौद्ध आणि हिंदू धर्माचे आध्यात्मिक ज्ञान वाटणार्‍या काशीमध्येच पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना 1916 मध्ये केली. काशी नरेशांनी दिलेल्या साडेतेराशे एकर जमिनीवर हे विश्वविद्यालय पसरले आहे. यामध्ये स्वतंत्र शैक्षणिक विभागांची संख्या 128 आहे.

संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय हे इथले पहिले महाविद्यालय. 1791 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिसने या संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली. त्याचे विद्यापीठ बनले. आज 2100 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महात्मा गांधी काशी विद्यापीठाची स्थापना 1921 ची आहे. इथल्या विद्यार्थ्यांनी स्वतंत्रचळवळीत भाग घेतला. शिवप्रसाद गुप्त यांनी दहा लाख रुपये आणि स्वत:ची जमीन दान दिल्यावर हे विद्यापीठ उभे राहिले. विद्यार्थी आणि शिक्षकही खादी वापरत. आज 35 विभागात बारा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आधुनिक ज्ञानाशी काशीचा असा जवळचा संबंध आहे.

सत्यज्ञान

बनारस हिंदू विश्वविद्यालय गंगाकिनारी, अस्सी घाटाच्या आधी आहे. त्यांनी आपले नाव देशभर केले आहे. आधुनिक ज्ञानाची गंगा इथून वाराणसीत आली; पण त्यापूर्वीही इथे विश्वाला गवसणी घालणारे महामना-म्हणजे महामानव जन्मले, वाढले, राहिले आहेत. त्यांनी माणुसकीचे सत्यज्ञान जनतेपर्यंत पोचवण्याचे कार्य केले.

गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन

गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म देशभर पसरला. पुढे जगभर पसरला. आजही सर्वांत मोठी लोकसंख्या असलेला चीन, उद्योगशील म्हणून प्रसिद्ध असलेला जपान किंवा अमेरिकन साम्राज्यवाद्यांना धूळ चारणारा छोटासा व्हिएतनाम बौद्धधर्मीच आहेत.

पण त्या गौतम बुद्धांच्या प्रवचनाची सुरुवात वाराणशीतूनच झाली. वाराणशीचाच भाग असलेल्या दहा किलोमीटर अंतरावरील सारनाथ येथे गौतमांनी पहिले प्रवचन दिले. बुद्धांनी चार ‘आर्यसत्ये’ सांगितली –

दु:ख – संसारमें दु:ख है – हर चीजमें दु:ख है, ये सत्य है।

कारण, समुदाय – दु:खका कारण भी है।

उपाय, निरोध – दु:खका कारण है, तो उसका निवारण भी है।

निर्वाण, मार्ग – दु:ख निवारण के लिए मार्ग है।

दु:ख – जीवन दु:खमय आहे. आपण खूप धन-दौलत मिळवली. सुंदर पती किंवा पत्नी मिळवली. जमीनजुमला, गाडी-घोडा मिळवला, तरी आपण दु:खी राहतो. दु:ख हे सत्य आहे. दु:ख मुक्तीसाठी प्रयत्न करावेत. नवी साधने शोधावीत, तरी दु:ख नष्ट होत नाही.

दु:ख दूर करण्यासाठी काहीजण व्यसनी, जुगारी बनतात. बुवा-बाबाचे मागे लागतात. ब्लॅकमेलिंग, अपराध करतात. यातूनही दु:ख कमी न होता, दु:खी बनण्याचे अजून मार्ग वाढतात. दु:खाचे कारण? जगातील प्रत्येक घटनेमागे कारण असते. दु:ख आहे, म्हणून त्याचे कारणही अस्तित्वात आहे. कारण शोधण्यासाठी आपण स्वत:चे निरीक्षण केले पाहिजे. आत्मनिरीक्षण करण्यासाठी आपण काय चूक केले? पाप केले? नियम तोडले? या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे शोधावीत. दु:खाचे कारण वासना, इच्छा आहेत.

दु:ख दूर करण्याचा उपाय आहे – सर्व दु:खाचे कारण वासना, इच्छा आहेत. दु:ख दूर करायचे, तर आपण ध्यान केले पाहिजे. वासनांचा स्वभाव अभ्यासला पाहिजे. बेईमानी, अपराध यापासून दूर राहिले पाहिजे. आहे त्यात समाधान मानले पाहिजे.

जातीभेद, धर्मभेद, पदलालसा, उच्च-नीच यापासून दूर राहावे.

दु:ख निवारण्याचा मार्ग – दुसर्‍यांचे हित चिंतिले, तर आपले दु:ख लहान वाटते. जीवनाचा अर्थ समजला, प्रेम-करुणाने हृदय भरते, इच्छा, वासनांवर विजय मिळवला जातो, तेव्हा दु:खमुक्त अवस्था म्हणजे आनंदी अवस्था तयार होते, हा दु:ख निवारणाचा मार्ग आहे.

दु:ख निवारणाचा अष्टांग मार्ग बुद्धांनी सांगितला. आत्मा, परमात्मा, स्वर्ग-नरक, मृत्यूनंतरचे जीवन याची काळजी करण्यापेक्षा आहे, हे जीवन सुखी करा. हा संदेश लोकांच्या पचनी पडला नाही. त्यांनी सारनाथाच्या शेजारीच आत्मा-परमात्म्याला मुक्ती, मोक्ष मिळवून देणारा सोपा मार्ग काशीमध्ये शोधला.

सारनाथ

सारनाथमध्ये गाडलेले बौद्धकालीन अवशेष ब्रिटीश काळात पुन्हा वर काढण्यात आले. पुराण वस्तुसंग्रहालयामध्ये हे पाहायला मिळतात.

सारनाथमध्ये बौद्धमंदिर आहे. मंदिरात अडीच फूट उंचीची, सोनेरी रंगातली सुबक मूर्ती पाहायला मिळते. प्रभावळ व बैठकीसह मूर्तीची उंची सहा फूट होते. परिसर पूर्ण शांत व स्वच्छ आहे. एक सूचना आहे – Put your contribution in the donation box. दुसरी सूचना आहे – इस पवित्र स्थलपर शोर मचाना, दौडकर चलना, व्यायाम करना, गंदगी करना दंडनीय अपराध है। इस तरह का काम करना, पाप का कार्य होता है। या ‘शांत’ परिसरात उभा राहून सूचना वाचत होतो, तर मागे एका बाजूला माईकवरून प्रवचन सुरू होते.

आम्हाला माहिती सांगण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते ओमप्रकाश मौर्य आले होते, मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले – ते म्हणाले – ‘हर चीज जो है, इनकममें बदल रहे है।

बाहेर बुद्ध मूर्ती, अशोक स्तंभ, चार सिंह, मण्यांच्या माळा, हत्ती इत्यादी दगड व लाकडात कोरलेले विकण्याचे स्टॉल; शिवाय दूध, दही, लस्सी आणि फळांचे स्टॉल आहेत. समोरच जैन मंदिर आहे. पलिकडे शिवमंदिर आहे. शेजारी सारनाथचा प्रसिद्ध स्तूप असून त्याच्यासमोर सारनाथ संग्रहालय आहे.

सारनाथ संग्रहालय

संग्रहालय केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. स्तुपाशेजारी झालेल्या उत्खननात भारताचे राज्यचिन्ह अशोक स्तंभ, त्यावरील चार सिंह, विविध मूर्ती गजसिंह, अश्व, वृषभ हे महापंथ, प्रचंड दगडी छत्री या अशोककालीन वस्तूंबरोबरच अकराव्या शतकातील लोखंडी वस्तू, भांडी, शिलालेख, मूर्ती सापडल्या, त्या सर्व इथे पाहायला मिळतात. इथली शांतता, स्वच्छता आणि शिस्त ही वाखाणण्यासारखी आहे. सारनाथ वस्तुसंग्रहालयासाठी केवळ 5 रुपये, तर फॉरेनर्सना 25 रुपये तिकीट आहे.

स्तुपाशेजारी उत्खननही पाहण्याची सोय आहे. त्याचे तिकीट भारतीयांसाठी 25 रुपये, तर फॉरेनर्ससाठी 300 रुपये आहे. बौद्धधर्मीय फॉरेनर्स इथे गर्दी करतात. ते गाडीतून उतरण्यापूर्वीच गाईड आणि खेळणी विक्रेते त्यांच्यामागे धावत असतात.

बुद्धविचार

बौद्धकालीन वस्तूंच्याबरोबर बुद्धाचे विचारही इथे पुन्हा डोके वर काढत आहेत. वाराणशीमध्ये या विचारांचे गट तयार झाले आहेत. गौतम बुद्धांनंतर अजून दोन मोठी माणसे इथे होऊन गेली, ती म्हणजे संत रविदास आणि संत कबीर.

संत रविदास

रविदासांचा जन्म बनारसचा. त्या भागात ते रैदास म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी समतेचा संदेश दिला. जातीभेद, वर्णभेद त्यांना मान्य नव्हते. आज त्यांची अनेक पदे प्रसिद्ध आहेत.

रैदासांचे विचार समाजापर्यंत पोचण्यासाठी रुपककथांचा उपयोग केला गेला आहे.

मन चंगा…

एका कथेत त्यांच्याकडे चप्पल शिवायला आलेल्या ब्राह्मणाला ते त्यांनी दिलेली कवडी गंगामैय्याला भेट द्यायला सांगतात. ब्राह्मण स्नान झाल्यावर कवडी गंगेला अर्पण करतो, तेव्हा गंगा सोन्याचे रत्नजडित कंगन रैदासना देण्यासाठी ब्राह्मणाकडे देते. ब्राह्मण ते कंगन राजाला देतो; त्याला राजाने खूष होऊन भरपूर धन द्यावे, अशी इच्छा असते. राणीला कंगन आवडते. ती दुसर्‍या हातात घालायला कंगन मागते. राजा ब्राह्मणाला सांगतो – ‘कंगन आणून दे नाही तर मरणाला तयार हो!’

तेव्हा ब्राह्मण घडलेली सत्यघटना सांगतो, कंगन केवळ रैदासच देऊ शकेल. म्हणून राजा व ब्राह्मण रैदासाकडे येतात. रैदास ब्राह्मणाचा जीव वाचावा म्हणून चप्पल भिजवण्याच्या काटवटीलाच गंगा म्हणून नमस्कार करतात आणि ब्राह्मणाचा जीव वाचवण्यासाठी अजून एक कंगन मागतात.

त्यांच्या काटवटीत कंगन येऊन पडते. ‘मन चंगा तो काटवटमें गंगा’ या म्हणीमधून बाह्य अवडंबर माजवणार्‍या ब्राह्मणांपेक्षा चांगल्या मनाचे रैदास श्रेष्ठ आहेत, हा संदेश दिला जातो.

पण सामान्य जन संदेशापेक्षा कथेतील चमत्कारांनाच जास्त भुलतात आणि नवी बुवाबाजी सुरू होते. वैदिकांविरोधात केलेले बंड इथेच शमते.

विद्रोही कबीर

ही बाब कबीरांच्या बाबतही दिसते. कबीरांचा जन्मही वाराणसीचाच. त्यांना सांभाळले त्या आई-वडिलांची आणि कबीरांची झोपडी जिथे होती, तिथे आता कबीर चौरा मठ उभा आहे. मठाकडे जाणार्‍या बोळांच्या दोन्ही बाजूंना कबीरांचे दोहे आणि ते स्पष्ट करणारी उठावाची भित्तिचित्रे रंगवली आहेत.

आम्ही कबीर मठाचे मुख्य प्रबंधक गोपालदास महाराजांची मुलाखत घेतली. त्यांनी, आम्ही अंनिसचे कार्यकर्ते आहोत, असे सांगितल्यावर त्यांनी संत कबीराचे अं.नि. विचार मांडताना कबीरांनी अनेक अंधश्रद्धांवर कठोर प्रहार केले आहेत. हिंदू पंडिताप्रमाणे मुस्लिम मौलवीलाही त्यांनी सोडले नाही. पाने तोडून देवाला वाहणार्‍या माळिणीला ते म्हणतात –

‘भूली मलीन पांती तोडे, पांती पांती जीव

जो पांती देवन को चढै, सो देव है निर्जीव।’

पण तरीही पाने आणि फुले घेऊन मंदिराकडे धावणारे कमी झाले नाहीत. मशिदीवर चढून बांग देणार्‍या मुल्लाला ते म्हणतात –

‘कंकर पत्थर जोडके, मसजिद लई बनाय

ता चदि मुल्लां बांग दे, बहरा हुआ खुदाय।’

एका दोह्यात कबीर म्हणतात –

‘कबीरा खडा बाजारमें लिए लुका दी हाथ

जो घर फुंके अपना चलै हमारे साथ।’

समाजक्रांती करायची, तर घर फुंकून बरोबर येणारेच कार्यकर्तेहवेत.

दर्शनी दरवाजावर “सद्गुरू कबीर मंदिर, कबीर चौरा आदि मूलगादी” असे ठळक लिहून खाली जीर्णोद्धाराची तारीख आहे. मठातील आतले आवार शंभर-सव्वाशे फूट लांबी-रुंदीचे असून बाजूने व्हरांडा व राहण्यासाठी खोल्या आहेत. आवारात कबीरांच्या जीवनातील विविध प्रसंग शिल्पांच्या सहाय्याने दाखवले आहेत. कबीरांनी कष्टकर्‍यांच्या साधनांना प्रतिष्ठा दिली. त्यातच ईश्वर दाखवला. विणकराचा हातमाग, कुंभाराचे चाक, पाणी खेचण्याचा रहाट या माध्यमातून कष्टाला पूजेपेक्षा मोठे स्थान दिले.

कबीरांनी सुरवात केलेल्या समता आंदोलनात कष्टकरी, गोरगरीब, मजूर, दलित मोठ्या संख्येने सामील झाले. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या कवितेत याचे यथायोग्य वर्णन केले आहे –

‘फैल गयी यह ख्याती देश में, सिद्ध पुरुष है भक्त कबीर,

नर नारी लाखोने आकर, घेरी उनकी वन्य कुटीर।’

याचा परिणाम ब्राह्मणांच्यावर काय झाला? पुढे ते म्हणतात –

‘कहने लगे, क्रोध भारी, भर नगरी के ब्राह्मण सब।

पुरे चारो चरण हुए कलियुग के, पाप छा गया अब॥’

कबीरांच्या काळात सुरू झालेल्या समता आंदोलनात गुरूनानकदेव, रैदास, सेन, पीपा, दादू, दरिघा, गरीबदास, रज्जब, घासीदास, घीसा, बावरी साहिबा, बुल्ला, भीखा, पलटू, शिवनारायण इत्यादी संतांची यादीच ‘कबीर का सच’ ग्रंथामध्ये कबीरचौराचे आचार्य संत विवेकदास आचार्य यांनी दिली आहे.

वारकरी संतांप्रमाणेच कबीरही ‘बोले तैसा चाले’ या वृत्तीचे होते.

त्या काळीही काशीत मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो, तर मगहरमध्ये मेल्यास गाढवाचा जन्म मिळतो, अशी श्रद्धा निर्माण करण्यात आली होती. ईश्वराचे नाव घेतले, तर काशी काय आणि ‘मगहर’ काय; दोन्ही ठिकाणी मोक्ष मिळाला पाहिजे, नाहीतर रामनामाची किंमत काय राहिली? असा फरक करणे, हा रामाचा अपमान आहे, अशी भूमिका कबीरांनी घेतली.

काशीत मोक्ष – अंधश्रद्धा

काशीबाबतच्या अंधश्रद्धेला छेद देण्यासाठी स्वत: कबीर मृत्यूपूर्वी अडिचशे किलोमीटरवरील मगहरला गेले. त्यांना वाराणसीतल्या अनेक प्रतिष्ठितांनी सांगितले, तरी त्यांनी आपले मत बदलले नाही. ते आपल्या दोह्यात म्हणतात –

‘ज्यों पानी–पानी मिलि गयरू। त्यों धुरि मिला कबीरा।

ज्यों मिथिला को सांचा व्यास। तोहरो मरन होय मगहर पास॥

मगहर मरै मरन नहीं पावै। अंतै मरै तो राम लजावें।

मगहर मरै सो गधा होय। भल परतीत राम सो खोय॥

का कासी का मगहर ऊसर। जो पै हिृदय राम बसें मोरा।

जौ कासी तन तजै कबीरा। तौ रामहिं कवन निहोरा॥’

अर्थात, पाण्यात पाणी मिसळल्यावर पत्ता लागत नाही, तसे मेल्यावर पंचतत्त्वात विलीन झाल्यावर वेगळेपण राहत नाही. तू खरा व्यास पंडित असशील आणि मगहरमध्ये मरत नसशील, तर रामाला लज्जीत करतो आहेत. मी काशीएवढेच महत्त्व मगहरला देतो. काशीत मरून मुक्ती आणि मगहरला मरून गाढवाचा जन्म मिळत असेल, तर रामनामाचा उपयोग काय?

काशीत मेले नाही तर मोक्ष मिळत नाही, ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी कबीरांनी काशीपासून दूर 250 किलोमीटरवरील मगहरला आपला देह ठेवला.

कबीर आणि रैदास यांचा संबंध गोरखनाथांशीही जोडला जातो. तिघांमध्ये समता आणण्याचा प्रयत्न, उच्च-नीचतेला विरोध, अंधश्रद्धांना विरोध, हे साम्य आहे.

नाथपंथीयांनी दीक्षा देताना वर्णभेद केलेला नाही. कोणत्याही वर्णाच्या, जातीच्या व्यक्तीला दीक्षा घेता येते. ही बाब वैदिकांच्या विचारांशी विसंगत आहे. नाथपंथीयांप्रमाणेच महानुभावी, एकनाथ महाराजही दत्तात्रेयांना गुरू मानतात. दत्त पंथही समता मानणारा लोकप्रिय पंथ होता. या अर्थाने कबीर पंथाचे नाथपंथाशी जवळचे नाते आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही नाथपंथीय असून गोरखनाथ मठाचे प्रमुख होते; पण त्यांनी नाथपंथीयांच्या समतेच्या विचारांना तिलांजली दिलेली दिसते; ते वैदिकांच्या गटात सामील झाले.

संत तुलसीदास

संत तुलसीदासही बनारसचेच. ‘रामचरित मानस’ रचून त्यांनी रामभक्तीची सीमा गाठली; पण त्यांच्या लिखाणात ब्राह्मण्यवादाचे समर्थन दिसते. ‘रामचरितमानस’मध्ये असे अनेक श्लोक मिळतात- त्यातील एक –

‘सापत, ताडत पुरुष कहंता। बिप्र पूज्य अस गावहि संता।

पूजि अ बिप्र सील गुन हीना। सूद्र न गुन गन ग्यान प्रविणा॥’

शाप देणारा, मारणारा, कठोर बोलणारा, असला तरी ब्राह्मण पूजनीय आहे, असे संत सांगतात. शील आणि गुणांनी हीन असलेला ब्राह्मणही पूजनीय आहे. गुणांनी युक्त आणि ज्ञान निपुण असला, तरी शूद्र पूजनीय नाही.

शंकराचार्यासोबत वादविवाद

बनारसमध्येच शंकराचार्य आणि मंडनमिश्रा यांचा प्रसिद्ध वाद झाला. मंडणमिश्रा हरला; पण तो वादात नव्हे; तर त्याच्या गळ्यातला हार लवकर कोमजेला, म्हणून तो हरल्याचे जाहीर करण्यात आले. वादविवादाची ही पद्धत चांगली आहे. यासाठी सोबत सशस्त्र अनुयायी हवेत.

मंडणमिश्रांच्या पत्नीनेही वादविवाद केला. तिने 17 व्या दिवशी हरल्याचे मान्य केले. तिचे नाव उमाभारती. हरल्यावर मंडणमिश्रा शिष्य बनून शृंगेरी मठाचे शंकराचार्य झाल्याची कथा आहे, तर उमाभारती अदृश्य होऊन शारदापीठाच्या परिसरताील देवळात देवी बनली.

मुन्शी प्रेमचंद

बनारसमध्ये मोठे साहित्यिकही निर्माण झाले आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचे नाव म्हणजे मुन्शी प्रेमचंद. 1880 साली बनारसजवळच्या लमही खेड्यात त्यांचा जन्म झाला. वडील पोस्ट मास्तर, आई 8 व्या वर्षी, तर दोन वर्षांनी वडिलांचे निधन झाले.

गावातून बनारसपर्यंत पायी चालत येऊन त्यांनी शिक्षण घेतले. पुढे बनारसमध्ये ट्यूशन मिळवून तिथे राहून मॅट्रिक केले. वाचनाची प्रचंड आवड. त्यासाठी पुस्तक दुकानात नोकरी केली. शिक्षण खात्यात नोकरी लागली, तेव्हा लिखाणाला सुरुवात केली. देशभक्तीने भरलेल्या त्यांच्या पहिल्याच लिखाणाची इंग्रजांनी दखल घेतली. अंक जप्त केले, नष्ट केले आणि ‘पुन्हा असे लिहिले, तर तुरुंगात पाठवू,’ अशी तंबी मिळाली. त्यावेळी ते त्यांच्या मूळ नावाने – म्हणजे ‘धनपतराय’ नावाने – लिखाण करत.

मित्रांनी सल्ला दिला, नाव बदल. त्यांनीच मुन्शी प्रेमचंद नाव दिले. या नावाने त्यांनी कथा, कादंबर्‍या आणि नाटकेही लिहिली. आपल्या साहित्यातून त्यांनी बहुजन कष्टकर्‍यांची हलाखीची परिस्थिती मांडली. या परिस्थितीला कारणीभूत असलेले गावोगावचे शेटजी आणि भटजी उघड केले. अंधश्रद्धा, रुढी, परंपरा यांनी बद्ध असलेल्या बहुजनांना कसे छळले जाते, याची यथार्थ वर्णने त्यांनी केली. ‘गबन’, ‘कफन’ अशा एकापेक्षा एक सरस कादंबर्‍यांनी त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.

देशातील पुरोगामी साहित्यिकांना एकत्र करण्यासाठी सहकार्‍यांच्या मदतीने ‘पुरोगामी लेखक संघ’ काढला. त्याचे ते अध्यक्ष झाले. या संघात बहुसंख्य मार्क्सवादी साहित्यिक एकत्र झाले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे ते जिते जागते प्रतीक होते.

वंशपरंपरेने आलेल्या पोटाच्या आजाराने 1936 साली ते अनंतात विलीन झाले.

काशीची सोशिक जनता

त्यांच्या कथांमधून सर्वसामान्य व जनता धर्मभोळी आणि सोशिक असल्याची वर्णने येतात. आजही परिस्थिती तशीच आहे. गंगा घाटाकडे जाणार्‍या रस्त्यावरून आम्ही चार वाजता चाललो होतो. दुतर्फा वाहतूक सुरू होती. रिक्षा, सायकल रिक्षा, टू व्हीलर, फोर व्हीलर, यातून वाट काढत चालणारे पब्लिक! कोणत्याही गाडीपेक्षा चालणारे पुढे जात होते.

शांतपणे मार्गक्रमण करणार्‍या या सोशिक जनतेचे खरेच कौतुक केले पाहिजे.

याच वर्षी नवीन फ्लाय ओव्हर रस्त्याचा भाग काम चालू असताना कोसळला. त्याखाली शंभर गरीब नागरिक, रिक्षावाले व प्रवासी मारले गेले; पण शहर शांत राहिले. पोलिसांनी अज्ञाताविरोधी गुन्हा दाखल केला. त्या सर्वांना मोक्ष प्राप्त झाला असावा.

या कामाचा ठेका एका मोठ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने घेतला असल्याचे माहीतगाराने सांगितले. त्यामुळे तपास कसला करणार? उलट मोक्ष मिळवून दिल्याबद्दल दक्षिणा द्यावी.

2014 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत या मतदार संघातून निवडून आलेला उमेदवार देशाचा पंतप्रधान झाला आणि पडलेला उमेदवार दिल्लीचा मुख्यमंत्री झाला. त्यामुळे एवढा समंजसपणा लोकांच्यात असला पाहिजेच.

या धर्मभोळ्या जनतेला धर्मांध बनवण्याचा प्रयत्न 1992 साली झाला. घाटावर झालेल्या स्फोटात एक महिला व मुलगी ठार झाली. लगेच हिंदू-मुस्लिम दंगलीने पेट घेतला.

तेव्हापासून गंगेत पोहायला जात नाही, असे अर्जक संघाच्या एका मुस्लिम कार्यकर्त्याने सांगितले. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य टिकलेच; पण शारीरिकही!

गंगा प्रदूषण

गंगेचे पाणी पवित्र असेल की नाही, याबद्दल वाद होऊ शकतो; पण प्रदूषित आहे की नाही, यावर चर्चेचीही गरज नाही. काठावरचे पाणी बाटलीत भरून गंगाजल म्हणून नेताना त्याचा रंग गढूळ असून बाटली अर्धपारदर्शकच नव्हे, तर काही वेळा अपारदर्शक बनलेली दिसते.

सर्व प्रकारचे कारखाने, गटारे, रसायने, मैला, अर्धवट जळलेली प्रेते, लाकडे, राख व कोळसे, आणखी काय-काय गंगेच्या पोटात रिचवले जाते, कुणास ठाऊक?

पण प्रदूषण टाळण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. तशा सूचना भविकांना दिल्या जात आहेत – “गंगा के तट पर नहाने, धोने के लिए साबून का प्रयोग न करे।” अशी सूचना तीन-चार ठिकाणी तरी लावली आहे. यापेक्षा मोठे प्रयत्न काही ऐकायला मिळाले नाहीत.

प्रदूषण टाळण्यासाठी गंगेच्या पाण्यात पायही न घालता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

आत्मा-परमात्मा, स्वर्ग-नरकाच्या अंधश्रद्धा आदी त्यावर आधारित वर्णभेदाच्या बजबजपुरीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी गौतम बुद्धांनी वाराणसीतच सारनाथ येथे पहिले प्रवचन दिले. जैन धर्मातील 11 वे तीर्थंकर श्रेयसनाथांचा जन्म वाराणशीचाच. त्यांनीही समता, बंधुता आणि अहिंसेचा संदेश दिला.

नाथपंथीयांनी जातीभेद न करता आपल्या पंथाची दीक्षा दिली. कबीर, रैदास आणि त्यांच्या सहकार्‍यांनी समतेचे आंदोलन उभे केले; पण या सर्वांचा काशीकरांवर काय परिणाम झाला? अंधश्रद्धा आणि ब्राह्मण्यवादाच्या गर्तेतून ते बाहेर येऊ शकले नाहीत.

सर्व महामानवांनी समतेचा विचार सांगितला; पण त्याला अर्थव्यवस्थेत स्थान नव्हते. उच्च-नीचता आणि जातीवर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेवर या विचारांचा परिणाम झाला नाही. राजेरजवाडे, सरंजामदार, जमीनदार आणि श्रमिक जनता यांचे संबंध बदलले नाहीत. ही सरंजामशाही मोडीत काढली ब्रिटिशांनी. ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनी, नवी व्यवस्था-भांडवलशाही- भारतात आणली. तेव्हाच जुन्या हितसंबंधांना हादरा बसला. उच्च-नीचता आणि जातीभेदाच्या, सोवळ्या-ओवळ्याच्या भिंती ढासळू लागल्या.

मार्क्सच्या भाषेत सांगायचे, तर उत्पादन साधने बदलल्यामुळे समाज बदलू लागला. आज समाज बदलण्याच्या अवस्थेत आहे. डोंबाचा अग्नी नाकारण्याचे धैर्य एखादा कार्यकर्ता दाखवत आहे. मृत्यूनंतर बारा दिवस अशौच पाळून उत्तरकार्याला जेवण घालून, भटजी बोलवण्याऐवजी, सातव्या दिवशी केवळ शोकसभा घेणारे नागरिकही फुटकळ का असेना; पण दिसत आहेत.

पण केवळ उत्पादन साधने बदलून समाज बदलत नाही, त्याला वैचारिक प्रबोधनाची जोड द्यावी लागते. पुन्हा एकदा बुद्ध, कबीर, भीमराव, फुले यांच्या विचारांचा जागर वाढला पाहिजे. नाहीतर जागतिकीकरणात वाढणार्‍या अनिश्चिततेचा गैरफायदा घेऊन वर्णवर्चस्ववादी आपले स्थान बळकट करण्याची भीती आहे. पुरोगामी संघटनांची ही जबाबदारी आहे.

छायाचित्रे – राहुल थोरात

लेखक संपर्क – 9764147483