शब्दांचे सामर्थ्य अधोरेखित करणारा ग्रंथ
अलिकडच्या काळात धर्मांध आणि जातीय झुंडशाही राजकारणाने देशभर धुमाकूळ घातला आहे. कोणी काय खावे, प्यावे, कोणता वेश घालावा, कोणी काय पहावे यावर बंधने घातली जात आहेत. त्या विरोधात आवाज उठवणार्यांचे खून केले जात आहेत. पण तरीही येथील प्रज्ञावंतांना दडपणे शक्य नाही. ते कोणत्याही दहशतीला भीक घालीत नाहीत. असा संदेश देणार्या या ग्रंथाचा परिचय करून देणारा प्रा. दिलीप चव्हाण यांचा हा लेख…
के. सच्चिदानंदन यांनी संपादित केलेला व लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी धर्मांध व जातीय शक्तींच्या विरोधात उभे ठाकलेल्या देशभरातील लेखक, कलावंत, शास्त्रज्ञ, विचारवंत, न्यायाधीश, अभ्यासक यांचे विचारप्रवर्तक लेख असलेला ‘वर्ड्स मॅटर : रायटिंग्ज अगेन्स्ट सायलेन्स’ हा ग्रंथ आजच्या हिंसक वातावरणात वैविध्याची, वादविवादाची आणि संवादाची जी अस्सल भारतीय परंपरा आहे, तिचे स्मरण करून देतो. याच परंपरेने भारतीय लोकशाहीला बळकट केले आहे. ज्या मिथकांचा, श्रद्धांचा, विचारप्रणालींचा आपण गौरव करतो, त्यातून प्रेरणा घेतो, त्यांची चिकित्सा करण्याचीही आपली परंपरा आहे, याची आठवण के. सच्चिदानंदन यांनी या ग्रंथाच्या परिचयात्मक टिपणात करून दिली आहे. म्हणून देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांची वेगवेगळी रूपे प्रचलित असल्याचेही दिसते. भारतीय संस्कृतीच्या या लवचिकतेमुळे, खुलेपणामुळे ती अनेक प्रभाव पचवू शकली आणि काळाला पुरून उरली. मात्र सध्याच्या उन्मादी वातावरणात हे भान सुटत चालल्याचे दिसत आहे, याची जाणीव या ग्रंथातील परिचयात्मक संपादकीय टिपण आणि लेख करून देतात. कोणत्या पार्श्वभूमीवर हा ग्रंथ जन्मास आला आणि त्यामागची नेमकी भूमिका काय, हे समजून घेण्यासाठी या ग्रंथासाठी संपादक के. सच्चिदानंदन यांनी लिहिलेले ‘द पोएट रिमेम्बर्स’ हे परिचयात्मक टिपण आवर्जून वाचायला हवे, इतके ते महत्त्वाचे आहे.
या ग्रंथाचे संपादक के. सच्चिदानंदन हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवी व समीक्षक असून ते आधुनिक मल्याळी कवितेचे प्रणेते मानले जातात. मल्याळी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ते लेखन करीत असतात. देशविदेशातील एकोणीस भाषांमध्ये त्यांचे ग्रंथ भाषांतरित असून तीसहून अधिक देशांत अत्यंत प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात त्यांनी काव्यवाचन केलेले आहे. 2011 साली साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळू शकेल, अशा जगातील प्रमुख साहित्यिकांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे यावरून के. सच्चिदानंदन यांच्या या क्षेत्रातील अधिकाराचा अंदाज यावा. त्याचबरोबर एक सिद्धहस्त संपादक म्हणून त्यांचा लौकिक आहे. ‘इंडियन लिटरेचर’ या साहित्य अकादमीच्या नियतकालिकाचे अनेक वर्षे त्यांनी संपादन केले आहे. त्यांच्या संपादनकौशल्याचा प्रत्यय याही ग्रंथात येतो. विविध क्षेत्रातील ज्या मान्यवरांना त्यांनी लिहिते केले आहे, त्यांचा आपापल्या क्षेत्रातला लौकिक आणि अधिकार पाहिला तरी हा ग्रंथ समकालीन प्रश्नांना किती वेगवेगळ्या अंगांनी भिडतो आणि त्याचा आवाका किती मोठा आहे, याची जाणीव वाचकांना होऊ शकते.
भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून जी मूल्ये रुजवण्याचा ध्यास आपण घेतलेला आहे, तीच मूल्ये खुलेआम पायदळी तुडवण्याचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे या देशातील विद्वतजन, लेखक, कलावंत अस्वस्थ आहेत. भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांना प्रमाण मानून वाटचाल केली, तरच इथल्या प्रगतीच्या दिशा प्रकाशमान होऊ शकतात. कारण निखळ मानवतावादी भूमिकेतून व वंचितांविषयीच्या अपार करुणेतून भारतीय राज्यघटना आकारास आलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता आणि महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर तत्कालीन नेत्यांच्या औदार्याचे आणि भविष्यवेधी दृष्टीचे प्रतिबिंब यात उमटलेले आहे. संपूर्ण भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा आशय कवेत घेणारा, सर्व समाजघटकांना जीवन व मालमत्तेच्या सुरक्षेची हमी देणारा, कायद्यापुढे सर्वांना समान मानणारा, जात, धर्म, रंग, वंश या भेदांपलिकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा हा दस्ताऐवज साकारला आहे. प्रजासत्ताक गणराज्य म्हणून भारताचे रंगरूप कसे असावे, याचा नितांत सुंदर आराखडा भारतीय राज्यघटनेने या देशाच्या वाटचालीसाठी दिलेला आहे. भविष्याच्या दिशेने तोच आराखडा, तोच मार्ग भारतीय प्रजेने प्रमाण मानलेला आहे. म्हणून गेली सत्तर वर्षेइथे स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे. विरोधकांच्या मताचा आदर हे लोकशाहीचे पायाभूत वैशिष्ट्य आहे, याचेही भान इथल्या राजकीय धुरिणांनी दीर्घकाळ बाळगलेले आहे. इथे अनेक जाती, धर्म निरनिराळ्या चालीरीती, प्रथा, परंपरा आहेत. त्यात संवाद आहे, तसा विसंवादही राहिलेला आहे. या सर्व वेगवेगळ्या घटकांचे त्यांच्यातल्या संवाद आणि विसंवादासह सहअस्तित्व भारतीय राज्यघटनेने गृहीत धरले आहे. शेकडो वर्षेभारतीय समाजाने हे वैविध्य स्वीकारलेले आहे आणि भारतीय राज्यघटनेने ते अधोरेखित केलेले आहे.
वैविध्य हेच भारतीय लोकशाहीचे सौंदर्य आहे. मात्र अलिकडे हिंदूराष्ट्राची स्वप्नं पाहणार्या घटनाविरोधी शक्ती राजकीय सत्तेच्या आधाराने एकवटल्या असून भारतीय लोकशाहीचा हा पायाच ते उद्ध्वस्त करू पाहत आहेत. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला उबगलेल्या सर्वसामान्य माणसांनी मोठ्या विश्वासाने विकासाचे स्वप्न दाखवणार्या मोदींकडे सत्तेची सूत्रे सोपवली. मात्र त्यामुळे गेली कित्येक वर्षे अडगळीत पडलेल्या हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहणार्या फॅसिस्ट वृत्तीच्या विध्वंसक शक्ती अचानक सक्रिय झाल्या. निरनिराळे मुखवटे घालून समाजाची दिशाभूल करण्यात माहीर असलेल्या या शक्तींनी संपूर्ण देशात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. घरात गोमांस बाळगल्याच्या संशयातून उत्तर प्रदेशातील दादरी येथे अखलाक या मुस्लिम गृहस्थाची त्याच्या कुटुंबियांसमोर निर्घृण हत्या करण्यात आली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्यानंतर एम. एम. कलबुर्गींसारख्या विचारवंतांची नियोजनबद्धरित्या हत्या करण्यात आली. साहित्य अकादमी सारखी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मानबिंदू असलेली संस्था यावर काही बोलत नाही म्हणून अनेक लेखकांनी, कलावंतांनी, शास्त्रज्ञांनी आपले पुरस्कार परत केले. या पुरस्कार वापसीने सरकारची जगभरात नाचक्की झाली. त्यांच्या तथाकथित विकासाचे सोंग उघडे पडले. याने चिडून सरकारने आपल्या काही पाळीव लेखक, कलावंतांच्याद्वारे पुरस्कार परत करणार्यांची गलिच्छ भाषेत संभावना सुरू केली. सरकारच्या या अहंकाराचा परिणाम म्हणून आणखी मोठ्या संख्येने लोकशाही मूल्यांची चाड असलेले विद्वतजन एकत्र आले. सरकारच्या दडपशाहीचा आपापल्या पद्धतीने प्रतिकार करू लागले. भारतीय लोकशाही, तिचे संस्थात्मक वैभव, इथले वैविध्यपूर्ण सामाजिक जीवन, वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक विचारधारांचे सहअस्तित्व मानणार्या लोकशाहीवादी प्रतिभावंतांनी आपल्या या बंडखोरीला ‘वर्ड्स मॅटर : रायटिंग्ज अगेन्स्ट सायलेन्स’ या ग्रंथातून शब्दरूप दिले. ‘पेंग्विन’ या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. विवेकाचे आणि विवेकाधारित शब्दांचे सामर्थ्य दाखवणारा हा इंग्रजी ग्रंथ आहे.
‘वर्डस मॅटर : रायटिंग्ज अगेन्स्ट सायलेन्स’ या ग्रंथाचे तीन विभाग आहेत. पहिल्या विभागाचे ‘फेअरवेल टू रिझन’ असे शीर्षक असून त्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व एम. एम. कलबुर्गी यांच्यावरील लेख व त्यांच्या स्वत:च्या लिखाणातील त्यांच्या भूमिका स्पष्ट करणारे काही अंश इंग्रजीत भाषांतरित केलेले आहेत. परिचयात्मक लेखातून त्यांचा जीवनप्रवास उलगडावा आणि त्यांचे सामाजिक कार्य नेमकी कुणाची दुकानदारी बंद करीत होते की, ज्यामुळे त्यांचे विरोधक इतके बिथरले की त्यांनी हत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, याचाही ऊहापोह करण्याचा उद्देश असल्याने या विभागाची रचना वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील लेखाने या ग्रंथाची सुरवात होते. दिलीप चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘अ डॉक्टर किल्ड बाय द पेशंट्स’ या लेखात दाभोलकरांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेण्यात आलेला आहे. हा लेख डॉ. दाभोलकर यांच्या जीवनप्रवासाची माहिती तर देतोच; त्याचबरोबर त्यांच्या हत्येची कारणमीमांसाही करतो. महात्मा गांधींचे विचार प्रत्यक्ष जगण्यात अनुसरणारे डॉ. दाभोलकर चर्चा, वादविवाद, संवाद हे समाजाच्या निकोप वाढीसाठी आवश्यक मानत. त्यामुळे ते यासाठी नेहमी तयार असत. माणूस बदलू शकतो आणि म्हणून वैचारिकदृष्ट्या विरोधक असलेल्यांसाठीही चर्चेचे मार्ग सदैव खुले ठेवले पाहिजेत, असे ते मानत. इतक्या टोकाच्या लोकशाहीवादी असलेल्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत अहिंसक मार्गानेच अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ नेणार्या माणसाचा खून होणे म्हणजे विरोधकांकडे त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी काहीही मुद्दे नव्हते आणि चर्चा करण्याइतकी बुद्धी नव्हती, हे स्पष्ट करणारे आहे. विरोधकांकडे होती फक्त आपले व्यक्तिगत आणि जातीय हितसंबंध जपण्याची केविलवाणी धडपड. जादूटोणाविरोधी कायद्याने वर्षानुवर्षे धर्माच्या नावाने निर्धोकपणे चाललेली दुकानदारी बंद पडेल, या भयगंडाने पछाडलेल्या सनातन्यांनी अखेर त्यांचा जीव घेतला. पण तरीही सनातनी पराभूतच आहेत. नैराश्यग्रस्तच आहेत. ते आणखी नैराश्यग्रस्त होत जाणार. कारण डॉ. दाभोलकर गेले; पण आपल्या कार्यावर आणि विचारांवर ठाम असलेल्या, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात निरलस वृत्तीने काम करणार्या हजारो कार्यकर्त्यांची फौज तयार करून गेले, अशी भूमिका लेखकाने मांडलेली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वाचकांना डॉ. दाभोलकरांच्या संघर्षाची कल्पना यावी यासाठी ‘न संपणारा प्रवास’ या त्यांच्या लेखाचे इंग्रजी भाषांतरही दिलेले आहे. सुमन ओक यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यासंबंधी डॉक्टरांची भूमिका स्पष्ट करणारा लेख भाषांतरित केलेला आहे.
कॉ. गोविंद पानसरे यांच्या कर्तृत्त्वाचा आढावा घेणारा ‘रिमेम्बरिंग पानसरे’ हा लेख मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्तेव अभ्यासक उदय नारकर यांनी लिहिला आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचे आगळेवेगळे रूप समोर आणून कॉ. पानसरेंनी मुस्लिमद्वेष निर्माण करण्यासाठी शिवाजीराजांचा वापर करणार्यांची चांगलीच गोची करून ठेवलेली आहे. मार्क्सवादी अन्वेषण पद्धतीने कोणताही अभिनिवेश न बाळगता वस्तुनिष्ठ ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे शिवाजी कसा गोरगरिबांचा, शेतकर्यांचा, कष्टकर्यांचा, सर्वधर्मसमभाव मानणारा, न्यायबुद्धी असलेला राजा होता, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले होते. त्याचबरोबर महात्मा गांधींच्या मारेकर्यांना हुतात्मा ठरवणार्यांचेही पितळ ते उघडे पाडत असत. त्यासाठी ठोस पुरावे देत. त्यामुळे त्यांचे विरोधक नैराश्याच्या गर्तेत जाणे स्वाभाविक होते. मार्क्स, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या आस्थेच्या केंद्रस्थानी होते. धर्मव्यवस्थेची आणि धर्मव्यवस्थेवर पोसल्या जाणार्यांची आणि त्यातून उभ्या राहिलेल्या शोषण व्यवस्थेची अत्यंत परखड व निर्भीड चिकित्सा ते करत असत, हे उदय नारकरांनी त्यांच्या लेखनाचे जे अंश भाषांतरित करून यात समाविष्ट केले आहेत, यावरून स्पष्ट होते. कॉ. पानसरेंची हत्या करण्यात कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, हे नारकरांनी साधार स्पष्ट केलेले आहे.
‘एम. एम. कलबुर्गी, द टायरलेस स्कॉलर अॅण्ड फिअरलेस क्रिटिक’ हा प्रोफेसर कलबुर्गींच्या कार्यकर्तृत्त्वाचा आढावा घेणारा लेख कलबुर्गी येथील कर्नाटक केंद्रीय विद्यापीठाचे कन्नड साहित्याचे प्राध्यापक, कवी विक्रम विसाजी यांनी लिहिला आहे व दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतील नाट्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक; तसेच नामवंत कवी, नाटककार व अनुवादक एच. एस. शिवप्रकाश यांच्यासह त्यांनी तो कन्नडमधून इंग्रजीत भाषांतरित केलेला आहे. त्यातून कलबुर्गींच्या असामान्य विद्वत्तेचे दर्शन घडते. साहित्य आणि संस्कृतीचा गाढा व्यासंग असलेले कलबुर्गी हे किती असामान्य दर्जाचे विद्वान होते, याचा आपल्याला अंदाज येतो. 115 ग्रंथ आणि 700 हून अधिक प्रकाशित शोधनिबंध आणि जवळपास 100 हून अधिक असे अप्रकाशित लेख त्यांनी लिहिलेले आहेत. या अप्रकाशित लेखांमध्ये एकेका पुस्तकाएवढा एकेक लेख आहे. त्यांचे प्रत्येक पुस्तक एखाद्या प्रश्नाला थेट भिडते आणि निर्भयपणे त्यांची उत्तरे देते. प्राचीन कन्नड साहित्य, वचन चळवळ, मध्ययुगीन कालखंडातील संहिता आणि ग्रंथ, व्याकरण, छंदशास्त्र, काव्यशास्त्र, भाषाशास्त्र, हस्तलिखितशास्त्र, अलंकारशास्त्र, शिलालेखशास्त्र, लोककथा व संस्कृती अभ्यास अशा बहुविध ज्ञानशाखांच्या तळाशी जाऊन धांडोळा घेणारा बहुआयामी प्रतिभेचा हा ज्ञानसाधक होता. अगदी सुरुवातीपासूनच त्यांना कडव्या विरोधाचा सामना करावा लागला. बसवण्णांच्या जन्माबद्दलच्या त्यांच्या मतामुळे कर्नाटकात त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर हिदू धर्म, जातीयता, वीरशैववाद यावर त्यांनी नव्याने प्रकाश टाकणारे लेखन केले आहेे. हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेवर घणाघात करणारे लिखाण त्यांनी केलेले आहे. वीरशैवाहून लिंगायत हा वेगळा असून तो कधीही हिंदू धर्माचा भाग नव्हता, हे त्यांनी मांडले. एवढेच नाही, तर लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याचे ते मांडत. त्यांच्या मते, लिंगायत हा अहिंसावादी, पशुहत्येला विरोध करणारा, स्त्रियांना आणि शूद्रांना स्वातंत्र्य व ज्ञानार्जनाचा अधिकार देणारा, आंतरजातीय विवाहांना मान्यता देणारा धर्म आहे. त्यामुळे जातिभेद करणार्या, स्त्रियांना-शूद्रांना स्वातंत्र्य आणि ज्ञानार्जनाचा अधिकार नाकारणार्या, आंतरजातीय विवाहांना विरोध करणार्या हिंदू धर्माशी लिंगायत धर्माचा संबंध नाही, असे त्यांचे प्रतिपादन होते. लिंगायत धर्मावर वीरशैव व हिंदू धर्म लादण्याच्या राष्ट्रीय सेवक संघ प्रणित संघटनांच्या प्रयत्नांना ते कडाडून विरोध करत. कलबुर्गींच्या भूमिकेमुळे वीरशैव व लिंगायत यांच्या मठातही विभागणी झाली. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांच्या राजकारणाला कर्नाटकात मोठाच धक्का बसत होता, या वास्तवाकडे या ग्रंथातील कलबुर्गींच्या लिखाणातील जे अंश एच. एस. शिवप्रकाश आणि कन्नड व इंग्रजी साहित्यात लौकिक असलेले बसवराज नायकर यांनी भाषांतरित केलेले आहेत, ते लक्ष वेधतात. यातूनच त्यांच्या हत्येमागे कोण असणार, याची दिशाही सूचित होते.
‘डायग्नोसिंग द मेलडी’ हे दुसर्या विभागाचे शीर्षक अत्यंत अर्थपूर्ण आहे. यात जातीय, धार्मिक झुंडशाही व त्यातून निर्माण झालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह इतर समकालीन प्रश्नांचा लेखकांनी प्रभावीरित्या वेध घेतलेला आहे. चेन्नई येथील मद्रास इन्स्टीट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीजचे प्राध्यापक व तामिळनाडूच्या सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक इतिहासाविषयी उद्बोधक लेखन करणारे ए. आर. वेंकटचलपथी यांनी ‘हू किल्ड पेरुमल मुरुगन?’ या लेखात ‘मधोरुभगन’ या कादंबरीतील हिंदू कोंगू वेल्लर जातीची बदनामी केल्याच्या आरोपावरून भयंकर अवमानाला सामोरे गेलेल्या आणि त्याने उद्विग्न होऊन स्वत:चाच लेखक म्हणून मृत्यू झाल्याचे जाहीर करणार्या पेरुमल मुरुगन या तामिळ लेखकाबद्दल लिहिले आहे. भारतात सध्याच्या असहिष्णु वातावरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किती भयंकर स्वरुपाचे आव्हान उभे राहिले आहे, हे यावरून दिसते. अनादी काळापासूनच्या धर्मशास्त्रसंमत प्रथेनुसार विनाअपत्य स्त्रिया एका धार्मिक उत्सवात सहभागी होऊन परपुरुषाकडून अपत्य प्राप्त करून घेतात हे कादंबरीतले चित्रण कालपरवा जन्माला आलेल्या हिंदू धर्माभिमान्यांना मान्य करायला जड जाते. त्यावरुन ते लेखकाला जगणे मुश्किल करतात. शेकडो वर्षांपासून अशाप्रकारच्या श्रद्धा, प्रथा पृथ्वीच्या पाठीवर अनेक मानवी समूहात असल्याचे दाखले आहेत. याला समाजशास्त्रीय, मानववंशशास्त्रीय पुरावे देता येतात. भारतातही प्राचीन काळापासून या प्रथेला नियोग म्हणून धर्मशास्त्रांची मान्यता आहे. मात्र याच प्रथेचे कादंबरीत चित्रण केले म्हणून एखाद्या लेखकाला इतके अवमानित केले जाते की तो स्वत:चा मृत्यू झाल्याचे जाहीर करतो. महासत्तेची स्वप्नं पाहणार्या, स्वत:ला आधुनिक म्हणवणार्या भारतात हे घडते आणि तेही एकविसाव्या शतकात! तामिळनाडूत कोंगू वेल्लर ही सामाजिक व राजकीयदृष्ट्या प्रबळ जात आहे. सध्याच्या तामिळनाडू सरकारमध्ये या जातीचे प्राबल्य आहे. याचा अर्थ असा की, इथल्या धर्मांध राजकारणाला आता प्रबळ जातींच्या झुंडशाहीचाही आधार मिळालेला आहे. प्रबळ जातींच्या धटिंगणपणाचा व संख्याबळाच्या मग्रुरीचा धर्मांध शक्ती कौशल्यपूर्वक वापर करून घेत असल्याचे देशभर दिसते आहे. तामिळनाडूतही तसेच चित्र आहे. धर्मांध आणि जातीय राजकारण आता उघडपणे हातात हात घालून वावरताहेत आणि हे अत्यंत धोकादायक मिश्रण आहे.
अनन्या वाजपेयी या नवी दिल्ली येथील ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’च्या असोसिएट फेलो असलेल्या विदुषीने ‘हिंद स्वराज वर्सेस हिंदू राष्ट्र’ या लेखात महात्मा गांधींनी मांडलेल्या स्वराज आणि सावरकरांच्या हिंदू राष्ट्र या संकल्पनांची तौलनिक चिकित्सा केलेली आहे. गांधीजींच्या खुल्या, सर्वसमावेशक, आध्यात्मिक स्वरुपाच्या हिंद स्वराज या संकल्पनेसमोर एकच देव, एकच साक्षात्कार, एकच प्रेषित, एकच धर्मव्यवस्था, एकच वंश, एकच भाषा, एकच देश, एकच इतिहास, एकच विचारधारा, एकच तत्त्वज्ञान असा अट्टाहास धरणार्या संकुचित हिंदुत्ववादाला उभे करून हिंदू राष्ट्र या कल्पनेतला फोलपणा उघड केला आहे. सावरकरांचा हिंदुत्ववाद हा धार्मिक नसून निव्वळ राजकीय असल्याचा निष्कर्ष वाजपेयी यांनी काढला आहे. ज्या पद्धतीने सावरकरांना व त्यांच्या हिंदू राष्ट्र संकल्पनेला प्रमोट करण्याचे प्रयत्न सुरु झालेले आहेत, त्यामुळे इथल्या धर्मनिरपेक्ष मूल्यांना धोकादायक स्थिती निर्माण झालेली असून त्यातून सांस्कृतिक युद्धांना सुरुवात झालेली आहे, असेही त्यांचे म्हणणेे आहे.
गीता हरिहरन या आघाडीच्या इंग्रजी कादंबरीकार व कथालेखिका आहेत. ‘द थाउजंड फेसेस ऑफ नाईट,’ ‘अॅन आर्ट ऑफ डाईंग,’ ‘द घोस्ट्स ऑफ वासू मास्टर,’ ‘व्हेन ड्रीम्स ट्रॅव्हल,’ ‘इन टाइम्स ऑफ सिज अॅण्ड फ्युजिटिव्ह हिस्टरीज’ अशा एकाहून एक सरस कादंबर्यांमुळे इंग्रजी साहित्यात त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यांनी देशभरातील वाढत्या असहिष्णुतेचे भयकारक दर्शन त्यांच्या ‘अॅन इनकम्प्लिट डायरी : फ्रॅग्मेन्ट्स ऑफ अ ईअर ऑफ सिज’ या लेखात घडवले आहे. जानेवारी 2015 पासून जातीय, धार्मिक हिंसाचाराच्या घटना व त्या घटनांच्या निषेधार्थ लेखक, कलावंत, शास्त्रज्ञांनी जे पुरस्कार परत केले, त्यांची आपल्या लेखात तारीखवार नोंद केली आहे. या लेखांच्या शीर्षकात ‘इनकम्प्लीट डायरी’ असा अर्थपूर्ण शब्द त्यांनी वापरला आहे. म्हणजे जोवर हे सरकार आहे तोवर आणखी काहे धार्मिक उन्मादाचे बळी जाऊ शकतात अशी धास्ती त्यात सूचित केलेली आहे.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतील राज्यशास्त्राचे नामवंत प्राध्यापक गोपाळ गुरू यांचा या ग्रंथातील लेख ‘फॉर दलित, हिस्टरी इज नॉट पास्ट; बट प्रेझेन्ट’ विस्थापितांच्या शोकात्मिकेला राजकीय रंग देणार्यांच्या मानसिकतेचा, त्यांच्या पक्षपाती भूमिकेचा खोलवर वेध घेतो. राजकारण, तत्त्वज्ञान, जातिव्यवस्था आणि स्त्रियांच्या चळवळीविषयी सातत्याने विचारप्रवर्तक लेखन करणारे गोपाळ गुरू हे सामाजिक व राजकीय अभ्यास क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले एक मोठे प्रस्थ आहे. त्यांचा हा लेख भारतातील विस्थापनाच्या चर्चेतील राजकारण उलगडून दाखवतो. विस्थापन ही सामाजिक शोकात्मिका असते. मात्र भारतात विस्थापित कोणत्या जातीधर्माचा आहे, कोणत्या वर्गाचा आहे अशी प्रतवारी करून सोयीच्या भूमिका घेत चर्चा होते, याकडे गोपाळ गुरू लक्ष वेधतात. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाबद्दल पोटतिडकीने बोलणारे दलितांच्या भारतभरातल्या विस्थापनाची दखलसुद्धा घेत नाहीत. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिले, तर देशाच्या वेगवेगळ्या भागात असे विस्थापन होत असल्याचे दिसते. हे समजून न घेतल्यामुळे आम्ही विस्थापित झालो, तेव्हा पुरस्कार परत करणारे लेखक कुठे होते, असे चुकीचे प्रश्न विचारले जातात. विस्थापित म्हणून काश्मिरी पंडितांची दलित विस्थापितांबद्दल काय भूमिका आहे? असा सडेतोड प्रश्न गुरू उभा करतात. चुकीच्या वेळी चुकीचे प्रश्न विचारणार्यांना गोपाळ गुरू यांचा हा लेख म्हणजे अत्यंत अभ्यासपूर्ण उत्तर आहे.
‘द फोर्स ऑफ डिसेन्ट’ हा मानश भट्टाचारजी यांचा लेख प्रतिकाराचे सामर्थ्य समजावून देतो. जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीच्या मुशीत तयार झालेले आणि नवी दिल्लीच्या आंबेडकर विद्यापीठात ‘स्कूल ऑफ कल्चर अॅण्ड क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स’ येथे प्राध्यापक असलेले मानश भट्टाचारजी प्रतिकारातील नैतिक बळाचे महत्त्व आपल्या लेखातून पटवून देतात. सत्यासाठीच्या आग्रहातून होणार्या प्रतिकारात नैतिक बळ असल्याने सत्तेला बेधडकपणे सत्य सांगण्याचे त्यात सामर्थ्य असते, असा हावेल या विचारवंताचा दाखला देत त्यांनी आपला मुद्दा मांडला आहे.
पंजाबमधील मोहाली येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च’ येथे अभ्यागत प्राध्यापक असलेल्या मीरा नंदा यांचा ‘अगेन्स्ट द हिंदुत्व हिस्टरी ऑफ सायन्स’ हा लेख हिंदुत्ववाद्यांच्या तथाकथित वैज्ञानिक दाव्यांची साधार चिरफाड करतो व त्यांच्या दाव्यातला पोकळपणा उघड करतो. विज्ञान व मानव्यविद्यांचा गाढा व्यासंग असलेल्या या विदुषीने ‘सायन्स इन सॅफ्रन : स्केप्टिकल एसेज ऑन हिस्टरी ऑफ सायन्स,’ ‘द गॉड मार्केट’ व ‘प्रॉफेट्स फेसिंग बॅकवर्ड’ या ग्रंथांमधून धर्माभिमान्यांचे अवास्तव दावे साधार खोडून काढलेले आहेत. कोणत्याही हिंदुत्ववाद्याने कोणत्याही प्राचीन ग्रंथाच्या आधारे वैज्ञानिक प्रगतीचा दावा करण्याआधी मीरा नंदा यांचा या ग्रंथातील लेख जरूर वाचावा, इतका तो महत्त्वाचा आहे. सर्व वेदांमध्ये आहे अशी हिंदुत्ववाद्यांची भूमिका असते – अगदी विमानेसुद्धा! आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती, केशवचंद्र सेन यांनीही असेच दावे केले होते. स्वामी विवेकानंदांनी तर 1893 साली धर्म परिषदेत आधुनिक विज्ञान वेदांत तत्त्वज्ञानाचा प्रतिध्वनी असल्याचा दावा केला होता. अर्थात, सर्व राजकीय विचारसरणीच्या पक्षांना असा अभिनिवेश असतो. हिंदुत्ववादी मात्र या अभिनिवेशाला वैज्ञानिक आधार असल्याचा जोरकसपणे दावा सातत्याने करत असतात. हिंदुत्ववादी सत्तेत आल्यावर सर्वांत पहिले काम हे इतिहासाच्या पुनर्लेखनाचे हाती घेतात, याचे कारण या मानसिकतेत आहे. प्राचीन भारतातील गणित व विज्ञानाच्या शोधासंबंधीचे अवास्तव दावे करणे, मिथक व ऐतिहासिक पुरावा, विज्ञान व ज्योतिषशास्त्र यातील सीमारेषा पुसणे, अध्यात्मातील संकल्पनांचा वापर करुन बनावट विज्ञान उभे करण्याचा प्रयत्न करणे अशा ठळक चार प्रवृत्ती या अभिनिवेशात दिसत असल्याचे निदान मीरा नंदा यांनी केले आहे. इतिहास व वारसाभिमान यात फरक करणे आवश्यक असल्याचे त्यांचे प्रतिपादन आहे. इतिहास हा शास्त्रशुद्ध व काटेकोर पुराव्यांनी सिद्ध करावा लागतो. नवे पुरावे मिळाल्यावर जुने टाकून देण्याची लवचिकता असावी लागते. मात्र वारसाभिमानी नेमकी याच्या उलट भूमिका घेतात व काल्पनिक वारसा निर्माण करून सर्वांनी त्यापुढे नतमस्तक व्हावे व अभिमान बाळगावा, असा अवैज्ञानिक अट्टाहास करतात. या लेखात हिंदुत्ववाद्यांच्या इतिहासविषयक अभिनिवेशी दाव्यांची परखड चिकित्सा मीरा नंदा यांनी केली आहे.
‘इंडियाज डॉक्टर जेकील अॅण्ड मिस्टर हाईड’ या लेखात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यिक व समीक्षक पंकज मिश्रा यांनी 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या अमानुष कत्तलींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींच्या झालेल्या उदयाची सांगोपांग चिकित्सा केली आहे. माया कोडनानी, बाबू बजरंगीसारख्या दंगलखोरांना संरक्षण देण्यापासून सुरू झालेला प्रवास उद्योगपती, कॉर्पोरेटस यांच्या सहकार्याने ‘मीडिया मॅनेजमेंट’ करत जगभरात भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीचे गाजर दाखवत देशविदेशात टाळ्या मिळवणार्या व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना अलिंगन देण्यासाठी स्वत:चे नाव असलेला लाखो रुपयांचा सूट शिवणार्या गुलछबू नेत्यापर्यंत कसा झाला आहे आणि कोणत्या पार्श्वभूमीवर झाला आहे, याची समकालीन भ्रष्ट अर्थकारणाच्या संदर्भात पंकज मिश्रा मांडणी करतात. मोदींच्या दिखाऊ रुपाची भुरळ पडलेल्या पाश्चात्यांना वास्तवाची जाण नसते. मात्र परदेशातले श्रीमंत भारतीय मोदींच्या या मिस्टर हाईडकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात, असे मिश्रा यांचे म्हणणे आहे. स्वस्त जमिनी व करसवलतींचे आमिष दाखवून रतन टाटा, मुकेश अंबानी, अनिल अंबानींसारख्या भारतीय उद्योगपतींना मोदींनी जाळ्यात ओढले आणि प्रसारमाध्यमांच्या व समाजमाध्यमांच्या मदतीने ‘मोदी मॅनिया’ तयार करण्यात यशस्वी झाले. त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनांना मागील दाराने वैचारिक खाद्य पुरवणारे विचारवंत लेखक कलावंत यांनाही त्यांनी जवळ घेतले व महत्त्वाच्या संस्थांवर त्यांच्या नेमणुका केल्या. आधीच्या सरकारच्या काळात दुर्लक्षित राहिलेले हे प्रतिभावंत अचानक सत्तास्थानी आणले गेले. त्यांना जणू सूडबुद्धीने राजकारण करण्याचा अलिखित परवानाच देण्यात आला. अनेक वर्षे परदेशात राहूनही गोर्यांच्या जगात फारसा मानमरातब नसल्याच्या न्यूनगंडाने पछाडलेल्या भारतीयांनाही येणारे शतक हे भारताचे आहे, हा मोदींनी सोडलेला फुगा आकर्षक वाटला. पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठा यांना सर्वोच्च स्थान असलेल्या व माणसाची किंमत शून्य असलेल्या जगात मोदींसारख्यांचा उदय होणे पंकज मिश्रांना धक्कादायक वाटत नाही. त्याचबरोबर हिंदूश्रेष्ठत्वाच्या गंडाने पछाडलेल्यांना मैदान मोकळे करून देणार्या काँग्रेस पक्षालाही मिश्रांनी चांगलेच फटकारले आहे. याच भागात राम पुनियानी यांचा ‘फ्रॉम सेलिब्रेटिंग टू हेटिंग द अदर’ हा लेख आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व समविचारी संघटनांच्या द्वेषमूलक राजकारणावर नेमके बोट ठेवले आहे. मुसलमान व ख्रिश्चनांच्या विरोधात तरुणांना भडकावण्याच्या संघ परिवाराच्या उद्योगांवर त्यांनी सडकून टीका केली आहे. हे विभागणीचे राजकारण लोकशाहीला धोकादायक असून तथाकथित विकासाच्या गप्पांआड लपवता येणार नाही, असे पुनियानी यांनी या लेखातून ठणकावले आहे.
ऑक्सफर्ड, कॉर्नेल, पेनिसिल्व्हानिया, जेएनयू अशा प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये इतिहासाच्या अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असणार्या रोमिला थापर यांना स्वतंत्र प्रज्ञेच्या इतिहासकार म्हणून जागतिक मान्यता आहे. भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. ‘द पेंग्विन हिस्टरी ऑफ अर्ली इंडिया,’ ‘अशोका अॅण्ड द डिक्लाईन ऑफ मौर्याज,’ ‘एन्शंट इंडियन सोशल हिस्टरी’ व ‘शकुंतला’ या ग्रंथांमुळे बुद्धिवंतांच्या विश्वात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. या ग्रंथातील ‘इंडियन सोसायटी अॅण्ड द सेक्युलर’ या लेखातून रोमिला थापर यांनी धर्मनिरपेक्षता हा राजकीय चिखलफेकीचा विषय बनवणार्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. धर्मनिरपेक्षता हे मूल्य राजकारणापलिकडचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आहे. ‘सेक्युलॅरिझम’ ही परकीय संकल्पना म्हणून हिणवणार्यांना लोकशाही व राष्ट्र या संकल्पनासुद्धा भारतासाठी परकीयच आहेत, असे सुनावले आहे. मुक्त अर्थव्यवस्था ही तर उघडपणे पाश्चात्य ठसा वागवते. मग तिचे काय करायचे, असा प्रश्न थापर विचारतात. लोकशाहीच्या अस्तित्वासाठी समाजाचे सेक्युलर असणे आवश्यक असल्याचे त्या सोदाहरण पटवून देतात. समकालीन हिंसक राजकीय वातावरण समजून घेण्यासाठी धर्म व समाजाचे परस्परसंबंध त्या समजावून देतात. आपल्या बर्याच दुखण्यांचे मूळ वासाहतिक कालखंडात असल्याचे थापर दाखवून देतात. त्यांच्या मते, या वासाहतिक कालखंडात आपले स्वत:बद्दलचे आकलन बदलले. ते न तपासताच आपण स्वीकारले आणि इथेच मोठा घोळ झाल्याचे थापर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. धर्मासंबंधीच्या पाश्चात्य कल्पना वसाहतवाद्यांनी भारतीयांवर लादल्या. मायनॉरिटी-मेजॉरिटी अशी समाजाची विभागणी वसाहतवाद्यांनीच केली. हिंदू मुसलमानातला भेद व शत्रुत्व कल्पिणे हा खास पाश्चात्य वसाहतवादी एकधर्मीय अस्मितावादी दृष्टिकोन असल्याचे त्यांनी मांडले आहे. हिंदू मुसलमान कायम एकमेकांचे शत्रू राहणार आणि म्हणून त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी तिसर्या शक्तीची गरज आहे, अशी ही स्वत:च्या वसाहतवादाचे समर्थन करणारी भूमिका आहे. या वसाहतवादी भूमिकेचा न तपासता अंगिकार केल्याने परस्परसद्भाव धोक्यात आला, असे निदान थापर यांनी केले आहे.
‘इन सर्च ऑफ टॉलरन्स’ हा पेन इंटरनॅशनल या संस्थेत ‘रायटर्स इन प्रिझन कमिटी’चे प्रमुख असलेले व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले सलील त्रिपाठी यांचा लेख आहे. हा लेख आजच्या एकूणच हिंसक वातावरणात शब्दांचे मोल सांगतो आणि समाजातील लेखकांच्या भूमिकेचे मूल्यमापन करू पाहतो. समाजाला न आवडणार्या विषयांकडे लेखक समाजाचे लक्ष वेधतो. न रुचणार्या विषयांवर लेखक समाजाला विचार करायला भाग पाडतो. व्यक्तीला स्वत:चाच सामना करायला उद्युक्त करतो. म्हणून लेखकाचे, त्याच्या शब्दांचे मोल असते, असा महत्त्वपूर्ण मुद्दा त्यांनी मांडला आहे.
या ग्रंथाच्या तिसर्या भागाचे ‘बिअरिंग विटनेस’ असे शीर्षक असून त्यात गेल्या काही वर्षांतील हिंसक घडामोडींवर अम्रित लाल, अनिश अहलुवालिया, केकी दारूवाला, न्या. मार्कंडेय काटजू, माया कृष्ण राव, मीना कंडास्वामी, नयनतारा सहगल आणि श्याम सरन यांचे विचारप्रवर्तक लेख आहेत.
ख्यातनाम मल्याळी साहित्यिक बशीर हे मुसलमान आहेत म्हणून त्यांना रामायणावर लिहिण्याचा अधिकार नाही असे म्हणणार्या हिंदुत्ववाद्यांचे मल्याळी रामायण परंपरेचे अज्ञान ज्येष्ठ पत्रकार व इंडियन एक्सप्रेस या आघाडीच्या दैनिकाचे असोसिएट एडिटर असलेल्या अम्रित लाल यांनी ‘सायलेन्सिंग ट्रॅडिशन’ या लेखात उघड केले आहे. रामायणाचे अभ्यासक म्हणून बशीर यांना विद्वतजगात मोठी मान्यता आहे. या महाकाव्यावरती अत्यंत मूलभूत स्वरुपाचे संशोधन करून त्यांनी पंधरा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रकाशित केलेले आहेत. मल्याळी रामायण परंपरेचा धावता आढावा लेखाच्या मर्यादित अवकाशात अम्रित लाल यांनी घेतला आहे. अगदी बाराव्या शतकापासूनच्या काही उपलब्ध लिखित संहितांमध्ये लोकपरंपरेतल्या रामायणात रामाच्या व्यक्तिमत्त्वाची विविधांगाने छाननी करण्यात आलेली आहे. हे खुलेपण, ही लवचिकता आपल्या लोकपरंपरेचे खरे वैभव आहे. मात्र एकाच ग्रंथातला, एकाच धर्माच्या आकलनातला, एकाच विचारसरणीच्या बाजूने झुकणारा राम सर्वांवर लादण्याच्या प्रयत्नांतून बशीर यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि खुल्या रामायण लोकपरंपरेचाही गळा घोटल्याचे विदारक चित्र या लेखातून उभे राहते.
शहरी समाजजीवनावर भाष्य करणार्या कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेले चित्रपटनिर्माते व कलावंत अनिश अहलुवालिया यांनी ‘द क्रक्स ऑफ अवर सॉल्यूट्यूड’ या लेखात जयपूर कला संमेलनात मांडलेल्या शिल्पावरून गायीचा अवमान केल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी कशी हीन वागणूक दिली, याची हकीकत सांगितली आहे. याविषयी पोलिसांची कलावंतांशी झालेली प्रश्नोत्तरे मुळातून वाचण्यासारखी आहेत. त्यातून इथल्या सेन्सॉरशिपचा एकूण दर्जा दिसतो.
याच विभागात सुप्रसिद्ध भारतीय इंग्रजी कवी केकी दारूवाला यांचा ‘रायटर्स लॅक ब्रिकबॅट्स’ हा संकुचित मनोवृत्तीच्या सरकारचा झणझणीत उपहास करणारा लेख आहे. ‘कॉमनवेल्थ पोएट्री प्राइझ,’ ‘साहित्य अकादमी पुरस्कार,’ ‘पद्मश्री’ अशा मानाच्या पुरस्कारांनी नावाजलेला हा अत्यंत प्रतिभावंत कवी आहे. विचारवंतांच्या, अल्पसंख्याकांच्या, दलितांच्या हत्यांचे सत्र ज्या पद्धतीने देशभर सुरू झालेले आहे, त्याने अस्वस्थ झालेल्या दारूवालांनी सरकारच्या मग्रुरीचे या लेखातून धिंडवडे काढले आहेत. देशभरात नियोजनबद्धरित्या होत असलेल्या हत्यांवर दिल्या जाणार्या सरकारी उत्तरांचा समाचार दारूवाला यांनी घेतला आहे. मोदी आणि त्यांच्या लोकांना बहुमताने निवडून दिल्यानेच हा धुमाकूळ घातला जातोय का, यावर विचार करण्याचे आवाहन दारूवाला या लेखातून करतात.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांनी ‘इंटलेक्च्युअल्स आर द आईज ऑफ सोसायटी अॅण्ड विदाऊट देम इंडिया वूड बी लॉस्ट’ या लेखात अभिव्यक्ती स्वातंत्र्य व विचारवंतांच्या हत्या या मुद्द्यांवर सरकारचा धिक्कार करत पुरस्कार परत करणार्या लेखकांचे समर्थन केले आहे. समकालीन बौद्धिक चर्चाविश्वात सुरू असलेल्या वादांमध्ये हिरिरीने सहभागी होणारे न्या. काटजू त्यांच्या या लेखातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आहेत. युरोपात फॅसिस्ट राजवटी आल्यावर समाजातले बुद्धिवंत एकतर गप्प बसले होते किंवा सरकारला सामील झाले होते. भारतात मात्र सरकार दडपशाहीच्या मार्गाने जात आहे, असे दिसताच समाजातल्या बुद्धिवंतांनी त्याचा प्रतिकार सुरू केला, ही भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने मोठी दिलासादायक गोष्ट असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. बुद्धिवंत हे समाजाचे डोळेे असतात. तेच काढून घेतले तर समाज आंधळा होईल, याकडे त्यांनी या लेखातून लक्ष वेधले आहे.
ख्यातनाम अभिनेत्री, कथकली नृत्यांगना, प्रशिक्षक व कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या माया कृष्णा राव यांनी ‘द गव्हर्नमेंट इज गेटिंग नर्व्हस अबाउट रायटर्स स्पिकिंग इन वन व्हॉईस’ या लेखात भारतात जीवन जगण्याच्या स्वातंत्र्यापासून ते खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यापर्यंत सर्व प्रकारची स्वातंत्र्ये धोक्यात असल्याने लेखकांची पुरस्कार वापसी समर्थनीय ठरते, असा मुद्दा मांडला आहे.
‘दलित’ या इंग्रजी द्वैमासिकाच्या संपादक व नव्या पिढीतील आघाडीच्या भारतीय इंग्रजी कवयित्री मीना कंडास्वामी यांचा ‘ही हॅज लेफ्ट अस विथ ओन्ली हीज वर्ड्स’ हा लेख हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या अनुषंगाने लिहिला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तक्रारीवरून रोहित वेमुलावर अन्यायकारक कारवाई करण्यात आली. त्याला आत्महत्त्येला प्रवृत्त करण्यात आले. यावरुन शिक्षणक्षेत्रात शिरलेल्या हिडीस जातीय वृत्तीचे क्रौर्य उघड होते, याकडे मीना कंडास्वामी लक्ष वेधतात. देशभरातील विद्यापीठांमध्ये संघप्रणित विद्यार्थी संघटना अभाविप धुडगूस घालत आहे आणि दलित, अल्पसंख्याक, बहुजनातील विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना लक्ष्य करत आहे. त्यांना विद्यापीठांमध्ये शिकणे-शिकवणे मुश्किल होईल व ते शिक्षण सोडतील, नोकरी सोडतील, अशी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप मीना कंडास्वामींनी केला आहे. त्याचबरोबर दलित, बहुजन, अल्पसंख्याक विद्यार्थी व प्राध्यापक त्यांना कधीही विसरता येणार नाही, असा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
‘वी ऑल बिलाँग टू द कंट्री ऑफ इमॅजिनेशन’ हा नयनतारा सहगल यांचा लेख साहित्यिकांच्या वैश्विक नागरिकत्वाचे चिंतन मांडतो. ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज’ या संस्थेच्या संस्थापक सदस्यांंपैकी एक असलेल्या सहगल यांचे ‘रिच लाइक अस’ व ‘प्लॅन्स फॉर डिपार्चर’ या कादंबर्यांमुळे व ‘जवाहरलाल नेहरु : सिव्हिलायझिंग अ सॅव्हेज वर्ल्ड,’ ‘इंदिरा गांधी : ट्रिस्ट विथ पॉवर’ या ग्रंथांमुळे इंग्रजी वाङ्मयविश्वात एक विशेष स्थान आहे. कोणत्याही देशात लेखकांवर अन्याय होत असेल, तर त्याच्याशी सर्व लेखकांचा संबंध असतो, अशी भूमिका सहगल यांनी मांडली आहे. साहित्य हे काळाचे अपत्य असल्याने त्या-त्या काळातील राजकारणापासून ते वेगळे काढता येत नाही; किंबहुना सध्या माणसांच्या जीवनावर राजकारणाचा एवढा प्रभाव वाढलेला आहे की, जगातील सर्वाधिक प्रभावी कादंबर्या यातूनच जन्माला येत आहे हे त्यांनी या लेखातून नजरेस आणून दिले आहे. विषय पृथ्वीवरच्या पाठीवरील पर्यावरणाचा असो की तापमानातील बदलांचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असो की मानवी हक्कांचा; आपल्याला सोबत पोहायचे आहे किंवा बुडायचे तरी आहे असे सर्वांना एकजुटीचे आवाहन लेखाच्या शेवटी सहगल करतात.
या ग्रंथाच्या तिसर्या विभागाचा व ग्रंथाचाही शेवट श्याम सरन यांच्या ‘डिमिनिशिंग आयडिया ऑफ इंडिया’ या लेखाने झाला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष व परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सांभाळलेल्या श्याम सरन यांनी आण्विक घडामोडी व हवामान बदल या विषयांसाठी पंतप्रधानांचे खास दूत म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी भारताची मूळ संकल्पना विषद केली आहे. सहिष्णुता, मानवता, करुणा, औदार्य या मूल्यांनी भारत ही संकल्पना आकाराला येते. तीच मूल्ये आज धोक्यात आहेत. त्यामुळे भारताची मूळ संकल्पनाही धोक्यात आहे. म्हणून तिचे जतन करण्यासाठी भारतीयांनी पुढे सरसावले पाहिजे, असे आवाहन श्याम सरन यांनी लेखात केले आहे. कुणाला जातीधर्माच्या आधारावर नाकारणारा, विस्थापित करणारा, जिवंत जाळणारा, चर्च आणि मशिदी पाडणारा ही भारताची मूळ संकल्पना नसून सहिष्णु भारत हेच या देशाचे मूळ स्वरूप असल्याचे अधोरेखित करणे नितांत गरजेचे असल्याचे त्यांनी कळकळीने मांडले आहे.
‘वर्डस मॅटर : रायटिंग्ज अगेन्स्ट सायलेन्स’ हा इंग्रजी ग्रंथ भारत या संकल्पनेबद्दल, भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या मूल्यांबद्दल, त्याविरोधात जाणार्या समकालीन धर्मांध व जातीय झुंडशाहीच्या राजकारणाबद्दल विचारप्रवृत्त करतो आणि त्यामुळे दिवसेंदिवस तीव्र होत जाणार्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईचीही जाणीव करून देतो. त्याचबरोबर इथे आपल्या संघटनांच्या मदतीने कसाही धुडगूस घालता येईल, या संघ परिवाराच्या विश्वासाला तडा देतो. हा ग्रंथ दडपशाहीच्या सांस्कृतिक राजकारणाला आव्हान देतो. हा ग्रंथ इथल्या प्रज्ञावंतांना दडपणे शक्य नाही, ते कोणत्याही दहशतीला भीक घालत नाहीत, असा सरळ संदेश देतो. प्रज्ञावंतांच्या हत्या करण्यासाठी कुणी कारस्थाने करत असतील, शस्त्रे परजत असतील तर इथल्या प्रज्ञावंतांनीही आपापली शस्त्रे परजली आहेत आणि ते बलाढ्य सत्तेला, झुंडशाहीच्या राजकारणाला शह द्यायला उभे ठाकले आहेत, हे या ग्रंथावरून ध्यानात येते. शब्द हेच प्रज्ञावंतांचे शस्त्र असते. त्यांच्या शब्दात जसा करुणेचा आणि मायेचा ओलावा असतो, तसा मस्तवाल महासत्तांनाही जबर जखमी करू शकणारा स्फोटक साठाही असतो. प्रज्ञावंतांच्या शब्दांनी होणारी जखम खूप खोल असते आणि त्या जखमेला शतकानुशतके ओल असते, याचे भान मस्तवाल सत्तेने ठेवणे आवश्यक असते. नाहीतर येणार्या पिढ्यांनाही जखमा चाटत स्पष्टीकरणे देत बसावे लागते.