समाजोपयोगी कार्य
मार्च 2018 च्या अं. नि. वार्तापत्र अंकात प्रा. प. रा. आर्डे यांनी ए.डी. तथा आनंदराव पाटील यांचा उत्तम परिचय लिहिला आहे. ‘सुधारक’कार आगरकरांच्या काळी कर्तेसुधारक आणि बोलते सुधारक असे दोन प्रकार होते. आज आनंदराव हे कर्तेम्हणजे कृतिशील सुधारक आहेत. अंत्येष्टी विधी ही सर्वाधिक आर्थिक नुकसान करणारी अंधश्रद्धा आहे, हे आनंदरावांनी अचूक ताडले. जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे माणूस भावनाविवश झालेला असतो. अशावेळी भटजी सांगतात, ते सगळे मृताच्या आत्म्याला सद्गती मिळावी, या समजुतीने करतो. खूप खर्च येतो. तो सर्व वाया जातो. मृताला त्याचा काही उपयोग होत नाही. मृत देहाची योग्य तर्हेने व्यवस्था लावणे, हे नातेवाईकांचे कर्तव्य असते. तेवढेच करावे; बाकी काही करू नये. कुणाचे काहीही वाईट होत नाही. आनंदराव हे सगळे समजावून सांगतात. त्यामुळे मोठा खर्च वाचतो. आत्मा, सद्गती, पुनर्जन्म या सर्व भ्रामक कल्पना आहेत. अंत्यसंस्कारांची अंधश्रद्धा संपली तर अनेक कुटुंबांची आर्थिक प्रगती होईल. म्हणून ए. डी. पाटील यांचे कार्य समाजोपयोगी आहे. त्यांना सर्वांनी साथ द्यायला हवी.
– प्रा. य. ना. वालावलकर
ynwalagmail.com,मोबा. 9404609126
वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीयच!
वार्षिक अंकामध्ये बहिणाबाई यांच्यासंबंधी प्रा. डॉ. छाया विलास पोवार यांचा लेख वाचला. निरक्षर असणार्या बहिणाबाईंचा विवेकी विचार त्यांनी उदाहरणांसह सोप्या भाषेत स्पष्ट केला आहे. बहिणाबाईंना मराठी किंवा इंग्रजी शिक्षण मिळाले नाही, तरीही त्यांनी आपल्यावर आलेल्या संकटांशी सामना करताना दैव, देव, नशीब, गंडेदोरे यांचा सहारा घेतला नाही. कष्ट करून मुलांना वाढवले, प्रयत्नपूर्वक शिक्षण दिले. उघड्या डोळ्यांनी समाजातले अनुभव घेऊन त्यांनी आपले विचार कवितेमध्ये मांडले. हा संसार, हे जीवन असार आहे, असत्य आहे. पारलौकिक जीवनच सत्य आहे, त्यासाठी या जन्मात प्रयत्न करा, उपवास करा, यज्ञ करा, भक्ती करा म्हणजे पुढच्या जन्मी चांगले जीवन जगता येईल, अशा विचारांचा पगडा समाजावर असताना बहिणाबाईंनी मात्र ते नाकारले, ‘हे जीवन, हा संसार असत्य आहे,’ हे शंकराचार्यांचे मतही त्यांनी खोडून काढले आहे. त्या म्हणतात, ‘संसार खोटा म्हणू नये, राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये!’ म्हणजे या जीवनाला त्यांनी देवळाच्या कळसाची उपमा दिली आहे. त्यांना हा विवेकी विचार, वैज्ञानिक विचार मिळाला कुठे? याच मातीमध्ये! याच संस्कृतीमध्ये. वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीयच असल्याची अशी उदाहरणे ग्रामीण जीवनात मिळतात. भारतीय संस्कृतीतच वैज्ञानिक विचार आहे, याची ओळख लेखिकेने करून दिली आहे. अशा आणखी साहित्यिकांची माहिती त्यांनी करून द्यावी, ही अपेक्षा.
–प्रभंजन चव्हाण, कोल्हापूर
भगवं विज्ञान अप्रतिम लेख
मार्च 2018 च्या वार्तापत्रातील प्रा. प. रा. आर्डे यांचा ‘भगवं विज्ञान’ हा लेख अप्रतिम आहे. भारतातील हिंदुत्ववादी राजकारण्यांनी सगळं विज्ञान आमच्या धर्मग्रंथात (विशेषत:) वेदात अगोदरच सांगितलं आहे. या प्रचाराचा चांगलाच समाचार या लेखात लेखकांनी घेतला आहे. अशा विचारसरणीतील धोके पण लेखकांनी प्रभावीपणे मांडले आहे. छद्मविज्ञानाची भलावण हा भारतातील विज्ञान क्षेत्रासमोरील मोठं आव्हान आहे. छद्मविज्ञानाविरोधात राजकारणनिरपेक्ष जनचवळवळ उभी राहायला हवी. महा. अंनिसने या दिशेने टाकलेले पाऊल स्तुत्य आहे.
या लेखात डार्विनच्या सिद्धांतावर टिका करणारे राजकीय नेते सत्यपाल सिंह आहेत. त्यांच्या जागी राजनाथ सिंह असे छापले गेले आहे. अशी चूक पुन्हा होऊ नये.
–कुमार मंडपे व कुमुदिनी मंडपे
याच अर्थाचे फोन यज्ञेश्वर निगळे (गोवा), दिगंबर कट्यारे (जळगाव), चंद्रसेन टिळेकर (मुंबई) यांच्याकडून आले आहेत.