Categories
विज्ञान

विज्ञानावरील विश्वास आणि अविश्वास

वार्षिकांक - २०१६

विज्ञानावर विश्वास ठेवणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे, हे अवघड का असते आणि तरीदेखील ते महत्त्वाचे का आहे, याबद्दल कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) या अमेरिकेतील विद्यापीठात विज्ञानाचे आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचे शिक्षण आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कसे देता येईल याबद्दल संशोधन करणार्‍या सुगत दाभोलकर यांनी लिहिले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या विषयाला हात घातला आहे. अंनिवाच्या वाचकांना आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या विचाराला चालना देणारा हा छोटेखानी लेख

कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) या अमेरिकेतील अभियांत्रिकी आणि विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये बॅ. अतुल गवांदे यांनी जून 2016 मध्ये भाषण केले. या भाषणाच्या अनुषंगाने मी या लेखात विज्ञानावरील विश्वास आणि अविश्वास याबद्दल काही विचार मांडणार आहे. कॅलटेक हे अमेरिकेतील अत्यंत प्रथितयश विद्यापीठ. तिथल्या 34 माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. अशा ठिकाणी डॉ. गवांदे यांनी दिलेल्या भाषणाचा विषय होता – विज्ञानावरील अविश्वास. जगात सर्वत्रच विज्ञानावर अविश्वास ठेवण्याची मानवी प्रवृत्ती आहे. इतिहास, भाषा, संगीत अशा सामाजिक शास्त्र अथवा कला विषयातील पदवीधर देखील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून जीवन जगणारे बनले म्हणजे विद्यापीठाने संपूर्ण शिक्षण देण्याचे त्याचे काम पूर्ण केले, असे ते म्हणाले.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे हे आपल्या देशाच्या संविधानातील मूलभूत कर्तव्यांपैकी एक आहे, हे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाचकांना वेगळे सांगायची गरज नाही. परंतु दैनंदिन जीवनामध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कितपत अंगीकार करतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा वारसा पुढच्या पिढीला देतो की नाही, याचा सतत विचार करण्याची आणि त्यानुसार आचरण करण्याची गरज आहे. याचे कारण म्हणजे असे करत राहणे ही सोपी गोष्ट नाही. विज्ञानाचे ज्ञान असणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे या वेगळ्या गोष्टी आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे ‘कार्यकारणभाव,’ असे डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमी सांगायचे. प्रत्येक कार्यामागे काही कारण असते आणि मानवी बुद्धीला त्या कारणाचे आकलन होऊ शकते, हा विचार म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. या कारणाचे आकलन पद्धत म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. मी येथे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ ही संकल्पना व्यापक अर्थाने वापरत आहे. विज्ञान, वैज्ञानिक विचार पद्धती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या तीन एकमेकांशी निगडित परंतु भिन्न संकल्पना आहेत. या लेखामध्ये या तीनही संकल्पनांसाठी मी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या शब्दांचा वापर केला आहे. याचे कारण म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ही या तीनपैकी सर्वांत व्यापक आणि दैनंदिन जीवनाशी अधिक संबंध असलेली संकल्पना आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन ही एक प्रकारची विचारपद्धती आहे. ही पद्धत वापरून वैज्ञानिक नवीन ज्ञानाची निर्मिती करत असतात. वस्तुनिष्ठ निरिक्षणांच्या आणि काटेकोरपणे केलेल्या प्रयोगांच्या निष्कर्षाच्या सहाय्याने आपल्या आजूबाजूचे आणि सर्वच विश्वाचे आकलन करण्याचा हा प्रयत्न आहे. अशा पद्धतीने निर्माण केलेले मान हे सत्याच्या अधिकाधिक जवळचे असते आणि या ज्ञानातून जगाच्या मानवजातीच्या प्रगतीसाठी ठोस कृती करता येते, याची प्रचिती आपल्याला मागच्या दोन-तीन शतकांमध्ये मानवी जीवनमानात झालेल्या बदलांवरून येते. असे असले तरीही विज्ञान मार्गाने निर्माण झालेल्या ज्ञानावर विश्वास ठेवणे अवघड असते. कारण बरेचदा हे ज्ञान अतिनैसर्गिक आणि सारासार विचारांच्या विरोधी वाटते.

सारासार विचारांच्या आधारे अनेक शतके सर्वांनाच असे वाटायचे की, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो किंवा जड वस्तू उंचीवरून खाली टाकली की, लवकर जमिनीवर पडते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांनी यामागचे सत्य शोधून काढले, तेव्हा देखील त्यावर विश्वास ठेवायला जग तयार नव्हते. आज आपण या गोष्टींवर विश्वास ठेवतो तो त्यामागचे विज्ञान समजून विश्वास का ठेवतो सर्वजण म्हणतात, पुस्तकात लिहिले असते म्हणून विश्वास ठेवतो, याचा विचार करा बरं. शंभर किलो वजनाचा आणि त्याच आकाराचा एक किलो वजनाचा गोळा उंच इमारतीवरून खाली टाकला, तर कोणता गोळा आधी खाली पडेल? या प्रश्नाचे उत्तर आपण कसे देतो, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. पुस्तकात वाचले आहे म्हणून माहितीच्या आठवणीच्या आधारे उत्तर देतो का, त्यामागचा कार्यकारणभाव माहिती आहे आणि तो पटलेला आहे म्हणून तो वापरून उत्तर देतो. इंटरनेटवर, गुगलवर याचे उत्तर शोधा आणि त्याचा कार्यकारणभाव आपल्याला समजतो का आणि पटतो का, याचा विचार करा. विज्ञानावरचा विश्वास हा डोळस विश्वास असला पाहिजे. नाहीतर तोही एक प्रकारचा अंधविश्वास नव्हे का?

21 व्या शतकात वैज्ञानिक प्रगतीचा वेग खूप वाढला आहे. प्रत्येक गोष्टीमागचा कार्यकारणभाव समजून घेणे कोणालाच शक्य नाही. परंतु हा कार्यकारणभाव समजून घेण्याची वैज्ञानिक पद्धत काय आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. ही पद्धत समजून घेणे, तिचा अंगीकार करणे आणि सातत्याने आपण त्यानुसार वर्तणूक करतो आहे ना याची शहानिशा करत राहणे महत्त्वाचे आहे. ही पद्धत ज्ञाननिर्मितीच्या इतर पद्धतींपेक्षा अधिक सरस का आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. ‘विज्ञानाची सृष्टी आली, पण विज्ञानाची दृष्टी आली नाही’ असं डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमी म्हणायचे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विज्ञान मार्गाने ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया काय आहे आणि ती अधिक सरस, अधिक योग्य का आहे, हे आपण समूजन घेत नाही. हे न समजून घेता विज्ञानावर ठेवलेला विश्वास म्हणजे विज्ञानावरचा अंधविश्वास नव्हे का?

मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो. विज्ञानाचे शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे शिक्षण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सक्षमतेने कसे देता येईल, हा माझ्या संशोधनाचा एक भाग आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, हे खरोखरच समजून घ्यायचे असेल, तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून ज्ञाननिर्मिती करण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे. वैज्ञानिक सर्व जगासाठी नवीन असलेले शास्त्र निर्माण करतात. आपण तेवढे करण्याची गरज नाही; पण आपल्यासाठी, स्वत:साठी नवीन असलेले ज्ञान विज्ञानमार्गाने निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला दैनंदिन जीवनात भेडसावणारा प्रश्न निवडा, स्वयंपाकघरातील समस्या असेल किंवा कॉम्प्युटर वापरण्यातील अडचण असेल किंवा आरोग्य-आहार याबद्दलची शंका असेल. प्रश्न निवडल्यावर त्या प्रश्नाचे उत्तर काय असेल, याचा आडाखा बांधा, उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा, उत्तराविषयी माहिती मिळवा, मिळालेल्या उत्तरांवर लगेच विश्वास ठेवू नका, ती उत्तरे कशी तपासून पाहता येतील याचा विचार करा. या लेखातून एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे की, प्रश्नांची विज्ञानमार्गाने उत्तरे मिळविणे सोपे नसते. मिळालेली उत्तरे विज्ञान मार्गाने तपासून पाहणे सोपे नसते; परंतु या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन प्रश्नांशी व त्यांच्या उत्तरांशी झगडणे, उत्तरे तपासून पाहण्याचे विविध मार्ग वापरणे आणि ते मार्गही तपासून पाहणे. हे सर्व सातत्याने दैनंदिन जीवनात करत राहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करणे.

‘गणपती दूध प्यायला लागले’ ही तशी जुनी घटना आहे; पण ती किती लवकर आणि किती गावांमध्ये पसरली याचा अनुभव बर्‍याच जणांनी घेतला असेल. चमच्यामधील दूध कमी होते, या कार्याचे कारण देव दूध पितो, असे सांगितले, तर ते चटकन समजते आणि बहुतांश माणसांचा त्यावर पटकन विश्वास बसतो. वैज्ञानिक कारण किती जणांना खरोखरच समजले? र्डीीषरलश ढशपीळेप किंवा पृष्ठीय बल अशा शब्दांचा वरवर वापर न करता, खरोखरचं ते कारण आपल्याला समजले होते का, समजले आहे आहे का, याचा विचार करा. एखाद्या अंधश्रद्धाळू माणसाला हे कारण सप्रमाण, पुराव्यानिशी कसे पटवून देता येईल, त्याचा विश्वास कसा बदलता येईल, याचा विचार करा. म्हणजे तुम्हाला हे पटेल की, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे फारसे सोपे नसते.

वैज्ञानिकांनी संशोधन करून सिद्ध केलेल्या गोष्टींवरही विश्वास ठेवणे अवघड जाते. ग्लोबल वॉर्मिंग – जागतिक तापमानवाढ – हे सत्य नाही. लसीकरणामुळे ऑटिझम हा आजार होतो. जैवअभियांत्रिकीचा वापर करून बनवलेली (जीएम) सर्वच पिके वाईट असतात – असा जगभरातल्या अनेक माणसांचा विश्वास आहे. या सर्व गोष्टींच्या विरोधी वैज्ञानिक पुरावा उपलब्ध असतानाही अनेक सुशिक्षित लोकांचा या पुराव्यांवर विश्वास नाही. नुकतेच निवडून आलेले अमेरिकेसारख्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, सगळीकडे थंडी वाढते आहे, तर जागतिक तापमानवाढ कशी असेल. अपुर्‍या पुराव्याच्या आधारे किंबहुना आपल्या बाजूच्या समर्थनासाठी सोयीस्कर पुरावे बरेचदा अवैज्ञानिक गोष्टी वैज्ञानिक म्हणून भासवल्या जातात आणि त्यामार्फत सर्वसामान्य लोकांची दिशाभूल केली जाते. जगभरातील लोकांचा विज्ञानावरील विश्वास कमी होत चालला आहे.

गॉर्डन गोचॅट या अमेरिकेतील सामाजिक शास्त्रज्ञांना 1974 ते 2010 पर्यंतच्या सर्वेक्षणातील माहितीच्या आधारे लोकांच्या विज्ञानावरील विश्वासाच्या संदर्भात अत्यंत धक्कादायक बदल दिसून आले. एकंदरीत शैक्षणिक पातळी वाढत असली, तरी लोकांचा विज्ञानावरील विश्वास कमी होत आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्यांपैकी पुराणमतवादी अमेरिकन लोकांचा विज्ञानावरील विश्वास 1974 मध्ये सर्वाधिक होता, तर 2010 मध्ये तो सर्वांत कमी आहे, असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अपुरे ज्ञान आणि तो अधिक सरस का आहे, याची माहिती नसणे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे हे समजून घेणे आणि त्याचा दैनंदिन जीवनात अंगीकार करणे अधिकच महत्त्वाचे आहे.

या लेखामध्ये मी विज्ञानावर विश्वास ठेवणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे, हे अवघड का असते आणि तरीदेखील ते महत्त्वाचे का आहे, याबद्दल लिहिले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करण्याची सवय ही आपल्या वर्तनातून लावून घेतली पाहिजे. प्रश्न विचारत राहणे, मिळालेलीउत्तरे तपासत राहणे, ती तपासून पाहण्याचे विविध मार्ग वापरणे, ते मार्ग योग्य आहेत की, नाही ते तपासून पाहत राहणे, हे सर्वच महत्त्वाचे आहे. अगदीच काही नाही, तर निदान व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुक वर एखादी गोष्ट फॉरवर्ड करण्याआधी त्याची वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करा!

सुगत दाभोलकर dsugat@gmail.com