महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा विस्तार महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्हा आणि तालुक्यात झालाच आहे. पण, महाराष्ट्राबाहेरील राज्यातही हा विचार पोहोचला आहे आणि आता याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे.
या वर्षीचा अमेरिकेतील मानाचा समजला जाणारा ’अविजित राय करेज अवॉर्ड’ आपल्या संघटनेला प्रदान करण्यात आला. तो स्विकारण्यासाठी अमेरिकेस गेलेल्या आपल्या कार्याध्यक्षांनी, त्यानिमित्ताने केलेल्या भाषणाचा स्वैर अनुवाद अंनिवाच्या वाचकांसाठी देत आहोत.
नमस्कार मंडळी, मी अविनाश पाटील, अंधश्रध्दा निर्मूलन समिती महाराष्ट्र या संघटनेचा कार्याध्यक्ष आहे आणि या वर्षीचा प्रतिष्ठित अविजित रॉय करेज अवॉर्ड घेण्यासाठी मी आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी हा पुरस्कार आमचे दिवंगत नेते आणि या क्षेत्रातील विद्वान डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गेली तीस वर्षे अंधश्रध्दा निर्मूलनाचे अहोरात्र काम करणारे आमचे कार्यकर्ते यांना अर्पण करतो. यासमयी मला आमच्या असंख्य हितचिंतक, देणगीदार, वाचक आणि पाठीराखे यांची आठवण येत आहे, ज्यांचे सहकार्य आणि मदत यांच्या जिवावरच हे काम गेली तीस वर्षे जनमानसात तग धरून आहे आणि दिवसेंदिवस वाढतच आहे.
मी फ्रिडम फ्रॉम रिलिजन या संस्थेचे सुध्दा आभार मानतो, ज्यांनी हा पुरस्कार देण्यासाठी ‘मअंनिस’ची निवड केली. मला याची खात्री आहे की, हा पुरस्कार म्हणजे आमच्या कामाला मिळालेली आंतरराष्ट्रीय समूहाची पोच पावती आहे आणि या क्षेत्रात आणखी काम करण्यास आणि स्वत:ला झोकून देण्यास हा पुरस्कार नक्की आम्हाला सदैव प्रेरणा आणि ऊर्जा देत राहील.
दोन वर्षांपूर्वी मा. अविजित रॉय यांचा खून झाला आणि पाच वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. गेल्या दशकभरात धर्म, परंपरा आणि संस्कृतीच्या नावावर अशा अनेक स्वतंत्र आणि विवेकी विचार करणार्या लोकांचे खून जगभर झाले आहेत आणि हे एकविसाव्या शतकातील मानवजातीपुढचेे एक गंभीर संकट आहे. विशेषत: हे संकट विकसनशील देशात अधिकच चिंताजनक स्वरूप धारण करताना आपल्याला दिसत आहे. यापेक्षा गंभीर म्हणावी, अशी बाब म्हणजे सरकार आणि पोलीस यंत्रणांचा अशा खुनांकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन अधिकच चिंता वाढवणारा असून तपास यंत्रणा याबाबतीत प्रचंड शांत आहेत आणि सरकारी इच्छाशक्ती अशक्त असलेली दिसून येते. याचा वाईट परिणाम म्हणजे समाजात वाढणारी असहिष्णुता हिंसक रूप धारण करत आहे आणि जगातील अधिकाधिक लोक असहिष्णुतेच्या चक्रात अडकत आहेत.
ज्या समाजात अंधश्रध्दांचा उपयोग राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक राजकारणासाठी केला जातो, अशा समाजात अंधश्रध्दा निर्मूलन हे अधिकच गंभीर आणि अशक्य काम आहे. यामध्ये प्रचंड संयम आणि विवेकाची गरज असतेच; पण यापेक्षाही अधिक गरज काही वेळेला धैर्याची असते. कारण हे काम तुमच्या जिवाची किंमत मागू शकते. म्हणूनच धैर्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार मला अधिक गौरवाचा आणि आमच्या कामाच्या योग्य मोबदल्याचा वाटतो. माणसाच्या सुसंस्कृत जीवनाच्या विकासवाटेवर आपण असे अनेक लोक हरवले आहेत, जे धर्मनिरपेक्षता, मानवता, विज्ञान, न्याय, वैज्ञानिक द़ृष्टिकोन, समानता आणि सामाजिक न्याय या मानवी मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करत आपल्या सहकारी मानवांचे प्रबोधन करत होते. माझ्या मनात यावेळी वेदना आणि आनंदाची संमिश्र भावना आहे. एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबरच धैर्य आणि नीतितत्त्वांच्या मानवी तत्त्वज्ञानाची अधिक गरज आपल्याला असणार आहे. आपल्याला असेल दिसेल की विवेकी विचारांचा अभाव अंधश्रध्दा अधिक घातक बनवत आहे.
विवेकी लोकांनी सर्वसामान्य लोकांच्याबरोबर संवाद निर्माण केलेला मूलतत्त्ववादी लोकांना सहन होत नाही. भारतामध्ये यासाठी अलिकडच्या काळात डॉ. दाभोलकर, डॉ. कलबुर्गी, कॉ. पानसरे आणि गौरी लंकेश यांनी त्यांचे विचार, संकल्पना आणि तत्त्व यासाठी आपला जीव गमावला आहे. तपास यंत्रणांना या सर्व खुनांचे धागेदोरे धार्मिक मूलतत्त्ववादात दिसून आले आहेत. मी हा पुरस्कार या सर्व महान व्यक्ती, त्यांचे विचार आणि कार्य यांना समर्पित करतो.
शहीद अविजित रॉय यांची ‘मुक्त मन’ ही संकल्पना आमच्या कामाचा एक मूलभ्ाूत घटक आहे. मुक्त विचारांचे जग तयार करणे ही ऊर्जा आपल्या सर्वांना एकत्र बांधणारी आणि उभा करणारी शक्ती आहे. ‘मअंनिस’ गेल्या तीस वर्षांमध्ये याच कामात सदैव गुंतलेली आहे. माणसाने अंधश्रध्दांच्या आहारी जाऊन आपले जीवन अविवेकी बनवण्यापेक्षा त्याचे विचार धर्म, संस्कृती आणि परंपरा यांच्याबाबतीत मुक्त असावेत, मुक्तपणे नवे विचार आणि संकल्पना मानवी जीवनात रुजाव्यात हा आमच्या कामाचा गाभा घटक आहे. आमच्या तीस वर्षांच्या अथक आणि अविश्रांत कामाने अंधश्रध्दा निर्मूलन या शब्दांना आणि संकल्पनांना महाराष्ट्रांत एक वेगळा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ मिळालेला आहे. अंधश्रध्दा निर्मूलन या विषयाच्या माध्यमातून आमची समाजात सकारात्मक बदल घडवण्यात यशस्वी झालो आहोत. आमचे दूरद़ृष्टीचे नेतृत्व डॉ. दाभोलकर यांच्या अथक प्रयत्नातून हे साध्य झाले आहे. याची सुरुवात तीस वर्षार्ंपूर्वी 9 ऑगस्ट 1989 रोजी ‘मअंनिस’च्या स्थापनेने झाली होती.
अलिकडेच 9 ऑगस्ट 2019 रोजी आमच्या संघटनेला तीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईमध्ये आम्ही एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. महाराष्ट्रात जवळपास 350 शाखांच्या मधून या चळवळीचे काम चालते. जातिव्यवस्था, अंधश्रध्दा आणि कर्मकांड यांना फाटा देऊन महाराष्ट्रात समाजसुधारणेचा इतिहास अधिक वेगाने पुढे जावा, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
स्वत:ला दैवी शक्ती किंवा देव असे जाहीर करून लोकांची लुबाडणूक करणार्या बाबांचा भांडाफोड करून या चळवळीचे काम सुरू झाले. त्यानंतरच्या काळात समितीने वैज्ञानिक द़ृष्टिकोन, धर्माची विधायक चिकित्सा, धर्मनिरपेक्षता, विवेकवाद आणि मानवता यांचा प्रचार अणि प्रचार हे आपले ध्येय बनवले. या माध्यमातून काम करताना आम्ही दोन कायदे पास करू शकलो आणि सर्वसामान्य माणसांची पिळवणूक थांबलो शकलो.
समितीच्या तीस वर्षांच्या कामाचा इतिहास तीन दशकांत विभागला जाऊ शकतो. पहिल्या दशकात समितीकडे काही मूठभर शाखा होत्या आणि काही कार्यकर्ते होते. या काळात आम्ही समाजाला अंधश्रध्दा निर्मूलन हा विषय महत्त्वाचा आहे, हे समजावून सांगू शकलो. आमच्या कामांमुळे समाजाने या विषयाची दखल घेतली. समाजाने हे मान्य केले की, आपल्या समाजात अंधश्रध्दा आहेत आणि यांचे निर्मूलन झाले पाहिजे. अगदी समितीचे विरोधक सुध्दा समितीच्या कामाबद्दल तसेच बोलताना दिसतात.
दुसर्या दशकात समितीला या कामातील तज्ज्ञाची जागा मिळाली; तसेच या कामातील समितीचे महत्त्व समाजाने मान्य केले. या काळात समितीने आपल्या कामाचा अधिक विस्तार केला.
तिसर्या दशकात समितीने धर्माची विधायक चिकित्सा आणि विवेकवादाचा प्रचार आणि प्रचार या गाभा घटकांच्या वर अधिक जोमाने काम चालू केले.
‘मअंनिस’ आपल्या कामाचा मूलभूत आधार दोन गोष्टींच्या आचरणातून आणि तत्त्वज्ञानातून घेते. एक आहे, महाराष्ट्राला असलेला समाजसुधारकांचा इतिहास. समिती जे काम करते, ते या राज्यातील समाजसुधारकांनी केलेले काम आहे. आम्ही त्यांचेच काम करतो, अशी समितीची प्रामाणिक भ्ाूमिका आहे. नीतिमत्ता, नीती, बंधुभाव, विवेकवाद, मानवता, न्याय आणि अहिंसा ही तत्त्वं समाजसुधारकांच्या कामांचा गाभा घटक होती. आम्ही पण त्याच मार्गावर चालत आहोत.
दुसरा मूलभूत घटक आहे भारताचे संविधान. भारताच्या संविधानाचा सरनामा आणि समाजसुधारकांचे विचार यात काही फरक आहे, असे आम्हाला वाटत नाही. भारताचे संविधान स्त्री आणि पुरुष असा भेद करत नाही आणि सर्व ठिकाणी या दोघांचा प्रवेश आणि वावर मुक्त असावा, असा त्याचा आग्रह आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र याला धोका निर्माण होईल, अशा कोणत्याही अमानवी आणि अघोरी कर्मकांडाचा पुरस्कार भारताचे संविधान करत नाही. भारतीय समाजाचे घटनात्मक वर्तन हे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या ध्येयावत असलेल्या नीतिमान आणि विवेकी समाजनिर्मितीच्या आचाराशी मेळ बसणारे आहे.
आमचा तीस वर्षांचा अनुभव असे सांगतो की, अंधश्रध्दा या मानवतावादी समाजनिर्मितीच्या निर्मितीतील एक प्रमुख अडथळा आहेत. वैज्ञानिक द़ृष्टिकोनाचा अभाव स्त्रिया, वंचित आणि दबलेल्या सामाजिक घटकांच्या विकासाचा अवकाश निर्माण करत नाहीच; उलट त्यांच्या पिळवणुकीच्या व्यवस्था अधिक घट्ट करत असतो. अंधश्रध्दांच्या मुळे बुवा-बाबांचा, कर्मकांडांचा ‘उद्योग’ तेजीत चालतो. सर्व प्रकारच्या पिळवणुकीच्या प्रमुख आधारांमध्ये अवैज्ञानिक विचार, परंपरांची कालानुरूप आणि विज्ञानाच्या आधारे चिकित्सा न करणे आणि परंपरा आणि श्रध्दा यांच्याबद्दलचा खोटा अहंकार प्रमुख आधार आहेत.
या सर्व गोष्टींचा विचार करूनच ‘मअंनिस’ने संविधान महोत्सव, जोडीदाराची विवेकी निवड, छद्मविज्ञानाबद्दल प्रबोधन आणि जातपंचायतींचे उच्चाटन असे काही कार्यक्रम हाती घेतले आहेत. अशा नाविण्यपूर्ण संकल्पना आणि समाजाशी सतत होणारा व्यवहारातील आणि कामातून निर्माण होणारा संवाद ‘मअंनिस’ला अधिक क्रियाशील बनवतात.
निःस्वार्थी आणि झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते ही ‘मअंनिस’च्या तीस वर्षांच्या अविरत कामाची खरी ताकद आहे. त्यांचे शारीरिक, बौध्दिक, मानसिक आणि भावनिक श्रम समितीला समाजात क्रियाशील बनवत असते. समाजाची मान्यता आणि प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी समितीच्या उपक्रमांना दिलेली साथ ही आमची दुसरी ताकद असू शकते.
आम्ही असे समजतो की, अंधश्रध्दांचे निर्मूलन म्हणजे व्देष, राग, हाव, भीती, अयोग्य स्पर्धा आणि नकारात्मक भावनांचे निर्मूलन करणे आणि प्रेम, सहकार्य, बंधुभाव, सहिष्णुता, शांततापूर्ण सहअस्तित्व, करुणा, एकमेकांवरील विश्वास, आणि विवेकवाद यांचे संवर्धन करणे. हा शतकांचा प्रवास आहे. एका पिढीत संपेल असे हे काम नाही, तर बर्याच पिढ्यांना यामध्ये काम करावे लागेल. अंधश्रंध्दा पिढान्पिढ्यांपासून रुजल्या आहेत, त्या एका पिढीच्या योगदानाने संपणार नाहीत.
यानिमित्ताने मी आपल्याला आमचे सहप्रवासी, साथी, सहकारी आणि आश्रयदाते होण्याची विनंती करेन. आमची अशी ठाम समजूत आहे की, तुम्ही जे काम इथे अमेरिकेत करीत आहात, तेच काम आम्ही भारतात करत आहोत. आपण सर्व समविचारी लोक आहोत आणि आपण एकत्रित संवाद निर्माण करण्याची गरज आहे. एकमेकांना तांत्रिक आणि बौध्दिक मार्गदर्शन केल्यानेच हे काम सोपे होणार आहे. कारण आपण मानवता, विवेकवाद आणि समानतेच्या जगाच्या निर्मितीचे सहप्रवासी आहोत.
विवेकवादाचा प्रचार आणि प्रसार हेच आता आपल्या हातात आहे. मानवी जीवन आपल्या ऐतिहासिक विकासात बर्याच स्थित्यंरातून पुढे आले आहे. विज्ञानवादी विचार करण्याच्या या टप्प्यावर येण्यासाठी माणसाने तर्क, परीक्षण आणि सर्वसमावेशक विचार पध्दती या तंत्रांचा उपयोग केला आहे. या सर्वांचा पुढील विकसित टप्पा म्हणजे विवेकवाद आहे. सर्वसमावेशक द़ृष्टिकोन विकसित करण्यासाठी आपल्याला वैज्ञानिक ज्ञानावर आणि प्रयोगावर आधारलेला विवेकवाद जगात रुजवला पाहिजे. हा विवेकवाद मूल्य आणि नीतिमत्ता यावर आधारित असेल.
माणसाच्या वर्तनात आणि वागण्यात बदल करण्यासाठी फक्त विचार परिवर्तन करून चालणार नाही, तर भावनिक बदलांसाठीसुध्दा काम केले पाहिजे. मानवी व्यक्तिमत्त्व फक्त मूल्यांच्या विचारांवरच तग धरणार नाही, तिला विवेकी भावनांची गरज आहे.
धर्मांधता आणि हिंसा ही नव्या जगासमोरील आव्हाने उग्र रूप धारण करताना दिसत आहेत आणि जागतिकीकरणानंतर तर ही आव्हाने अधिक उग्र होत आहेत. यावर मात करण्यासाठी जगातील सर्व मानवतावादी आणि विवेकी लोकांनी एकत्र काम करण्याची गरज आहे, तरच विवेकी जग शक्य आहे. यासाठी ‘मअंनिस’ जी जबाबदारी येईल, ती आपल्या खांद्यावर घ्यायला तयार आहे. एकमेकांचे हात हातात घेऊनच वेगाने पुढचा प्रवास करावा लागेल. शांत आणि सुंदर जग फक्त स्वप्नात बघ्ाून निर्माण होणार नाही, तर त्यासाठी मैदानात येऊन जबाबदारी घेऊन काम करावे लागेल.