महा. अंनिस शाखा पनवेल व पनवेल शहर ‘विवेकवाहिनी’तर्फे दि. 18 ऑगस्ट 19 रोजी ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या विषयावर आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. डॉ. दाभोलकरांच्या खुनाला 6 वर्षेझाली आहेत, तरीही अजून सूत्रधार सापडलेले नाहीत. देशात मात्र हिंसाचाराच्या घटना वाढतच आहेत. अशा पार्श्वभूमीवर तरुणाईची भूमिका सांस्कृतिक अंगाने समजून घेण्याचा हा प्रयत्न होता. रायगड, मुंबई, नवी मुंबई परिसरातील अंतिम 20 कॉलेजेसना सादरीकरणाची संधी मिळाली. पथनाट्याचं अतिशय दर्जेदार सादरीकरण सर्वच टीमनं केलं. कौटुंबिक हिंसा, बलात्कार, विषमता, मानसिक हिंसा, करिअर, रॅगिंग, जातीयता, धार्मिक हिंसा, अंधश्रद्धेतील हिंसा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व विचारवंतांचे झालेले खून, प्राण्यांवरील हिंसा ते 370 कलम अशा विविध विषयांना या तरुणाईने हात घातला. सादरीकरणातलं वेगळेपण, जोश, अभिनय हे सारं अफाट होतं. प्रथम क्रमांक विजेत्या कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन कॉलेज मुंबईने ‘र्हास संवैधानिक मूल्यांचा’ हे संविधानाच्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून सादर केलेले पथनाट्य व द्वितीय क्रमांकाचे ‘काय, पटतंय ना?’ हे एन. ई. एस. रत्नम कॉलेज, भांडुपच्या मुलींनी सादर केलेले पथनाट्य तरुणाई किती वेगळ्या पद्धतीने विचार करते, हे दाखवणारं होतं.
Categories