Categories
पर्दाफाश

शेवटी आसारामबापूंना तहहयात शिक्षा, तथाकथीत आध्यात्मिक गुरुपरंपरेचा पर्दाफाश!

मे - २०१८

आसारामबापूंच्या विरुद्ध 6 ऑगस्ट 2013 रोजी आरोपपत्र दाखल झाले होते. त्यात कलम 8 नुसार पॉकसो कायदा (Protection of Children from Sexual Offences ­Act) आणि भारतीय दंड संहिता कलम 342, 376, 506 , 509 नुसार तसेच ज्युवेनाईल जस्टीस अ‍ॅक्ट या कायद्यांप्रमाणे कलम 23 व 26 अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. त्यातील तरतुदींनुसार मरेपर्यंत जेल जन्मठेप अशी शिक्षा आसारामबापूना करण्यात आली आहे. तसेच सहआरोपी म्हणून शरद व शिल्पी यांना प्रत्येकी 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

खटल्यातील विशेष न्यायाधीश मधुसुदन शर्मा यांनी त्यांच्यावर आलेल्या सर्व प्रकारच्या दबावाला न जुमानता, कुठलाही पक्षपात न करता निकाल दिल्यामुळे हे शक्य झाले. यात न्यायाधीश शर्माजींनी दाखविलेल्या धैर्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन आहे. तसेच बाधित कुटूंबाने सर्व विपरित परिस्थितीत देखील घेतलेल्या पुढाकारामुळे एवढया बलाढ्य बाबाला केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होऊ शकली आहे. फिर्यादी, तपास यंत्रणा व न्यायालयाच्या प्रयत्नांमुळे सर्वसामान्य, गरजू नागरिकांचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास दृढ व्हायला मदत होईल.

आसारामबापूंची 10 हजार कोटींची मालमत्ता आहे, 450 पेक्षा जास्त वैध-अवैध आश्रम आहेत, लाखो अनुयायी आहेत आणि त्यात राजकीय, धार्मिक, प्रशासन, माध्यम क्षेत्रातील प्रभावी असणारे उघड वा छुपे समर्थक मंडळी आहेत. आशा आहे की, आता ती मंडळी त्यांच्या पाठिंब्याचा पुनर्विचार करतील. आसारामना संत पदाचा दर्जा दिलेल्या सनातनी मंडळींना अपेक्षा आहे की, सर्वोच्च न्यायालयात निकाल त्यांना अनुकूल मिळेल. त्यासाठी ते दाखले देत आहेत ते धार्मिक मुलतत्त्वासाठी केल्या गेलेल्या बॉम्बस्फोटांसारख्या हिंसक कृत्यातील गुन्हेगारांचे! जरी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले तरी खालच्या कोर्टाचा निकाल कायम राहु शकतो. अर्थातच त्यासाठी सुनावणी, साक्षी पुरावे, निकालामधे कायदा जाणकारांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता अपीलात सुध्दा प्रामाणिक, नि:पक्षपातीपणे काम करणे अपेक्षित आहे. म्हणजे त्यात ‘फेस लॉ’ प्रभावी न ठरता, ‘केस लॉ’ परिणामकारक ठरावा. महाराष्ट्र अंनिसने हाताळलेले आसारामबापू विरोधाचे काही मुद्दे असे आहेत…

1) आसारामबापूंनी ‘यौवन सुरक्षा’ नावाची पुस्तिका शालेय मुलांना वाटल्या होत्या. त्यात सर्व अशास्रीय गोष्टी होत्या, वीर्यपतन करू नये यासारख्या. त्याला महा. अंनिसने विरोध केला. त्यावर यातील तज्ज्ञ डॉ. विठ्ठल प्रभूंकडून लेख लिहून तो ‘अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्रा’त छापला होता. नंतर त्याच्या पुस्तिका काढल्या. यावर आसारामबापूंनी वार्तापत्राला नोटीस पाठवली होती, त्याला देखील महा. अंनिसने जोरदार उत्तर दिले होते.

2) महा अंनिस कार्यकर्ताच्या एका धाडसी पत्रकार मुलींने आसारामबापूंचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. ते ‘आजतक’ टीव्हीने दाखवले. अंनिवा वार्षिक अंकात छापले. परदेशी चलनाची अफरातफरी व त्यांचा स्रीलंपटपणा यातून बाहेर आला.

3) आसारामबापूंच्या आश्रमात झालेले खूनावर अंनिवाने वेळोवेळी परखड लिखाण केले आहे.