Categories
कार्यकर्ता मुलाखत

संयमी आणि चिकित्सक कार्यकर्ता : दीपक गिरमे

वार्षिकांक - २०१७

हंसयोग शिकविणारा शितोळे महाराज किंवा वज्रेश्वरीच्या ‘गुरुमाई’ आश्रम अशा कर्मकांडी व अंधश्रद्धाळू वातावरणात राहूनही आपल्या व चिकित्सक व अभ्यासू वृत्तीला न सोडणारे अंनिसचे कार्यकर्ते दीपक गिरमे यांच्या विवेकवादापर्यंतचा अंनिसच्या सहाय्याने झालेल्या प्रवासाचा आलेख या मुलाखतीतून डॉ. ठकसेन गोराणे यांनी रेखाटला आहे.

“आम्ही व्यक्ती आणि समाजव्यवस्था या दोहोंमध्ये परिवर्तन करू इच्छितो,” असे डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे. सामाजिक परिवर्तनाच्या त्या संग्रामात सुरुवातीपासून डॉक्टरांच्या सोबत सातत्याने कार्यरत राहिलेले जे अनेक निष्ठावान लढवय्ये होते, त्यामध्ये पुण्यातील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक दीपक गिरमे हेही होते. 1990 पासून ते डॉक्टरांसोबत कार्यरत होते. आजही ते समितीच्या कामात जास्तीत जास्त वेळ देऊन सहभागी होतात, जबाबदारी स्वीकारतात, नवीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात, मोहिमा- उपक्रमांचे नियोजन करतात. त्यासाठी पूर्वीपासूनच स्वत:चा वेळ व अनुषंगिक खर्च करतात. अभ्यासपूर्ण-अनुभवावर आधारित विषयाची मांडणी, सततचे वाचन-चिंतन-मनन यामुळे ठोस निष्कर्षांपर्यंत येण्याची वृत्ती, मदतीचा हात सदैव पुढे करण्याची उदारता आणि विशेष म्हणजे प्रचंड चिकित्सक वृत्ती! अशा या प्रसन्न-टापटीप व्यक्तिमत्त्वाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला जाणून घेतले, तर नवीन; तसेच कार्यरत सर्व साथींना प्रेरणा-प्रोत्साहन, सोशिकता-संयम बाळगण्याची वृत्ती, वाचन-चिंतन-मनन करण्याची आवड अशा अनेक बाबींबाबत मार्गदर्शन खात्रीने मिळेल. या हेतूने त्यांची मुलाखत घेतली आहे. डॉक्टरांचा प्रत्यक्ष सहवास अनेक वेळा त्यांना लाभला. त्यांचे अनुभवही कार्यकर्त्यांना वाचावयास मिळावेत, म्हणजे सुरुवातीपासून ते आजपर्यंत समितीच्या कामात कशी-कशी विविधता होती, कसे पेचप्रसंग होते, कौशल्याने आणि सर्वांना सोबत घेऊन डॉक्टरांनी त्यावर कशी मात केली आणि आधुुनिकतेशी सर्व विषयांची नाळ जोडून, भविष्याचा वेध घेण्याचे कसब स्वत:सोबतच कार्यकर्त्यांनाही डॉक्टरांनी कशी अनौपचारिकपणे शिकवून, आत्मसात करायला लावले, याचे प्रत्यक्ष साक्षीदार-सहभागीदार-हिस्सा दीपक गिरमे राहिले आहेत. कार्यकर्त्यांना हे नक्कीच प्रेरक ठरेल.

गिरमे सर, आपले बालपण, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी याबाबत माहिती घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.

1951 साली शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. पुण्यातील बिशप हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात माझं शिक्षण झालं. वेगवेगळ्या प्रांतातील आणि विविध जाती-धर्माची मुले येथे शिक्षण घेत होती. मात्र तरीही तेथे भेदाभेद विशेष जाणवत नव्हता. माझे वडील दोनदा आमदार म्हणून निवडून आले. ते स्वातंत्र्यसैनिक होते. पत्री सरकारात काम करणारे कार्यकर्ते; तसेच स्वातंत्र्यचळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांना वडिलांनी सतत छुपा आश्रय दिला. अनेक मान्यवरांचे आमच्या घरी येणे-जाणे असायचे. मुक्कामी राहायचे; पण जेवण घेत नसत. मात्र त्यात आम्हाला काही विशेष त्यावेळी वाटत नसे. वडिलांकडे अनेक पुस्तकांची स्वत:ची लायब्ररी होती. त्यात अनेक इंग्लिश पुस्तके होती. त्याकाळीही आमच्या घरी इंग्रजी वर्तमानपत्रे यायची. त्यामुळे माझे वाचन होत असे. वाचनाची आवड आणि सवय मला लागली. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅ. सावरकर यांची काही पुस्तके वाचली. त्यामुळे चिकित्सक मानसिकता घडत राहिली. ‘हिंदूपद-पदशाही’ या पुस्तकाच्या वाचनाने बरेच काही कळाले. पुढे ‘Riddles of Hinduism’ वेद, पुराणे वाचण्यात आली. मूळ वाल्मिकी रामायणाचे 9 खंड मिळविले. ते वाचले. वाग्भटांचे आयुर्वेदावरील पुस्तक आणून वाचले. वेदांच्या प्रती झेरॉक्स करून, कार्यकर्त्यांना वाचावयास दिल्या. त्यावर सातत्याने प्रश्नोत्तरे होत राहिली. त्यामुळे सत्य-असत्याचा शोध घेण्याची वृत्ती आणखीच बळकट होत राहिली.

माझा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला. त्याकाळी विवाहात करावयाची सर्व कर्मकांडे यथासांग झाली. आपणास पटो ना पटो, समाजव्यवस्थेचा तो एक अपरिहार्य भाग होता. अर्थातच, त्यात अनेक अंधश्रद्धायुक्त कर्मकांडे होती; पण त्याचे विशेष कुणाला काही वाटत नव्हते. जगण्याचा एक भाग आणि परंपरेचे पालन, असे ते सर्व होते. कॉलेजमध्ये शिकत असताना मात्र भेदाभेद प्रकर्षाने जाणवायला लागला. आपला-परका असे उघड-उघड दिसायचे; पण बोलता येत नसे.

साधारण चाळीस वर्षांपूर्वी आपण या घटना पाहिल्या. आपण स्वत: काही गुरूपरंपरा, श्रद्धा या नावाखाली त्यावेळी चालणार्‍या प्रकारांच्या संपर्कात आला होतात काय?

साहजिकच कौटुंबिक, सामाजिक प्रभाव अधिक असल्याने, स्वत:ची मतं माडणे अवघड असायचे. कुटुंबात वातावरण मनमोकळे होते; पण तरीही अनाहूत दडपण या बाबतीत असायचे. त्यानंतरच्या पुढील आयुष्यात शितोळे महाराज नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात येणे झाले. हा महाराज ‘हंसयोग’ शिकवायचा. मात्र त्याच्या अनेक भक्तांनी त्याला पुण्यात कुठेकुठे गैरवर्तन, चाळे करताना पाहिले होते. त्यामुळे अध्यात्म, योग शिकविणारा हा महाराज बाहेरच्या आयुष्यात भलतेच उद्योग करतो, ही बाब लक्षात आली आणि त्याचे सान्निध्य संपले.

वज्रेश्वरीच्या ‘गुरुमाई’ आश्रमातही काही काळ येणे-जाणे झाले. ते मात्र प्रचंड प्रस्थ होते. अनेक देशांतील भक्तमंडळी तेथे येत असत. त्यांची व्यवस्था चोख ठेवलेली असायची. सर्व आधुनिक सुखसुविधांनी सज्ज असा हा आश्रम आहे. आश्रमातील सर्व कामे हा शिष्यगणांच्या सेवेचा भाग होता. अगदी मन लावून, तन्मयतेने शिष्यगण सर्व कामे करायचे. परदेशी भक्तगण अधिक असल्याने या आश्रमावर परदेशी संस्कृतीचा पगडा अधिक असायचा. देशी शिष्यांची संख्या तेथे तुलनेने कमी होती.

वरील दोन्ही भोंदूगिरीच्या संपर्कात काही काळ गेल्याने खरे अध्यात्म – जे मला वाचनातून कळाले होते ते आणि महाराजांच्या सान्निध्यात चालणारे अध्यात्माचे ढोंग हा फरक माझ्या चिकित्सक वृत्तीने लवकरच ओळखला. गुरुमाईच्या आश्रमात जाताना एकदा अंधश्रद्धा निर्मूलनाचे पितामह म्हणून आपण ज्यांना मानतो, त्या डॉ. अब्राहम कोवूर यांचे “Gods, Demons and Spirit’ हे पुस्तक सोबत नेले, ते वाचले. तेव्हा आश्रमात चाललेला ढोंगी अध्यात्माचा प्रकार आणि कोवूरांनी बुवाबाजीची केलेली चिरफाड या बाबी प्रत्यक्षात बघायला मिळाल्या.

1984 च्या आसपास माझ्या उजव्या डोळ्याला लहानशी; पण गंभीर जखम झाली. प्रचलित पद्धतीने (बाहेरचे बघणे) मंत्र-तंत्र-शांती-यज्ञ असे प्रकारही केले. खरं तर त्यात अजिबात तथ्य नव्हतं. मनाला ते पटतही नव्हतं. पण तरीही असं घडत राहायचं.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क कधी आला? त्यानंतरचा पुढील सहभाग, काम याबाबत सविस्तर सांगा.

साधारणत: हा 1990 ते 1991 चा कालावधी असावा. समितीची मीटिंग आपटे प्रशालेत व्हायची. कुणासोबत गेलो आठवत नाही; पण मग मात्र या बैठकांना मी जास्तीत जास्त वेळा उपस्थित राहायचो. बैठकीतून अनेक विचार मांडले जायचे. मलाही खूप काही सुचायचे, बोलावेसे वाटायचे; पण ते मांडण्यासाठी भाषेचा प्रश्न यायचा. कारण माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले होते. चर्चेत अनेक विषय नवीन वाटायचे. त्याबाबत कुतूहल निर्माण व्हायचं. शब्बीर शेख हे कार्यकर्ते बैठकीत चमत्कार करून दाखवायचे आणि शिकवायचेही. त्यातून मी चमत्कार-प्रात्यक्षिक करण्याचे शिकलो. बोलण्यासाठी, विचार मांडण्यासाठी डॉक्टरांनी हिंमत दिली, प्रोत्साहन दिले. मी समर्पक, मुद्देसूद बोलू लागलो. पुढे पुणे शहराचा कार्याध्यक्ष झालो. डॉक्टरांनी पुण्यातील पत्रकार, संपादक यांची कार्यकर्त्यांशी जाणीवपूर्वक भेट घडवून आणली. चर्चा, प्रश्नोत्तरे होत राहिली. नंतर पुणे जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणूनही काम केले. डॉक्टर पुण्यात आले की, त्यांच्यासोबत अनेक वेळा सहवास घडायचा, चर्चा व्हायची. बांधकामाचा व्यवसाय असल्याने लहान चारचाकी गाडी होती. डॉक्टर म्हणतील तेव्हा गाडी उपलब्ध करून द्यायचो. स्वत: मीही सोबत असायचो. अनेक मान्यवरांकडे जाणे-येणे, चर्चा होत असायची. गाडी छोटी पडू लागली म्हणून मोठी गाडी घेतली. त्यामुळे समितीच्या कार्यक्रमासाठी पुण्यातील मान्यवर आणणे-पोचविणे सोपे झाले. शिवाय कार्यकर्त्यांचीही सोय झाली. या मोठ्या गाडीमुळे डॉक्टरांसोबत महाराष्ट्रभर अनेक वेळा फिरता आले. त्यामुळे परिवर्तनाच्या अनेक विषयांवर, मुद्द्यांवर डॉक्टरांशी चर्चा व्हायची. माझ्या वाचनाने मलाही खूप काही सुचायचे. त्याचीही चर्चा डॉक्टरांसोबत करायचो. स्वत:च्या चिकित्सक-विश्लेषक स्वभावामुळे आणि एखादा विषय मुळातूनच जाणून घेण्याच्या वृत्तीमुळे त्या विषयाबाबत इतरांचीही मते, म्हणणे डॉक्टर मोठ्या कौशल्याने जाणून घ्यायचे. एखाद्या विषयाबाबत जुन्या-नव्या कार्यकर्त्याला काय वाटतं, त्याचं स्वत:चं त्याबाबत काय मत आहे, या विषयाचं भूत-वर्तमान-भविष्य काय असू शकेल आणि त्यामध्ये योग्य तो बदल घडवून आणण्यासाठी काय करावे लागेल, याची माझ्यासमक्ष, माझ्यासह अनेकांशी चर्चा व्हायची. त्यामुळे कार्यकर्ते विचार करू लागायचे, शोध घ्यायचे, घडत राहायचे, असा माझा अनुभव आहे. मी स्वत:ही काही नवीन विषयावर बोलायचो. डॉक्टरांशी चर्चा करायचो. लोकांशी बोलण्यात, भाषणात डॉक्टर त्याचा आवर्जून उल्लेख करायचे. त्यामुळे माझी हिंमत, आत्मविश्वास वाढायचा. कामातील गोडी, आवड वाढायची. एकूणच जगण्याची, विचार करण्याची पद्धत, दृष्टिकोन बदलायचा, मजा वाटायची, आनंद मिळायचा. आपल्याला विचार सुचतो, तो मांडता येतो, लोकांना तो पटतो, लोक चिकित्सा करू लागतात. तसे स्वत: वागण्याचा प्रयत्न करतात, हा अनुभव सतत येत राहिला.

समितीत कार्यरत असताना अनेक मान्यवर, प्रसिद्ध व्यक्तींशी आपला संपर्क आला. अशा त्या मान्यवर व्यक्ती कोणकोण होत्या? काम करताना त्यांचा काय फायदा व्हायचा?

निळूभाऊ फुले, डॉ. श्रीराम लागू, ग. प्र. प्रधान, डॉ. वसंतराव गोवरीकर, डॉ. जयंत नारळीकर यांच्यासोबत अनेक वेळा अनेक तास राहता आले. त्यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी होत राहिलो. प्रत्यक्ष त्यांच्याशी समितीच्या कामाबाबत चर्चा होत राहिली. पुणे विद्यापीठात ‘आयुका’ मध्ये अनेक वेळा कार्यक्रम झाले. माझा स्वत:चा व्हिडीओ कॅमेरा होता. त्याचा फायदा झाला. वेळोवेळी मान्यवरांची भाषणं रेकॉर्ड करता आली. इतर कार्यकर्त्यांना ती दाखविता आली. समाजात मानपान, प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळालेली ही मोठी माणसं समितीच्या कामासाठी जाणीवपूर्वक येतात, वेळ देतात, कामाचा वाटा उचलतात. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारीचे भान अधिकच आपणास बाळगायला हवे, ही बाब मनाशी घट्ट व्हायची.

समितीचे काम लोकाधारावर चालते. सुरुवातीला फारच अडचणी असायच्या. लोकप्रबोधनासाठी साहित्यनिर्मिती, प्रचार, प्रसारासाठी साधने कशा प्रकारे मिळायची? काही देणगीदार आणि त्यांनी केलेली मदत, तिचा उपयोग समितीला कसा झाला?

चंदू चव्हाण या दानशूर व्यक्तीने व्हिडीओ प्रोजेक्टर समितीला दिला. त्यांची खूपच मदत झाली. दृक्श्राव्य साधन हाताशी आल्याने प्रबोधन प्रभावी होऊ लागले. मोठा लोकसमूह प्रबोधित करता येऊ लागला. वसंतराव दिवेकर यांनीही दोन प्रोजेक्टर दिले. त्यामुळे नवीन कार्यकर्ते जोडले गेले. कामाच्या प्रचार-प्रसाराचा हेतू मोठ्या प्रमाणात साध्य होऊ लागला. समितीचं कुठंतरी हक्काचं कार्यालय असावं, अशी कल्पना पुढे आली. पण चालतं-फिरतं कार्यालय, जे लोकांपर्यंत नेता येईल, कार्यक्रम प्रत्यक्ष दाखविता येतील, अशीही एक वेगळी कल्पना पुढे आली. समितीच्या एकूणच त्यावेळच्या विविध विभागांच्या कामाची लोकांना माहिती व्हावी, कार्यक्रमाचे सर्व साहित्य सोबत असावे, अशी गाडी तयार करण्याचे ठरले. पुन्हा वसंतराव दिवेकर यांनी अशी गाडीच समितीला दिली. तिची बांधणी करून घेतली. त्यासाठी सातार्‍याला जाऊन, मला बराच वेळ द्यावा लागला. पण अतिशय आकर्षक अशी ‘विज्ञान बोध वाहिनी’ची ही व्हॅन बांधून घेतली. आवश्यक त्या सर्व सुविधांनी युक्त अशी बहुपयोगी व्हॅन सज्ज झाली. संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम घेता आले. समितीचे काम झपाट्याने लोकांपर्यंत पोचविता आले.

समितीचे कामकाज जागतिक पातळीवर जावे, असे सर्वांनाच वाटत होते. यासाठी वेबसाईट तयार करण्याची गरज मी सुचविली. तिचे ‘antisuperstition’ हे नावही सुचविले. वेबसाईटवर चांगला ‘फीडबॅक’ मिळू लागला. सर्व व्यावसायिक, कौटुंबिक व्याप सांभाळून, ओढाताण करून, वेबसाईटवर अद्ययावत माहिती अपलोड करायचो. आज 300 पेजेस या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. विशेेषत: तंत्रज्ञान जाणणार्‍या आणि नवीन कार्यकर्त्यांसाठी अतिशय उपयोगी अशी ही वेबसाईट आहे.

जादूटोणाविरोधी कायदा व्हावा, यासाठी स्वतंत्र वेळ देऊन पाठपुरावा करायला लागायचा. त्याबाबत आपण काय सांगाल?

जादूटोणाविरोधी कायद्याचा कच्चा मसुदा, प्रथम लॉ कॉलेजचे त्यावेळचे प्राचार्य व कायदेतज्ज्ञ सत्यरंजन साठे यांना वाचावयास दिला. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक मिसरसाहेब यांचीही याकामी मोठी मदत झाली. त्यांच्याशी सतत संपर्क, चर्चा, पाठपुरावा पुणे शाखेला करायला लागायचा. त्यामुळे कायद्याची गरज, मुद्दे इतर कामासोबत स्वतंत्र काम म्हणून ते वेळ देऊन, जाणीवपूर्वक करावे लागायचे.

विवेकी विचार समाजात रुजविण्यासाठी, कृतिशील, नाविन्यपूर्ण उपक्रम, मोहिमा, अभियाने समितीने सुरुवातीपासून राबविली. त्याचे आपण साक्षीदार आहात. काही मोजके अनुभव सांगाल?

विसर्जित गणपती दान मिळविण्याची मोहीम जेव्हा प्रथम पुण्यात सुरू केली, त्यावेळी समितीच्या विचारसरणीच्या विरोधातील काही संप्रदायाच्या भक्तांनी, शिष्यांनी त्याठिकाणी येऊन जोरजोरात घंटा बडवायला सुरुवात केली. त्यामुळे वाहत्या पाण्यात, नदीपात्रात गणपती विसर्जित केल्याने काय दुष्परिणाम होतात, याबाबत आम्ही जे तोंडी लोकप्रबोधन करीत होतो, ते लोकांना ऐकायला येईना. या घंटा बडवणार्‍यांचा मला खूप राग यायचा. पण माझ्यासह इतर कार्यकर्त्यांना ‘शांतपणे शक्य तेवढे आपले करा’, असे डॉक्टर सांगायचे. घंटा बडविणार्‍यांचा नाईलाज झाला.

गणपतीला विविध रासायनिक रंगांनी रंगविलेले असते. त्यातील घटक जाणून घेण्यासाठी अनेक तज्ज्ञांची मदत घेतली. लोकप्रबोधन करण्याकामी त्याचा फार प्रभावीपणे उपयोग झाला. या रासायनिक रंगांमध्ये कॅडमियम, शिसे असते. पाण्यासोबत ते जर प्राणी-पक्ष्यांच्या पोटात गेले, तर कॅन्सरसारखे दुर्धर रोग होतात. हे सांगितल्यावर लोक विचारमग्न व्हायचे, प्रतीकात्मक विसर्जन करून समितीच्या कार्यकर्त्याकडे मूर्ती सोपवायचे. पुढे मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशच याबाबत झाले.

माणूस कधी शहाणा होईल, याची चर्चा व्हायची. होमोसेपियन, सेपियन, माणूस शहाणा, शहाणा होत राहील, तेव्हा तो विवेकी होत जाईल, हे ते सूत्र होते. आपल्या भाषणात डॉक्टर याचे उत्तम विवेचन करायचे.

अनेक कार्यकर्त्यांनी ‘वेदां’चे झेरॉक्स करून वाटले. अथर्वशीर्षातील पुरुषसुक्तांवर व इतर लेखनावर चर्चा व्हायची. वेदांचे खरे स्वरूप (!) कळण्यास मदत झाली. ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ हे प्रबोधनकारांचे पुस्तक डॉक्टरांनी ‘साधना’ साप्ताहिकात छापले. तो अंक खूपच गाजला. त्यामुळे काही वर्गणीदारांनी वर्गणी परत मागितली. त्यांना ती परत देण्यात आली.

‘जात’ ही अंधश्रद्धाच आहे. यावरही खूप चर्चा घडून आली. भाषणामध्ये डॉक्टरांनी यावर सोदाहरण व वारंवार मांडणी केली. या महत्त्वपूर्ण चर्चेत माझा सहभाग असायचा. त्यातून मी घडत गेलो.

समितीचा विवेकी विचार रुजविण्यात कितपत यश मिळाले?

माझ्या दोन्ही मुलींचा सत्यशोधकी पद्धतीने आंतरजातीय विवाह झाला. जोडीदाराची विवेकी निवड, पसंती करण्याची सर्वस्वी जबाबदारी मी मुलींवर सोपविली होती. मात्र त्यांचे वैदिक पद्धतीने लग्न करायचे नव्हते, हे मी सर्वांशी चर्चा करून ठरवून टाकले होते. निरर्थक कर्मकांडांना फाटा देत, सर्वांना आनंद मिळेल, अशा पद्धतीने, मान्यवरांच्या उपस्थितीत दोन्ही विवाह झाले. मुलींच्या व्यवसायाशी निगडित परदेशी पाहुण्यांची उपस्थिती विवाहाप्रसंगी अधिक होती. त्यांच्यासाठी थोडा वेगळेपणा जपावा लागला.

‘सत्यशोधक धर्म’ हे पुस्तक माझ्या वाचनात आले. त्यातील लग्नाचा पर्याय वाचला. इतरांना त्याचा फायदा होईल, या हेतूने त्याचे इंग्रजी, हिंदी आणि मराठीत रूपांतर केले. सुरेश माटेंनी मराठीत भाषांतर केले. डॉक्टरांनी ते तपासले. ‘सत्यशोधकी बचत विवाह’ या लोकोपयोगी मोहिमेचा प्रचार, प्रसार करण्यास त्याची मदत झाली.

मुलींचे वाढदिवस जाणीवपूर्वक अनाथाश्रमातील मुलांना कपडे व इतर साहित्यांचे वाटप करून साजरे केले. एका भोंदूबुवाचा भांडाफोड करण्याकामी माझी पत्नी प्रतिमा हिला डमी भक्त बनवून पाठविले होते. असे एक ना अनेक प्रसंग सांगता येतील. कौटुंबिक व व्यावसायिक सर्व व्याप सांभाळून समितीच्या स्वीकारलेल्या कामात सहभागी होण्यासाठी खूप कसरत करायला लागायची. पण वेळेचे गणित जमविले की, धावपळीतही आनंद वाटायचा. कामातील समाधान आणि आनंद शब्दातीत होता आणि आजही आहे. त्याचा व्यक्तिगत आणि कौटुंबिक-व्यावसायिक पातळीवर प्रचंड फायदा झाला. समितीलाही त्याचा फायदा झाला.

20 ऑगस्ट 2013 ला डॉक्टरांचा पुण्यात निर्घृण खून झाला. कार्यकर्त्यांवर प्रचंड आघात झाला. दु:, वेदना, संताप, खेद अशा विविध दु:खद भावना समाजस्तरातून मोठ्या प्रमाणात उमटल्या. कार्यकर्तेही सैरभैर होतात की काय, अशी स्थिती झाली. आपण त्यावेळी आणि त्यानंतरच्या चार वर्षांत याबाबत काय विचार केला? आपल्या आताच्या सहभागाबाबत काय सांगाल?

डॉक्टरांच्या निर्घृण खुनाच्या केवळ आठवणीने आजही प्रचंड वेदना होतात. काळीज चिरणारी ती घटना होती. मात्र तरीही माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी त्या घटनेनंतर जो संयम दाखविला, जे विवेकी वर्तन केले, त्याला तोड नाही. कोणतीही अप्रिय घटना, तेव्हाही आणि त्यानंतरही कार्यकर्त्यांच्या हातून घडली नाही. प्रचंड दु:खात, कामातील अभिमानाची सुखद फुंकर घालणारी ही बाब आहे. येथेही कार्यकर्ते घडविण्याचे कसब, जातानाही डॉक्टरांनी दाखविले. डॉक्टर हयात असताना कधीतरी गैरहजेरी लागायची. पण आता डॉक्टर नाहीत. म्हणून माझा कामातला सहभाग वाढविला पाहिजे, असे मी ठरवून टाकले. असह्य वेदना आजही आहेत. सावरायला खूप वेळ लागेल; पण सनदशीर मार्गाने निषेध व्यक्त करायचा आणि विविध पातळ्यांवर चालू असलेले काम नवनवीन कार्यकर्ते जोडून पुढे नेण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न स्वत:पासून करायचे, असं ठरविले. साप्ताहिक बैठकांना नियमित उपस्थित राहून, विषयांची मांडणी, नियोजन, सूचना, मार्गदर्शन सातत्याने करतो. प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न असतो.

डॉक्टरांच्या खुनानंतर सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने दोन कायदे अमलात आले. खरे तर त्यांची पायाभरणी डॉक्टरांनी करूनच ठेवली होती. मात्र कार्याध्यक्ष अविनाश पाटील, चारही प्रधान सचिव, कार्यकारी समितीचे पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील तमाम ‘मअंनिस’चे कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमातून, पाठपुराव्यातून सरकारला हे दोन्ही कायदे प्रत्यक्षात मूर्त स्वरुपात आणण्याची कायदेशीर पूर्तता करणे भाग पाडले. डॉक्टरांच्या निर्घृण खुनानंतरही कार्यकर्ते सैरभैर झाले नाहीत, समितीचे काम सोडून देण्याचा विचारही त्यांच्या आसपास फिरकला नाही; उलट शतपटीने काम पुढे नेण्यासाठी सर्व कार्यकर्ते स्वत:चा वेळ, श्रम, पैसा खर्च करून झिजत राहिले. त्या सर्वांना सलामच केला पाहिजे.

आजही समितीत आपण कार्यरत आहात, याचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो. कामात माणसं जोडली जातात. विचार, सुखदु:, सहकार्य, मदत, प्रेरणा, प्रोत्साहन अशा भावना नकळत उमलतात, विकसित होतात. आपल्या बाबतीत असे नक्की घडले असणार. आम्ही माहीत करून घेऊ इच्छितो.

खरंय, समाजासाठी काम करताना व्यक्तीचं सामाजिकीकरण आवश्यक असतं. समितीच्या प्रत्येक कामाचं ते वैशिष्ट्य आहे. ज्याला सामाजिक तळमळ आहे, तोच इथे टिकला. माझ्या वाटचालीत मला माझी पत्नी प्रतिमा; तसेच माझ्या मुलींचे व कुटुंबातील इतर सदस्यांचे नेहमीच सहकार्य लाभले. सुरुवातीपासून पुणे शाखेतील बोरकर, मिलिंद देशमुख, मिलिंद जोशी, तिवठाणेकर, अनंत लिमये, प्रभाकर नानावटी, रासकर अशा अनेक साथींनी साथ दिली. विशेषत: मिलिंद सोनटक्के यांनी वेबसाईट व व्हिडीओ फिल्म्स बनविण्याकामी मोलाची मदत केली.

अलिकडच्या काळात श्रीपाद ललवाणी, माधव गांधी, डॉ. गोराणे, नंदिनी जाधव, शालिनीताई ओक, सुमनताई ओक यांचे सहकार्य मिळाले. सुमनताई ओक यांची मराठीतून इंग्लिशमध्ये पुस्तके भाषांतर करण्याकामी फार मोठी मदत झाली.

‘मध्यवर्ती’च्या सर्वच साथींचे वेळोवेळी भरपूर मार्गदर्शन, स्नेह मिळाला.

कार्यरत; तसेच नवीन येणार्‍या, कामात जोडून घेणार्‍या कार्यकर्त्यांसाठी आपण काय संदेश द्याल?

विवेकी समाजव्यवस्था निर्मिती, हे आपले मिशन स्टेटमेंट आहे. याला खूप कालावधी लागणार, हे उघड आहे. आम्हाला डॉक्टरांचा प्रत्यक्ष सहवास अनेक वर्षे लाभला. त्यांच्या सहवासात त्यांची चिकाटी, विषयावरील प्रभुत्व, वाचन-चिंतन, मनन, संयम, सोशिकता, विषय मांडण्याची पद्धती, कामाची तळमळ, संघटनकौशल्य, धारदार नेतृत्व असे अनेक पैलू प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले. पण आज डॉक्टर नाहीत. त्यांचा विचार मात्र नेहमी असणार. म्हणून निराश व्हायचे नाही. समितीच्या ध्येय-उद्दिष्टांना सतत डोळ्यापुढे ठेवून, शांततेच्या आणि सनदशीर व अहिंसेच्या मार्गाने कार्यप्रवण राहायचे. सर्वच कार्यकर्त्यांनी निष्ठापूर्वक व बांधिलकीच्या भावनेने जमेल, सोसेल तेवढे अगदी थोडे-थोडे काम केले, तरी प्रचंड काम उभे राहील, यात शंका नाही.

माणसाचा मेंदू विस्तारतो आहे. कारण माणूस हा उत्क्रांत होणारा प्राणी आहे. तो अधिकाधिक शहाणा होत जाईल. पण त्यासाठी माणसामाणसांपर्यंत आपल्याला पोचलं पाहिजे. त्याच्या विवेकाला हाक दिली पाहिजे. ही सततची आव्हानं पेलू या!

विवेकाचा आवाज बुलंद करू या!