महाराष्ट्रातील; किंबहुना देशातील सडक नाटक चळवळीत शाहीर संभाजी भगत यांचे आव्हान नाट्यमंचच्या माध्यमातून दिलेले योगदान खूपच मोठे आहे. 1977-1978 नंतर जवळजवळ 125 सडक नाटके लिहिण्यात, त्यात काम करण्यात, गीते लिहिण्यात त्यांचा काही ना काही सहभाग आहे. आंबेडकरी जलशांना कव्वाली, मुशायरातून बाहेर काढून त्या जलशांना एक नवे रूप देण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. 1999 मध्ये त्यांचे ‘कातळाखालचे पाणी’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक धारावी येथील पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनात प्रसिद्ध झाले. ‘महानगर’ आणि ‘सम्राट’ या वर्तमानपत्रातून त्यांची सदरे 2005 ते 2008 च्या दरम्यान नियमितपणे येत. या सदरांतून त्यांनी व्यापक राजकीय आणि तात्त्विक मुद्द्यावर लिहीत त्याचा मागोवा एखाद्या घटनेच्या अनुषंगाने घेत, त्याचा व्यक्तिश: त्यांच्यावर आणि चळवळीवर कसा परिणाम झाला, याबद्दल लिहिले आहे. 2012 साली त्यांचे ‘शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मोहल्ला’ हे नाटक आले. राजकीय पक्ष अस्मितांचा स्वत:च्या स्वार्थासाठी कसा वापर करून घेतात, याची मांडणी नाटकात मुंबई दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केली आहे. या नाटकाच्या संगीताला ‘मराठी आंतरराष्ट्रीय सिने–नाटक पारितोषिक’ मिळाले. सर्वसामान्य माणूस जेव्हा हे नाटक पाहायचा, तेव्हा शिवाजी महाराजांचे खरेखुरे रूप त्याच्यापुढे उभे राहावयाचे, त्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रात वेगळे वातावरण या नाटकाने निर्माण केले. कोणत्याही व्यावसायिक निर्मात्याचे सहाय्य न घेता या नाटकाची उभारणी त्यांनी कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांच्या सहाय्याने केली. त्यानंतर ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या त्यानंतर ‘कोर्ट’ या गाजलेल्या व अनेक पारितोषिके मिळविणार्या चित्रपटाच्या निर्मितीत त्यांचा मोठा सहभाग होता. सध्या संभाजी भगत यांनी नवीन कलाकार कार्यकर्त्यांना संगीत, नाटक यात प्रशिक्षण देण्यासाठी संशोधन केंद्र स्थापन केले आहे. त्यातून अनेक पुरोगामी कलाकारांनी आपआपले ग्रुप स्थापन केले आहेत. तसेच आज संविधानावर आलेल्या अरिष्टाविरोधात चालू असलेल्या संघर्षातही ते अग्रभागी आहेत. सांस्कृतिक माध्यमातून संविधानविषयक जाणीव जागृतीसाठी ते कार्यरत आहेत. अशा या कलाकार कार्यकर्त्यांशी सडक नाटकाच्या चळवळीसंदर्भात अंनिवाने केलेली बातचीत…
1977 साली आणीबाणी उठल्यानंतर संपूर्ण देशातील सारे राजकीय वातावरण एकदम बदलून-ढवळून गेले होते. एका नव्या राजकीय वातावरणाची सुरुवात होऊ लागली होती. त्या बदलत्या राजकीय वातावरणात लोकशाहीवादी, डाव्या, परिवर्तनवादी चळवळींनीही जोर धरला होता. त्याचे परिणाम सांस्कृतिक चळवळीवरही होत होतेच; शोषित जनतेचे प्रश्न, अन्याय वेशीवर टांगणारे विविध सांस्कृतिक कलाप्रकार नाटकाच्या, गाण्याच्या माध्यमातून उदयास येत होते, जुन्या पारंपरिक कलाप्रकारांना बदलत्या राजकीय वातावरणात नवे आयाम मिळत होते. अशा या वातावरणात सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील महू या छोट्याशा खेड्यातून संभाजी भगत मुंबईत दाखल झाला. आपल्याच गावच्या वडा-पावची गाडी चालविणार्याच्या सहाय्याने वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालयात दाखल झाला. दलित पँथरचे जन्मस्थान असलेल्या सिद्धार्थ विहारच्या वसतिगृहात राहायला लागला. दलित पँथरचा निखारा जरी विझत चालला होता, तरी काहीशी धग वसतिगृहाच्या खोलीत शिल्लक होतीच.
नोकरीच्या शोधात फोर्टमधील रोजगार केंद्रातून येताना चर्चगेट स्टेशनजवळ चालू असलेल्या सडकनाट्याजवळ तो थबकला. ते सडकनाट्य होते विद्यार्थी प्रगती संघटनेच्या आव्हान नाट्यमंचचे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर होते ते. सडकनाट्य चालू असताना पोलीस आले; पण त्या तरुणांनी त्या पोलिसांना न जुमानता सडकनाट्य चालूच ठेवले. संभाजीला सडक नाटकात उपस्थित केलेला प्रश्न भावला; तसेच त्या तरुणांचे पोलिसांना, व्यवस्थेला न जुमानणेही. त्या वेळेपासून संभाजी भगत आणि आव्हान नाट्य मंच हे नाते जसे जुळले, तसेच ते सडकनाट्याशीही जुळले. आव्हान नाट्य मंचमध्येच संभाजीच्या कलावंताने, शाहिरीने आकार घेतला. जनतेच्या विविध प्रश्नांवर जवळजवळ 125 सडक नाटके त्यांनी केली. ही सर्व सडकनाट्ये दलित, आदिवासी, स्त्रिया, कामगार यांच्यासारख्या शोषितांवरच्या अत्याचाराला वाचा फोडणारी, सरकारच्या साम्राज्यवादी, धर्मांध, जातीयवादी प्रस्थापितांच्या धोरणांच्या विरोधात स्वातंत्र्य, सामाजिक-आर्थिक-लैंगिक समता, मानवता, विज्ञानवादी मूल्यांना उचलून धरणारी होती. त्याबद्दल बोलताना संभाजी भगत म्हणाले, मी आव्हान नाट्य मंचशी जोडला गेलो आणि माझा संबंध सनोबर केशवार, प्रकाश बेर्डे, तांबट; तसेच मुलुंडच्या झोपडपट्टीत काम करणार्या शाहीर विलास घोगरे यांच्याशी आला. या सर्वांचा आव्हान नाट्य मंच उभा करण्यात मोठा सहभाग होता. रमाबाई आंबेडकर नगरमधील हत्याकांडानंतर आत्महत्या केलेल्या शाहीर विलास घोगरेसह आम्ही आव्हान नाट्य मंचला एक वेगळे वळण दिले. सडक नाटकावर त्यावेळेस चित्रपट संगीतातून आलेल्या लोकगीतांचा, अभिजनातून आलेल्या कार्यकर्त्यांचा प्रभाव होता. विलासवर आंबेडकरी गीतांचा आणि अण्णा भाऊ साठेंच्या लाल बावटा कलापथकातील गीतांचा प्रभाव होता. त्याच सुमारास आम्ही आंध्रमधील क्रांतिकारी शाहीर गदर याच्या संपर्कात आलो. त्याच्या क्रांतिकारी शाहिरीचा आमच्यावर खूपच प्रभाव पडला आणि त्यातूनच आम्ही आंबेडकरी गीते आणि डावी क्रांतिकारी गीते या दोहोंचा मेळ साधत डावी क्रांतिकारी गीते रचली व ती आम्ही पोवाडा, भारूड, गोंधळ यासारख्या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांचा आधार घेत सडक नाटकांतून प्रभावीपणे सादर केली. यामुळे एकूणच सडकनाटकांच्या सादरीकरणाला वेगळे वळण मिळाले व सडक नाटकाच्या चळवळीची नाळ पारंपरिक लोककलांशी व अण्णा भाऊ साठे, अमर शेख, गवाणकर, गदर यांच्या क्रांतिकारी शाहिरीशी जोडली गेली.

सडक नाटकाची सुरुवात 1918 साली रशियन क्रांतीला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने झालेल्या रस्त्यावरील प्रयोगाने झाली, असे मानले जाते. त्यानुसार 2018 हे सडक नाटकाचे 100 वे वर्ष म्हणून जगभर मानले गेले. त्या संदर्भात मत व्यक्त करताना संभाजी भगत म्हणाले, जनतेचे प्रश्न लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे, लोकप्रबोधन करण्याचे सडक नाटक हे कोणत्याही क्रांतिकारक चळवळीसमोरचे प्रभावी साधन आहे, हे बरोबरच आहे. पण सडक नाटकाची सुरुवात अमुक एका वेळीच झाली, असे म्हणता येत नाही, कारण अगदी आदिम काळापासून वेगवेगळ्या प्रकारात सडकनाटकसदृश्य कलाप्रकार लोकांची दु:खे, अन्याय मांडताना आपल्याला जगभर दिसतात. सडक नाटक हा त्याच प्रक्रियेतला आधुनिक प्रकार आहे. त्याचा वापर निरनिराळ्या देशांतील विद्यार्थी-कामगारांनी आपली चळवळ पुढे नेण्यासाठी केलेला आहे. भारताला लोककलांची समृद्ध परंपरा आहे. त्या-त्या राज्यातल्या कार्यकर्त्या कलाकारांनी या परंपरेतून आपल्या चळवळीसाठी कलाप्रकार शोधलेले आहेत. महाराष्ट्रात आधुनिक सडकनाट्याची सुरुवात सत्यशोधकी जलसे, आंबेडकरी मेळे यातून झालेली आहे आणि त्याची नाळ पोवाडे, कीर्तन, तमाशा, गोंधळ या पारंपरिक लोककलांबरोबर शाहिरी परंपरेशीही जोडली गेलेली आहे.”
1980 – 1990च्या दशकात झालेल्या प्रत्येक आंदोलनात आव्हान नाट्य मंचाने आपली भूमिका निभावली. 1982 चा मुंबईतील गिरणी कामगारांचा संप असो, मराठवाडा नामांतराचा लढा असो, मुंबईतील झोपडपट्टी उठविण्याच्या विरोधातील लढा असो, हे सर्व संघर्ष आपल्या सडक नाटकांतून आव्हान नाट्य मंचने महाराष्ट्रातील गावागावात पोचविले. नर्मदा आंदोलनातील सहभागाबद्दल बोलताना संभाजी भगत म्हणाले, “नर्मदा आंदोलनाच्या प्रारंभीच्या काळात आम्ही जवळजवळ महिनाभर संपूर्ण नर्मदेच्या खोर्यात गावागावांत उन्हातान्हात आमचे सडक नाटक करत फिरत होतो. रात्री एखाद्या गावात आमचा मुक्काम असायचा आणि मग दिवसभर या गावातून त्या गावात सडक नाटक करत क्रांतिकारी गाणी गात आंदोलनाचा संदेश देत फिरायचो. नर्मदा आंदोलन गावागावांत, वस्त्या-पाड्यांवर सडक नाटकाच्या सहाय्याने प्रारंभीच्या काळात पोचविण्यात आमचा मोठा सहभाग होता.”
सडक नाटकाच्या आजच्या स्थितीबद्दल बोलताना संभाजी भगत म्हणाले, “आज अनेक सडक नाटके होताना आपण बघतो. पण या सडक नाटकांचा सडकनाट्य चळवळीशी काहीच संबंध नाही. या सडक नाटकांना कोणतीही राजकीय भूमिका नसते. केवळ त्यांनी ‘फॉर्म’ वापरलेला असतो आणि सडक नाट्य करणे म्हणजे प्रस्थापितांच्याविरोधात ठाम राजकीय भूमिका घेऊन उभे राहणे, अशी भूमिका तुम्हाला तुरुंगापर्यंतच काय; पण तुमचे प्राण घेण्यापर्यंतही जाऊ शकते. कॉ. सफदर हाश्मीला प्राण गमवावे लागले; तर शंतनु कांबळे, शीतल साठे यांच्यासारख्यांना तुरुंगवास भोगावा लागलेला आहे. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आज काही अपवाद वगळता केवळ सरकारी योजनांच्या जाहिरातीसाठी सडक नाटकांचा वापर केला जात आहे. तसेच प्रसारमाध्यमांतल्या बदलत्या स्वरुपाकडेही बघितले पाहिजे. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने चळवळीसाठी कसा करून घेता येईल, याचा विचार केला पाहिजे. जनतेपर्यंत पोचण्याचे सडकनाटक हेच केवळ साधन आता राहिलेले नाही, तर एका क्षणात लाखो लोकांपर्यंत पोचणारे तंत्रज्ञान आज निर्माण झाले आहे. त्याचाही वापर केला पाहिजे. आजची परिस्थिती नक्कीच गंभीर आहे. जातीयवाद्यांचा, धर्मांधाचा केवळ प्रभावच प्रसारमाध्यमांवर आहे, असे नाही तर त्यांच्या ताब्यातच ही माध्यमे आहेत. अशा वेळी त्यांच्यावर मात करण्यासाठी आपल्यालाही आपले वेगळे मार्ग आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शोधले पाहिजेत.”