Categories
पुस्तक परिचय

सत्यशोधक आनंदस्वामी

जून - २०१८

‘महाराष्ट्रातील शेतकरी विद्रोह आणि सत्यशोधक आनंदस्वामी’ हे पुस्तक संजय खरात यांनी लिहिले असून ‘हरिती प्रकाशन’ने ते प्रकाशित केले आहे. याबद्दल या दोघांचेही मनापासून आभार मानायला हवेत. लिखित इतिहास लिहिण्याची परंपरा आपल्याकडे कधी नव्हती. लिखित इतिहासाचा स्पष्ट पुरावा आपल्याला दिसतो, तो सम्राट अशोकाच्या लुंबिनी येथील शिलालेखावर; ज्यात म्हटले आहे, “सिद्धार्थ गौतमाचा जन्म येथे झाला.” त्या आधीच्या इतिहासाचे असे लिखित पुरावे नाहीत. इतिहास लेखनाबद्दल अशी उदासीनता असल्यामुळे आपल्याला इतिहास लेखनासाठी पुरावे मिळणे फारच अवघड जाते; ज्यातून हितसंबंधासाठी इतिहास विकृत स्वरुपात पुढे येतो. अगदी सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या संत तुकारामांचे नेमके काय झाले? ते सदेह वैकुंठाला गेले की, त्यांची हत्या झाली, हे सिद्ध करणे कठीण जाते. तीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या संदर्भातही आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आधुनिक काळात महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या प्रबोधनाच्या चळवळीचा, त्यातील लहान-मोठ्या नेत्यांचा इतिहास मांडणे अवघड जाते. य. दि. फडके यांनी यासाठी मोलाचे काम केले आहे. संजय खरात यांनी वरील पुस्तक लिहून सत्यशोधक चळवळीतील आनंद स्वामी यांच्या जीवनकार्याच्या रुपाने एक सोनेरी पान आपल्या समोर आणले आहे. त्यांचा उद्देश जरी उलगडून दाखविण्याचा असला, तरी आनंद स्वामी यांचे जीवनकार्य त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण सखोल मांडणीतून सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ-दलित चळवळ यांचा या अनुषंगाने जो व्यासंगपूर्ण वेध घेतला आहे, तो या चळवळीच्या अभ्यासकांना अत्यंत उद्युक्त आणि योग्य दृष्टिकोन देणारा आहे.

सत्यशोधक चळवळीने अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वे घडवली आहेत. मग ते कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे असोत किंवा पत्रकार पालेकर, डॉ. विश्राम घोले असोत, या सर्वांबद्दल काहीएक माहिती पुस्तकरुपाने आलेली आहे. परंतु आनंद स्वामी यांच्या संदर्भात अशी विस्तृत माहिती पुस्तक रुपाने आलेली नव्हती. शिवाय सत्यशोधक चळवळ म्हटली की, जातीव्यवस्थेविरुद्ध लढा, धर्मशास्त्राची चिकित्सा अशाच गोष्टी पुढे आणल्या जातात; पण सत्यशोधक चळवळीने शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर मोठे काम केले आहे, हे पुढे येत नाही. भारतातील शेतकर्‍यांच्या दु:खाची ब्रिटीश सरकारला कल्पना यावी म्हणून महात्मा फुले शेतकरी वेषात सरकारला भेटायला गेले, असा उल्लेख आपण करतो; पण शेतकरी आणि कामगार यांच्या प्रश्नांवर सत्यशोधक चळवळीने त्यांच्या हक्कांसाठी आणि शोषणविरोधी भूमिका घेतल्याचे पुढे येत नाही. आनंद स्वामी यांचे संपूर्ण जीवनच शेतकरी लढे उभारण्यात गेले, जी गोष्ट नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार वर्गासंदर्भात केली.

भारतातील शोषणाचे जात-वर्ग स्वरूप पुढे आणण्याचे श्रेय आपण महात्मा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक चळवळीला दिले पाहिजे- “स्त्रीशूद्रातिशूद्र” या शब्दातच त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाचे सार सामावलेले आहे. आनंद स्वामी यांचे जीवनकार्य याच दृष्टिकोनावर आधारलेले आहे. आजवर आपण भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक नेत्यांना अखेरीस अध्यात्माकडे वळलेले पाहिले आहे. परंतु वेदशास्त्रसंपन्न असलेले, एका मठाचे मठाधिपती असलेले आनंद स्वामी सत्यशोधकी दृष्टिकोनाकडे वळतात, हे अभूतपूर्व आहे. एक तर या धर्मशास्त्रांचा अभ्यास केल्यामुळे त्यांना त्यातील खोटेपणा अधिक जवळून अनुभवता आला आणि त्यामुळेच त्यांचा दृष्टिकोन अगदी कडवा सत्यशोधकी झालेला आहे. अनेक पुरोगामी आपण पाहतो की, जे कर्मकांडे अथवा धार्मिक विधींच्या वेळी आपल्या पुरोगामीपणाला बाधा येईल, असे वागत असतात. कारण धर्मशास्त्रांचा त्यांनी तितका टीकात्मक अभ्यास केलेला नसतो. त्यांची मानसिकता पूर्णार्थाने पुरोगामी झालेली नसते. त्यामुळे अडचणीच्या आणि कसोटीच्या वेळी ते गलितगात्र होतात. अशा लोकांनाही आनंद स्वामींच्या जीवनातून एक सशक्त दृष्टिकोन मिळू शकेल. एकंदरच, त्यांचे जीवन हे स्फूर्ती देणारे आणि नवी दृष्टी प्रदान करणारे आहे.

आनंद स्वामींवरील 144 पानांच्या या पुस्तकात अनेक प्रश्नांचा ऊहापोह केला आहे, जे प्रश्न आजही लागू आहेत. ते प्रश्न संपलेले नाहीत. त्या प्रश्नांची त्या काळात शोधलेली उत्तरे आजही लागू पडतात. सत्यशोधक चळवळीचा, ब्राह्मणेतर चळवळीचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या एकंदर विचारांचा आजच्या काळातही नव्याने विचार करता येतो, केला गेला पाहिजे. कारण तपशिलात जरी बदल झाले असले, तरी या प्रश्नांचे स्वरूप आणि आशय फार बदललेले नाहीत. धर्माच्या-जातींच्या नावाने शोषणाची प्रक्रिया अधिकच तीव्र झाली आहे, संपलेली नाही. भाजपच्या रुपाने ब्राह्मण्यवादी सत्तेवर आल्यानंतर जणू परत पेशवाई अवतरल्याचा भास होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक समाजपरिवर्तन करू इच्छिणार्‍या प्रत्येकाने वाचले पाहिजे.

या पुस्तकात सात प्रकरणे आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये शेतकरी विद्रोहाच्या अनुषंगाने मांडणी केली गेली आहे. शेतकर्‍यांच्या शोषणाला वसाहतिक सत्तेला जबाबदार धरणारा; परंतु ब्राह्मणी हितसंबंधांना जोपासणारा एक उच्च जातीवर्ग दृष्टिकोन, तर धर्माच्या अंगाने शेतकर्‍यांना लुबाडणारा ब्राह्मण्यवादी दृष्टीला विरोध करणारा सत्यशोधकी दृष्टिकोन यांची चांगली मांडणी या पुस्तकात केली आहे. आनंद स्वामींच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी लढ्याची संपूर्ण माहिती या पुस्तकात आहे. त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या प्रश्नांचाही ऊहापोह आहे. आपण या पुस्तकाकडे केवळ आनंद स्वामी यांचे चरित्र असे न पाहता म्हणजे त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे मूळ नाव काय, ते कुठल्या समाजाचे होते वगैरे. अर्थात, हे महत्त्वाचे आहे. कारण ते तुमच्या जडणघडणीत मोठी भूमिका बजावत असतात. असे असले तरी शेतकर्‍यांच्या लढ्यांच्या अनुषंगाने आपण आनंद स्वामींचे जीवनकार्य पाहिले पाहिजे आणि ते आजच्या घडीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आनंद स्वामींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर चळवळीच्या ओघात संबंध आले. बाबासाहेबांच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबासाहेबांबरोबर जनतेचे प्रबोधन करण्यासाठी त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. इतर अनेकांप्रमाणे त्यांना बाबासाहेबांची धर्मांतराची भूमिका मान्य नव्हती. आपण याच समाजात सुधारणा घडवून आणू आणि सत्यशोधकी समाज निर्माण करू, अशी भूमिका घेतली. शेतकर्‍यांचे हे लढे वसाहतिक सत्तेविरुद्ध होते. स्वातंत्र्याचा लढा सुरू होता, अशा वेळी आनंद स्वामी यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला- या परिणामी त्यांना 1940 ते 1943 या तीन वर्षांत भूमिगत राहून कार्य करावे लागले; पण 1943 च्या ऑगस्ट महिन्यात त्यांना पकडण्यात आले. 1943 च्या ऑगस्ट पासून ते 1946 च्या ऑगस्टपर्यंत तुरुंगात होते. या काळात त्यांच्या सुटकेसाठी जनतेने अनेक आंदोलने केलेली आहेत. काँग्रेसच्या भांडवलवादी धोरणांना त्यांचा सातत्याने विरोध राहिला. या प्रक्रियेचा भाग म्हणून महाराष्ट्रात उदयास आलेल्या शेतकरी-कामगार पक्षात त्यांनी काम केले. समाजवादी समाज निर्माण करून सर्व प्रकारचे शोषण नष्ट करण्याची त्यांनी भूमिका घेतली.

संजय खरात यांनी या पुस्तकाचा शेवट करताना आनंद स्वामींच्या एकंदर जीवनकार्याचा मार्मिक शब्दांत वेध घेतला आहे. ते म्हणतात, “आनंदस्वामी यांनी महात्मा फुले यांच्या विचारांनी प्रभावित होऊन शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले. साधी राहणी, जगण्याच्या अत्यंत कमी गरजा ठेवून ते साधूसारखे वैरागी जीवन जगले. त्यांनी शेतकरी लढ्यांना अधिक व्यापक-लढाऊ बनवले. आनंद स्वामी यांनी जातीव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवला. वसाहतवादामुळे बदलत जाणार्‍या समाजव्यवस्थेमुळे पुढे त्यांनी वर्गव्यवस्थेवरही हल्लाबोल केला. महात्मा फुले हेच शेतकर्‍यांचे मुक्तिदाते होते, या विचारांशी ते ठाम राहिले. वर्ण-जात व्यवस्थेबरोबर वर्गव्यवस्था नष्ट करण्यासाठी ते सतत संघर्ष करीत राहिले. भारतीय शेतकर्‍यांच्या मुक्तीचा संघर्ष जात-वर्ग लढ्यानेच होऊ शकतो, ही दूरदृष्टी आनंद स्वामींच्या कार्यातून प्रकट होते. भारतीय शोषणमुक्तीचे त्यांनी सांगितलेले हे मर्मच भारतीय क्रांतीचा प्रश्न सोडवू शकेल.”

या पार्श्वभूमीवर आपण आज भारतातील शेतकरी प्रश्नाकडे पाहिले, तर आज केवळ भीषण चित्र समोर येते. लाखो शेतकरी आत्महत्या करतात, ही वस्तुस्थिती आपल्या स्वातंत्र्याला, प्रगतीला लाज आणणारी आहे. अशा वेळी आनंद स्वामी यांनी दाखवलेल्या आक्रमक-लढाऊ शेतकरी चळवळीची गरज आहे. आनंद स्वामींच्या जीवनकार्याचा सन्मान या एकाच कृतीने होऊ शकतो. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवत नाहीत. किमान शेतकर्‍यांनी तरी आपला हा लढाऊ इतिहास विसरू नये. त्याचा वारसा आजच्या घडीला पुढे घेऊन जायला हवा.

लेखक संपर्क : 98693 92157