भाग : २
अनुवाद : डॉ. शंतनु अभ्यंकर
डॉ. रिचर्ड डॉकिन्स हे सुप्रसिद्ध विवेकवादी वैज्ञानिक. विज्ञान लोकप्रिय करण्याचं त्यांचं कार्य अमोल आहे. अं. नि. वार्तापत्रही हे कार्य करते. अंनिसच्या प्रबोधनाचा हेतू लक्षात घेऊन डॉ. डॉकिन्स यांनी त्यांच्या ‘दि मॅजिक ऑफ रिअॅलिटी’ या सुप्रसिद्ध ग्रंथाचा मराठीत भावानुवाद ‘अं.नि.वार्तापत्रा’साठी करण्यास डॉ. शंतनु अभ्यंकर यांना परवानगी दिली.
जागतिक कीर्तीच्या वैज्ञानिकाने अं. नि. वार्तापत्राच्या कार्याला दिलेली ही पावतीच आहे. ‘दि मॅजिक ऑफ रिअॅलिटी’ या पुस्तकातील लेख दरमहा क्रमश: वार्तापत्रात प्रसिद्ध केले जातील.
सत्य कोणतं आणि जादू कुठली?
अतिनैसर्गिक शक्ती आणि अतिनैसर्गिक कल्पना आपल्याला विश्वाचं यथातथ्य ज्ञान कधीच घडवत नाहीत. याबाबतीत या कल्पना अगदीच कुचकामी असतात. कोणत्याही घटनेला कुणी अतिनैसर्गिक कारण जोडलं म्हणजे त्या मागचं कारण त्यांना समजलेलंच नाही, असं खुशाल समजावं! शिवाय एकदा कारण चिकटवलं की पुढे योग्य कारणाचा शोधही थांबतो. हा तर मोठाच तोटा आहे. शोध का थांबतो? कारण एकदा ‘एखाद्या गोष्टीमागे अतिनैसर्गिक कारण आहे,’ असा शिक्का मारला की साहजिकच ती निसर्ग विज्ञानाच्या कक्षेबाहेर ढकलली जाते. कित्येक अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघालेली, आजच्या कित्येक सुखांची मूलाधार ठरलेली, चारशे वर्षांची छोटीशी; पण देदीप्यमान परंपरा असलेली वैज्ञानिक पद्धती कुचकामी ठरवली जाते. ‘सध्या तर कारण आम्हाला माहीत नाहीच, पण यापुढे कधीच त्याचा उलगडा होऊ शकणार नाही. सबब प्रयत्न व्यर्थ आहेत, करू सुद्धा नका’, असंच बजावण्यासारखं आहे हे.
विज्ञान याच्या बरोब्बर उलटा मार्ग निवडतं. सर्व काही समजलं नाहीये, हे मुळी मान्यच असतं विज्ञानाला! मग ही जाणीवच जीवाला शोधाची आस लावते. प्रश्न विचारले जातात, नवी नवी मॉडेल्स कल्पिली जातात, तपासली जातात. पावलापावलाने सत्याच्या अधिकाधिक निकट जाण्याचा हा विज्ञानाचा मार्ग आहे. ज्ञात विज्ञानाला अज्ञात किंवा त्याच्या विरोधी असं काही सापडलं, तर ती एक संधी आहे, एक आव्हान आहे, असं वैज्ञानिक मत मानतं. मग आहे ते मॉडेल नाकारलं तरी जातं किंवा त्यात योग्य ते बदल केले जातात. अशा किंचित-किंचित सुधारणांमुळेच आपण पायरी-पायरीने; पण निश्चितपणे सत्याच्या नजीक पोचतो.
खुनाचा उलगडा करायला एखाद्या गुप्तहेराला पाचारण केलं आणि या आळशी पठ्ठ्यानं काहीही शोधाशोध न करता, सरळ खून हा अतिनैसर्गिक शक्तीचा प्रताप असल्याचं सांगितलं तर…? पूर्वी करणी, चेटूक, भूत, प्रेत, आत्मा, शाप, उ:शाप, दैवी कोप किंवा कृपा अशी अतिनैसर्गिक कारणं चिकटवलेल्या कितीतरी गोष्टी आज विज्ञानाच्या कह्यात आहेत. विज्ञानाला याची कारणं तपासता येतात, समजावून देता येतात. विज्ञानाचा सगळा इतिहास, हा मुळी अत्यंत विश्वासार्ह, उलटतपासणीला सदा उपलब्ध अशा उलगड्याचाच इतिहास आहे. मग आज जे अज्ञात आहे, ते उद्या ज्ञात होणारच नाही, असं समजण्याचं कारणच काय? ज्वालामुखी, भूकंप, साथीचे रोग या दैवी कोपांची आणि प्रकोपांची कारणं समजलीच ना? तसा अन्यही काजळ कोपर्यात विज्ञानाचा उजेड पडेल.
‘फ्रॉग प्रिंट्स’ या परिकथेत म्हटल्याप्रमाणे बेडकाची पप्पी घेऊन त्याचा राजपुत्र होत नाही आणि ‘सिंड्रेला’या परिकथेत म्हटल्याप्रमाणे भोपळ्यातून अचानक राजेशाही बग्गी निघत नाही, हे मान्य असतं सगळ्यांना. पण असं का? का नाही होऊ शकत असं? असा कधी विचार केलाय आपण? अनेक पद्धतींनी हे समजावून सांगता येईल; पण माझी आवडती पद्धत ही.
बेडूक काय किंवा बग्गी काय, अतिशय गुंतागुंतीची रचना असते त्यांची, कितीतरी छोटे छोटे भाग आणि त्यांची अत्यंत गुंतागुंतीची जोडणी! असं केवळ अपघाताने किंवा जादूची कांडी फिरवून घडू शकत नाही. बेडूक किंवा बग्गीसारख्या क्लिष्ट रचना घडवणं हे कौशल्याचंच काम. बग्गी बनवायला अनेक सुटे-सुटे भाग हवेत. ते नीट एकत्र करायला हवेत. येथे पाहिजे जातीचे, येर्यागबाळ्याचे काम नोहे. इथे कसबी सुतार हवा, अन्यही कारागीर हवेत. ‘आलामंतर कोलामंतर छू’ म्हणून बग्गी घडत नाही. चाकं आहेत, बाकं आहेत, दारं आहेत, खिडक्या आहेत, स्प्रिंगा आहेत, गुबगुबीत गाद्या आहेत आणि या सार्याची विशिष्ट रचना आहे. गुंतागुंतीच्या रचनेची फट् म्हणता साधी रचना करता येईल. परिराणीच्या जादूच्या कांडीऐवजी मशाल फिरवताच, बग्गीची पाहता-पाहता राख होईल. कशाचीही राख करणं सोप्पं. पण राखेतून किंवा भोपळ्यातून बग्गी, अशक्य. कारण बग्गीची कितीतरी गुंतागुंतीची आणि प्रवासाला साजेशी रचना.
आपण परिराणीचं काम थोडं सोप्पं करूया. तिला भोपळ्या-बिपळ्याऐवजी बग्गीचे सगळे सुट्टे भाग वापरायची मुभा देऊया. समजा सगळे भाग एका खोक्यात ठेवले आहेत; फळ्या, सळ्या, काचा, फोम, रेक्झिन, मखमल, खिळे, स्क्रू वगैरे. आता ते नीट जुळवण्याऐवजी परीने ते सगळे एका प्रचंड पोतडीत घालून नुसते गदागदा हलवले तर त्यातून बग्गी बाहेर निघेल का हो? चाकाच्या जागी चाक आणि बाकाच्या जागी बाक येईल? अर्थातच नाही. का? कारण हे वेगवेगळे भाग अनंत प्रकारे जुळवता येतील, हे वापरून अनंत प्रकारचे ढिगारे रचता येतील; पण त्यातून बग्गी सोडाच, कोणतीही उपयोगी रचना आपोआप होणे नाही.
या ढिगात क्वचित एखाद्या वेळी काहीतरी ओळखीचं डिझाईन दिसेल; पण क्वचित, अगदी-अगदी क्वचित. बहुतेकदा भंगारचा ढीग शोभेल असंच काहीतरी बाहेर निघेल. हे सुटे भाग कोट्यवधी तर्हांनी जुळवता येतील आणि कोट्यवधी तर्हांनी पुन्हा त्यांचा ढीग बनवता येईल. दरवेळी वेगळाच, एकमेव असा पॅटर्न तयार होईल; पण उपयुक्त असा काही पॅटर्न निपजलाच तर तो क्वचित अगदी क्वचितच. हरणाची जोडी, गुलाबाचं रान तुडवत, राजवाड्यावर पार्टीला नेऊ शकेल अशी बग्गी बनणं तर अशक्यच.
असे वेगवेगळे भाग किती तर्हांनी एकत्र करता येतील, याचं गणित मांडता येतं. उदाः बावन्न पत्ते म्हणजे बावन्न वेगवेगळे भाग आहेत, असं समजू.
समजा चौघांत पानं वाटली आणि पाहतो तो काय माझ्याकडे सगळीच्या सगळी तेराच्या तेरा पानं इस्पिकची! आश्चर्याने थक्क होऊन मी माझी पानं सगळ्यांना मोठ्या कौतुकाने दाखवू लागलो तर… प्रत्येक जण आपली पानं दाखवायला लागला. एकाला सगळी किल्वरची, एकाला सगळी बदामची आणि चौथ्याला चौकटची, अशी वाटणी झाली होती!
ही जादूच नाहीतर काय? जादू असंच वाटेल तुम्हाला. पण गणितज्ज्ञांनी असं होण्याची शक्यता मोजली आहे. ती दर 53, 644, 737, 765, 488, 792, 839, 237, 440, 000 डावात एकदा, एवढी नगण्य आहे. कारण तेरा पानं चारजणात, नेमक्या 53, 644, 737, 765, 488, 792, 839, 237, 440, 000 च प्रकारे वाटता येतात. म्हणजे एरव्हीही पत्ते नीट पिसून वाटलेला प्रत्येक डाव हा तसा अनन्यच असतो. कोणताही डाव पुन्हा जस्साच्या तस्सा’ येण्याची शक्यता ही दर 53, 644, 737, 765, 488, 792, 839, 237, 440, 000 डावात एकदा एवढीच असते. पण पानं कशीही वाटली गेली असल्यामुळे आपल्याला त्याचं काही अप्रुप नसतं. प्रत्येकाला एकाच प्रकारची पानं वाटली जाणं, यात आपल्याला एक संगती दिसते आणि आपल्याला अचंबा वाटतो.
अगदी निर्दयपणे, बेडकाच्या चिंधड्या उडवून राई- राई एवढ्या कोट्यवधी प्रकारे जोडता येतील. पण यात बहुतेकवेळा मांसाचा चिखल तयार होईल. नुसता अर्थहीन, आकारहीन मांसाचा गोळा. पिसून वाटलेले, कसेही वाटलेले, पत्तेच जणू. यात अगदी मोजक्याच वेळा हा गोळा कशासारखा तरी दिसेल, त्यात काही तरी आकार उकार भासेल, पण त्यातून राजपुत्र होणं? असंभव.
बेडकाची पप्पी घेऊन त्याचा राजपुत्र होत नाही आणि भोपळ्यातून अचानक राजेशाही बग्गी निघत नाही. कारण यांचे सुटे भाग अतिशय योजनाबद्ध पद्धतीने गुंफलेले असतात. अनंत शक्यतांपैकी ही एक, अनन्य अशी शक्यता असते. आपल्या आजूबाजूचा प्रत्येक सजीव, प्रत्येक पशू, प्रत्येक पक्षी, प्रत्येक झाड आणि आपणही आधी अत्यंत साधी रचना असणार्या सजीवांपासून उत्क्रांत झालो आहोत. म्हणजे मग उत्क्रांती म्हणजे जादूचा खेळ किंवा जुगारच आहे एक प्रकारचा? नाही! अजिबात नाही!! हा शुद्ध गैरसमज आहे. सभोवतालची जीवसृष्टी म्हणजे चान्स किंवा लक् किंवा जादू नाही. जादुई मात्र खास आहे. विस्मयकारक तर आहेच आहे.
उत्क्रांतीची संथ जादू
जादूची कांडी फिरवून, जटिल रचना असणार्या एका जीवाचं रुपांतर, जटिल रचना असणार्या दुसर्या जीवामध्ये होत नाही. मग ही सगळी जटिल रचनेची सजीवसृष्टी उद्भवली कशी? बेडूक आणि बटाटा, विंचू आणि वड, राजकन्या आणि भोपळे, तुम्ही-आम्ही, आलो कसे अस्तित्वात?
शतकानुशतके या प्रश्नाचं नेमकं उत्तर कुणालाच ठाऊक नव्हतं. मग त्याबद्दल लोकांनी अनेक सुंदर-सुंदर कल्पना लढवल्या, कथा रचल्या. शेवटी एकोणिसाव्या शतकात हे कोडं सोडवलं ते विज्ञानमहर्षी चार्ल्स डार्विनने. अगदी भन्नाट उत्तर दिलं त्यांनी कोड्याचं. या प्रकरणाच्या उरलेल्या भागात हे उत्तर काय होतं, ते आपण थोडक्यात बघूया.
क्लिष्ट रचना असलेले जीव, आपण म्हणा किंवा बॅक्टेरिया म्हणा, आत्ता आहेत तसे, एका झटक्यात, आहे त्या रुपात, अवतरलेच नाहीत. अत्यंत संथपणे टप्प्याटप्प्याने, मूळ रचनेपासून इवली-इवली फारकत घेत-घेत आजची रचना घडलेली आहे. कल्पना करा की तुम्हाला लंबूटांग्या बेडूक हवा आहे. तुमच्याकडे असलेल्या विविध बेडकांपैकी तुम्ही एक छानशी; पण त्यातल्या त्यात लांब पायवाली जोडी निवडायची. यांना पिल्लं झाली की पिल्लांचे पाय किती लांब आहेत ते बघायचं. पुन्हा एकदा या पिढीतली त्यातल्यात्यात लंबूटांग जोडी घ्यायची आणि त्यांना पिल्लं होऊ द्यायची. लांड्या पायवाल्यांचा यांच्याशी अजिबात संकर होऊ द्यायचा नाही.
पुन्हा एकदा लंबूटांगवाल्यांची अंडी लंबूटांगवालेच फळवतील. त्यातून बेडूकमासे (Tadpoles) निर्माण होतील. त्यांचेही बेडूक होतील. त्यांना पाय फुटतील. पुन्हा एकदा लंबूटांगवाल्यांचा संकर लंबूटांगवाल्यांशी करा.
साधारण दहा पिढ्यांनंतर असं लक्षात येईल की बेडकांच्या पायांची लांबी आता सुरुवातीपेक्षा जरा जास्त आहे. पहिल्या पिढीतल्या बेडकांपेक्षा दहाव्या पिढीतले सगळेच बेडूक हे लांब पायाचे आहेत. हे निव्वळ उदाहरण आहे. कदाचित असं घडायला वीस किंवा जास्त सुद्धा पिढ्या लागतील, पण शेवटी तुम्ही बेडकाच्या तंगड्या लांबवल्या असतील. आता मोठ्या अभिमानाने तुम्ही जगाला सांगू शकाल की, ‘बघा, मी जगावेगळा बेडूक बनवला!’
ना जादुविद्या हवी, ना जादूची कांडी! वर सांगितलंय, त्याला म्हणतात ‘सिलेक्टिव्ह ब्रीडिंग’ (निवड करत करत निपज). सगळे बेडूक एकसारखे नसतात आणि पायांची लांबी ही अनुवांशिक असते, आई-वडिलांकडून गुणसुत्राद्वारे अपत्याला मिळते. तेव्हा आई-बाबा कोण हे दरवेळी निवडून आपण नवाच बेडूक निर्माण केला, नाही का?
सोप्पं आहे ना?
हे तर काहीच नाही, इथे आपण फक्त बेडकांचे लंबुटांग बेडूक केले. पण समजा मुळात बेडूक न वापरता, अन्य कुठल्या प्राण्यापासून बेडूक तयार केला तर…? समजा पाणसरडा (Newt) घेतला. नाव ‘सरडा’ असलं तरी हे अन्य सरड्यांसारखे सरीसर्प, सरपटणारे प्राणी (Reptiles) नाहीत. हे बेडकांचेच उभयचर (Amphibians) भाईबंध आहेत. यांचे पाय बेडकापेक्षा लांडे असतात, त्यामुळे हे उड्या मारत नाहीत, चालतात. लांब शेपूट असतं त्यांना आणि शरीर बेडकापेक्षा खूपच निमुळतं आणि लांबोडं असतं. आता पाणसरड्यांपैकी त्यातल्या त्यात बेडकासारखे पाणसरडे घ्यायचे, त्यांच्या पिल्लांमधले पुन्हा त्यातल्या त्यात बेडकासारखे पाणसरडे घ्यायचे. इतरांना प्रजननाला मज्जाव करायचा. असं कोट्यानुकोटी वेळा करायचं. दरवेळी निव्वळ लांबपायाचे, आखूड शेपटाचे, जरा-जरा बेडकासारखे आई-बाबा निवडायचे. दरवेळी निव्वळ त्यांचाच संकर होईल असं बघायचं. होत-होत अंतिमतः तुम्ही ‘बेडूक’ निर्माण करू शकता. कुठल्याच पिढीत तुम्हाला नाट्यमय बदल दिसणार नाही. बहुतेक प्रजा आपल्या आई-बाबांसारखीच निपजेल. पण काही पिढ्यांनंतर शेपूट थोडं आखूड असेल आणि पाय थोडे लांब! पाय पुरेसे लांब झाले की एखाद्या पिढीतला पाणसरडा त्या लांबलचक पायांचा उपयोग करून सरपटण्याऐवजी टुण्णकन् उडी की हो मारेल….!
वरच्या सगळ्या वर्णनात आई कोण, बाबा कोण, हे ठरवणारे आपण होतो. एका विशिष्ट पूर्वनिश्चित दिशेने हे पिढ्यांपिढ्यातील बदल व्हावेत म्हणून ती दिशा आपण ठरवली होती. अधिक दाणे देणारी वाणं, अधिक दुभत्या गायी, रोगप्रतिकारकशक्ती असलेली पिकं असं सगळं याच तंत्राने आपले शेतकरी पिढ्यान्पिढ्या करतच आलेले आहेत. डार्विनने मात्र आपल्यासारखा कोणी कर्ता-करविता नसतानाही, निसर्गात हे आपोआप होतं, ही जाण दिली. निसर्गातल्या अनेक घटकांमुळे काही प्रजा ही पुढील पिढी जन्माला घालण्याआधीच मरून जाईल. काही मात्र प्रजनन होईपर्यंत तगून राहील. जे तगतात त्यांचीच गुणवैशिष्ट्ये पुढच्या पिढीत संक्रमित होतात. तगण्यासाठी लागणारे गुणधर्म असतात तेच तेवढे तगतात. पाणसरडे असोत वा बेडूक, साप असोत वा विंचू; जगायला अधिक उपयुक्त अशा गुणांनी युक्त, अशी काही प्रजा असणार. उदाहरणार्थ, काही जीवांना जगण्याच्या स्पर्धेत लांब पाय उपयुक्त असतात. बेडकांना किड्यांवर झेपावायला, किड्यांना बेडकापासून निसटायला, चित्त्यांना चितळ पकडायला किंवा चितळांना चित्ता चुकवायला… सबब, असे लांबूटांगे जीव हकनाक मरणार नाहीत. जगतील, तगतील, त्यांना संतती होईल. ही अर्थातच लंबूटांग असेल. पिढ्यान्पिढया लांब पायाचे गुणसूत्रं संक्रमित होतील. अधिकाधिक प्रजा लंबूटांग असेल. थोडक्यात जे आपण जाणूनबुजून पाणसरड्याच्या बाबतीत केलं आणि लंबूटांग प्रजा निर्माण झाली, तेच इथे कोणी मुद्दाम न करताही घडून आलेलं आहे. कोणी कसबी कारागीर नसताना, कोणी कर्ताकरविता नसताना; आपोआप निसर्गतः निव्वळ जगण्याच्या स्पर्धेतून, हे घडलं. पुढच्या पिढीत जीन्स संक्रमित करेपर्यंत जगण्याच्या स्पर्धेत टिकून राहणं महत्त्वाचं. ‘जगण्याची स्पर्धा’ हाच तो निवड करणारा, कर्ता-करविता, अदृश्य हात. यालाच म्हणतात ‘नैसर्गिक निवड’.
पुरेशा पिढ्यांनंतर पाणसरड्यांसारख्या पूर्वजांपासून बेडकासारखे वंशज निपजतात. प्रचंड पिढ्यांनंतर माशासारख्या पूर्वजांपासून माकडासारखे वंशज निपजतात. आणखी युगं लोटली की बॅक्टेरिया कुळातल्या पूर्वजांना, वंशज म्हणून माणूस लाभतो! हे नेमकं अस्संच घडलं असणार. सध्या अस्तित्वात असलेल्या आणि सध्या अस्तित्वात नसलेल्याही प्रत्येक जीवाचा अवतार असाच झाला आहे. पिढ्यान्पिढ्या म्हणजे नेमक्या किती पिढ्या, हे जरा तुमच्या आमच्या कल्पनेबाहेरचं आहे. हे विश्व हजारो कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आलं. जीवसृष्टी ही सुमारे साडेतीन हजार कोटी वर्षांपासूनची आहे. उत्क्रांती घडून येण्यासाठी हा वेळ पुरेसा आहे.
डार्विनच्या या कल्पनेला ‘नैसर्गिक निवडीतून उत्क्रांती’ असं म्हटलं जातं. आजवर मानवी मनात तरळलेल्या सगळ्याच चमकदार कल्पनांपैकी ही एक. याच्या फलस्वरूप सजीवसृष्टीचा सारा रूपबंध उलगडला जातो. या महत्त्वाच्या संकल्पनेकडे आपण पुढे पुन्हा-पुन्हा येणारच आहोत. सध्या एवढंच लक्षात घेऊ या की, उत्क्रांती ही अतिसंथ आणि प्रचंड वेळखाऊ प्रक्रिया आहे. अत्यंत सावकाशपणे ही प्रक्रिया घडत असल्यामुळेच यातून, बेडूक किंवा राजपुत्रासारखे, महा-गुंतागुंतीचे सजीव निर्माण झाले आहेत. बेडकाचा राजपुत्र हा अकस्मात घडणारा बदल आहे आणि म्हणूनच प्रत्यक्षात अशक्य आहे. उत्क्रांती हे रास्त उत्तर आहे, त्याचा पुरावा आहे. मुंगीच्या पावलांनी होणार्या उत्क्रांतीऐवजी कोणा कसबी कारागिरानं एका फटक्यात आजची सजीवसृष्टी निर्माण केली किंवा बेडकापासून जादूने राजपुत्र तयार होतात, अशा कथा म्हणूनच भाकडकथा ठरतात. याच कारणास्तव छूमंतर म्हणून भोपळ्याची बग्गी होऊ शकत नाही. बग्ग्या काही बेडकांसारख्या किंवा राजपुत्रांसारख्या, निसर्गतः उत्क्रांत होत नाहीत. पण विमानं आणि वाहनं, कॉम्प्युटर आणि कुर्हाड, हे सारं मानवनिर्मित आहे. असा मानव, जो स्वतः उत्क्रांतीचं फलित आहे. माणसाचा तल्लख मेंदू, त्याचे कसबी हात हे देखील पाणसरड्याच्या शेपटासारखे किंवा बेडकांच्या पायासारखे, नैसर्गिक निवडीतून ‘उत्क्रांती’चं फलित आहेत. उत्क्रांत झालेल्या या अफाट मेंदूतून माणसाने बग्ग्या बनवल्या, गाड्या बनवल्या. रागदारी, घड्याळ आणि वॉशिंग मशीन बनवलं. सूर, सुरा आणि सुरी असं काय-काय बनवलं. यात ना कसली जादू आहे ना हातचलाखी. सारं काही सुसंगतपणे, सुंदरपणे समजत जातं आपल्याला.
पुस्तकात पुढे मी ठायी-ठायी दाखवून देणार आहे की विज्ञानाच्या दृष्टीतून भवतालचं सारं जग जादुई, मायावी, विस्मयी वाटायला लागतं. पण ही वेगळीच जादू आहे, वेगळीच माया आहे ही! सत्य गवसल्याचा, कार्यकारणभाव समजल्याचा हा विस्मय आहे. या अस्सल जादूपुढे त्या अतिनैसर्गिक भाकडकथा, फुसक्या, फुटकळ आणि बेगडी ठरतात. विश्वरूपाचं हे सत्यदर्शन, यात अतिनैसर्गिक काही नाही, यात कसली हातचलाखी नाही. हे निव्वळ अद्भुत आहे अद्भुत! हे सत्य अद्भुत आहे!! हे सत्य आहे म्हणूनच अद्भुत आहे!!!
– डॉ. शंतनु अभ्यंकर, संपर्क : 98220 10349
Copyright c 2011 by Richard Dawkins Ltd. All right reserved.