पाच वर्षांची कोर्टबाजी, साक्षीदारांचे खून, पीडित मुलीला, तिच्या कुटुंबियांना, वकिलांना जीवे मारण्याच्या धमक्या, भक्तांकडून दहशत माजवून न्यायालय, शासन, पोलीस यांच्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न, सत्ताधारी, विरोधक राजकारणी यांची छुपी-उघड सहानुभूती, मदत, स्वत:ला धर्मरक्षक म्हणवणार्या सनातनी गुंडांचे उघड समर्थन, देशातील सर्वांत नामवंत वकिलांची फौज उभी करूनही आसारामला अखेर कोर्टाने 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे त्या पीडित मुलीने, तिच्या आईवडिलांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लढवलेली कोर्टातील किमान पहिली लढाई तर जिंकली. ही लढाई किती विषम होती, याची कल्पना आपण याच अंकात छापलेले त्या पीडित मुलीचे वकील पी. सी. सोलंकी यांचे छोटेसे मनोगत वाचल्यावर लक्षात येईल. हरियाणातल्या डेरा सच्चा सौदाचा बाबा राम-रहीम याच्या विरोधातही उभ्या राहिलेल्या त्याच्याच डेर्यातील दोन साध्वींनी व त्यांच्या कुटुंबियांनी दाखवलेले धाडस, सोसलेला त्रास व त्याला इतर काही विवेकवादी कार्यकर्त्यांनी दिलेली साथ यामुळेच तो तुरुंगात जाऊ शकला.
देशभरात बुवाबाजीच्या अनेक प्रकरणांत अशाच प्रकारे पीडितांना आपल्या जीवावर उदार होऊन त्या-त्या बुवांविरोधात लढावे लागते व न्याय मिळवावा लागतो. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जादूटोणाविरोधी कायद्याचे हत्यार हाताशी असल्याने व महाराष्ट्र अंनिससारखी संघटना पीडितांच्या पाठीशी उभी राहत असल्याने ही लढाई काही अंशी तरी सुसह्य होते. नुकत्याच नवी मुंबईतील बेलापूर येथे झालेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याच्या प्रशिक्षण शिबिराच्या वेळेस पीडितांचे अनुभवकथन ऐकताना हे प्रकर्षाने जाणवले. महाराष्ट्र अंनिसने छेडलेल्या जातपंचायतविरोधी आंदोलनाने व त्या आंदोलनाच्या दणक्याने निर्माण झालेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यामुळे व महाराष्ट्र अंनिससारख्या संघटनेच्या भक्कम व सक्रीय हस्तक्षेपामुळे जातबहिष्कृत पीडितांना जातपंचायतीच्या अन्यायाविरोधात उभे राहण्याचे बळ मिळाले.
पण हे फारच अपुरे आहे, हेही जाणवते. आसाराम, राम-रहीम, रामपाल अशा तत्सम अनेक बाबांची दुष्कृत्ये पुराव्यानिशी चव्हाट्यांवर आली, न्यायालयाने त्यांना आजन्म तुरुंगाची हवा दाखवली तरी समाजावर व्यापकपणे असणारा बुवाबाजीचा-बुवाशरण मानसिकतेचा (डॉ. हमीद दाभोलकरांनी लिहिलेल्या आपल्या एका लेखात हा अतिशय योग्य शब्द वापरलेला आहे.) प्रभाव फारसा काही कमी झालेला दिसत नाही. या मानसिकतेला छेद देण्याचा प्रयत्न अगदी थेट चार्वाक, गौतम बुद्धापासून संतचळवळीपासून फुले, शाहू, आंबेडकर व डाव्या चळवळीच्या परंपरेने केलेला आहे. अलिकडच्या काळात शहीद डॉ. दाभोलकरांसारखा मोहरा गमावला, तरी ही परंपरा विवेकाने पुढे नेण्यात महाराष्ट्र अंनिस अग्रेसर राहिलेली आहे. त्यामुळे या मानसिकतेला तडे जरूर गेले; पण तिला समूळ नष्ट करण्यात यश आलेले नाही, हे तर स्पष्ट आहे.
आजची परिस्थिती तर या बुवाशरण मानसिकतेला अत्यंत पोषकच आहे. आजच्या सत्ताधार्यांचे केवळ हितसंबंधच नव्हे, तर अस्तित्वच या बुवाशरण मानसिकतेभोवती गुंतलेले असल्याने ती मानसिकता जास्तीत जास्त कशी बळकट होईल, अशाच पद्धतीने ते त्यांच्या अर्थकारण, समाजकारण, राजकारणाला गती देण्यात गुंतलेले आहेत. त्यांची घटनाविरोधी, बेताल, अवैज्ञानिक वक्तव्ये, इतिहासाचे विकृत धर्मांधीकरण करण्याची धडपड, शिक्षण क्षेत्रातील त्यांची ढवळाढवळ, सत्ताकारणात व्यक्तिपूजेचे, धनशक्तीचे माजवलेले स्तोम, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी, स्त्रिया यांच्यावर होणार्या वाढत्या अत्याचाराचे प्रमाण, आजच्या बाजारू अर्थकारणात विकासाचे ढोल जरी बडविले जात असले, तरी आर्थिक विषमतेची दरी मात्र प्रचंड वाढताना दिसत आहे. कामगार, शेतकरी, नोकरदार हे या बाजारकेंद्री अर्थकारणात पुरे नागवले जात आहेत. आजचा आपल्या देशाचा मानवी निर्देशांक मागास समजल्या जाणार्या देशांच्या तुलनेत कितीतरी खाली घसरलेला आहे. आरोग्य, शिक्षण, निवारा आणि इतर सामाजिक सुरक्षेवरचा सार्वजनिक खर्च दिवसेंदिवस कमी होत चालला आहे आणि या सेवांच्या खासगीकरणामुळे त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत. स्वातंत्र्यानंतर स्वत:ला कल्याणकारी म्हणवून घेणारे भारतीय शासन आता या मूलभूत सेवासुविधांपासून अंग काढून घेत आहे. सर्वसामान्य माणसाला सुरक्षा देणार्या सर्व भौतिक व्यवस्था त्याच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे असुरक्षिततेच्या भावनेतून साहजिकच तो भ्रामक, दैवी, आध्यात्मिक यांचा आधार घेत आहे. ही असुरक्षिततेची, अस्वस्थतेची भावना त्याला बुवाशरण मानसिकतेकडे ढकलत आहे. या असुरक्षिततेच्या भावनेची व्यापकता, भयानकता जाणून घेऊन सर्वसामान्य माणसांच्या व्यापक प्रश्नांना भिडून ते सोडविल्याशिवाय बुवाशरण मानसिकता समूळ नष्ट होणार नाही, हे तर खरेच आहे.
पण ते ध्येय गाठण्याच्या संघर्षात आजच्या सनातनी वातावरणात महाराष्ट्र अंनिसचे काम समाजातील विविध विभागात पसरणे, बुवाबाजीला चाप लावणारा जादूटोणाविरोधी कायदा होणे, जातपंचायतीच्या मनमानीला आव्हान देणारा सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा होणे, आसाराम, राम-रहीम, रामपाल यांच्या सारख्या माजलेल्या बुवांना तुरुंगात जावे लागणे या सकारात्मक घटनांचे महत्त्व काही थोडेथोडके नाही.