Categories
प्रासंगिक

सहारनपूर-शब्बीरपूर दलित हल्ला धर्मांध राजकारणाचे बळी

जुलै - २०१७

हर हर महादेव, जय श्रीराम, राणा प्रताप की जय, आंबेडकर मुर्दाबाद, चमार चट्टा मुर्दाबाद देश में रहना तो मोदी मोदी कहना है, परदेश (प्रदेश) में रहना है, तो योगी योगी कहना है, अशा घोषणांचा जयघोष करीत उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील शब्बीरपूर गावच्या दलितांच्या वस्तीवर आणि संत रोहिदास मंदिरावर हजारो ठाकूरांचा जमाव नंग्या तलवारी, बंदुका, शिगा, पेट्रोल बॉम्ब, दांडके घेऊन नि:शस्त्र दलितांवर अंदाधुंदपणे हल्ले करीत होता. अनेक घरांवर पेट्रोल बाँब फेकण्यात आले, ज्यात 65 घरे जळाली. हल्लेखोरांकडून काही घरे जाळण्यासाठी छोट्या गॅस सिलिंडरचाही वापर करण्यात आला. या जाळपोळीत शाळेतील मुलांची पुस्तके-वह्या, घरातील धान्य व अन्य प्रापंचित साहित्याची राख झाली. घराबाहेर उभ्या असलेल्या सायकली, मोटारसायकली पेटविण्यात आल्या आणि हे सर्व पोलिसांच्या उपस्थितीत घडत होते व पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेऊन हल्लेखोरांना पाठीशी घालण्याचे काम करीत होते.

दलितांवर केलेल्या या भीषण हल्ल्याची पार्श्वभूमी अशी आहे की, शब्बीरपूर गावातील चर्मकार जातीतील दलितांनी काही वर्षांपूर्वी बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे ते पाईक आहेत. संत रोहिदासांच्या बंडखोर विचारांचेही ते चाहते आहेत आणि यावर्षीच्या 14 एप्रिल या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी त्यांना गावातील संत रोहिदास मंदिराच्या आवारातील मोकळ्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आकाशाकडे बोट दाखवित असलेला उभा पुतळा त्यांना बसवायचा होता. हा पुतळा बसविण्यासाठी आंबेडकर जयंतीच्या दोन दिवस आधी त्या जागेवर चबुतरा बसविण्याचे बांधकाम सुरू असताना स्थानिक ठाकूर समाजाच्या लोकांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली. ते म्हणू लागले की, ‘धेड की मूर्ती नहीं लगने देंगे।’ तेव्हा दलितांनी त्यांचे ऐकण्यास नकार दिला. नंतर ठाकूर लोक सांगू लागले की, ‘धेड की उपर तरफ दिखनेवाली उंगली नीचे लो।’ तेव्हा त्यालाही दलितांनी नकार दिल्यावर ठाकूर म्हणू लागले की, रोहिदास मंदिराच्या आवाराची भिंत खूप उंच बांधा, याने धेड की मूर्ती बाकी लोगोंको नही दिखनी चाहिये’ ठाकूरांची सर्वजातीय व द्वेषमूलक वृत्ती दलितांनी नाकारल्यामुळे ठाकूर खवळले व त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांमार्फत पोलिसांवर दबाव आणून चबुतरा बनविणार्‍या अग्निभास्कर बौद्ध या बांधकाम करणार्‍या कारागिराला पोलिसांनी पुतळ्यास परवानगी नसल्याने बांधकाम थांबविण्यास सांगितले. याबाबत स्थानिक दलित कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, पुतळा मंदिराच्या जागेतील आवारात आहे व जागा आमच्या मालकीची असल्याने प्रशासनाच्या परवानगीची गरज नाही. परंतु पोलिसांनी दलितांचे न्याय्य म्हणणे ऐकून न घेता ठाकूरांच्या दबावाखाली बांधकाम बंद पाडले व भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकाराचा पुतळा बसविण्यास जातीय मानसिकतेतूनच विरोध केला. हे रोहिदासांचे मंदिर गावातील मुख्य नाक्यावर असल्याने रोजच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन सर्वांना घ्यायला लागेल, याच कारणास्तव पुतळ्यास विरोध होतो आहे, असे स्थानिक दलितांचे मत आहे. गावात तणाव वाढू नये म्हणून स्थानिक दलितांनी 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम शांतपणे साजरा केला. परंतु त्या दिवशीही ठाकूर समाजातील 50 पेक्षा अधिक तरुणांनी मोटारसायकलवर रोहिदास मंदिराजवळ येऊन, चमार चट्टे मुर्दाबाद, आंबेडकर मुर्दाबाद, राणा प्रताप झिंदाबाद अशा दलितांचा अपमान करणार्‍या घोषणा देऊन दलितांना हिणविण्याचा प्रकार केला. त्यामुळे दलित समाजात प्रचंड संताप निर्माण झाला होता. परंतु दलितांनी संयम पाळला. ठाकूरांचे दलितद्वेषाचे दुसरे कारण म्हणजे गावचा दलित समाजातील सरपंच हा एकदा राखीव जागेवरून आणि दुसर्‍यांदा जनरल जागेवर मुस्लिम, ओबीसींच्या पाठिंब्यावर पुन्हा निवडून आला आणि हे ठाकूरांच्या उच्चवर्णीय मानसिकतेला व अहंकाराला न मानविणारे आहे आणि हाच सरपंच डॉ. बाबासाहेबांच्या पुतळा बसविण्यास पुढाकार घेत असल्याने त्याच्याविषयीचा रागही ठाकूरांच्या मनात होता आणि या द्वेषातूनही हा हल्ला झाला.

या हल्ल्यामागील दुसरी घटना म्हणजे दि. 20 एप्रिल रोजी शब्बीरपूर जवळील सडक दुधली या गावात आंबेडकर जयंतीच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचे खासदार राघव लखनपाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांच्या सहभागाने बेकायदेशीररित्या शोभायात्रा काढण्यात आली. ज्यात श्रीरामाचा जयघोष, ‘मंदिर वही बनायेंगे’च्या घोषणा देत नंग्या तलवारी, बंदुका, काठ्या मिरवत दहशतीचे वातावरण निर्माण केले गेले. सडक दुधली गाव हे जातीय-धार्मिक तणावासाठी संवेदनशील मानले जात असल्याने गेली दहा वर्षेतेथे मिरवणुकीस बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही पोलिसांचे कडे तोडून शोभायात्रा गावात घुसविण्यात आली आणि गावातील मशिदीजवळ आल्यावर मुद्दामहून मुस्लिम धर्माविरुद्ध शिवीगाळ व नारेबाजी करून धार्मिक तणाव वाढवून मशिदीवर दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे मुुस्लिम समुदायाकडूनही प्रतिकार करण्यात आला व वातावरण चिघळले आणि मिरवणुकीतल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात मारहाण व हिंसाचाराला सुरुवात केली. अनेक दुकाने, घरे पेटविण्याचा प्रयत्न केला. दुकानातील सामान रस्त्यावर फेकले व लूटमार केली. पोलीस कमिशनरच्या गाडीवरही हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांना गावाच्या बाहेर हुसकावले. तेव्हा त्यांनी देहरादून-सहारनपूर महामार्ग बंद पाडला व गाडीतील प्रवाशांनाही बेदम मारहाण केली. मोटारसायकली, गाड्यांची तोडफोड केली. हा सर्व हिंसाचार-धुमाकूळ सत्ताधारी पक्षाचे खासदार, आमदार, नेते दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत कायदा धाब्यावर बसवून घालत होते. या हिंसाचाराला रोखण्याचे व कायदा-सुव्यवस्था पाळण्याचा तेथील पोलीस अधीक्षक मा. लवकुमार यांनी प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर राग व्यक्त करण्यासाठी व सूड घेण्यासाठी या सत्ताधारी नेत्यांच्या गुंड जमावाने पोलीस अधीक्षकांच्या घरावरच हल्ला केला. त्यांच्या सरकारी घरातील व कार्यालयातील सामान, फर्निचर, नावाची पाटी तोडली. सी.सी.टी.व्ही. कॅमेरे फोडले. पोलीस अधीक्षकांची पत्नी घाबरून आपला जीव वाचविण्यासाठी दोन लहान मुलांना घेऊन मागच्या दाराने पळाली व गायीच्या गोठ्यात आश्रय घेतला. या हल्ल्याच्या प्रसंगाचे वर्णन करताना त्या पत्नीने प्रसारमाध्यमांना सांगितले, ‘मैं आय.पी.एस.की पत्नी हूँ। अलिगढ, गोरखपूर, मुरादाबाद जैसे संवेदनशील जिले में पती के संग रही हॅूं, लेकीन सबसे सुरक्षित समझी जानेवाली एस.एस.पी. की कोठीपर ढाई घंटे तक मैने जो मन्जर देखा उससे मैं सहम गई हूँ। मैने अपनी छ: और आठ सालके बच्चोंकी आँखोंमें जो खौफ देखा, उसे भूल नहीं सकती। पहले वे कभी इतनी जोरसे चीख कर नहीं रोए, जितना कल शामको।’

एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याच्या पत्नीची अशी हतबल अवस्था असेल, तर गावातील सर्वसामान्य लोकांची या सत्ताधारी हिंदुत्ववादी गुंडांच्या दहशतीखाली काय स्थिती झाली असेल, याचा विचार करावा. एवढी सगळी गुंडगिरी भाजपच्या खासदार-आमदार नेत्यांनी केली, ज्याबाबत देशभरातील प्रसारमाध्यमांकडे टीकेची झोड उठवली, तरी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने आजतागायत या हिंसाचारप्रकरणी एकालाही साधी अटकही झाली नाही व गुन्हेही दाखल केले नाहीत. भाजप नेत्यांचा सडक दुधली गावात आंबेडकरांच्या नावाने दलित-मुस्लिम समाजात दंगे घडविण्याचा प्रयत्न होता. परंतु स्थानिक दलितांनी भाजपचा हा डाव ओळखला व ते हिंदुत्ववाद्यांच्या खोट्या आंबेडकरप्रेमाला बळी पडले नाहीत. भाजपच्या या हिंसाचाराचा सहारनपूर मधील भीम आर्मीपासून अनेक आंबेडकरवादी-दलित संघटनांनी तीव्र निषेध केला व जातीय-धार्मिक सलोखा राखला. या दंगलीमागे दलित-मुस्लिम मतांचे धु्रवीकरण करून आगामी होणार्‍या सहारनपूर महापालिकेच्या निवडणुकीत हिंदू-दलित मतांचा लाभ उठविण्याचा भाजपचा यामागे प्रयत्न होता, जो दलितांनी हाणून पाडला.

सहारनपूर परिसरातील दलित आपल्या भूलथापांना बळी पडत नाहीत व आपल्या जाळ्यात अडकत नाहीत, हे भाजपच्या लक्षात आल्याने त्यांनी परिसरातील सर्व ठाकूर-रजपूतांना एकत्र आणण्यासाठी दि. 5 मे 2017 रोजी सहारनपूर मधील शब्बीरपूरजवळच्या सिमलावा या गावात राणाप्रताप जयंतीचे औचित्य साधून महासंमेलन बोलविले. या संमेलनात भाजपचे खासदार, आमदार आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार फुलनदेवीचा खुनी शेरोसिंग राणा याला तो जेलमधून पॅरोलवर बाहेर असताना बोलविले. या संमेलनाची प्रचंड मोठी मिरवणूक हातात तलवारी-बंदुका घेऊन डीजेचा दणदणाट करीत पोलीस परवानगीशिवाय काढली. तेव्हा शब्बीरपूर गावात दलित-ठाकूरांमध्ये तणाव असल्याने परवानगी देऊ नये, असे तेथील सरपंच शिवकुमार यांनी पोलिसांना सांगितले. डीजे वाजविण्यासही प्रतिबंध घालण्याची विनंती केली. पोलिसांनी डीजे वाजविणे थांबविल्यावर मिरवणुकीतील लोकांनी चमरचट्टे मुर्दाबाद, आंबेडकर मुर्दाबाद, रोहिदास मुर्दाबाद अशा दलितविरोधी घोषणा देत मिरवणूक नेली. नंतर गावातून मिरवणूक पुढे काही अंतरावर गेल्यानंतर त्यातीलच 40-50 मोटारसायकलस्वार पुन्हा दलित वस्तीत येऊन तुम्ही मिरवणुकीला व डीजे वाजवायला विरोध का केला, असे विचारत त्यांनी दलितांना मारहाण केली. रोहिदासाच्या मंदिरात घुसून मूर्तीची विटंबना केली आणि मंदिरात, घरांवर ज्वलनशील द्रव असलेले फुगे फेकून आगी लावण्यास सुरुवात केली. ज्या दलितांनी त्यांना विरोध केला, त्यांनाही त्यांनी तलवारी, लोखंडी शीगा, काठ्यांनी बेदम मारहाण केली. याच मारहाणीच्या, आगीच्या कोलाहलात सुमित नावाचा राजपूत समाजाचा तरुण हल्लेखोर प्रचंड धुरात श्वास घुसमटल्याने अत्यवस्थ झाला. त्याला अन्य हल्लेखोरांनी ओढून नेल्यानंतर काही काळाने त्याचे निधन झाले. त्याच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरावर कुठल्याही जखमा नसल्याचे व श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट म्हटले असतानासुद्धा त्याच्या मृत्यूला दलितांनाच जबाबदार ठरविण्यात आले आणि अन्य दोन राजपूत तरुणांनाही शब्बीरपूरच्या दलितांनी ठार मारल्याची अफवा राजपूत संमेलनात पसरवून भडकाविण्यात आले. शब्बीरपूरच्या दलितांनी हिंदू धर्मातून बाहेर पडून केलेले बौद्ध धर्मांतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यासाठी धरलेला आग्रह आणि सतत दोनदा निवडून आलेला दलित सरपंच या सर्व गोष्टीमुळे उच्चवर्णीय ठाकूर-राजपुतांचा जातीय अहंकार दुखावला गेला होता, दलित आता सन्मान व स्वाभिमानाने जगू पाहताहेत, ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणून प्रतिजबाब देतात, बदलते वास्तव सहन न झाल्यामुळे व जातीय विद्वेषाची भावना उफाळून आल्यानेच त्या संमेलनातील हजारो लोक दलित वस्तीवर चाल करून गेले व घरांची राखरांगोळी केली. केवळ शब्बीरपूरच नाही, तर वाटेतील महेशपूर गावातील चर्मकार-दलितांच्या घरावरही हल्ले केले व दलितांना मारहाण केली.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे योगी आदित्यनाथ या ठाकूरांचे सरकार आल्यानंतर योगीने स्थापन केलेली ‘हिंदू युवावाहिनी’ ही गुंडांची संघटना अधिकच आक्रमक झाली आहे. त्यांनी गोरक्षेच्या नावाखाली अनेक मुुस्लिमांवर खुनी हल्ले केले, ‘लव-जिहाद’च्या नावाखाली अनेक तरुण-तरुणींवर हल्ले केलेत आणि वर उल्लेख केलेल्या सडक दुधलीमध्ये तर पोलीस अधीक्षकांच्या घरावरच हल्ला करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे आणि एवढा हल्ला करूनही योगी सरकारने कुणावरही कारवाई केली नाही. उलट ज्या भाजप खासदार-आमदारांनी पोलिसांच्या घरावर हल्ला केला, त्यांच्याच सांगण्यावरून मा. लवकुमार यांच्यासारख्या कर्तव्याचे पालन करणार्‍या प्रामाणिक आय.पी.एस.अधिकार्‍यांची सहारनपूरहून बदली केली गेली. वर उल्लेख केलेल्या ज्या अग्निभास्कर बौद्धने रोहिदास मंदिरात पुतळा बसविण्याचा प्रयत्न केला व तो आणि त्याची पत्नी तलवारीच्या हल्ल्याने जबर जखमी होऊन सुमारे 15 दिवस रुग्णालयात अत्यवस्थ होते. त्यांच्यावर 37 कलमांचे गुन्हे दाखल केलेत. कायद्याचे पालन करणारा शिवकुमार या गावच्या दलित सरपंचाला पोलिसांनी खोट्या गुन्ह्याखाली तुरुंगात ठेवले आहे. गावातील सर्व दलित तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकविले आहे. आज दलित वस्तीत एकही तरुण नाही. काहीजण पोलिसांच्या व ठाकूरांच्या भीतीने घरातून पळून छुपे जीवन जगत आहेत. शासनाने जो राजपूत तरुण मरण पावला, त्याला 15 लाखांची व जखमी राजपूत तरुणांना एक लाखाची त्वरित मदत दिली. परंतु ज्या दलितांच्या घर-संसाराची राख झाली व जे जखमी झाले, त्यापैकी फक्त काही जखमींना अवघ्या 25 हजारांची मदत दिली. परंतु घर-संसार उभे करण्यासाठी फुटकी कवडीही दिली नाही. यामधून भाजपच्या योगी सरकारचे जातीयवादी रूप पुन्हा पाहायला मिळाले आहे. या घटनेस जवळपास एक महिन्यापेक्षा अधिक काळ ओलांडला; पण शब्बीरपूरच्या दलितांचा संसार मात्र अजूनही राखेत उघड्यावरच भेसूर अवस्थेत पडला आहे.

शब्बीरपूरच्या दलितांवरील निर्घृण हल्ल्याची संतप्त प्रतिक्रिया उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश व दिल्ली परिसरातील शिक्षित दलित तरुणांमध्ये अ‍ॅड. चंद्रशेखर रावण यांच्या पुढाकाराने दि. 21 मे रोजी दिल्लीत जंतर-मंतर येथे भरलेल्या ‘भीमआर्मी’च्या हजारोंच्या विशाल रॅलीत पाहावयास मिळाली. ब्राह्मणी-भांडवली प्रसारमाध्यमांनी जरी त्याची ठळक बातमी दिली नाही; परंतु सोशल मीडियातून ती घरोघरी गेली आणि भीमआर्मीच्या या विशाल रॅलीचा धसका घेऊन हा दलित प्रतिरोध अ‍ॅड. चंद्रशेखरला अटक करून जातीयवादी सरकार दडपायचा प्रयत्न करीत आहे. पण भीमआर्मीला देशभरातील दलित तरुणांकडून व पुरोगामी, समतावादी फुले-आंबेडकरी संघटनांचा जो वाढता पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे सरकारपुढे नवे आव्हान उभे राहील.

-सुबोध मोरे

subodhvidrohi@gmail.com