Categories
प्रासंगिक

हिंसा अंतिम उत्तर नाही

मार्च - २०१८

मानवी समाजात अहिंसा हे नेहमीच आदर्श मूल्य राहिले आहे. हे आदर्श मूल्य व्यवहाराच्या स्वरुपात समाजजीवनात अस्तित्वात आले. यासाठी मानवजातीची धडपड आपणास दिसून येते. यासाठी समाजजीवनातून हिंसेचा पूर्ण नायनाट व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न होताना दिसतात. तरीपण हिंसा अक्राळ-विक्राळ स्वरुपात समाजजीवनात प्रकट होत राहते. ‘खरा तो एकचि धर्म- जगाला प्रेम अर्पावे’ हे साने गुरुजींनी किती साध्या-सरळ शब्दांत व्यक्त केलेले तत्त्वज्ञान; पण हे आजवर पचनी का पडू नये? उलट हिंसाच मानवजातीचा आज जणू व्यवहार बनू लागली आहे. याचा भौतिकवादी द़ृष्टीतून काही विचार करता येईल का? कारण अखेर विचार, मूल्य, भावना ही भौतिक परिस्थिती उपजत असते. भौतिक परिस्थितीत हिंसा आहे. म्हणूनच त्याला उत्तर म्हणून अहिंसा हे मूल्य आदर्श म्हणून पुढे येते. आता हिंसा का आहे? ती विशिष्ट माणसांची विकृती आहे का? आणि विकृती असली, तरी तिचा उद्भव कशामुळे आहे? त्याला कुठली भौतिक परिस्थिती जबाबदार आहे? अशा पद्धतीने विचार केला; तरच आपण थोड्याफार प्रमाणात सत्याच्या जवळपास पोचू शकतो.

“वैराने वैर संपत नाही, हिंसेने हिंसा संपत नाही,’ असे जरी बुद्धाने म्हटले असले तरी स्वरक्षणासाठी हिंसेचा पर्याय बुद्धाने मोकळा सोडला आहे. तुमच्या मनात हिंसेची इच्छा असता कामा नये, असे बुद्धाचे प्रतिपादन आहे; पण हिंसेची इच्छा मनात का उद्भवते? तर बुद्धाचे उत्तर आहे तृष्णा, अभिलाषा, आहे त्यापेक्षा अधिकची हाव. यालाच आपण आधुनिक भाषेत हितसंबंधाचा झगडा म्हणतो, जो परस्परविरोधी हितसंबंध असणार्‍या जातवर्गात असतो. तो स्त्रीला दास्यात ठेवणार्‍या पुरुषसत्तेत असतो, हिंसेचा उद्भव होतो इथे. या सगळ्या झगड्याचा अंत झाल्याखेरीज केवळ मानसिक परिवर्तनातून हिंसेचा नायनाट करता येणार नाही.

स्वतंत्र भारतातील पहिली राजकीय हत्या महात्मा गांधींची झाली, जे बुद्ध-महावीरांनी उद्घोषित केलेल्या अहिंसेचे आधुनिक काळातील सर्वांत मोठे प्रवक्ते होते. गांधी म्हटले की, अहिंसाच आठवते, इतके ते या मूल्याशी एकरूप होते. सनातन हिंदूराष्ट्रनिर्मितीत गांधी अडथळा ठरणार, ही खूणगाठ मनाशी पक्की करूनच त्यांची हत्या घडवण्यात आली. ही हत्या करण्यामागे एक विचार आहे. व्यक्ती कोण आहे, याला काही अर्थ नाही. हा जो खुनी विचार आहे, त्याला आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कसलाही नीती-अनीतीचा विधिनिषेध नाही. कारण भारतीय परंपरेतील सनातन वैदिक धर्म त्यांना तेच शिकवतो. आजवर ते हिंसेचा आधार घेतच इथपर्यंत आले आहेत. त्यांचे सगळेच धर्मग्रंथ हिंसेचा पुरस्कार करतात. त्यांचे सगळेच देव हत्यारबंद आहेत. हिंसेचा पुरस्कार आणि मानवतावादाचा पूर्ण अभाव हेच त्यांच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे. महात्मा गांधी पण एक व्यक्ती राहिले नव्हते, ते एक विचार बनले होते. ज्या विचारांनी करोडो जनता प्रेरित झाली होती. महात्मा गांधी स्वत:ला सुरुवातीच्या काळात सनातनी हिंदू म्हणवून घेत. यावर नेहमी टीका केली जाते; परंतु त्यांचे हे सनातनी हिंदू असणे कशाप्रकारचे आहे, होते, ते नंतर कसे बदलत गेले, हे कोणी सांगत नाही. त्यांची धार्मिकताही सर्वसमावेशक अशी होती आणि त्यांच्या धार्मिकतेलाही मानववादाचे अधिष्ठान होते. आंतरजातीय लग्नांनाच मी हजर राहीन, ही त्यांनी अखेरी-अखेरीस घेतलेली भूमिका जातिव्यवस्था समर्थक सनातन धर्माची मृत्युघंटा वाजविणारीच होती. इथे ते एकदम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जोडीला येऊन बसतात. गांधीहत्येसाठी ब्राह्मणवाद्यांना इतकी कारणे पुरेशी होती.

महात्मा गांधींच्या हत्येनंतर तथाकथित हिंदुत्ववादी राजकीयदृष्ट्या काळ्या यादीत गेले, त्यानंतर आज साठ-सत्तर वर्षांनी ते उजळमाथ्याने मिरवत आहेत. गांधीजींच्या खुन्याचे मंदिर बांधण्याचे स्वप्न पाहत आहेत; पण आज सत्तेवर येताना रथयात्रा, बाबरी मशिदीचे पतन, गुजरात नरसंहार; यात हजारो लोकांची हत्या दंगलीमध्ये होऊनच ते सत्तेवर आले आहेत आणि आजही हत्या सुरूच आहेत.

आपल्याला गांधीहत्येचा कार्यकारणभाव चटकन समजतो; पण डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांचा कार्यकारणभाव नाही. या हत्या गांधीसदृश्यच हत्या आहेत. गांधी हत्येमागे जे व्यापक हेतू ठेवले गेले होते, ते तत्कालीन नुकसानीचे असले, तरी दीर्घकालीन फायद्याचे होते. तसेच हेतू वरील हत्यांमागे आहेत. सनातनी प्रतिगामी विचारसरणीच्या विरोधात असणार्‍या पुरोगामी विचारसरणीचा खातमा करणे, प्रत्येक जण बोलताना, लिहिताना, मुक्तपणे विचार करणार नाही, अशी अटकळ यामागे आहे. चार्वाक, तुकाराम, बसवेश्वर, चक्रधर यांच्या हत्यांमागील हेतू जसे व्यापक होते, तसेच हेतू या हत्यांमागे आहेत. हे चारही विचारवंत असे आहेत की, व्यक्तिगत स्वार्थी विचारांचा स्पर्शही कधी त्यांच्या जीवनाला झाला नाही. त्यांचे चारित्र्य शुभ्र-धवल, एकही डाग नसलेले आहे. तुकारामांच्या भाषेत ‘देव रोकडा सज्जनी’ असे ते सज्जन आहेत. त्यांचा गुन्हा एकच होता, तो म्हणजे विज्ञानविरोधी, जातीयवादी, धर्मवादी, पुरुषप्रधानवादी, कष्टकरी जनतेच्या विरोधी विचारांचे विष जे सनातन्यांकडून पेरले जात आहे, त्या विषाचा नायनाट करण्यासाठी विचारजागर करणे, बहुजन जनतेला डोळस बनविणे, त्यांचे डोळे त्यांच्या खांद्यावर कसे राहतील, हे पाहणे, तिला विचारप्रवृत्त करणे, अंधश्रद्धाविरोधी बनवणे, आपल्या हक्कांसाठी लढणारी बनवणे आणि हा गुन्हा कुठल्याही प्रस्थापित प्रतिगामी शक्तींसाठी सर्वांत मोठा आहे. म्हणूनच तर तुकारामांच्या अभंगांवर पेशवाईत बंदी घातली होती. या गुन्ह्याला ते माफ करत नाहीत. इतिहास हेच सांगतो; पण त्यांच्या आजही लक्षात येत नाही की, माणूस मारता येतो; पण विचार नाही. महात्मा गांधींच्या ‘आई’ कादंबरीतील आई म्हणते, “सत्य रक्ताच्या नदीत जरी बुडवले, तरी ते वर येईलच” आणि सत्य हे नेहमीच कष्टकरी, बहुजनांच्या बाजूला असते, नेहमीच.

लेखक संपर्क : 9869392157